अनंत बोरसे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सध्या राज्यात गुंड प्रवृत्तींकडून खूनखराबा सुरू आहे, त्याच बरोबर गुन्हेगार आणि राजकिय पक्ष, नेते यांचे (सु)मधुर संबंध देखील चव्हाट्यावर येत आहेत. राजकारणी मंडळी कधी काळी समाजसेवेचे, समाजाला दिशा देण्याचे काम करीत असत, रोजगारनिर्मिती करणारी धोरणे आखत असत आणि म्हणूनच राज्यव्यवस्थेची जबाबदारी त्यांच्यावर निश्चिंतपणे दिली जाई. कोणताही भेदभाव न करता त्यांनी कायद्याचे राज्य राबवावे ही त्यांची घटनात्मक जबाबदारी. मात्र गेल्या काही वर्षांपासून सत्ताकारणाचे संदर्भच बदलून गेले आहेत.

केवळ निवडणूक जिंकणे हेच उद्दिष्ट उरल्याने, गुंड प्रवृत्तींना हाताशी धरून निवडणुका जिंकण्याचा सोपा मार्ग राजकारण्यांनी स्विकारला आणि ‘तुमचा दाऊद तर आमचा गवळी’ असा युक्तिवाद करत गुंडगिरी पोसण्याचे काम राजकीय पक्ष, नेते करू लागले. अशाने निवडणुका जिंकता येतात हे लक्षात आल्याने गुंडाच्या टोळ्या पोसण्याची स्पर्धाच जणू सुरु झाली, कालांतराने याच गुंडाना पांढरे कपडे घालून राजकीय नेते बनवले गेले मात्र त्यांची काळी कृत्ये सातत्याने होतच राहिली. सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता मिळविण्यासाठी गुंड प्रवृत्तीही मोठी भूमिका बजावतात हे अनेकदा अधोरेखित झाले आहे, जवळपास सर्वच राजकीय पक्षांनी गुंडांच्या टोळ्या निर्माण केल्या आहेत, त्यामुळे अगदी गल्लीपासून दिल्ली पर्यंत गुंडांचा हौदोस पहायला मिळतो. यातूनच अनेक हत्या बिनदिक्कतपणे केल्या जाऊ शकतात, कारण या मंडळींना ना कायद्याचा धाक ना शिक्षेची भिती.

हेही वाचा : पुण्याच्या ललित कला केंद्रात अपरिपक्व आणि औचित्यहीन अनुकरणच शिकवले जाते?

गुंड, राजकारणी, वरिष्ठ नोकरशहा यांचे संबध आता जगजाहीर झाले आहेत, यातून पोलिस दलदेखील भ्रष्टाचाराने पोखरले गेले आहे आणि याला सर्वपक्षीय राज्यकर्तेच जबाबदार आहेत. बऱ्याच वर्षांपूर्वी एका मोठ्या नेत्याच्या विमानातून एका नामचिन गुंडाने केलेल्या कथित प्रवासाची केवढी चर्चा झाली होती. तो विषय पुढे निवडणूक प्रचारातही गाजला होता. यानंतरच्या काळात मात्र अनेक गुंडांनीच समाजसेवकाचा बुरखा घालून राजकीय पक्ष काढले आणि राजमान्यता मिळवली. ‘लूटो और बांटो’ या पद्धतीने अनेक गुंड समाजात आपले लाखो समर्थक तयार करतात मात्र कधी ना कधी त्यांच्या मधील गुंड प्रवृत्ती जागी होते आणि अभिषेक घोसाळकर सारख्यांच्या दिवसाढवळ्या हत्या होतात.

