प्रमोद जाधव
कोकणातील एका गावातील साडेचार हजार एकर शेतजमीन विक्रीला काढल्याची बातमी वाचली. या बातमीत नमूद केलेली स्थिती थोड्याफार फरकाने कोकणात सर्वत्र दिसून येते. यावर मात करण्यासाठी या गावांमध्ये रोजगाराच्या संधी निर्माण करणे गरजेचे आहे.

या भागात आंबा काजू चांगला होतो, हे सर्वांना माहिती आहेच. परंतु सध्या प्रामुख्याने नर्सरीतून कलम विकत घेऊन लागवड करण्यात येते. डोंगराळ भागांमध्ये उन्हाळ्यात या कलमांना पाणी घालणे फार कष्टप्रद काम आहे. मात्र जंगलामध्ये मोठमोठे वृक्ष असतात. त्यांना पावसाळ्यानंतर कोणी पाणी घालत नाही, तरीही नैसर्गिक स्थितीतच ते मोठे होतात. त्याच धर्तीवर मी माझ्या शेतात मूल स्थानी लागवड ( इन सी टू प्लांटेशन) या सोप्या तंत्राचा यशस्वीरित्या वापर केला.

या तंत्राचा वापर कसा करता येईल, हे पाहूया… लहान खड्डा खणून त्यात शेणखत, राख व मातीचे मिश्रण भरावे. कारण झाडाला लागणारी बहुतांश सर्व मूलद्रव्ये राखेत असतात. पाऊस सुरू झाल्यावर या खड्ड्यामध्ये रायवळ आंब्याची बी (बाठ) किंवा काजूची भरीव बी लावावी. पावसाचे पाणी मिळाल्यावर याची मुळे खोलवर जातात. वर्षानंतर सप्टेंबर किंवा मार्चमध्ये या रोपावर चांगल्या जातीचे (उदा. हापूस आंबा किंवा वेंगुर्ला सात काजू) कलम करावे. अशा प्रकारचे कलम वेगाने वाढते. त्याला बाहेरून पाणी घालण्याची गरज लागत नाही. भरपूर उत्पन्न मिळते. तसेच अशा झाडांवर फारसे रोग येत नाहीत. वादळामुळे ही झाडे मोडण्याचे प्रमाण कमी असते असेही ओरिसातील संशोधनात आढळले आहे.

कोकणातील अन्य फळपिके म्हणजे फणस व कोकम. यामध्ये दोन्ही फळे मे महिन्याच्या अखेरीस किंवा जूनमध्ये पिकतात. त्यामुळे पावसात बहुतांश फळे खराब होतात. परंतु कोकणात काही तुरळक ठिकाणी लवकर म्हणजेच फेब्रुवारी ते एप्रिल या कालावधीत तयार होणारे फणस व कोकमची झाडे आढळली आहेत. त्यातील निवडक चांगल्या झाडांची लागवड करावी.

माकड व डुक्कर यांमुळे शेतीचे मोठे नुकसान होते. रायगड जिल्ह्यात तर एक लहान बाळ माकडाने उचलून नेले होते. सामाजिक वनीकरण खात्याने अकेशिया, निलगिरी या विदेशी झाडांची मोठ्या प्रमाणात लागवड केली आहे. या झाडांना फळे येत नाहीत. त्यामुळे जंगलातील प्राण्यांना अन्न न मिळाल्याने हे प्राणी शेती व गावाकडे वळतात. त्यामुळे स्थानिक झाडे लावणे आवश्यक आहे. याबाबत माधव गाडगीळ समितीने शिफारस केली आहे. कर्नाटक सरकारने याबाबत अलीकडे निर्णय घेतला. सामाजिक वनीकरण खात्याच्या नर्सरीतून विदेशी झाडे विक्री करण्यास कठोर प्रतिबंध करणे आवश्यक आहे. याशिवाय या प्राण्यांचा प्रतिबंध करण्यासाठी विविध उपाय करणे शक्य आहे.

कोकणात वणवा लागण्याचे प्रमाण मोठे आहे. यासाठी जाळ पट्टे काढून बायोचार करणे उपयुक्त ठरेल. दोन टक्क्यांपेक्षा जास्त सेंद्रिय कर्ब असल्यास जमीन सुपीक समजली जाते.

