नेहा राठोड ही भोजपुरीतील तरुण लोककलाकार. गेली चार वर्ष बिहार आणि उत्तर प्रदेशात ती गाजतेय ते तिच्या सडेतोड गाण्यांमुळे. ‘बिहार में का बा’ आणि नंतर ‘यूपी में का बा’ ही तिची गाणी सर्वदूर गाजली. सामान्य माणसांचे प्रश्न आपल्या गाण्यांच्या केंद्रस्थानी आणून सत्ताधाऱ्यांना ती सवाल करतेय. उत्तर प्रदेशातील योगी सरकारने नेहा विरोधात गुन्हा दाखल केलाय. पण न डगमगता नेहाचं ‘का बा’ विचारणं सुरू आहे. तिच्या या प्रवासाविषयी युवराज मोहिते यांनी तिच्याशी साधलेला हा संवाद.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नेहा, भल्याभल्यांचा आवाज दाबला जात असताना तू तुझी गाणी गात हिमतीने उभी आहेस..

मी भोजपुरी भाषेतील लोककलाकार आहे. भोजपुरी ही माझी मातृभाषा. मात्र गेल्या काही वर्षांत असा एक समज झालाय की भोजपुरीतील गाणी म्हणजे फुहड, लेहंगा और चोली या पलीकडे काही नाही. अश्लीलता आणि महिलांवरची टिप्पणी एवढंच या गाण्यांतून मांडले जातेय. खरंतर भोजपुरी ही समृद्ध भाषा आहे. या भाषेतील अनेक साहित्य प्रकार प्रसिद्ध आहेत. याच भाषेतून आता सत्य आणि विचारही मांडायला हवेत असा मी विचार केला. शिक्षण, रोजगार, महागाई यावरही गाण्यांच्या माध्यमातून बोललं पाहिजे हे ठरवून मग मी सक्रिय झाले.

हेही वाचा >>>जागतिक हवामानाबद्दल आपण सजग रहायला हवे, कारण…

या सगळय़ाची नेमकी सुरुवात कशी झाली?

बिहार विधानसभेची निवडणूक असताना मी ‘बिहार में का बा’ हे गाणं लिहिलं. ते लोकांच्या पसंतीस उतरलं. मग उत्तर प्रदेशची निवडणूक आली. तेव्हा मी काही तसं ठरवलं नव्हतं. माझा नवरा हिमांशु मला म्हणाला की तू आता ‘यूपी में का बा’ हे पण लिही. मग मी तेही लिहिलं आणि काही प्रश्न उपस्थित केले. ते तुफान गाजलं. पण त्यामुळे राजकारण्यांचा रोष मात्र आम्हाला पत्करावा लागला.

तू गाण्यातून प्रश्न उपस्थित करून थेट सरकारच्या वर्मावर बोट ठेवतेस..

मला वाटतं की लोकांनी सजग व्हावं, विचार करावा. सरकारला प्रश्न विचारावेत. कलाकार म्हणून संवेदनशीलपणे समाजाकडे पाहाणं हे माझं काम आहे. विरोधी पक्षांनी किंवा प्रसिद्धी माध्यमांनी याबाबत प्रश्न उपस्थित करायलाच पाहिजेत. सरकारला जाब विचारला पाहिजे. साहित्यिक, कलावंतांनीही ते केलं पाहिजे. मी हे माझं कर्तव्य समजते. समोर इतक्या सगळय़ा चुकीच्या, अन्यायकारक गोष्टी घडत असताना आपण गप्प कसं बसायचं? मी माझ्या माध्यमांतून त्यावर व्यक्त होतेय. यातूनच मी ‘यूपी में का बा’ चा सिझन टू काढला..

पण मग यावरूनच सरकारकडून तुझ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला?

