श्रीकांत विनायक कुलकर्णी
सर्वांनाच सगळ्या गोष्टींची पूर्ण माहिती असणं किंवा प्रत्येकाला प्रत्येक गोष्ट करता येणं शक्य नाही. याच वास्तवाच्या व्यावहारिक जाणिवेतून गावगाडा, बारा बलुतेदारी अर्थात बार्टर सिस्टीम ही जगातील बहुतेक सर्व समाजांमध्ये रुजत गेली. जो पर्यंत मोबदला याअर्थी पैसा चलनात आला नव्हता, तो पर्यंत सगळं म्हटलं तर छान चालत असावं. पैशाचं चलन आलं आणि माणुसकी आणि पर्यायानं समाजाचा ऱ्हास होण्यास सुरुवात झाली. विवादास्पद वाटला तरी हा विषय फार चिंतनाचा आहे, अर्थात या लेखाचा उद्देश वेगळा आहे. तो आहे, होणारा ऱ्हास व त्यातनं होत चाललेलं सार्वत्रिक सुमारीकरण याकडे लक्ष वेधण्याचा आणि तद्नुषंगानं बारा वा तत्सम बलुतेदार या संकल्पनेचं सामाजिक महत्व अधोरेखित करण्याचा. सुरुवातीस विशेष वाटणार नाहीत, अशी काही उदाहरणं पाहू.

१) वृद्ध आई हॉस्पिटलमध्ये असताना तिला बऱ्याच उलट्या होत होत्या. म्हणून तिला एक गोळी देण्याकरता सिस्टर आली व आईला आ करायला सांगून तिने अलगद गोळी व लगतच्या तांब्यातलं पाणी आईच्या घशात सोडलं. पाणी घशात जाताच आई चक्क डोळे विस्फारून उडालीच कारण, पाणी गरम होतं आणि उलट्यांमुळे घसा सोलवटलेला होता. स्पष्टीकरण दिलं गेलं की पेशंटना उकळलेलं पाणीच दिलं जातं. बरोबरच आहे, पण उकळून थोडं कोमट वा गार झालेलं पाणी देणं हे डॉक्टरना अभिप्रेत असेल हे त्या सिस्टरच्या गावीही नसावं?

Two youths attacked with a koyta in Khadki crime news Pune news
पुणे: खडकीत दोघा तरुणांवर कोयत्याने वार
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
loksatta editorial on india s relations with Sheikh Hasina
अग्रलेख : वंग(मैत्री)भंगाचे वास्तव…
Thane , government projects, dust, health,
सरकारी प्रकल्पांमुळेच धुळधाण, नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता
account wise inquiry started against clerk in case of corruption in Jijamata Hospital of Municipal Corporation in Pimpri
पिंपरी : जिजामाता रुग्णालयातील रकमेचा अपहार; लिपिकाची खातेनिहाय चौकशी
sarva jat dharm ekta manch
बांगलादेशातील हिंदू विरुद्ध अत्याचार मोदी सरकारने रोखावेत, सर्व जाती-धर्म एकता मंचची मागणी
Rock dove bird pune, Rock dove, Municipal Corporation pune, pune,
पुणे : पारव्यांना खाद्य टाकताय सावधान…! महापालिका वसूल करणार ‘एवढा’ दंड
diarrhea, Badlapur, girl died diarrhea Badlapur,
अतिसाराने चिमुकलीचा मृत्यू, बदलापुरातील दुर्दैवी घटना, अंधश्रद्धेचा संशय

हेही वाचा >>>नागरिकाचा लाभार्थी झाला, पण…

२) अनेक ठिकाणी खर्च कमी करण्यासाठी किंवा जास्त गार वाटतंय म्हणून एसी बंद करतात. सर्व खिडक्या हवाबंद असताना आणि खोलीत बरेच लोक असताना एसी बंद केल्यास हवा खेळती राहत नाही. अशावेळी थोड्याच वेळात खोलीतील कार्बन डायऑक्साईड वाढतो, हवेत जडपणा येतो, आणि काहींना गुदमरल्यासारखं वाटतं. हे समजून घ्यायची पात्रता त्या एसी बंद करण्यास जबाबदार असणाऱ्या व्यक्तीची नसावी?