शास्त्रज्ञाना सर्वात सुपीक जमीन टेराप्रेटा ही अमेझॉनच्या खोऱ्यात आढळली. ही शेकडो वर्षांपूर्वी स्थानिक शेतकऱ्यांनी केली होती. त्यात दहा टक्के सेंद्रिय कर्ब आहे. यामध्ये प्रामुख्याने बायोचार कोळसा वापरला आहे. हा कोळसा कमी ऑक्सिजन मध्ये पायरोलिसीस या पद्धतीने तयार करण्यात येतो. घरगुती चुलीत हा तयार होतो. तसेच खड्ड्यात तयार करता येतो. बायोचार व अन्य खतांचे मिश्रण शेतीत वापरल्यास उत्पन्न प्रचंड वाढते. विशेषतः तळ कोकणात याचा अधिक उपयोग होऊ शकतो.

तळ कोकणात अजूनही पारंपरिक लाल भाताच्या अनेक प्रजाती आहेत. मी शेतकरी मित्र यांच्या मदतीने पारंपरिक भाताचे सुमारे ३२ प्रकार शोधले. ते मी पणदुर, ता.कुडाळ येथील ‘ॲग्रीकार्ट सीड बँके’कडे सुपूर्त केले आहेत. यामध्ये अनेक औषधी गुणधर्म आढळले. त्याचे संवर्धन, प्रचार, प्रसार व मार्केटिंग झाल्यास चांगली रोजगार संधी निर्माण होईल.

शालेय स्तरावर कृषी हा विषय समाविष्ट करण्याची केवळ चर्चा होते. परंतु ठाम निर्णय होत नाही. मात्र केंद्र सरकारने प्रत्येक शाळेत सेंद्रिय पद्धतीने परसबाग विकसित करण्याच्या सूचना दिल्या आहेत. देशात एक लाख शाळांत हा उपक्रम सुरू झाला आहे.

राज्य शासनाने तो सुरू केला आहे. याची व्याप्ती वाढविल्यास विद्यार्थ्यांना लहानपणीच निसर्ग व शेतीविषयी आस्था निर्माण होईल. झाड वाढतानाचा आनंद अनुभवता येईल. कल्पकता वाढेल.

एकीकडे रोजगार उपलब्ध नाही तर दुसरीकडे शेतीसाठी मजूर उपलब्ध नाहीत असा विरोधाभास दिसून येतो. रायगड जिल्ह्यात हांदा नावाची पद्धत आहे. या पद्धतीमध्ये एका गावात शेतकऱ्यांचा एक संघ असतो. व ते एकमेकांच्या शेतावर काम करतात. तसेच अन्यत्रही समूहाने मजुरीसाठी जातात. त्याचबरोबर खाडी किनारी जोळे नावाचीही शेतकऱ्यांची संघटना असते. समुद्राच्या भरती ओहोटीमुळे बाहेर काठा फुटतो. खारे पाणी आत आल्याने शेतीचे नुकसान होते. यावर ही जोळे नावाची शेतकरी संघटना बाराही महिने कार्यरत असते. संगमेश्वर तालुक्यात सापड नावाची तण काढण्याची स्पर्धा हा आनंददायी उपक्रम आहे. अशा शेतकऱ्यांच्या विविध चांगल्या परंपरा जोपासण्याची गरज आहे.

छत्रपती शिवाजीराजे यांच्या काळात दुर्गम भागांत अनेक किल्ले बांधण्यात आले. येथे बांधकामा साठी दगड काढण्यात आला. त्यामुळे तयार झालेल्या खड्ड्याला तलावाचे रूप देण्यात आले. रायगड किल्ल्यावरील गंगा सागर तलाव हे अशा दुहेरी उपयोगाचे एक उत्तम उदाहरण आहे. याचा पद्धतीने दगड खाणींचे पुष्करणी पाषाण तलाव केल्यास पाणी टंचाईवर काही प्रमाणात निश्चितच मात करता येईल. हे सर्व झाल्यास गड्या आपुला गाव बरा! असे म्हणत मुंबईकरही आपल्या निसर्ग रम्य गावाकडे हळूहळू परत येतील.

(लेखक समाज कल्याण विभागात (पुणे) सहआयुक्त आहेत.)

Story img Loader