वसंत बंग
निवडणुका आल्या की मतदान करून बोटावर शाई लावून घेतली की लोकशाहीच्या रक्षणासाठीची आपली जबाबदारी संपली असे कुणाला वाटत असेल, तर ते साफ चुकीचे आहे. आपले उत्तरदायित्व त्याच्याही पुढे जाणारे आहे.

एप्रिल महिन्यात १९ तारखेला रोजी सुरू झालेल्या देशातील लोकसभा निवडणुकीच्या प्रक्रियेला लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव म्हटले जाते. पण काही लोकांना लोकशाही ही पद्धतच चुकीची आहे असे वाटते. काही लोकांना असे वाटते की लोकशाही व्यवस्थेमुळे निर्णय प्रक्रिया मंदावते. त्यांना असे वाटते की प्रत्येक घटकाचा विचार करताना कठोर निर्णय घेता येत नाहीत, आणि म्हणून देशाचा हवा तसा विकास होत नाही. काही लोकांना असे वाटते की लोकशाहीमध्ये प्रत्येकाला मतदानाचा हक्क देणे चुकीचे आहे. काहींना असे वाटते की जे निवडून येतात ते लोक शासन चालवण्यासाठी योग्य असतीलच असे नाही. काहींना मतदान व एकूण निवडणूक पद्धतच सदोष वाटते. तर बरेच जण असा विचार करतात की आपल्या एका मताने काहीही फरक पडणार नाही. ही कारणे योग्य असोत किंवा नसोत, पण त्यामधून लोकशाहीचा संकुचित अर्थ समोर येतो. लोकशाही म्हणजे फक्त मतदान करणे नाही तर खऱ्या लोकशाहीत नागरिक सदैव जागरूक असले पाहिजेत आणि त्यांना राज्यकारभारात वेगवेगळया मार्गानी भाग घेता आला पाहिजे. 

war Iran Israel
विश्लेषण : इराण आणि इस्रायल यांच्यात युद्ध भडकणार का? भारतावर काय परिणाम?
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
Bhosari MIDC Garbage piles
भोसरी एमआयडीसीत कचऱ्याचे साम्राज्य
tanishq
नैसर्गिक हिऱ्यांना कृत्रिम पर्याय नाही; तनिष्कचे उपाध्यक्ष अरुण नारायणन यांची माहिती
Amit Shah Nagpur, BJP, Congress, Vidarbha,
महाशक्तीला विदर्भात काँग्रेसची भीती का वाटते ?
Sarsanghchalak Mohan Bhagwat appeal to the bjp new generation regarding Pt DeenDayal Upadhyay
भाजपच्या आजच्या पिढीने दीनदयाळजींचे गुण अंगीकारावेत; सरसंघचालक मोहन भागवत यांचे आवाहन
aimim tiranga yatra marathi news
‘एमआयएम’ कडून मुस्लीम मतपेढीला साद
Hezbollahs influence hasan nasarullah
“लेबनॉनवर हल्ले म्हणजे युद्धाची घोषणा”; हिजबुलच्या प्रमुख नेत्याचं वक्तव्य, कोण आहेत हसन नसराल्लाह?

भारतात अनेकांना चीनच्या प्रगतीचे आकर्षण आहे आणि त्यांचा असा विश्वास आहे की, चीनमध्ये लोकशाही नसल्यामुळेच तिथे प्रगती होऊ शकली. चीनच्या औद्योगिक विकासाने भारावलेल्या बहुतेकांना या प्रगतीची दुसरी बाजू माहीत असण्याची शक्यता फारच कमी. ‘हार्वर्ड बिज़्‍ानेस रिव्ह्यू’ या व्यवस्थापनाविषयीच्या नियतकालिकात २०१३ साली प्रकाशित झालेल्या एका शोधनिबंधानुसार चीनमध्ये ज्या कंपन्यांच्या वरिष्ठ व्यवस्थापनामध्ये माजी उच्चपदस्थ सरकारी अधिकारी, राजकीय व्यक्ती असतात, त्यांमध्ये सुरक्षा ढिसाळ असण्याची शक्यता खूप जास्त असते. या शोधनिबंधानुसार अशा कंपन्यांतील दुर्घटनांमध्ये मरण पावलेल्या कर्मचाऱ्यांची संख्या इतर कंपन्यांपेक्षा दहा पट जास्त आढळली. अशा बातम्या चिनी माध्यमांमध्ये सहसा प्रकाशित होत नाहीत.