३) एकदा नेहमीप्रमाणे व्हॉट्सॲपवर यादी पाठवून काही औषधं मागवली पण लिहून दिलेली सूचना नीटशी न कळल्यामुळे यादीतील दुसरीच औषधं आली. अर्थात हा गैरसमज निस्तरला गेला. पण अशाच प्रकारे एखाद्या अशिक्षित व्यक्तीनं विश्वासापोटी दिली तशीच औषधं घेतली असती तर काय झालं असतं?

४) वरीलप्रमाणेच आजचा कुठल्याही गोष्टीतला ‘तज्ञ’ वा ‘प्रोफेशनल’ हा पूर्ण तज्ञ वा पूर्ण प्रोफेशनल असेलच ही खात्रीच देता येईनाशी झाली आहे, मग तो भले चर्मकार असो वा कपडे शिवणारा व्यावसायिक वा प्लंबर वा अभियंता वा डॉक्टर वा खेळाडू वा शिक्षक वा नेता वा अभिनेता वा अन्य कुणीही.

असो, वरील उदाहरणांतील प्रोफेशनल किंवा तत्सम समाजघटकांनी केवळ कुशल (स्किल्ड) आणि प्रशिक्षित असणं पुरेसं नाही, तर सजग आणि जबाबदार असणंही तितकंच अपेक्षित असतं हे अधोरेखित होतं. पण त्याचबरोबर वास्तवात तसं नाहिये ही सखेद जाणीवही होते. ज्या प्रकारे आणि ज्या प्रमाणात हे असं सुमारीकरण समाजातील अंगोपांगात झिरपलं आहे ते पाहून विषण्णता दाटून येते. दशकानुदशकं होत आलेली ही अधोगती शिक्षण, संस्कृतीपासून अगदी राजकारणापर्यंत सर्वच क्षेत्रांत दिसून येते. ‘३५ टक्क्यांनी उत्तीर्ण होता येतंय, मग त्यापुढे जायची गरजच काय?’ ही वृत्ती सर्वत्र आढळते; अर्थात, नफेखोरी मात्र याला अपवाद आहे. नफेखोरीत ‘आवळा देऊन कोहळा काढायचाच’ ही प्रवृत्ती दिसून येते. हे बेसुमार सुमारीकरण किती खोलवर पोहोचलं आहे आणि त्याचे दूरगामी परिणाम काय असू शकतात, याचा विचार करणं आवश्यक आहे. खालील उदाहरणांतून समाजातील काही महत्त्वाच्या क्षेत्रांतील सुमारीकरणाचं गांभीर्य स्पष्ट होईल.

हेही वाचा >>>नेत्यांनी प्रचार रसातळाला नेला, आता आपण काय करणार?

शिक्षणक्षेत्रातलं सुमारीकरण :

शिक्षण व्यवस्था हे अत्यंत महत्वाचं या अर्थी डोळे उघडणारं उदाहरण आहे जिथे सर्वोत्तम वा सर्वोत्कृष्टतेची कास जाऊन केवळ सरसकट सुमारीकरण उरलंय. शिकवण्यातला बौद्धिक उत्कर्षावरचा कटाक्ष आता निव्वळ नाममात्र किमान पूर्ततेवर लक्ष केंद्रित होण्यात बदलला गेल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये वस्तुनिष्ठ चिंतनात्मक विचारक्षमतेचा विकास होणं तर दूरच पण क्षय होत चालला आहे. परीक्षा पद्धती व अभ्यासक्रम हे विद्यार्थ्यांच्या आकलनापेक्षा पाठांतरकेंद्री जास्त होत गेले आहेत. आणि अर्थातच शिकवणंही अशा परीक्षा ध्यानी घेत तितकंच उथळ, वरवरचं होत गेलं आहे. यामुळे साहजिकच सखोल ज्ञानाचं महत्त्वच कमी होतंय आणि फक्त गुण मिळवणं या एकमेव उद्दिष्टालाच प्राधान्य दिलं जातंय.

परिणामत: विद्यार्थ्यांमध्ये वास्तव जीवनातील आव्हानं पेलण्याची क्षमता कदाचित उतरत नाही. ते पदवीधर होतात, पण आवश्यक ज्ञान किंवा कौशल्यांत कमी पडतात; त्यांच्यात सारासार विचारशक्ती, जिज्ञासा आणि चिकाटीचा अभाव जाणवतो. उत्तम शिक्षणाचा पाया आणि उद्दिष्टं यांनाच मुळातनं सुरुंग लागल्यासारखं वाटतंय.

