जयेश राणे
गणेशाचे आगमन ते विसर्जन हा कालावधी अनेक प्रश्न उपस्थित करतो. काही ठिकाणी पारंपरिक पद्धतीने शांततेत तर काही ठिकाणी डिजेच्या दणदणाटात, फटाक्यांचा धूर, कचरा करत मिरवणुका निघतात. कानांवर आघात करणाऱ्या डीजेच्या आवाजाला अलीकडे डोळ्यांना त्रासदायक ठरणाऱ्या लेझर लाईट्सचीही साथ लाभलेली दिसते. खरेतर सर्व मंडपांतील गणपतींचे महात्म्य सारखेच. मात्र तरीही मोजक्या सुप्रसिद्ध गणपतींच्या दर्शनासाठी लांबलचक रांगा लागतात, धक्काबुक्की होते. त्यात संयम सुटतो आणि देवाच्या दारातच भक्तांवर हात उगारला जातो. गणेशोत्सव खरोखरच अशाप्रकारे साजरा करणे अनिवार्य आहे का? डीजे, फटाके, तासंतास चालणाऱ्या मिरवणुका, देवाच्या दारात होणारी धक्काबुक्की लक्षात घेता यात धार्मिकता कुठे आहे, असा प्रश्न पडतो.
अनेकांना धार्मिकता म्हणजे काय, याची पुसटशी कल्पनाही नसते आणि त्याविषयी जाणून घेण्याची आवड सुद्धा नसते. बहुतेक ठिकाणी असे उत्साही उत्सव साजरा करण्यात आघाडीवर असल्याने आणि ते म्हणतील तीच पूर्व दिशा असल्याने गणेशोत्सवात धार्मिकता कितपत शिल्लक आहे, असा प्रश्न पडतो. यंदाच्या उत्सवातून मला आनंद मिळाला का, समाधान मिळाले का, यावर विचार करण्याएवढा वेळ कोणालाही नसतो. डीजे, फटाके मात्र हटकून असतात. संकटात देवाची आठवण होते. त्याला प्रार्थना केली जाते, साकडे घातले जाते. देवाकडे सतत काही मागण्यापेक्षा पुढील वर्षभरात आपण गणेशभक्ती म्हणून कोणत्या सकारात्मक गोष्टी करू शकतो, याचा विचार झाला पाहिजे. अशा विधायक कामांसाठी त्या बुद्धीदात्याला साकडे घातले, तर तो का ऐकणार नाही?
धार्मिकता म्हणजे शास्त्राप्रमाणे उत्सव साजरा करणे. गावोगावी, शहरांत कीर्तन सप्ताह होतात. तेथील वातावरण भक्तिमय होते. कारण तिथे भगवंताचे अखंड स्मरण होत असते. असे कार्यक्रम भक्तीची ओढ निर्माण करण्यासह त्यात वाढही करतात. यांप्रमाणे गणेशोत्सवही श्रद्धा आणि भक्तीचा उत्सव आहे. तो ठिकठिकाणी साजरा होत असल्याने त्याचे स्वरूपही विस्तीर्ण आहे. खऱ्या अर्थी हा उत्सव धार्मिकपद्धतीने झाला तर सर्वत्रचे वातावरण भक्तिमय होईल, मात्र केवळ हाताच्या बोटांवर मोजता येतील इतकेच लोक धार्मिकता टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्नरत असतात.
समाजप्रबोधनाचे हक्काचे व्यासपीठ म्हणजे सार्वजनिक उत्सव (गणेशोत्सव- नवरात्र) असतात. त्या व्यासपीठाचा उपयोग करत समाज एकसंघ ठेवणे, त्यास योग्य दिशा देण्याची जबाबदारी या निमित्ताने पाडता येऊ शकते. केवळ सोपस्कार म्हणून उत्सव साजरा करणे नको. आदल्या वर्षी झालेल्या चुकांची पुनरावृत्ती टाळून, नवीन चुका होऊ न देता उत्सव उत्साहात पार पाडला पाहिजे. देव सर्वत्र आहे, हे लक्षात ठेवून कोणत्याही सजीव-निर्जिवात सामावलेल्या देवाला त्रास न देण्याची दक्षता बाळगली पाहिजे.
विविध विषयांवर आधारित उत्तम देखावे, चलचित्र सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे वैशिष्ट्य असते. त्यातून विशिष्ट संदेश दिला जातो. लोकांचीही ते पाहण्यासाठी गर्दी उसळते. सायंकाळच्या वेळी कुटुंबासह स्थानिक गणपती पाहण्यासाठी जाणाऱ्यांची संख्या मोठी असते. सामाजिक प्रबोधन करण्यामागील व्यापक हेतू निश्चितच कौतुकास्पद असतो. लोकांनी तिथे केवळ मनोरंजन म्हणून जाऊ नये. तर त्यातून काय सांगितले जात आहे, तसे काही आपल्या विभागात करता येईल का, यावर विचार केला पाहिजे, त्याची अमलबजावणीही केली पाहिजे. ११ दिवसांत जे पाहिले त्याची उर्वरित वर्षभर अमलबजावणी केली पाहिजे. तरच देखाव्यांतून दिलेला संदेश सार्थकी लागेल.
पंढरपूरच्या विठ्ठलाची निघणारी वारी संपूर्ण जगासाठी आदर आणि आकर्षणाचा विषय आहे. लक्षावधी वारकरी त्यात सहभागी त्तरीही कुठेही गडबड गोंधळ नाही की हाणामाऱ्या नाहीत, पोलीस यंत्रणेवर ताण नाही. वारीच्या कालावधीत वारकरी मंडळी प्रतिदिन भजन, कीर्तन, नामस्मरण यांत तल्लीन होतात. वारीचा आदर्श घेऊन गणेशोत्सव – नवरात्रोत्सव साजरे केले, तर डीजे, फटाके यांची आवश्यकताच भासणार नाही. तुलना करणे हा उद्देश नाही, मात्र आपल्याच आजुबाजूला घडणाऱ्या घटनांतून प्रेरणा घ्यायला काय हरकत आहे?
देव भावाचा भुकेला आहे. त्याला विद्युत रोषणाई, भव्य आरास यांची आस नाही, असे म्हणतात. यावर गांभीर्याने चिंतन करण्याची वेळ आली आहे. धार्मिक उत्सवांत अधार्मिक गोष्टींचा शिरकाव झाला आहे. उत्सवांना आलेले व्यापारी स्वरूप लक्षात घेता नवीन पिढीला उत्सवांतील धार्मिकता म्हणजे काय, हे समजावून सांगण्याची वेळ आली आहे. उद्देश चुका दाखविणे हा नव्हे, तर योग्य काय हे सांगणे, हा असावा. सत्य हे कायमच कटू असते. पण त्याची मात्रा अत्यंत गुणकारी असते. उत्सवांबाबत ती आजमावून पाहण्याची वेळ आली आहे.