– जतीन देसाई

पाकिस्तानात इम्रान खान यांना राजकारण आणि समाजकारणातून संपवण्याचे सर्व प्रयत्न लष्कराने केले. लष्कर आणि अन्य सरकारी व इतर संस्थेने मिळून माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा पक्ष पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) निवडणूक लढवू शकणार नाही, अशी व्यवस्था केली. लष्कराकडून होणारा छळ सहन करून इम्रान खानच्या समर्थकाने सर्वत्र अपक्ष म्हणून निवडणूक लढवली. इम्रान खान तुरुंगात असल्यामुळे त्यांच्याकडे स्टार प्रचारक नव्हते. बहुतेक उमेदवार देखील नवीन होते. पण लोकांनी त्यांना निवडून देण्याचं ठरवलेलं. लष्कराने माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांना मदत केली. पाकिस्तानी आणि आंतरराष्ट्रीय माध्यमांनी नवाझ शरीफ पुढचे पंतप्रधान होणार, असं जाहीरच करून टाकलेलं. पाकिस्तान पीपल्स पार्टी (पीपीपी) व इतरांच्या मदतीने नवाझ किंवा शाहबाज शरीफ पंतप्रधान देखील होतील. मात्र या सार्वत्रिक निवडणुकीचा “प्लेयर ऑफ द मॅच” माजी क्रिकेटर इम्रान खान आहे. पीटीआय समर्थक अपक्ष उमेदवारांना सर्वात जास्त जागा मिळाल्या. पाकिस्तानच्या अनेक विश्लेषकांचं म्हणणं आहे की मतदानात लष्कराने हस्तक्षेप केला नसता तर १२५ हून अधिक मतदारसंघात पीटीआय समर्थकांचा विजय झाला असता. काही ठिकाणी रिटर्निंग ऑफिसर्सना पराभूत उमेदवारांना विजयी जाहीर करण्यास भाग पाडण्यात आले असल्याचा आरोप होत आहे. काही ठिकाणी रिटर्निंग ऑफिसरांना बंदुकांनी धमकी पण देण्यात आलेली.

kareena kapoor lal singh chadhha aamir khan
‘लाल सिंग चड्ढा’च्या अपयशाने निराश झाला होता आमिर खान, करीना कपूर खानने केला खुलासा; म्हणाली…
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Uday Samant On Jayant Patil
Uday Samant : “जयंत पाटील महायुतीत येणार असतील तर…”, शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान
Jayant Patil, Islampur Jayant Patil, Jayant Patil Sharad Pawar Group, Jayant Patil latest news,
राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांच्यासमोर मतदारसंघात कडवे आव्हान
readers feedback on loksatta editorial
लोकमानस : नाही तर ईडी, सीबीआय आहेतच!
Arif Mohammed Khan
Arif Mohammed Khan : केरळचे राज्यपाल आरिफ खान यांचं भगवद्गीतेबद्दल मोठं विधान; म्हणाले, “हा भारताचा…”
Pakistan former PM Imran Khan
Imran Khan: माजी पंतप्रधान इम्रान खान यांचे कायदेभंग आंदोलन करण्याचे आवाहन, पाकिस्तानमध्ये यादवी माजणार?
Eknath Shinde Devendra Fadnavis Ajit Pawar Narendra Modi
“…तर शिंदेंशिवाय शपथविधी झाला असता”, ठाकरेंच्या शिवसेनेचा दावा; म्हणाले, “सत्तेत आमचेही लोक, आतल्या गोष्टी…”

