शकुंतला सविता भालेराव

निवासी महिला डॉक्टरवर बलात्कार आणि हत्येचं प्रकरण कोलकात्यात घडल्यानंतर देशभर अनेक मोर्चे निघत आहेत. अशा आंदोलनांतून कायमच एक आवाज येतो. जो कोलकात्यातून आला, अगदी आत्ता हाच आवाज बदलापूरहूनही येतो आहे. “आरोपींना आमच्या हवाली करा”, “आरोपींना फाशी द्या”! यातून काय होणार ? नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्यूरो २०२२ ची आकडेवारी सांगते की, दररोज साधारण ८६ बलात्कार होतात. मग दररोज ८६ बलात्कारी पुरुषांना किंवा गॅंग रेप असेल तर आणखी जास्त पुरुषांना फाशी देणार का हा समाज? अनेकदा बलात्कार हे माहितीतल्या, ओळखीतल्या, नात्यातल्या पुरुषाकडून होतात. म्हणजे बाप, काका, मामा, भाऊ, शेजारी, गुंड, राजकारणी, सुरक्षारक्षक… यांना फाशी द्या म्हणायला ही पुरुषप्रधान व्यवस्था पुढे येणार का? फाशी दिल्यानंतर बलात्कार थांबणार का? मुद्दा बलात्कार केलेल्या पुरुषाला फाशी व्हावी की नाही हा नसून ‘बलात्कार का घडतो’ याच्या मुळाशी जाणं गरजेचं आहे.

Chief Minister of Telangana, Himachal and Deputy Chief Minister of Karnataka reply to BJP on the scheme Print politics
गरिबांचे पैसे गरिबांना ही काँग्रेसची हमी; तेलंगणा, हिमाचलचे मुख्यमंत्री तर कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांचे भाजपला प्रत्युत्तर
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Advice from Uttar Pradesh State Commission for Women to male tailors
‘पुरुष शिंप्यांनी महिलांचे माप घेऊ नये’ ; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाचा सल्ला
women are saying no to sex after Trumps win
डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयानंतर अमेरिकेतील महिलांचा लैंगिक संबंधास नकार; कारण काय? काय आहे 4B चळवळ?
Loksatta chaturang Along with sensible profound partner family
इतिश्री: समंजस, प्रगल्भ सोबत
inconvenient to carry dead bodies due to no road at Alibagh Khawsa Wadi
रस्ता नसल्याने मृतदेह झोळी करून वाडीवर नेण्याची वेळ…
Loksatta chaturanga Parent Nature Confused Psychologist
सांधा बदलताना : संसार शांतीचा झरा…
Fear Avoidant Personality Disorder Personality relationship Personality Loksatta Chaturang
स्वभाव, विभाव: भीती आणि न्यूनगंडाचा फास

