दोन पिढय़ांमध्ये मतभेद असणे हे नेहमीचेच असले तरीही, संवादमाध्यमांतील क्रांतीनंतर ही दरी अधिक खोल झाली आहे का, प्रत्यक्ष संवाद कमी झाल्यामुळे नातीच अनोळखी ठरू लागली आहेत का, याचा शोध घेणाऱ्या पुस्तकाविषयी..
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
गायत्री लेले
आपल्या भवतालचे जग दिवसेंदिवस जटिल होत आहे. विशेषत: गेल्या दशकात जगभरात घडलेल्या घटना, राजकीय-सामाजिक व सांस्कृतिक उलथापालथी आणि तंत्रज्ञानात झालेले क्रांतिकारी बदल या सगळय़ांचा आपल्या रोजच्या जगण्यावर निश्चितच परिणाम झाला आहे. हा परिणाम दर वेळी आपल्याला दिसेल अथवा जाणवेलच असे नाही. परंतु आपल्या अस्तित्वावर, विचारांवर आणि नातेसंबंधांवर या सर्व घडामोडींचा तात्कालिक आणि दूरगामी परिणाम होत असतो. कदाचित प्रत्येक पिढीतील वडीलधारे भूतकाळाच्या आठवणी जागवत भविष्याची चिंता व्यक्त करत असतात. प्रत्येक पिढीचे वेगळे ताण असतात, समस्या असतात. त्या समस्यांचे निराकरण करण्याचे स्वत:चे काही मार्ग असतात. त्यातून पुढच्या पिढीला, आपल्या मुलांना काहीएक मार्गदर्शन करता येईल इतके संचित जमा होते. पण आजचे जग काहीसे निराळे आहे. आज तरुण पिढीला पडणारे प्रश्न वेगळय़ाच प्रतलावरचे वाटू शकतात. ते वापरत असलेले तंत्रज्ञान, समाजमाध्यमे, संवादाची इतर साधने, आंतरजालाच्या मदतीने ज्ञानाचे सहज उपलब्ध झालेले प्रचंड भांडार आणि त्याच वेळी माहितीच्या विस्फोटामुळे उद्भवलेली गोंधळाची स्थिती, विचारसरणींची घुसळण व मतमतांतराचा गदारोळ या सगळय़ाचा समतोल कसा साधायचा असा प्रश्न सर्वानाच पडलेला दिसतो. मागच्या पिढीकडून पुढच्या पिढीकडे आपोआप संक्रमित होणारी मूल्ये व मार्गदर्शक तत्त्वे आता, या काळात पुरेशी ठरतीलच, असे ठामपणे म्हणता येत नाही. प्रश्नांची उत्तरे शोधता शोधता नवीनच समस्या उद्भवण्याची शक्यता अधिक. या कोलाहलावर बेतलेली कादंबरी म्हणजे कुणाल बासू यांची ‘इन अॅन आयडियल वर्ल्ड’.
ही कहाणी आहे कोलकात्यातील सुखवस्तू, उच्चमध्यमवर्गीय आणि तथाकथित उच्चजातीय सेनगुप्ता कुटुंबाची. आई रोहिणी, वडील जॉय आणि शिक्षणानिमित्त दूरच्या शहरात राहणारा त्यांचा विशीतला मुलगा बॉबी असे हे छोटेखानी कुटुंब. जॉय बँकर तर रोहिणी शाळेतील शिक्षिका. या दोघांचा प्रेमविवाह झालेला असतो, ज्यात मार्क्सवादी- माओवादी विचारसरणीचा मोठा वाटा असतो. त्या दोघांनी महाविद्यालयात शिकत असताना चळवळीला वाहून घेतलेले असते, विशेषत: जॉय हा त्याच्या तरुण वयात आघाडीचा क्रांतिकारक म्हणून ओळखला जात असतो. पण सद्य:स्थितीत मात्र ते अतिशय सुखासीन, अभिरुचीपूर्ण, कदाचित चंगळवादी म्हणू शकतो असे आयुष्य जगत असतात. त्यांच्या या चाकोरीबद्ध आयुष्यात फारसा बदल घडत नसतो आणि त्यामुळे एक प्रकारची सुस्ती आलेली असते. त्यांना भवतालचे आकलन जरूर असते, पण त्याचा त्यांच्या आयुष्यावर थेट परिणाम होत नसल्याने बाहेरचे जग आणि त्यांचे आयुष्य यात अंतर पडलेले असते. मात्र एका घटनेमुळे जॉय आणि रोहिणीच्या पायाखालची जमीन सरकते.
