निखिल बेल्लारीकर
व्यापाराचे रस्ते बंद झाल्यामुळे चेंगीझ खान चिडला नसता तर? किंवा, प्रजेला जिंकण्यासाठी मंगोलांनी इस्लाम स्वीकारला नसता, तर?
मंगोल साम्राज्याचा इतिहास भारतीय वाचकांना तसा नवीन नाही. मंगोलांचा कल्पनातीत सैन्यसंभार, त्यांचे युद्धकौशल्य, शौर्य, तितकेच पराकोटीचे क्रौर्य आणि त्यामुळे त्यांच्या ताब्यात आलेला अवाढव्य मुलूख यांभोवतीच चर्चा फिरत राहते. मात्र यामुळे मंगोल राजवटीचे जगावरील परिणाम, त्याच्या मर्यादा, व त्याचे लष्करी, आर्थिक व धार्मिक आयाम जनचर्चेच्या बाहेरच राहतात. इंग्लंडमधील नॉटिंगहम ट्रेंट युनिव्हर्सिटी इथे इतिहासाचे प्राध्यापक असलेल्या निकोलस मॉर्टन यांच्या नव्या (ऑक्टोबर २०२२) पुस्तकाने मात्र या दुर्लक्षित आयामांवर उत्तम प्रकाश टाकला आहे.
या पुस्तकात मंगोल साम्राज्याचा मध्यपूर्वेतील विस्तार व त्यामुळे तेथील राजकारण व सत्ताकारणात झालेले दूरगामी बदल हा विषय केंद्रस्थानी ठेवून मांडणी केली आहे. इ.स. १२२० पासून ते इ.स. १३५० पर्यंतचा काळ त्याकरिता विचारात घेतलेला आहे. मंगोलपूर्व काळात मध्यपूर्वेत इराण ते कझाकस्तानपर्यंतचे ख्वारेझ्मियन साम्राज्य, सीरिया, इजिप्त, इ. ठिकाणचे अय्युबी साम्राज्य, मध्य तुर्कीमधले सेल्जुक राज्य व बगदादची खिलाफत ही प्रमुख राज्ये होती. मंगोलांच्या अविरत रेटय़ापुढे ती सारीच कोलमडून पडली व अखेरीस मामलूक व ऑटोमन तुर्क ही दोन साम्राज्ये उदयास आली.
याची सुरुवात झाली ती इ.स. १२२० मध्ये. चेंगीझ खान तेव्हा इराणमधील ख्वारेझ्मियन साम्राज्यासोबत व्यापाराकरिता उत्सुक होता. मात्र त्या साम्राज्यातील अधिकारी इनालचुकने मंगोल व्यापाऱ्यांची हत्या केली. चेंगीझ खानाने यावर पुन्हा काही व्यापारी पाठवले. पण इनालचुकने पुन्हा एकदा कत्तल केली. मग चिडून चेंगीझ खानाने जेबे व सुबुताई या प्रसिद्ध मंगोल सेनापतींना धाडले. त्यांनी ख्वारेझ्मियन साम्राज्यातील कैक शहरांवर जोराचे हल्ले चढवून ती बेचिराख करून टाकली. ख्वारेझ्मियन सुलतान मुहम्मद मात्र त्यांच्या हाती न लागताच मरण पावला.
चेंगीझ खानानंतर त्याचा मुलगा ओगेदेई हा मंगोल खान अर्थात प्रमुख बनला. ओगेदेईने चोर्माघुन नामक सेनापतीला ख्वारेझ्मियन प्रदेशावर मंगोल प्रशासन बसवण्यास सांगितले. तोपर्यंत ख्वारेझ्मियन सुलतान मुहम्मदाचा मुलगा जलालुद्दीन हा बळजोर झाला होता. त्याने कैक मोहिमा करून बराच प्रदेश ताब्यात घेतला, खुद्द मंगोलांचाही एकदा पराभव केला. परंतु याआधी अय्युबी साम्राज्य, बगदादची खिलाफत, इ. राज्यांशीही संघर्ष झाल्यामुळे इ.स. १२३० च्या आसपास मंगोल पुन्हा डोकावू लागले तेव्हा त्याला कोणीही मदत केली नाही व ख्वारेझ्मियन साम्राज्य अखेर मंगोलांच्या हाती आले. तिथे त्यांनी स्वत:ची प्रशासनव्यवस्था लागू केली व नाणीही पाडली. मंगोलांच्या सामर्थ्यांची पहिली चुणूक पुस्तकात इथे कैक आयामांसह ठळकपणे दिसते.