गदी अलीकडे महाराष्ट्रात काही दुर्घटना घडल्या. मुंबईत रस्त्यावर होर्डिंग पडून कित्येक लोकांचा जीव गेला. डोंबिवलीतील एका कारखान्यातील आगीत काही कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. पुण्यात एक धनदांडग्याने बेदरकारपणे मोटारगाडी चालवून दोन निष्पाप युवकांचा जीव घेतला. आता विचार करा, या किंवा अशा घटनांमध्ये आपल्याला किंवा आपल्या परिवाराला झळ पोचली असती तर आपल्याला काय वाटले असते? माध्यमांनी हे विषय उचलून धरावेत की सोडून द्यावे? लोकशाहीमध्ये माध्यमांना स्वातंत्र्य असावे की असू नये याबद्दल आपले मत तयार करायच्या आधी हे स्वातंत्र्य कुठल्या सिद्धांतावर आधारित आहे हे समजणे आवश्यक आहे. प्रत्येक मानवाला सारखे अधिकार हा तो मूलभूत सिद्धांत. या सिद्धांतानुसार कारखान्यातील कर्मचारी आणि त्या परिसरात राहणारे रहिवासी यांचे हक्क कारखान्याच्या मालकापेक्षा किंचितही कमी नाहीत. मोटारगाडी चालविणाऱ्या श्रीमंत मुलाचा जीव जेवढा महत्त्वाचा, तेवढाच संबंधित अपघातात जीव गमावणाऱ्या सामान्य घरातील युवकांचा जीव महत्त्वाचा.

क्षणभर असा विचार करू या की आपण वर नमूद केलेल्या घटनांंमधील पीड़ित पक्ष आहोत. आता स्वतःला विचारा की कोणत्या देशात तुम्हाला तुमच्या हितसंबंधांचे संरक्षण होण्याची शक्यता जास्त वाटते? काही लोकांना हे वाचून आश्चर्य वाटेल की पाकिस्तानमध्येही काही माध्यमे निष्पक्ष आणि निडर आहेत. तेथील न्यायव्यवस्था अगदीच ढासळलेली आहे असे नाही. पाकिस्तानबरोबरच रशिया आणि उत्तर कोरियासारख्या देशांमध्येही निवडणुका होतात. पण आपण यापैकी कुठल्याही देशाला खरेखुरे लोकशाही देश मानू शकतो का? खऱ्या लोकशाहीत वर नमूद केलेले चारही स्तंभ महत्त्वाचे असतात. पाकिस्तानात विधिमंडळ आणि कार्यपालिकांवर तेथील लष्कराची अप्रत्यक्ष पण जबरदस्त पकड आहे. त्यामुळे पाकिस्तानातील नागरिक खऱ्या लोकशाहीच्या फळांपासून वंचित आहेत.

लोकशाहीचे मूलभूत तत्त्व म्हणजे धर्म, प्रदेश, जात, वर्ग, समुदाय आणि लिंग यांचा विचार न करता समानता. प्रत्येक माणसाला समान हक्क आणि समान आवाज असणारी व्यवस्था म्हणजे लोकशाही. लोकशाहीत समानतेचे रक्षण करण्यासाठी केवळ माध्यमेच नाही तर मुक्त आणि निष्पक्ष न्यायव्यवस्थाही महत्त्वाची ठरते. श्रीमंत उद्योगपती राजकीय पक्षांना कितीही पैसा पुरवू शकत असले तरी राजकारण्यांना निवडून येण्यासाठी शेवटी लोकांच्या मतांची गरज असते. आपण कारभार नीट चालविला नाही तर त्याचे परिणाम भोगावे लागतील ही भीती राजकारणीच नव्हे तर नोकरशहांवरही वचक ठेवते. पुण्यातील मोटारगाडीच्या अपघातात आरोपीला काही तासांतच जामीन मिळाला. पण काही लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्था आणि माध्यमांनी हा विषय उचलून धरल्यानंतर आरोपीला, त्याच्या वडिलांना आणि इतरांनाही कडक कारवाईला सामोरे जावे लागले. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे लोकशाहीचे सर्वात मोठे लाभार्थी असलेल्या सामान्य लोकांमध्येही काहींना हुकूमशाहीचे आकर्षण असते. अन्यायाला भिडता येत नाही तेव्हा, तेव्हा काही लोकांना हुकूमशाहीत अंतर्भूत असलेल्या शक्तीत, मग ती चुकीची का होईना, एक आशेचा किरण दिसायला लागतो. धड़क न्याय, ठळक कृती आणि जलद प्रगतीच्या अपेक्षेनेसुद्धा असे होत असावे.