हो, ते होणारच होतं. मी झन्डू बाम, चोली-लहंगा गाणारी कलाकार नाही. तशा पद्धतीच्या कलाकारांना सत्तेत स्थान मान मिळतो. मला तर त्रास होणारच ना? मी सामान्य कलाकार आहे. सर्वसामान्यांशी माझी बांधिलकी आहे. भोजपुरी भाषेवर माझं मनापासून प्रेम आहे, या भाषेतूनच सत्य मांडण्याचा माझा प्रयत्न आहे.

तू वारंवार भाषेबाबत बोलते आहेस. पत्रकार रवीश कुमार यांनीही भोजपुरी भाषेबाबत अशीच खंत व्यक्त केली होती..

हो, हीच आमचीही खंत आहे. युटय़ूब चॅनेल्समधून जो प्रचार होतोय तोच या भाषेला मारक आहे. या भाषेतील सभ्यता जणू लोप पावलीय. भोजपुरीत जी अश्लील गाणी गायली जातात, ती लाखो लोक पाहतात. त्यामुळे अधिकाधिक अश्लील कोण गातो यातच स्पर्धा सुरू आहे. एक प्रसंग सांगते. एकदा मी दिल्लीत एका कॅफेमध्ये बसले होते. तिथे पंजाबी आणि इतर गाणी वाजत होती. मी म्हटलं भोजपुरी गाणी लावाल का? तर ते रागाने म्हणाले इथे ते अलाऊड नाही. ती घाणेरडी गाणी आम्ही वाजवत नाही. तथाकथित भोजपुरी गायकांनी आमच्या भाषेची अशी वाताहत केली आहे. उत्तर प्रदेश, बिहारमध्ये बेरोजगारी एवढी आहे की यातच पैसा मिळू शकतो असं अनेकांना वाटतंय. या सगळय़ाला प्रेरणा कोण देतंय? अशी अश्लील गाणी सादर करणारेच सरकारमध्ये बसलेत, खासदार झालेत. दोष कुणाला द्यायचा?

हेही वाचा >>>कोणी, कोणाला, किती आणि का दिले?

रवी किशन, मनोज तिवारी या लोकप्रिय गायकांबाबतच तू हे बोलते आहेस का?

होय! भाषेवर बलात्कार करणारे हे लोक भाजपचे खासदार आहेत, हे मी जाहीरपणे बोलते. रवी किशन काय गातो? तोहार लहेंगा उठा देब रिमोट से.. हा भाषेवरचा बलात्कार नाही का? हे खासदार महोदय काय गातात ? चाचा हमार विधायक होवान नाही डराई हो, ये डबल चोटीवाली तोहके टांग ले जाई हो.. म्हणजे काय तर मेरे चाचा विधायक है, मैं डरता नही हूं, ए डबल चोटीवाली लडकी तुझे टांग कर ले जाऊंगा.. ही अशी गाणी? रवी किशनची ही काय भाषा आहे? याच्यावर काय बोलणार? खासदार मनोज तिवारीची गाणी ऐका. तो काय गाणी गातो – फटाफट खोल के दिखाव.. लोकांना याची मजा वाटते? महिलांबाबत यांचा हा दृष्टिकोन? बहुनी के लागल बा सहर की हवा, औढी पढावा.. कहनी के गऊनी में नऊवा लिखावा, औरी पढावा.. म्हणजे मुलीला शिकवलं तर तिला शहराची हवा लागेल. तेव्हा तिला शिकायला गावाबाहेर पाठवू नका. तिचं लग्न करून टाका.. मला तिरस्कार वाटतो अशा खासदार गायकांचा. ही गाणी हा भाजपचा महिला विकास आहे का? पंतप्रधान मोदी नारे देताहेत.. बेटी बचाव बेटी पढाव.. आता ही घोषणा आहे की लोकांना आव्हान देताहेत? बेटी बचा के तो दिखाव.. हाथरस की बेटी को बचा के बताव, मणिपूर की बेटी को बचा के दिखाव.. अशी ही सगळी परिस्थिती आहे. यावर बोललं पाहिजे ना?

