वैशाली चिटणीस

आपल्याकडच्या राजकारणाचा चेहरामोहरा पुरुषप्रधान आहे, हे गेली कित्येक दशकं दिसतं आहे, पण तो काळाच्या ओघात बदललेला नाही, आणि तो तसाच राहू पाहतो आहे, हे वास्तव मात्र सध्या पुन्हा पुन्हा अधोरेखित होत आहे. खरं तर स्वातंत्र्य चळवळीच्या काळात गांधीजींनी स्त्रियांना चळवळीतल्या सहभागाची हाक दिली आणि आपल्याकडच्या स्त्रिया त्यानिमित्तानं घराबाहेर पडल्या. ऐन भरात आलेली ‘चले जाव’ चळवळ, त्याच काळात सुरू झालेलं दुसरं महायुद्ध हा सगळा रेटाच एवढा जबरदस्त होता की स्त्रियांचा सार्वजनिक वावर वाढला. स्वातंत्र्यानंतर शिक्षण, नोकरी, व्यवसाय या क्षेत्रात त्यांचं योगदान वाढत गेलं, पण त्यांचा राजकीय परीघ पुन्हा संकुचित होत गेला. कुणाची तरी मुलगी, कुणाची तरी पत्नी असा वारसा असलेल्या काही स्त्रियांनी राजकारणावर आपली मोहोर उमटवली, पण त्याव्यतिरिक्त दोन-तीन अपवाद वगळता राजकीय पटलावर स्त्रियांचा वावर नगण्य म्हणावा असाच आहे. त्या कार्यकर्त्या म्हणून वावरतात, सर्व प्रकारची कामं करतात, पण त्यापलीकडे जाऊन राजकीय महत्त्वाकांक्षा बाळगणाऱ्या स्त्रियांचं काय होतं याचं अगदी ताजं उदाहरण म्हणजे सुषमा अंधारे. स्त्रियांना राजकारणातच काय इतर कुठंही गप्प बसवायचं असेल तर त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील गोष्टी चव्हाट्यावर मांडणं, त्यांच्या चारित्र्यावर वार करणं, एवढंच नाही तर आपल्या विरोधकाच्या विरोधात एखाद्या स्त्रीचाच शस्त्र म्हणून वापर करणं या गोष्टी पुरोगामी, सुसंस्कृत म्हणवल्या जाणाऱ्या महाराष्ट्राच्या राजकारणात घडताना दिसत आहेत, ही दुर्दैवाची गोष्ट आहे.

Jyotiraditya Scindia lady killer said Kalyan Banerjee
“सिंधिया लेडी किलर”, तृणमूलचे खासदार असं का म्हणाले? केंद्रीय मंत्र्याचंही जशास तसं प्रत्युत्तर
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
impeachment motion against justice Shekhar Yadav
अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींविरोधात महाभियोगाची शक्यता; महाभियोग म्हणजे काय? आजवर किती न्यायाधीशांवर झाली कारवाई?
Nana Patole
Nana Patole : “आमचे सर्व खासदार…”, महाराष्ट्रात ‘ऑपरेशन लोटस’च्या चर्चांवर नाना पटोलेंची प्रतिक्रिया
Rahul Gandhi Protest against modi shah
मोदी-अदाणीविरोधात काँग्रेस आक्रमक; राहुल गांधींच्या अनोख्य आंदोलनाने वेधले लक्ष
Chief Minister Devendra Fadnavis criticizes Sharad Pawar over assembly election defeat pune news
‘संयमाने वागून नेत्यांनी पराभव स्वीकारावा’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शरद पवारांवर टीका
markadwadi villagers marathi news
मारकडवाडी ग्रामस्थांच्या शंकांचे निरसन करणे आवश्यक, रामदास आठवले यांची भूमिका
News About Rahul Narwekar
Rahul Narwekar : विधानसभेच्या अध्यक्षपदी राहुल नार्वेकरांची निवड निश्चित; अर्ज भरताच विरोधकांवर टीका “विरोधकांचा लोकशाहीवर विश्वास…”