दुसरीकडे, अपक्ष उमेदवारांपेक्षा कमी जागा मिळाल्या असल्या तरी पाकिस्तान मुस्लिम लीगच्या (एन) नवाझ शरीफ यांनी सरकार बनवण्याच्या दृष्टीने पावले उचलायला सुरुवात केली आहे. पाकिस्तान मुस्लिम लीग (पीएमएल) आणि पीपीपीने एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढवलेली. या दोन्ही पक्षाचे नेते शाहबाज शरीफ आणि आसिफ अली झरदारी व बिलावल भुत्तो यांच्यात नवीन सरकार बनविण्याचा विचार करण्यासाठी शुक्रवारी रात्री लाहोर येथे बैठक देखील झाली. काही अपक्षांना लष्कराच्या मदतीने ‘समजण्यात’ देखील येईल आणि त्यांचा पाठिंबा मिळवण्यात येईल. लष्कराला कुठल्याही परिस्थितीत इम्रान खान पंतप्रधान म्हणून नको आहेत. निवडणूक आयोगाने इम्रान खानला निवडणूक लढवता येणार नाही, असा आदेश दिलेला. एका अविश्वास प्रस्तावामार्फत एप्रिल २०२२ ला पंतप्रधानपदावरून इम्रान खान यांना हटविण्यात आलेलं. पीएमएल, पीपीपी व इतर पक्षांनी एकत्र येऊन शाहबाज शरीफच्या नेतृत्वाखाली सरकार बनवलेलं. इम्रान खानच्या विरोधात अनेक खटले दाखल केले गेले. आतापर्यंत चार खटल्यांचे निकाल आले आहेत. तोशाखानाच्या पहिल्या केसमध्ये गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात इम्रान खान यांना तीन वर्षांची शिक्षा देण्यात आली. आता निवडणुकांच्या आधी तीन प्रकरणांचे निकाल आले. त्यात सायफर केसमध्ये इम्रान आणि माजी परराष्ट्रमंत्री शहा महमूद कुरेशी यांना १०-१० वर्षांची शिक्षा देण्यात आली. तोशाखानाच्या एका अन्य खटल्यात इम्रान यांना १४ वर्षांची शिक्षा आणि अनधिकृत निकाहबद्दल इम्रान खान आणि त्याची पत्नी बुसरा बीबी यांना ७-७ वर्षांची शिक्षा देण्यात आली.

हेही वाचा – परिघावरचे लोक हाच इथल्या राजकारणाचा मुख्य प्रवाह…

इम्रान खान आधीही लोकप्रिय होते आणि त्यांना तुरुंगात टाकल्यानंतर ज्या स्वरूपाने न्यायालयाने निकाल दिले त्यामुळे इम्रानबद्दल लोकांमध्ये प्रचंड सहानुभूती निर्माण झाली. ही सहानुभूती कोणाला दिसली नाही. पण मतदानातून ती व्यक्त झाली. इम्रान खान यांच्या नावावर लोक निवडून आले. इम्रान खान यांच्या उमेदवाराला मत म्हणजे लष्कराच्या विरोधात मतदान हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. इम्रान खान यांनी लष्कराची शरणागती पत्करली नाही. अफगाणिस्तानला लागून असलेल्या खैबर-पख्तुनख्वा प्रांतात इम्रान खान यांच्या उमेदवारांना प्रचंड यश मिळालं. इम्रान खान यांनी राजकारणात दहशतवादी संघटनांचा सतत उपयोग केला आहे. त्यांचा उल्लेख अनेकजण ‘मिस्टर तालिबान खान’ असाही करतात. २०२१ च्या १५ ऑगस्टला तालिबानने काबूलवर कब्जा मिळवल्यानंतर इम्रान खान यांनी “अफघान जनता आता गुलामगिरीतून मुक्त झाली” असं म्हटलेलं. भारताच्या दृष्टीने विचार केल्यास शरीफ बंधूपैकी कोणी पंतप्रधान होणे हे नेहमीच चांगलं. नवाझ किंवा शाहबाज पंतप्रधान झाल्यास उभय देशात व्यापार सुरू होऊ शकतो आणि परत संवादाची सुरुवात होऊ शकते.