गुन्हेगारीचे हे राजकीयीकरण झाल्यानंतर, गुन्हेगारांतही सत्ताधारी पक्षाचा आणि विरोधकांचा अशी विभागणी झाली आहे, मात्र सोयीनुसार एकमेकांना सांभाळून घेतले जाते आणि एखाद्याचा ‘करेक्ट कार्यक्रम’देखील केला जातो. वाण नाही पण गुण लागला या म्हणीप्रमाणे कोणी गुंड एखाद्या राजकीय पक्षात गेला म्हणून ‘वाल्याचा वाल्मिकी’ तर झाला नाही मात्र अनेक राजकीय नेते हे गुंडगिरीची भाषा करू लागले आहेत, आपण सत्ताधारी आहोत, कायद्याचे राज्य राबविण्याची आपली नैतिक जबाबदारी अधिक आहे याचे भान विसरून अनेक पक्षांतील नेते हे बेजबाबदार, बेताल वक्तव्ये करीत आहेत. समाज विघातक प्रवृत्तींंना तुम्ही काहीही करा, पोलीस तुम्हाला काही करू शकणार नाहीत, आपला बाॅस ‘सागर’ बंगल्यावर बसला आहे असे एखादा राजकारणी बिनदिक्कतपणे पोलिसांसमोरच सांगतो यातच सगळे काही आले. त्यामुळेच आमदार असलेला एखादा लोकप्रतिनिधीं पोलिस स्थानकातच बेछूट गोळीबार करतो आणि राजकारणी मंडळी त्याचे समर्थन करतात.

हेही वाचा : कोचिंग क्लासेस हवेत कशाला?

यातून दिसते, ती आपल्या सामाजिक अधःपतनाची पातळी. कधीकाळी राजकारणात नैतिकता, नीतिमूल्ये यांचे अन्यन्य महत्त्व होते, म्हणूनच केवळ रेल्वे अपघात झाला म्हणून लालबहादूर शास्त्री यांनी राजीनामा दिला होता, आता मात्र कोणामधेच नैतिकता उरलेली नसल्याने कोणी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा देईल ही अपेक्षाच बाळगता येत नाही, राजकारणी मंडळी स्वत:वर बलात्काराचा आरोप झाला तरीदेखील सहजासहजी खुर्ची सोडत नाहीत, अशी उदाहरणे लालबहादूर शास्त्रीजींच्याच राज्यात आता दिसतात. या सगळ्यात सत्ताकारणाला टोळीयुद्धाचे स्वरूप आले आहे.

या सगळ्यात कायदा व सुव्यवस्थेच्या बाबतीत महाराष्ट्राने बिहार आणि उत्तर प्रदेशा यांसारख्या राज्यांच्या एक पाऊल पुढे टाकले आहे का? राजकारणी मंडळीच जर गुंडांना सांभाळत असतील तर सुराज्य, कायद्याच्या राज्यची अपेक्षा बाळगायची तरी कोणाकडून? आता ही जीवघेणी गुंड प्रवृत्ती राजकारण्यांच्याच जिवावर उठली आहे. जमीन माफिया, झोपडपट्टी माफिया, ड्रग्ज माफिया, असे अनेक माफिया निर्माण झाले आहेत आणि ते दहशत निर्माण करीत आहेत, मात्र राजकारणी मंडळी त्यांचे उदात्तीकरण करीत आहेत कोणी लपून छपून त्यांना पाठबळ देतो तर कोणी उघडपणे त्यांना ताकद देतो, अनेक राजकीय नेते आणि गुंडाचे एकमेकांच्या गळ्यात गळे घातलेले हसरे फोटो, मोठमोठ्या होर्डिंग्ज वर चौकाचौकांत लावले जातात, त्यातून काय दिसते? एखादा गुंड जामीनवर सुटुन आला तरी पुण्या सारख्या सुसंस्कृत शहरात त्याचे फटाके फोडून आगतस्वागत केले जाते, पुष्पगुच्छ घेऊन राजकारणी मंडळी त्यांना भेटतात. कारवाया टाळण्यासाठी अनेक गुंडाना कोण आश्रय-राजाश्रय देतो हे जनतेला माहीत असते.

हेही वाचा : पंतप्रधान मोदी यांचे उत्कट ‘नेहरूप्रेम’! 

मात्र हे सगळे थांबायलाच हवे आणि त्यासाठी जनतेनेच पुढे यायला हवे. एकेकाळी मुंबई पोलीस दलातील ‘एन्काउंटर स्पेशालिस्ट’ अधिकाऱ्यांचे अफाट कौतुक होत असे. पुढे याच अधिकाऱ्यांच्या अन्य कारवायाही उघड झाल्या आणि त्यांचा फुगा फुटला. वाढलेल्या गुंडगिरीचा फुगाही जनतेने योग्य निर्णय घेतल्यास फुटू शकेल. त्याला अधिक हवा न मिळता तो फोडायलाच हवा.

((समाप्त))

मराठीतील सर्व विशेष लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In maharashtra crimes also politicized goons gangsters divided in ruling party and opposition party css