त्यांचा मुलगा बॉबी हा मनहर या कोलकात्यापासून दूर असणाऱ्या एका लहान शहरातील नवीन खासगी विद्यापीठात शिकायला असतो. त्याच विद्यापीठात जॉयची कॉलेजमधील एक मैत्रीण काम करत असते. एक दिवस ती तडकाफडकी जॉयला भेटायला कोलकात्याला येते आणि त्याला विद्यापीठातील एका घटनेची माहिती देते. अल्ताफ नावाचा एक मुस्लीम विद्यार्थी तीन महिन्यांपासून विद्यापीठातून गायब झालेला असतो. त्याचा ठावठिकाणा शोधण्यात पोलीस अपयशी ठरतात. अल्ताफची आई आणि इतर काही मित्रमैत्रिणी त्याला शोधण्याचे बरेच प्रयत्न करत असतात. विद्यापीठातील काही उजव्या गटांतील मुलांनी अल्ताफला पळवून नेऊन नंतर त्याची हत्या केली असल्याची आवई उठलेली असते. अर्थात याचा पुरावा कोणाच्याही हातात नसतो. तरीही, या संशयित मुलांची नावं विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये सर्वश्रुत असतात. हे सगळे जॉयला सांगण्याचे कारण म्हणजे, त्याचा मुलगा बॉबी हा त्या संशयितांपैकी एक असतो.
आत्तापर्यंत तटस्थपणे ही घटना ऐकणारा जॉय त्याच्या मुलाच्या उल्लेखामुळे हबकून जातो आणि मग सुरू होतो एक प्रवास. सुरुवातीला त्याच्या एकटय़ाचा, मग त्याचा आणि रोहिणीचा आणि सरतेशेवटी त्या तिघांचा. या प्रवासाचा अंत काय, हे इथे सांगण्याचे प्रयोजन नाही. पण त्यानिमित्ताने कादंबरीकाराने उपस्थित केलेले काही प्रश्न हे निश्चितच कालसुसंगत आणि विचारप्रवृत्त करणारेही आहेत.
बॉबी अतिशय कट्टर झाला आहे हे ऐकल्यावर पालकांच्या मनात स्वत:बद्दल शंका उपस्थित होतात. आपण पालकत्वात कुठे कमी पडलो, हा प्रश्न त्यांना भेडसावू लागतो. या प्रश्नाचा मागोवा ते वेगवेगळय़ा प्रसंगांत घेत जातात. आपल्या मुलाला जो ‘आदर्श’ देश किंवा जसा समाज हवा आहे, त्याच्या अगदी उलट विचार ते त्यांच्या तरुण वयात करत होते, याचा उल्लेखही सतत येतो. दोघे पालक आणि त्यांचा मुलगा यांची ‘आदर्शा’ची संकल्पना निराळी असते. पालकांचे स्वप्न हे सर्वसमावेशक, सहिष्णू, धर्मनिरपेक्ष, उदारमतवादी समाजाचे असते. ते संवैधानिक मूल्यांच्या जवळ जाणारे असते. हे स्वप्न साध्य करण्यासाठी जॉयने त्याच्या तरुण वयात हिंसक पद्धतींचा अवलंब केलेला असतो, पण त्याला वेळीच भानही आलेले असते. याउलट बॉबी मात्र त्याच्या कोवळय़ा वयात शहरापासून दूर, कट्टर वातावरणात जातो. तिथे एका ‘गुरू’च्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठातील काही कट्टरवादी विद्यार्थी विचारसरणीचे धडे गिरवत असतात. बॉबी पालकांच्या उदारमतवादी स्वप्नांपासून यथावकाश दूर जातो. भारताच्या सुवर्णकाळाच्या पुनरुज्जीवनाची स्वप्ने त्याला पडू
लागतात. सामिष खाणे, धर्म न मानणे इ. गोष्टी त्याला पाप वाटू लागतात. उदारमतवादी विचारांच्या शिक्षकांची घृणा वाटू लागते. मुस्लिमांबाबत तेढ निर्माण होते. चूक काय आणि बरोबर काय याबद्दलच्या संकल्पना बॉबीच्या डोक्यात इतक्या घट्ट रुततात की, रोहिणी आणि जॉयला त्याच्याशी साधासरळ संवाद करणे दुरापास्त होऊन बसते.