चोर्माघुन आता इराण व इराकमध्ये मंगोल शासनव्यवस्था बसवू लागला. पुढे इ.स. १२४१ मध्ये त्याजागी बैजू नामक सेनापती आला. आता सेल्जुक सुलतान कैकुबादने मंगोलांपुढे शरणागती पत्करली, परंतु इ.स. १२४० नंतर सेल्जुक-मंगोल संबंध फिसकटले. इ.स. १२४३ साली सेल्जुक व मंगोल सैन्यांत एक मोठी लढाई होऊन त्यात सेल्जुकांचा मोठा पराभव झाला. आता अय्युबी साम्राज्य व बगदादची खिलाफत ही दोनच मुख्य राज्ये मंगोलांच्या वाटेत होती.
प्रो. मॉर्टन यांनी या सर्व आक्रमणांच्या धार्मिक व सामाजिक पैलूंचेही रोचक वर्णन केले आहे. मंगोलांच्या आश्रयाने अनेक जण स्वत:च्या ख्रिश्चन अथवा इस्लामी पंथाचे व धर्माचे वर्चस्व वाढवण्याचा प्रयत्न करत. मंगोलांपूर्वी शतकभर जेव्हा सेल्जुक तुर्कानी तुर्की व आसपासच्या भूभागावर प्रभुत्व प्रस्थापित केले, तेव्हा त्यांना लग्नसंबंधादि मार्गानी काही पिढय़ांत तुर्कानी इस्लाम स्वीकारला. परंतु मंगोलांबाबत तूर्त तरी हे शक्य नव्हते, कारण मंगोलांच्या धार्मिक दृष्टिकोनानुसार अखिल पृथ्वी पादाक्रांत करण्याचा मक्ता फक्त मंगोलांकडे होता व ते मान्य केल्यास कोणताही धर्म पाळण्यास त्यांची हरकत नव्हती!
इ.स. १२५२ नंतर मध्यपूर्वेत मंगोल पुन्हा डोकावू लागले. त्यातही हुलागू खानाने धडक मारली ती थेट बगदादवर. इस्लामी जगात खलिफाचे धार्मिक आणि प्रतीकात्मक महत्त्व खूप मोठे होते. इ.स. १२५८ मध्ये हुलागूने मोठी फौज आणली व बगदादला वेढा घातला. टायग्रिस नदीतून कुणी पळून जाऊ नये म्हणून नौकांतून मंगोलांची पथकेही गस्त घालत होती. बगदादमधील अन्नसाठा हळूहळू संपू लागला. रोगराई पसरली. मेलेल्यांना दफनही करता येईना. मृतदेह नदीत सोडले जाऊ लागले. अखेर शेवटचा खलिफा अल मुस्तसिम बिल्लाह याने शरणागती पत्करली. त्यासह त्याच्या थोरल्या मुलाला मंगोलांनी गालीच्यात गुंडाळून वर घोडय़ांकरवी तुडवून मारले. अशा प्रकारे अब्बासी खिलाफतही नष्ट झाली.
आता मंगोलांना मध्यपूर्वेत एकच प्रतिस्पर्धी उरला -अय्युबी साम्राज्य! इ.स. १२४९ मध्ये इजिप्तचा सुलतान अय्युब मरण पावला. त्यानंतरच्या कैक लढायांत अय्युबी साम्राज्याने विकत घेतलेल्या हजारो तुर्क गुलाम सैनिकांनी आपले शौर्य दाखवले. या गुलामांना मामलूक म्हणत. या विजयामुळे मामलूकांना आपले सामथ्र्य लक्षात आले. काही संघर्षांनंतर मामलूकांनी इजिप्तवर आपली सत्ता स्थापन केली. यातच पुढे इ.स. १२५९ मध्ये मंगोलांनी दमास्कस, अलेप्पो, अँटिओख, इ. पूर्वीची अय्युबी शहरे काबीज करून बगदादसारखीच क्रूर कत्तल तिथेही केली.