लोकशाहीचे स्तंभ म्हणजेच लोकशाहीचे अंतिम घटक असा गोड गैरसमज करून घेऊन आपण लोकशाही व्यवस्थेतील सगळया जबाबदाऱ्या विधिमंडळ, कार्यपालिका, न्यायपालिका आणि माध्यमे यांच्यावर ढकलून वैयक्तिक जबाबदारीतून पळ तर काढत नाही? सर्वाना समान वागणूक देण्याचे तत्त्व म्हणजे केवळ सर्वाना मतदानाचा अधिकार एवढेच मर्यादित नाही. लोकशाहीचा प्रत्येक सिद्धांत प्रत्येक माणसाच्या दैनंदिन व्यवहारात लागू होतो. एखादी व्यक्ती लोकशाहीवादी आहे की नाही हे तिच्या कुटुंबीयांशी आणि कार्यालयातील कर्मचाऱ्यांशी असलेल्या वागण्यातून दिसून येते. एखाद्या शिक्षकाचे त्याच्या काही विद्यार्थ्यांशी वैचारिक मतभेद असूनही, तो त्यांच्या मूल्यांकनात पक्षपात होऊ देत नाही. डॉक्टर श्रीमंत आणि गरीब रुग्णाला कसे उपचार देतात त्यावरून त्यांचा व्यवहार लोकशाहीवादी आहे की नाही हे दिसून येते. गरीब रिक्षाचालकाला पोलीस किंवा न्यायाधीश जी वागणूक देतात त्यावरून त्यांची लोकशाही मूल्ये दिसतात.

लोकशाही ही परिपूर्ण शासन व्यवस्था आहे असे नाही. एखाद्या क्षेत्रातील सर्वात सक्षम आणि तज्ज्ञ व्यक्ती मतदारांमध्ये लोकप्रिय असेलच असे नाही. कॉर्पोरेट जगतातील काहींना असे वाटते की, कॉर्पोरेट क्षेत्रातील यशस्वी अधिकाऱ्यांना सरकार चालवायला दिल्यास देशाची खूप प्रगती होईल. पण व्यवस्थापन क्षेत्रातील अत्यंत विद्वान मानल्या गेलेल्या हेन्री मिंट्जबर्ग यांचे मत आहे की, सरकारी व्यवस्था ही कॉर्पोरेट पद्धतीने चालवणे शक्य नाही. आणि इष्टही नाही. लोकशाहीतील अंगभूत दोष गृहीत धरले तरीही इतर पर्यायांपेक्षा लोकशाही अधिक चांगली या निष्कर्षांवर आता जगभर जवळजवळ एकमत झाले आहे. 

आपण विधिमंडळ, नोकरशाही, न्यायपालिका आणि माध्यमे यांना लोकशाहीचे स्तंभ म्हणत असलो तरी तांत्रिकदृष्टया त्या व्यवस्था आहेत. व्यवस्था म्हणजे तत्त्वे आणि प्रक्रियांबद्दलचा परस्पर करार. ट्रॅफिक सिग्नल हा पोलीस आणि वाहनचालक यांच्यातील करार आहे. लोक ट्रॅफिक सिग्नलवर लाल दिवा असतानाही पुढे जातात तेव्हा ते हा करार मोडून इतरांच्या रस्ता सुरक्षित ओलांडण्याच्या अधिकारांवर गदा आणत असतात. अशा लिखित आणि अलिखित करारांवरच समाजाचा डोलारा चालत असतो. गुन्हे घडल्यावर अनेकदा उद्विग्न होऊन काही लोक आरोपींना कुठलीही चौकशी वगैरे न करता तडम्क शिक्षा द्यावी या मताचे असतात. त्यांचा हेतू चांगला असला तरी या पद्धतीमुळे व्यवस्था कोलमडून पडण्याची भीती असते. एकदा व्यवस्था कोलमडली की मग आपले एकमेकांमध्ये झालेले करार नेमके काय आहेत हे समजतच नाही. याचे सोपे उदाहरण म्हणजे वीज गेल्यानंतर ट्रॅफिक सिग्नलवर पोलीस नसतील तर जे काही होते ते होय. लेनची शिस्त मोडल्याने उद्भवलेले ट्रॅफिक जॅम हा आपण एकमेकांशी केलेला करार मोडल्याचा परिणाम आहे, हे बरेचदा आपल्या लक्षात येत नाही.

मतदान केल्यानंतर बोटावर शाईची खूण ही आपण आपले लोकशाहीतील कर्तव्य पार पाडल्याची पोचपावती मानतो. तीच कर्तव्यपरायणता आपण ट्रॅफिक सिग्नल ओलांडताना, शासकीय कार्यालयांमध्ये कामे करून घेताना, आपल्या आस्थापनांमधील कर्मचाऱ्यांशी वागताना, तसेच इतर धर्मीयांच्या श्रद्धेचा आदर करून, आपल्यापेक्षा वेगळया जीवनपद्धतीचा आदर करून दाखविल्यास लोकशाही बळकट होईल. लोकशाही म्हणजे केवळ मतदान करणे नव्हे, तर सहमानवांना समान वागणूक देणे आणि त्यांच्या हक्कांचा आदर करणे होय.

लेखक हे व्यवस्थापन सल्लागार असून शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहेत.

  vasantvbang@gmail. com