ज्या चार भिंतींची – सुरक्षित घरा- ची व्याख्या या ‘कुटुंब व्यवस्थे’नं केली आहे ते घर तरी खरंच किती सुरक्षित आहे हे अनेक बलात्कार आणि बाल लैंगिक हिंसेतून अधोरेखित झालं आहे. बलात्कार हा स्त्रियांवरील होणाऱ्या लैंगिक हिसेंचं हिमनगाचं टोक आहे. स्त्रियांवर होणाऱ्या अनेकपरींच्या हिंसेचा, बलात्कार हा एक दृश्य परिणाम आहे. यापेक्षाही भयावह आकडेवारी म्हणजे दर तीन मिनिटांनी एका स्त्रीची छेडछाड होते असे नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्यूरोची आकडेवारीच सांगते. आणि हे ‘नोंदवलेले’ आकडे! मग न नोंदवलेला आकडा किती असेल? इतकं भीषण वास्तव आहे आणि दिवसेंदिवस यात वाढच होताना दिसते. चौक, बसस्टॉप, रेल्वेगाड्या आणि स्टेशनं, रस्ता, शाळा, कॉलेज, गर्दीची, सुनसान ठिकाणं आणि कधी सुरक्षित घरातसुद्धा स्त्रियांना बळी पडावं लागतं. मग यातून नियम आणि बंधन घातली जातात ती स्त्रियांवरच. सातच्या आत मुलींनी घरात. का? ज्यांनी असुरक्षितता माजवलेली त्या पुरुषांना सातच्या आत घरात का नाही बोलवलं जात? कॉलेज आणि चौकांमध्ये पुरुष असतात. शिट्या मारतात. छेडछाड होते म्हणून मुलींचे, स्त्रियांचे कॉलेज बंद. नोकरी बंद. घराबाहेर जाणे बंद. पण छेडछाड बंदीसाठी समाज अवाक्षरही बोलत नाही. पुरुषांची नजर वाईट म्हणून स्त्रियांनी अंगभर कपडे घालायचे, बुरखा घालायचा? पण पुरुषांच्या वाईट नजरेवर काय उपाय केला जातो? या पुरुषसत्ता व्यवस्थेचा हा असा उलटा कायदा, तमाम समाज गपगुमान मान्य करतो. ही आपली तथाकथित गौरवलेली पुरुषप्रधान व्यवस्था!

आणखी वाचा-‘चॉम्स्की प्रकरणा’तून साउथ एशियन युनिव्हर्सिटीचे काय झाले?

या जाचक पुरुषसत्तेची मुळं उखडून फेकायला सुरुवात स्वत:पासून करावी लागते. गर्भात मुलगा-मुलगी तपासणी बंद करणं, मुलीच्या वाढदिवसाला गिफ्टमध्ये दागिने/ भातुकली/ बार्बी/बाहुली न देणं… हे निर्णयपूर्वक करावं लागतं. बॅटबॉल, कार तिला आवडेलच की. ती शिकेल लहानपणीच हुंदडायला, ओरडायला, चुका करायला. सुरुवातीपासूनच आत्मविश्वासाची तिच्यामध्ये पेरणी करा. असेच कपडे, केसांची स्टाईल, नटणं-सजणं नका पेरू तिच्यामध्ये. तिला तिच्या आवडी-निवडी आणि रहाणीमान ठरवू द्या. तिचा आवाज, हास्य, राग, बळ, बुद्धी, विश्वास छाटू नका. लहानपणीच उड्या मारत रस्ता ओलांडण्याचं धाडस तिच्यामध्ये येवू द्या. स्वत:चं संरक्षण करू शकेल असे तिचेही बाहू बळकट करा. सामर्थ्य, ताकद, युक्ती, बुद्धीवान, चलाख, चतुर अशीच मोठी करा. तिला परावलंबी, सहनशील, घाबरट, सामाजिक-व्यावहारिक अज्ञानी, संस्कृतीचा गाडा ओढणारी, कमकुवत, कमजोर समजणं बंद करा. तिला शिकवा की, मानवाच्या इतिहासापासून ती समाजाचे नेतृत्व करणारी, लढणारी, शूर-विरागंना राहिली आहे. साहजिकच अशी कर्तृत्वान, स्वतंत्र, स्वावलंबी, निर्णय घेणारी ‘ती’ स्वत:चंच काय समाजाचं संरक्षण केल्याशिवाय गप्प बसणार नाही. आधुनिक-जागतिकीकरणाच्या युगात स्पर्धा व बाजारीकरणमध्ये जाहिराती, टीव्ही, सिनेमा, ओटीटीवरसारख्या प्लॅटफॉर्मसवर स्त्रीदेहाचं गलिच्छ प्रदर्शन, अश्लील, हिंसक सेक्स हे आपण नाकारतो की त्याला खतपाणी घालतो? फसव्या आणि अश्लील जाहिरातींवर कधी विचार करतो का? स्त्रीदेहाचा बाजार मांडून अधिक नफा कमावणं हा भांडवलीशाही असंस्कृतपणा का डोळ्यांआड केला जातो? फेअर ॲण्ड लव्हली आणि फेअर ॲण्ड हॅण्डसम या खुळचट प्रकाराला आपण किती सहज भुलतो? याला आपण फाटा देऊ शकतो का? ही पुरुषप्रधान व्यवस्था लोकशाहीच्या सर्व खांबांमधून सुद्धा उघडपणे दिसून येते. त्यात सुधारणा नाही का करता येणार?