इ.स. १२६० मध्ये ऐन जालुत नामक आज पॅलेस्टाईनमधील ठिकाणी दोहोंमध्ये मोठी लढाई झाली. मामलूक सुलतान कुतुझ हा तिथे जातीने हजर होता. त्याने मंगोलांचा हल्ला परतवून लावला व जोराने प्रतिहल्लाही केला. हा प्रतिहल्ला मंगोल थोपवू शकले नाहीत. त्यांचा मोठा पराभव झाला. यामुळे कैक भूराजकीय समीकरणे बदलली. इत:पर एकमेव महासत्ता ते अन्य सत्तांप्रमाणेच एक सत्ता हा मध्यपूर्वेतील मंगोलांचा प्रवास सुरू झाला तो या लढाईने. या लढाईचे तपशीलवार वर्णन पुस्तकात आहे.
इ.स. १२६५ मध्ये हुलागू खान मरण पावला. त्यानंतर त्याचा मुलगा अबाघा सत्तेवर आला. त्यादरम्यान मंगोलांमध्ये अंतर्गत बंडाळी सुरू झाली व अंतिमत: मंगोल साम्राज्याचे चार भागांत विभाजन झाले. पैकी ‘इल्खान’ नामक भागाचा विस्तार हा हुलागू व अबाघाच्या प्रदेशात, म्हणजे बहुतांशी इराण, इराक व तुर्की इथे होता. इकडे मामलूक राज्यातही कैक घडामोडी सुरू होत्या. कुतुझनंतर बेबार्स नामक पूर्वाश्रमीचा किपचाक तुर्क जमातीतला गुलाम हा मामलूक सुलतान झाला. त्याने अनेक आघाडय़ांवर युद्धे केली व इल्खानांनाही थोपवून धरले. नंतर इ.स. १२८० मध्ये ऐन जालुतच्या पराभवाचा बदला घेण्यासाठी तब्बल वीस वर्षांनी संधी चालून आली होती. अबाघाने ऐंशी हजारांची मोठी सेना उभी केली होती. तुलनेने मामलूक फक्त चाळीस हजारांचेच सैन्य उभे करू शकले. दोन्ही सैन्यांची इ.स. १२८१ मध्ये आजच्या सीरियातील होम्स इथे लढाई झाली. मामलूकांनी पूर्ण मंगोल सैन्याचा दणकून पराभव केला.
यानंतर मात्र मध्यपूर्वेतील मंगोल वर्चस्वाला उतरती कळा लागली. अबाघाची सत्ता इ.स. १२८२ मधील त्याच्या मरणापर्यंत टिकली. त्यानंतर काही काळ मध्यवर्ती इल्खान शासन व नोयन (उमराव) यांमध्ये संघर्ष होऊन इ.स. १२८४ मध्ये अर्घुन नामक इल्खान साम्राज्याधिपती झाला. त्याच्या काळातही हा संघर्ष सुरूच राहिला व त्यातच इ.स. १२९१ मध्ये त्याचाही बळी गेला. त्यानंतर गेइखातु याने सत्तेची धुरा सांभाळली. त्यातही आजच्या अफगाणिस्तान व इराणमधील सीमारेषेजवळच्या भागातला उमराव नौरुझ विशेष आघाडीवर होता. इ.स. १२९५ मध्ये तत्कालीन इल्खान गेइखातु याला उमरावांनी पदच्युत करून ठार मारले तेव्हा नौरुझने गाझन या त्याच्या प्रतिस्पध्र्याचे नाव नवीन इल्खानपदाकरिता सुचवले. आता स्वत: नौरुझ हा मुसलमान असून, त्याने गाझननेही मुसलमान व्हावे, जेणेकरून तोवर मुसलमान झालेल्या कैक मंगोल सरदार व उमरावांकडून तसेच साम्राज्यातील बहुसंख्य मुसलमान प्रजेकडून पाठिंबा मिळवणे सोपे जाईल, असे सुचवले. त्यानुसार गाझनने इस्लाम स्वीकारला. यथावकाश तो इल्खान झाला. तेव्हापासून इल्खान साम्राज्याचा इस्लामकडे प्रवास सुरू झाला. तरी पारंपरिक मंगोल धार्मिक मान्यतांचा पगडा काही काळ टिकून राहिला. जिझिया वगैरेंसाठी अजून पंधरा वर्षे लागली.