तुझ्या गाण्यातून तू सरकारवरही टीकाटिप्पणी करतेस. याचा काय परिणाम सहन करावा लागतो?

मी सरकारची विरोधक नाहीये. मी टीकाकार आहे, असं म्हणा. संविधानाने मला माझ्या अभिव्यक्तीचा अधिकार दिलाय. प्रश्न विचारण्याचा मला अधिकार आहे. कलावंत म्हणून मला माझी भूमिका आहे. पण मी विरोधक आहे अशा पद्धतीनेच सरकार माझ्याशी वागणार असेल तर करायचं काय? इतका त्रास सहन करावा लागतोय की विचारू नका. त्यांनी माझ्या विरोधात गुन्हा दाखल केला आहेच, तेवढय़ावरच ते थांबले नाहीत. त्यांनी माझे कार्यक्रम होऊच नयेत, असे प्रयत्न चालवलेत. माझे कार्यक्रम आयोजित करणाऱ्यांवर दबाव आणला जातो. आयोजक जरा हिमतीचे निघाले तर हॉल उपलब्ध होणार नाहीत याचा प्रयत्न करायचा. सर्व बाजूंनी यंत्रणा कामाला लावलीय. सांगा कुठे आहे लोकशाही?

तुझ्या पतीविरोधात त्यांनी मोहीम चालवली..

‘यूपी में का बा’चा सिझन २ रीलिज झाल्यावर माझ्यावर नोटिसा बजावण्यात आल्या. आम्ही यावर कायदेशीर लढाई लढतोय. पण नंतर माझ्या पतीच्या नोकरीवर गदा आणली गेली. त्याला राजीनामा द्यावा लागला. आम्हाला रस्त्यावर आणण्याचे सगळे प्रयत्न सुरू आहेत. मी हात जोडून त्यांना शरण जावं अशी यांची अपेक्षा आहे. पण मी शरण जाणार नाही.

या सर्व लढाईत तुझ्या पतीची साथ कशी मिळते? 

त्याने हिंमत दिल्यानेच मी आज उभी आहे. खरं तर त्यावेळी आमचा अत्यंत वाईट काळ होता. हे सगळं पाहून माझी प्रकृती बिघडली होती. प्रचंड मानसिक तणाव होता. आपल्यासारख्या सामान्य कुटुंबातून येणाऱ्यांना अशा विरोधाला तोंड कसं द्यायचं हा प्रश्नच असतो. लक्षात घ्या, माझं गाणं रीलिज झालं तेव्हा माझं नुकतंच लग्न होऊन मी सासरी आले होते. तिथे पोलिसांचा मोठा फौजफाटा घरात पोहोचला. माझ्यावर नोटिसा बजावल्या गेल्या. माझे सासरे प्रचंड चिंतेत होते. आजूबाजूचे लोकही बोलू लागले. कुटुंबाचं नाव ही पोरगी बुडवणार..  पती की नौकरी खा गयी.. माझी काय अवस्था झाली असेल सांगा.. माझं काम, माझी गाणी, माझी प्रामाणिक कळकळ हिमांशूला, माझ्या पातीला माहीत आहे. कलावंत म्हणून मी ठाम राहावं, माझे विचार पुढे जावेत यासाठी तो सर्वतोपरी माझ्या पाठीशी आहे. कलाकार म्हणून माझं मनोबल कमी होऊ नये यासाठी तो प्रोत्साहन देत असतो. ही माझ्यासाठी सगळय़ात मौल्यवान गोष्ट आहे.

गाण्यांतून तू जे मांडतेस त्याला विरोध होणं हे सद्य:स्थितीत अपेक्षित असेलच ना?