व्यवसाय, व्यापार आणि कामाच्या ठिकाणचं सुमारीकरण :

बहुतांश कामांच्या ठिकाणी ‘केलं हेच पुष्कळ झालं’ ही मानसिकता बोकाळलेली आढळते. कंपन्यासुद्धा बरेचदा साधनशूचितेवर आधारीत दीर्घकालीक स्थैर्य व यशापेक्षा ‘फायदो उपाडो’ रोखठोक नफ्याला प्राधान्य देताना दिसतात. हे करताना अर्थातच बक्षीसपात्र ठरतात ते ‘फास्ट ट्रॅकर्स’ जे चटपटीतपणे किमान अपेक्षा पूर्ण करतात आणि जे चिकाटीने, सचोटीने मुळातनं काही योग्य करू पाहतात ते साधारण गणले जाऊन वंचित राहतात. वरवर दिसून न येणाऱ्या अशा वेळखाऊ व खर्चिक गुणवत्तेशी तडजोड करत कार्यक्षमता वाढवली जाते आणि आकर्षक अशा उत्पादन क्षमतेवर भर दिला जातो. अर्थातच अशा ठिकाणचा कर्मचारीवर्गही कायम कामं झटपट उरकण्याच्या मानसिक दडपणाखाली असतो.

याशिवाय, काळाच्या रेट्यामुळे बऱ्याच कंपन्या वा उद्योजक हे सर्जनशीलता वा दर्जात गुणात्मक वाढ करण्यापेक्षा चालत आलंय अन खपतंय तसंच चालू देणं सोयीचं अन जास्त व्यवहार्य मानतात. काही भर घातलीच तर ती केवळ वरपांगी आकर्षकपणात अन धकून जात असेल तर भेसळीच्या रुपात. अशा ठिकाणी, कर्मचारीवर्ग कितीही गुणी असला तरी इतर अधिकचं काही सुचवण्याच्या फंदात न पडता, चाकोरीतच निमूटपणे व आहे त्या व्यवस्थेनुसार, काहीही प्रश्न न विचारता काम करीत राहण्यात धन्यता मानतो. व्यवस्थापनाचीही हीच अपेक्षा असते. परिणामत: अशा ठिकाणी सुमार असणं अन त्यापोटी निमूट रहाणं हाच जणू एक गुण ठरून जातो आणि अर्थातच जास्त हुन्नरी वा कुशल व्यक्तींचा अशा रटाळ व एकसुरी वातावरणात कोंडमारा होतो. त्यांच्या गुण वा हुशारीचं चीज होत नाही आणि अर्थातच तेही नाईलाजानं शेवटी सुमारपणाच्या रेट्याला बळी पडतात.

सामाजिक सुमारीकरण :

एक समाज म्हणून पाहता, सुमारीकरणाचा शिरकाव नातेसंबंधांत अन सामाजिक देवघेवीतही झालेला दिसतो. आपापली सोय अन स्वार्थ यापुढे नात्यांमधील अध्याहृत असलेले बंध वा उत्तरदायित्व वा जबाबदारीच्या जाणिवा  बेदखल होताना दिसताहेत. बदलत्या काळानुरुप व माध्यमांच्या अतिरेकी प्रभावामुळे आजकाल अगदी पालकत्वापासून ते मैत्रीपर्यंत सर्वच नातेसंबंधांमध्ये संवेदनशीलता कमी होत चालली आहे, जेवढ्यास तेवढेपणा आला आहे. परिणामी अर्थातच सकस व निर्मळ संबंधांची जागा वरवरची, साजरीगोजरी देवाणघेवाण आणि सामाजिक माध्यमांवरचा उथळसा व औपचारिक संवाद यांनी घेतली आहे.

या बदलांमुळे, वरवरच्या नातेसंबंधांमुळे केवळ एकमेकांवरीलच नव्हे तर एकंदरीत समाजातीलच विश्वास आणि सहकाऱ्याची वृत्ती लोप पावत चालली आहे. परिणामत: समाज एकसंध न रहाता विभाजित होत जातो, दुही निर्माण होत जाते, सार्वत्रिक व सामाजिक हितासाठी आवश्यक असलेली मूल्यं व जाणिवा लुप्त होत जातात व अशा सुमार समाजाचा नकळतपणे अधोगतीकडे प्रवास सुरू झालेला असतो.