गाझनच्या काळात मामलूकांशी पुन्हा युद्धे झाली. इ.स. १२९९ मध्ये सीरियातीलच वादी अल खजानादार येथील लढाईत मामलूकांचा मोठा पराभव झाला. असे असूनही मंगोलांना त्याचा विशेष फायदा झाला नाही. पूर्वीच्या सेल्जुक प्रदेशातही आता मंगोलांच्या जागी कैक तुर्कमेन समूहांची सत्ता सुरू होती. त्यांपैकी ओस्मान नामक व्यक्तीच्या नेतृत्वाखालचा गट पुढे अजून बळजोर झाला. हेच ते पुढे प्रसिद्ध झालेले ऑटोमन तुर्क होत. याखेरीज बायझँटाईन साम्राज्यासमोरच्या दिसामासांनी वाढणाऱ्या अडचणी, भाडोत्री सैनिक वापरणे, लाकडी तटबंदी उभारणे, इ. अनेक मार्गानी त्यांवर मात करण्याची त्यांची धडपड, इ. चे विवेचन प्रो. मॉर्टन कैक साधनांतून एकदम रोचकपणे करतात. बायझँटाईन साम्राज्याचा अंत जवळच असून तो एखाद्या तुर्कमेन समूहाकडूनच होणार, हे त्या वेळी लक्षात येते.
मंगोलांच्या इस्लामी धर्मातराबाबतही पुस्तकात काही महत्त्वाचे तपशील आहेत. मंगोल हे शासनकर्ते असल्यामुळे त्यांच्यावर बळजबरी वा त्यांना पैशाची आमिष ही कारणे अशक्य होती. गाझन खानाचे धर्मातर हे शुद्ध राजकीय फायद्यापोटी होते. पण त्याहीपेक्षा महत्त्वाचे कारण म्हणजे धर्मातरित झालेले तुर्क हे होत. मंगोलांचे राज्य असलेल्या प्रदेशात हजारो तुर्कही होते. मुळात तुर्क आणि मंगोल समूहांत खूप साम्य असल्यामुळे तुर्काचा प्रभाव तुलनेने अल्पसंख्य मंगोलांवर पडणे साहजिक होते. शिवाय, इस्लाम स्वीकारल्यावरही मामलूक प्रदेशावर आक्रमण करताना तेथील मुसलमानांशी मंगोलांनी कोणतीही दयाबुद्धी दाखवलेली दिसत नाही.
सरेतेशेवटी इ.स. १३१६ मध्ये इल्खान अबू सैद मरण पावला. लगबगीने इल्खान साम्राज्य खिळखिळे होऊ लागले व काही वर्षांत त्याचे विघटनही झाले.या राजकीय घडामोडींचा भव्य पट मांडत असतानाच पुस्तकात मधूनच इब्न बतूता, मार्कोपोलो, इ. सारखे प्रसिद्ध प्रवासी, इब्न खल्दूनसारखे तत्त्वज्ञही भेटून जातात. इब्न बतूताने बायझँटाईन साम्राज्याला भेट दिली होती व मार्कोपोलो तर खुद्द कुब्लाई खानाला भेटूनही आला होता. त्याशिवाय मध्यपूर्वेत मोठय़ा प्रमाणावर चालणारा अनेक वस्तूंचा व्यापार, सर्वधर्मीय सत्ताधीशांनी त्याला दिलेले उत्तेजन, तसेच युद्धापासून व्यापाराचे संरक्षण करण्याची तयारी, इ.चे वर्णन वाचून युद्धापलीकडच्या समाजाची सम्यक कल्पना येते.
पुस्तकात तपशिलांची निव्वळ जंत्री किंवा कोणत्याही सिद्धान्ताचे विवेचन नसून कथा व नाटय़ आहे. मंगोल आक्रमणांची व त्यांमुळे एका मोठय़ा भूप्रदेशातील आमूलाग्र बदलून गेलेल्या भूराजकीय तसेच सामाजिक समीकरणांची ही कथा यातून उत्तमरीत्या अनुभवाला येते.
हेच लेखक प्रो. मॉर्टन यांचे सर्वात मोठे यश आहे.
‘द मंगोल स्टॉर्म : मेकिंग अॅण्ड ब्रेकिंग ऑफ एम्पायर्स’
लेखक: प्रो. निकोलस मॉर्टन
प्रकाशक : जॉन मरे पब्लिशर्स लि.
पृष्ठे : ३२८; किंमत: रु. ७४६/-