हो.. या विरोधाला मी आव्हान समजते. आपण एका लोकशाहीवादी देशात राहातो. संविधानाने नागरिकांना काय हक्क दिलेत ते आपण वाचत असतो. अशावेळी दमनशक्तीचा वापर कुणावरही होऊ नये. मतभेद होऊ शकतात. विचार वेगवेगळे असू शकतात. पण म्हणून मुस्कटदाबी करायची का? काहीही गुन्हा दाखल करून तुरुंगात डांबणार का? मी घाबरत नाही. मी माझी भूमिका स्पष्ट मांडलेली आहे. सरकारला खूश  करणं हे माझं काम नाहीय. ते मी कधीच करणार नाही. आता मी परिणामांना घाबरत नाही.

कलावंत हे सरकारचं सॉफ्ट टार्गेट असतं..

हे होतच असतं. पण माझा प्रश्न असा आहे की कलावंत म्हणून आजूबाजूला घडणाऱ्या घटनांवर तुम्ही बोलणार नाही का? हे जे लोक गप्प आहेत ना त्यांना कदाचित सरकारी बक्षिसी हवी असेल. किमान पद्मश्रीच्या अपेक्षेत काही लोक असतील. हा ज्याच्या त्याच्या वकुबाचा प्रश्न आहे. असो, मी अशा लाभार्थीच्या गर्दीतील नाही. सरकारने माझ्याविरुद्ध जो एफआयआर दाखल केलाय तोच मला माझा पुरस्कार वाटतो. ती नोटीसच मी फ्रेम करून ठेवली आहे.

ही प्रेरणा कुठून मिळालीय?

ही हिंमत मला संविधानाने दिली आहे. यूपी-बिहारमधली जी परिस्थिती मी पाहाते, त्यामुळे मी खूप अस्वस्थ होते, त्याबद्दल विचार करत. सत्य मांडायला कुणी पुढे येतच नाही. आपण बोललं पाहिजे असं मला वाटलं. मी माझ्या गाण्यांतून ते मी मांडायला सुरुवात केली. लोक मला विचारतात तुला भीती वाटत नाही? नाही मला भीती वाटत. संविधान आम्हाला भयभीत व्हायला शिकवीत नाही. म्हणून मी संविधानाचे विचार गाण्यातून मांडायला सुरुवात केली.. संविधान के सुनल विचार भैया, आव समझा आपल अधिकार भैया.. तुम्ही महाराष्ट्रातले लोक ज्या यूपी-बिहारींना भैया म्हणता ना त्या भैयांसाठी मी हे गाणं लिहिलंय.

उत्तरेतील प्रश्नांबाबत तू बोलतेयस. सध्या उत्तर प्रदेश राममंदिरामुळे गाजतोय. काय तुझं म्हणणं?

राम मंदिर झालं याचा आनंद आहे. राम कुठल्या पक्षाची प्रॉपर्टी आहे का? तो आपल्या सगळय़ांचा आहे ना? आता राम मंदिर झालं, ठीक आहे.  आता पुढे बोलूया. बेरोजगारीचा प्रश्न सुटलाय का? महागाई कमी झालीय का? शिक्षण व्यवस्थेत सुधारणा होतेय का? पुजाअर्चा लोक करत असतात. पण ते म्हणतात ना की, भुके भजन न होई गोपाला.. हे वास्तव आहे.

मुंबई काँग्रेस आयोजित शिबिरात तू कलावंत म्हणून बोलायला आली आहेस. राजकारणात सक्रिय होणार का? निवडणूक लढवणार का?

(हसत) नाही.. नाही.. माझा तसा काहीही विचार नाहीय. किंवा तशी अद्याप ऑफरही आलेली नाहीय. तसं कुणी विचारलंच तर पुढचं पुढे बघता येईल. माझी गाणी हेच माझं खरं ध्येय आहे. सध्या मी ‘मुंबई में का बा’ तयार करतेय.

mohiteyuvraj1@gmail.com

मराठीतील सर्व विशेष लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: I will continue to question the system through my songs neha rathod amy