सांस्कृतिक सुमारीकरण :

अर्थात कला, मनोरंजन व माध्यम क्ष्रेत्रांतील सुमारीकरण. अगदी ठरावीक अपवाद वगळता कला व माध्यमक्षेत्रांत सुमारपण हे कमालीचा साचीवपणा व साचेबद्धपणा यातनं डोकावतं. सवंग लोकप्रियता, भडक दिलखेचकपणा, सनसनाटी असंच काहीतरी निर्माण करायचा जणू चंग बांधला आहे या क्षेत्रांनी. निर्माण हा शब्द खरंतर चूक ठरावा कारण या क्षेत्रांतील बहुतांश निर्मिती ही परदेशी यशस्वी ठरलेल्या (कला)कृतींचीच अत्यंत सुमार अशी नक्कलच असते; मग ते बातम्याचं सादरीकरण असो वा फॅशन वा चित्रपट वा रिॲलिटी शो असो. खळबळजनक, भडक, उत्शृंखल, सवंग ही विशेषणं म्हणजे यांची चलनी नाणी.

वस्तुतः आपल्याकडे सर्जनशीलतेची, कल्पकतेची कमतरता नाहिये. या क्षेत्रातलं सुमारीकरण हे केवळ कमीतकमी खर्चात जास्तीतजास्त नफा कमावण्याच्या वृत्तीतनं आलेलं आहे. ‘क्लासेस’च्या पसंतीस काय उतरेल यापेक्षा ‘मासेसॅमध्ये काय खपेल हा विचार यापाठी आहे. तुलनेनं कमी विचारशील अशा व्यापक प्रेक्षकवर्गाला आकर्षक वाटेल अशा कंटेंटचे साचेच बनले आहेत. यामुळे संपूर्ण सांस्कृतिक क्षेत्रात एकसुरीपणा तर निर्माण होतोच पण खरी सर्जनशीलता आणि विचार व चिंतनाला चालना देऊ शकणाऱ्या कलाविष्कारांची घुसमटही होते. इतकंच नव्हे तर या दृकश्राव्य माऱ्याचा नकारात्मक प्रभाव समाजघडणीवरही नकळतपणे होतच असतो.

राजकीय क्षेत्रातील सुमारीकरण :

या सुमारीकरणाचे अत्यंत विदारक परिणाम आज महाराष्ट्रात पहायला मिळताहेत. समाजाचं होणारं सुमारीकरण इथे थेट प्रतिबिंबीत होतं. आमच्या अपेक्षा भले लाख असतील पण आमचं प्रतिनिधित्व करणाऱ्यासाठी अर्हतेचे, त्याच्या लायकीचे, त्याच्या मूल्यांचे काही किमान निकष तरी आहेत का? अभ्यास, व्यासंग, जनताभिमुखता, योग्यता, द्रष्टेपण, दृष्टिकोन आणि नैतिकता आदी गुण पाहून नेते निवडण्याऐवजी, आम्ही केवळ पक्षनिष्ठेला महत्त्व देत आमच्यावर लादलेल्या उमेदवारांमधून कुणीतरी निवडून देतो. अन तोसुद्धा ती निष्ठाही किती अन कुठवर जपतो हा प्रश्नच आहे.

राजकारणातल्या अन पर्यायानं शासनातल्या या सुमारीकरणामुळं जे खऱ्या अर्थी जनतेचं जीवनमान अर्थपूर्ण बदल घडवत, सुधारून उंचावत नेतील अशी क्षमता असलेले नेते निवडले जाण्याची शक्यता दुरावते. दुष्टचक्र असं की याचा परिपाक म्हणून बराच मोठा विचारी पण निराश असा वर्ग निवडणूक अन मतदान प्रक्रियेपासून अलिप्त राहू पाहतो व त्यातनं नेमकी अशी सुमार व्यवस्थाच टिकून राहते, मुळं धरते, अधिकच फोफावते. या व्यवस्थेत कसल्याही उच्च मूल्यांची, उच्च प्रतीची मागणी वा अपेक्षा नसते असते ती केवळ परावलंबी लाभार्थ्यांच्या झुंडी तयार करण्याची क्षमता.