आणखी वाचा-आम्ही सवलत नाही, संरक्षण मागतो आहोत…

इथे स्त्री विरुद्ध पुरुष असा मुद्दाच करायचा नाही. या व्यवस्थेत पुरुषसत्ता विचारांचे स्त्री आणि पुरुष दोघेही बळी आहेत. दोघांसाठी या व्यवस्थेनं ठरवून दिलेली चाकोरी आहे. अर्थात, दोन्ही घटक या चाकोरीबद्ध आयुष्यामध्ये घुसमटत आहेत. त्यामुळेच स्वातंत्र्याच्या ७८ व्या वर्षातही ‘अर्धा समाज’ भ्यायलेला आहे. पावलोपावली, रस्त्यात, प्रवासात, निर्मनुष्य ठिकाणी, गर्दीत आणि सुरक्षित म्हणवणाऱ्या ‘घरात’सुद्धा. आम्ही भ्यायलेले आहोत…. एकाच समाजात, कुटुंबात, गर्भात जन्माला आलेल्या मुलग्यांचा व मुलींचा सांभाळ का बरं दोन टोकांचा होतो? असुरक्षितेचं जाळं इतकं पसरलंय की या समाजात स्त्री सुरक्षित असू शकते याची कल्पनाही करवत नाही… आणि हेवा वाटावा अशा “पुरुष” असण्याचं आकर्षण वाटतं!

स्त्रियांवर होणारे अन्याय ही समाजाला काळिमा फासणारी गोष्ट आहे. याच्या विरोधात आपणा सर्वांना एक पाऊल उचलावे लागेल. पुरुषसत्ता तोडणाऱ्या अनेक स्त्री-पुरुषांचं आपण अभिनंदन तरी करतो का? सावित्री आणि ज्योतीबाचा वारसा चालवण्याची आपल्यावर जबाबदारी आहे. स्वत:पासून सुरुवात करूया. हिंसा सहन करू नका, हिंसा होऊ देऊ नका. कौटुंबिक निर्णय, शिक्षण, नोकरी, राजकीय व प्रशासकीय यंत्रणा तसेच संपत्तीमध्ये स्त्रियांना समान वाटा मिळण्याचा आग्रह धरूया. घरात समान वागणूक मिळण्यासाठी हट्ट धरूया. आपल्या घरात, समाजात, शाळा, कॉलेजमध्ये स्त्रियांसाठी असलेली असुरक्षित ठिकाणं सुरक्षित करण्यासाठी संघटितपणे पुढाकार घेऊया… कामाची / नोकरीची / प्रवासाची ठिकाणं, शासन, प्रशासन, पोलीस, न्याय यंत्रणा यांच्यामार्फत स्त्रियांच्या सुरक्षिततेसाठी जलद व ठोस उपाय करणाऱ्या यंत्रणा राबवल्या गेल्याच पाहिजेत याचा आग्रह सतत सारेजण मिळून धरूया.

‘बलात्कारी व्यक्तीला फाशी द्या’ म्हणणं हे तर केवळ ‘जखमेवर मलमपट्टी’ करण्यासारखं आहे. मूळ इन्फेक्शनला बरं करायचं असेल तर पुरुषसत्तेलाच मूठमाती द्यावी लागेल.

लेखिका महिलांच्या आरोग्यासाठी काम करणाऱ्या ‘साथी-सेहत’ संस्थेत कार्यरत आहेत.

shaku25@gmail.com