हे आपल्या कुटुंबांत आणि मित्रमंडळींच्या वर्तुळांतही सर्रास घडताना दिसते. एका बाजूला संवादासाठी अनेकविध साधने उपलब्ध आहेत. सगळे एकमेकांच्या पूर्वीहून अधिक संपर्कात आहे. एका क्लिकवर जगात कोणाशीही संपर्क साधणे शक्य आहे. पण तरीही विरुद्ध विचारसरणींची माणसे क्वचितच सौहार्दाने बोलताना दिसतात. मतभेद असतील तरी शांतपणे व आदराने एकमेकांशी बोलण्याची कला आपण जवळपास विसरून गेलो आहोत. या कादंबरीत काही टोकाच्या घटना दाखवल्या आहेत, ज्यात माणसामाणसांमध्ये खऱ्या अर्थाने वाद आणि संवाद घडताना दिसत नाहीत. आहेत ते फक्त आरोप आणि एकमेकांवरची कुरघोडी. किंवा मग एकसारखा विचार करणाऱ्या माणसांचा जाणीवपूर्वक तयार झालेला गट, ज्यात वेगळी मते असणाऱ्यांना थारा नाही. आपल्या रोजच्या जगण्यातही छोटय़ा पातळीवर का असेना, हेच होताना दिसते. कोवळय़ा वयातील संस्कारक्षम मने त्यामुळे अधिक गोंधळून जाऊ शकतात. सदसद्विवेक हरवून बसू शकतात. कादंबरीतील बॉबीच्या बाबतीत नेमके हेच होते.
एका प्रसंगात बॉबीच्या विद्यापीठातील शिक्षिका त्याच्या आईवडिलांना म्हणते- ‘आपल्या देशात हे काय सुरू आहे! आई-वडील आपल्या मुलांविरुद्ध, भाऊ भावांविरुद्ध, मित्र मित्रांविरुद्ध उभे ठाकत आहेत. आपण एकमेकांसाठी अनोळखी होत चाललो आहोत.’ हे वाक्य विचारसरणीच्या पलीकडे जाऊन आपल्याच माणसांशी माणूस म्हणून नाते टिकवणे आपल्याला जमत आहे की नाही, हा आजच्या काळातला यक्षप्रश्न अधोरेखित करते.
कुठल्या तरी विचारसरणीच्या टोकावरून जे सत्य दिसते, तो त्याचा केवळ एक अंश असू शकतो. सत्य हे मध्ये कुठे तरी असते आणि सगळय़ांना सारख्याच प्रमाणात चकित आणि भयभीत करू शकते. या कादंबरीतील हा आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आहे. जॉय आणि रोहिणीसाठी जे सत्य आहे, जो देश आहे, ते बॉबीसाठी वर्षांनुवर्षे तयार केलेले एक मिथक आहे. त्याच्या मते त्याच्या वास्तवातील आणि स्वप्नातील भारत पूर्णत: वेगळा आहे आणि तो सत्यात उतरवण्यासाठी त्याची धडपड सुरू आहे. कदाचित अशीच धडपड एके काळी त्याच्या आईवडिलांनीही केली होती. त्यातून काय निष्पन्न झाले हे त्यांना आज सांगता येत नाही. कारण पुन्हा तेच. सत्य कुठे तरी वेगळीकडेच आहे, ज्याचा शोध दोन्ही बाजूंना लागायचा आहे. या गोंधळाची छाया कादंबरीभर पडलेली दिसते.