पाकिस्तानच्या इतिहासात लष्कराची सत्तेत नेहमी महत्त्वाची भूमिका राहिली आहे. लष्कराला टाळून सत्ताधाऱ्यांना महत्त्वाचे निर्णय घेता येत नाही. देशाचा पंतप्रधान कोण होणार ते देखील वेळोवेळी लष्कर ठरवत आलं आहे. अलीकडचा विचार केल्यास २०१८ च्या सार्वत्रिक निवडणुकीत इम्रान खान यांना लष्कराने ‘सिलेक्ट’ करून पंतप्रधान बनवलेलं. परंतु इम्रान खान यांनी स्वतःला आपण लष्करापेक्षा मोठे आहोत, असं दाखवायला सुरुवात केली. त्यामुळे २०२२ च्या एप्रिल महिन्यात त्यांना सत्तेतून जावं लागलं. शाहबाज शरीफ पंतप्रधान झाले.

२०१७ पासूनच नवाझ शरीफ यांच्या विरोधात लष्कराने इम्रान खान यांचा उपयोग करायला सुरुवात केलेली. आताच्या निवडणुकीत इम्रान खान यांच्या विरोधात नवाझ शरीफ यांना लष्कराने सर्वप्रकारे मदत केली. नवाझ शरीफ लंडनला होते. निवडणूक लढवण्याची त्यांच्यावर बंदी होती. लष्करासोबत झालेल्या समझोतामुळे पाकिस्तानात ते गेल्यावर्षी ऑक्टोबर महिन्यात परत आले आणि न्यायालयाने वेगवेगळे निकाल देऊन नवाझ शरीफ यांना सर्व प्रकारांनी मदत केली. लष्करामुळेच हे सर्व शक्य झालं. लष्करामुळे नवाझ शरीफ चौथ्यांदा पंतप्रधान होतील, अशी चर्चा सुरू झाली. त्याला कारण म्हणजे पाकिस्तानच्या राजकारणात आणि समाजकारणात लष्कराचा असलेला निर्णायक प्रभाव. लष्कराच्या विरोधात बोलण्यास सत्ताधारी किंवा अन्य कोणी पुढे येत नाही. इम्रान खान यांनी तसा प्रयत्न केला आणि त्यामुळे त्यांना सत्ता सोडावी लागली. इम्रान खानच्या विरोधात १०० हून अधिक खटले भरण्यात आले. इम्रान खान, शहा महमूद कुरेशी तुरुंगात आहेत.

इम्रान खान यांच्या पक्षाच्या बहुसंख्य वरिष्ठ नेत्यांनी गेल्या वर्षी ९ मे नंतर पक्ष सोडला होता. जहांगीर तरीन, फवाद चौधरी, शिरीन मजारी, असद उमर सारखे माजी मंत्री गेल्या वर्षी पक्षातून बाहेर पडले. ९ मे ला इस्लामाबाद उच्च न्यायालयातून पोलिसांनी इम्रान खान यांना ताब्यात घेतलं. त्याच्या विरोधात पीटीआय समर्थकांनी रावळपिंडी येथील लष्कराच्या मुख्यालयावर व इतरत्र हल्ले केले होते. लष्कराने नंतर पीटीआयच्या विरोधात कारवाई सुरू केली आणि मोठ्या संख्येत पीटीआयच्या नेत्यांची अटक करण्यात आली. लोकांना फारसे माहित नसलेले पीटीआयचे अनेक उमेदवार आज मात्र इम्रान खान यांच्यामुळे निवडून आले. तुरुंगात असताना देखील इम्रान खान इतर सर्व नेत्यांपेक्षा पाकिस्तानात अधिक लोकप्रिय आहेत ही वस्तुस्थिती आहे.