तंत्रज्ञान वापरातलं सुमारीकरण :

अर्थात वापरातील अज्ञानमूलक विधीनिषेधशून्यता. तंत्रज्ञान हे वापरानुसार गुणवत्तावर्धक किंवा मारकही ठरू शकतं. कमीतकमी श्रमात अधिकाधिक साध्य करणं हे तंत्रज्ञानामुळे शक्य होत असलं तरी, यामुळे आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरकर्त्यांमध्ये एक प्रकारची अधीरता, उतावळेपणा वाढीस लागल्याचं जाणवतं. त्यातनं अस्वस्थता व अस्थिरताही वाढीस लागते. समाजातील इतरांवरचं अवलंबित्व कमी झालं असलं तरी तंत्रज्ञानावरचं अवलंबित्व मात्र पराकोटीचं वाढीस लागलेलं आढळतं. यामुळे आधीच सुमार अन विभाजित होत चाललेला समाज अधिकच तुटकपणाकडे, एकाकीपणाकडे झुकू लागला आहे असं जाणवतं.

सामाजिक माध्यमं ज्या प्रणालीवर – अल्गोरिदमवर – चालतात त्यात सकसता अन गुणवत्तेपेक्षाही लोकप्रियता हा जास्त महत्वाचा अन म्हणून प्रमुख निकष असतो. वापरकर्त्याला ही जाणीवही नसते की तो कुण्या अज्ञातानं ठरवलेल्या अन लादलेल्या ‘ईको चेंबर बबल’मध्येच जगतोय, त्यात जे समोर येइल तेच खरं व योग्य मानतोय. जिव्हाळ्याच्या एखाद्या विषयावरील उद्बोधक अशी अर्थपूर्ण चर्चा किंवा त्या त्या क्षेत्रातील तज्ज्ञांची अनुभवाधारीत मतं अशा उपयुक्त माहितीस या अशा ठरावीक पॉपअप्सच्या गदारोळात तो मुकतो. अत्यंत उथळ व प्रसंगी निरर्थक पण वरकरणी मार्गदर्शक भासणाऱ्या अशा दुष्टचक्रात अडकलेला राहतो.

अर्थातच वरील सर्व उदाहरणांस अपवाद हे निश्चितच आहेत, पण किती? तर, केवळ अपवादानं नियम सिद्ध होतो हे खरं ठरण्याइतपतच. यावर उहापोह करून मार्गही निश्चितच निघू शकतील, किंबहुना यातील प्रत्येक समस्येवर वैचारिक वा संकल्पनेच्या स्वरुपात उत्तरं आहेतच पण ती कृतीत येणं वा आणणं हे ज्यांच्या हाती आहे ते ‘आम्ही’ या समस्यांविषयी कितपत सजग अन गंभीर आहोत हा प्रश्न आहे. लेखाची सुरवात बारा बलुतेदारीनं केली ती केवळ हेच अधोरेखित करायला की एकमेकांना धरून ठेवण्यातच, मग ते अवलंबित्व असलं तरी, समाजाचं, राष्ट्राचं हित असतं. फक्त त्यात एकतर्फीपणा नसावा, समतोल असावा, बॅलन्स व काउंटर बॅलन्स असावा. पण हे तेव्हाच घडेल जेव्हा आम्हाला, होणारं सुमारीकरण हे घातक आहे हे जाणवेल तेव्हा. आपण केवळ स्वकेंद्रित न रहाता, स्वतःपासून सुरूवात करून एकमेकांकडून, भोवतालच्या लोकांकडून नित्यकर्मांपलिकडील अशा काही माफक अपेक्षा, गुणवत्तेची कास धरल्यास व त्याकरता प्रयत्न केल्यास आमचा समाज फिरून परत एकदा गुणग्राहक, सकस अन सुदृढ होऊ शकेल. आधुनिक तंत्रज्ञान व येणारं भविष्य यांचा योग्य तो उपभोग घेण्यासाठी समाज म्हणून आम्ही सशक्त अन सुदृढ असणं फार महत्वाचं आहे. आमची वाटचाल एकमेकांस आधार ठरू शकणाऱ्या, सर्वोपकारी पण काळानुरुप बदलत्या अशा ‘बारा बलुतेदारी’कडे होण्यातच आम्हा सर्वांचं हित असावं असं वाटतं अन त्याकरता आम्ही सर्वांनी आपापल्या परीनं प्रयत्न करावेत.

sk3shrikant@gmail.com

Story img Loader