‘इन अॅन आयडियल वर्ल्ड’मध्ये अनेक कच्चे दुवेही आहेत. एखादी तरुण व्यक्ती विशिष्ट विचारसरणीकडे कशी ओढली जाते, यावरचे आणखी चिंतन एक वाचक म्हणून मला अभिप्रेत होते. ही प्रक्रिया कौटुंबिक तसेच सामाजिक परिघात कशी घडते, हे जाणून घेणे आवश्यक आहे. पुस्तकात ते अगदीच थोडक्यात मांडले आहे, असे वाटले. त्यामुळे त्यातील पात्रांच्या व्यक्तिमत्त्वांना पुरेशी खोली प्राप्त होत नाही. कादंबरीकाराला निरनिराळे सनसनाटी म्हणावेत असे प्रसंग समाविष्ट करण्याचा मोह आवरलेला नाही, असेही दिसते. काही ठिकाणी उगाच गरज नसताना गोष्टी अधिक नाटय़मय केल्या आहेत, असे वाटते. त्यामुळे कादंबरी पुढे जाताना हे सर्व प्रसंग डोळय़ासमोर निश्चितपणे उभे राहतात, पण त्यातला आत्मा मात्र सापडत नाही. एकूणच कथानक खूप थकवणारे होते आणि त्याचा लेखकालाही शेवटी थकवा आला असावा की काय, असे पुस्तक मिटताना वाटून जाते.
दुसरी गोष्ट म्हणजे, कादंबरीतील पात्रे त्यांच्या विचारसरणीनुसार अगदीच साचेबद्ध पद्धतीने रंगवली आहेत. त्यातल्या त्यात बॉबीच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू दाखवण्याचा प्रयत्न झाला आहे. तो अतिशय कट्टर असला तरीही त्याला आई-वडिलांबद्दल आस्था आहे, गरिबांबद्दल कणव आहे आणि सगळय़ांना न्याय मिळवून द्यायलाच पाहिजे, अशा विचारांचा तो आहे. पण तरीही असे वाटून जाते की या पैलूंवर म्हणावा तितका प्रकाश पडलेला नाही. नाटय़मय घटनांच्या नादात हे बारीक परंतु महत्त्वाचे दुवे निसटून गेले आहेत. त्यामुळे पात्रांची पुरेशी ओळख नसतानाही त्यांच्या आयुष्यातील वळणांवरून आपण घरंगळत चाललो आहोत, असे शेवटी शेवटी वाटू लागते.
लेखक कुणाल बसू यांची जयपूर लिटरेचर फेस्टिव्हलमध्ये या पुस्तकासंदर्भात झालेली मुलाखत आंतरजालावर उपलब्ध आहे. त्यात एका वाचकाने त्यांना विचारले आहे की, ‘जसे प्रेमचंद यांच्या कादंबऱ्यांतून त्यांच्या काळातील सामाजिक स्थितीचे दर्शन घडते, तसे तुमच्या पुस्तकाच्या बाबतीत काही वर्षांनी होईल असे वाटते का?’ त्यावर बसू यांनी दिलेले उत्तर समर्पक आहे. ते म्हणतात, ‘हे ठरवण्याची जबाबदारी वाचकांची आहे. कदाचित वाचक असे म्हणतील की, हे तर निव्वळ एक कथानक आहे आणि भारतातील सद्य:स्थितीचा त्याच्याशी काही संबंध नाही. परंतु काही वाचक कदाचित त्याच्याशी जोडून घेऊ शकतील. ते कदाचित याचा संबंध आपल्या जगण्याशी, आपल्या मनाच्या स्थितीशी लावू शकतील. हे एक नागरिक म्हणून आपल्याला खरोखर काय दिसते यावरून ठरवायचे आहे, निव्वळ बातम्यांमधून दिसणाऱ्या सामाजिक स्थितीवरून नाही.
‘इन अॅन आयडियल वर्ल्ड’शी लोक अशा पद्धतीने स्वत:ला जोडून घेऊ शकतात का हे येणारा काळच ठरवेल. पण आजच्या काळाचे खरोखरचे चित्र जर कुणाल बसू म्हणतात त्याप्रमाणे असेल, तर ते काही आपल्यासाठी फार बरे नाही असेच म्हणावे लागेल.