हेही वाचा – दिल्लीत आजपासून विश्व पुस्तक मेळा

मतदान संपल्याच्या अनेक तासानंतर निकाल जाहीर करण्यात आले आणि त्याबद्दल माध्यमांमध्ये आणि मतदारांमध्ये प्रचंड नाराजी, असंतोष दिसत होता. नैमत खान नावाच्या पत्रकाराने X (पूर्वीचा ट्विटर) मध्ये म्हटलं, “सोहेल वराईच यांचा अपवाद केल्यास इतर सर्व विश्लेषकांच्या मनात निवडणुकीच्या विश्वसनीयताबद्दल प्रश्न आहेत. माध्यमांना रिटर्निंग ऑफिसरांच्या कार्यालयात जाण्यापासून अडवलं जात होत आणि १२ तासांपेक्षा अधिक वेळ झाला तरी निकाल जाहीर करण्यात आले नाही.” वेगवेगळ्या वर्तमानपत्राच्या वेबसाईटवर पण फारसे निकाल शुक्रवार संध्याकाळपर्यंत दाखवले जात नव्हते. वृत्तवाहिन्यांवर काही चर्चा सुरू होत्या. निकाल उशिरापर्यंत जाहीर होत नव्हते. त्यामुळे पाकिस्तानात अनेक ठिकाणी तणाव निर्माण झालेला. नवाझ शरीफ आणि त्यांची कन्या मरियम औरंगजेब, माजी पंतप्रधान शाहबाज शरीफ विजयी झाले आहेत. नवाझ शरीफ यांचा लाहोरहून विजय झाला. आश्चर्य म्हणजे त्यांच्या मतदारसंघातील १४ उमेदवारांना एकही मत मिळाली नाही. त्यांच्या नातेवाईकांनी देखील त्यांना मत दिले नसेल का हा प्रश्न सहज निर्माण होतो. चर्चेत असलेल्या हिंदू महिला उमेदवार डॉ. सवेरा प्रकाश यांचा पराभव झाला. सवेरा प्रकाश या खैबर-पख्तुनख्वा येथून प्रांतीय सभेसाठी पीपीपीच्या तिकीटवर उभ्या होत्या. सवेराला मात्र १७५४ मत मिळाली तर पीटीआय समर्थकाला २८ हजारांहून अधिक. अतिरेकी संघटना लष्कर-ए-तय्यबाच्या सर्वेसर्वा हाफीज सईद याचा मुलगा तलहा याचा लाहोरहून पराभव झाला. पीटीआय समर्थक लतीफ खोसा यांनी तलहाचा पराभव केला. तलहा याला मात्र २०२४ मत मिळाली तर खोसाला १,१७,१०९. मुत्ताहिदा कौमी मुव्हमेन्ट पाकिस्तान यांच्या काही उमेदवार कराचीत शुक्रवारी रात्री तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर होते. रिटर्निंग ऑफिसरने निकाल १२ तासांहून अधिक वेळ जाहीर केला नाही आणि नंतर त्यांना विजयी जाहीर करण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे. पीटीआयचे उमेदवार खूप पुढे होते पण नंतर त्यांचा पराभव झाल्याचं जाहीर करण्यात आले.

पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर आता काय करणार, हा प्रश्न आहे. पाकिस्तानात पहिल्यांदा लष्कराच्या अपेक्षेप्रमाणे झाले नाही. इम्रान कुठल्याही परिस्थितीत पंतप्रधान होणार नाही हे लष्करासाठी महत्त्वाचे आहे. निवडणुकीसाठी इम्रान खान अपात्र होते आणि म्हणून ते पंतप्रधान होऊ शकणार नाही. पीटीआय समर्थक विजयी अपक्ष उमेदवारांवर वेगवेगळ्या मार्गाने दबाव आणला जाईल. त्यांना नवाज शरीफ यांच्या पक्षाला मदत करण्यासाठी ‘समजावलं’ जाईल. मात्र येणारे दिवस पाकिस्तानसाठी अतिशय कठीण असतील. पीटीआय समर्थक आणि इतरांमध्ये निर्माण झालेला तणाव स्फोटक स्वरूप घेण्याची शक्यता नाकारता येत नाही. वाईट अवस्थेत असलेली अर्थव्यवस्था, वाढते दहशतवादी हल्ले यासारखे मोठे प्रश्न नवीन सरकार समोर असतील, तेहरीक-ए-तालिबान पाकिस्तान सारखी दहशतवादी संघटना अधिक हल्ले करेल अशी शक्यता नाकारता येत नाही.

jatindesai123@gmail.com

Story img Loader