गेली काही वर्षं समाजकारणात, राजकारणात असलेल्या सुषमा अंधारे यंदा दादरच्या शिवाजी पार्कवरील ‘दसरा मेळाव्या’त अधिक प्रकर्षाने प्रकाशझोतात आल्या. त्यांच्या भाषणानं अनेकांचं लक्ष वेधून घेतलं. त्यांच्या वक्तृत्वाची चर्चा झाली. आजकालच्या प्रथेप्रमाणे वेगवेगळ्या टीव्ही वाहिन्यांवरून त्यांच्या मुलाखती सुरू झाल्या. त्यांचा वावर विस्तारण्याची चिन्हं दिसत असताना अचानक त्यांच्या घटस्फोटित पतीला, वैजनाथ वाघमारे यांना पुढं आणलं गेलं. त्यांनी ‘बाळासाहेबांच्या शिवसेने’त प्रवेश केला आणि आपण लवकरच सुषमा अंधारे यांचा पर्दाफाश करणार असल्याचं जाहीर केलं. सुषमा अंधारे यांनी द्यायचं ते उत्तर दिलं असलं तरीही लग्न करणं, संसार करणं, विभक्त होणं हा त्या त्या जोडप्याचा वैयक्तिक निर्णय आहे आणि असतो. सार्वजनिक स्तरावर वावरणाऱ्या व्यक्तीच्या वैयक्तिक आयुष्यात घडणाऱ्या गोष्टी चव्हाट्यावर आणायच्या नाहीत, हा सभ्यतेचा संकेत आहे. तिचं सार्वजनिक काम आणि वैयक्तिक आयुष्य या गोष्टी वेगवेगळ्या आहेत. त्यांची गल्लत करणं हे सर्वथा चुकीचं. तेही स्त्रीच्या बाबतीत केलं जातं तेव्हा ते अधिक गंभीर ठरतं. कारण ती कुठे अडू शकते, बिचकू शकते, थांबवू शकते हे लक्षात घेऊन तो तिच्यावर जाणीवपूर्वक केलेला एक प्रकारचा वारच असतो.

हे वार वेगवेगळ्या प्रकारे केले जातात. एखाद्या स्त्रीला राजकारण करण्यापेक्षा घरी जाऊन स्वयंपाक कर हे सांगणं, तिच्याबद्दल अश्लील भाषेत बोलणं, तिच्या दिसण्याबद्दल बोलणं, तिची भर सभेत नक्कल करणं ही सगळी अगदी अलीकडच्या काळात घडलेली उदाहरणं आहेत. भाजप नेते तसंच उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांना घरी जा आणि स्वयंपाक करा असा अनाहूत सल्ला दिला होता. शिंदे-फडणवीस सरकारमधील कृषिमंत्री अब्दुल सत्तार सुप्रिया सुळे यांच्याबद्दल टीव्ही कॅमेऱ्यासमोर असभ्य बोलले होते. तृणमूलचे मंत्री अखिल गिरी यांनी राष्ट्पती द्रौपदी मुर्मू यांच्या दिसण्याबद्दल वादग्रस्त विधान केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपचा प्रचार करताना, सोनिया गांधी यांचा ‘काँग्रेसची विधवा’ असा उल्लेख केला होता. ममता बॅनर्जी यांची ‘दीदी ओ दीदी’ अशी टिंगलीच्याच सुरात हेटाळणीदेखील मोदी यांनीच प्रचारसभेत केली होती.

भाजपच्या दयाशंकर सिंह यांनी बसपच्या मायावतींचा अत्यंत अश्लाघ्य उल्लेख केला होता. २०१२ मध्ये लोकसभेतील स्त्रियांच्या आरक्षणावर चर्चा सुरू असताना समाजवादी पक्षाचे मुलायमसिंह म्हणाले होते की गावातल्या महिला शहरामधल्या महिलांसारख्या आकर्षक नसतात. त्यामुळे त्यांना आरक्षणाचा फायदा मिळणार नाही. तो फक्त शहरातल्या स्त्रियांनाच मिळेल. काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी त्यांच्याच पक्षाच्या खासदार मीनाक्षी नटराजन तसेच केजरीवल- राखी सावंत यांच्याबद्दल अत्यंत आक्षेपार्ह विधाने केली होती. दिल्लीत आंदोलन करणाऱ्या स्त्रियांवर माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांचा मुलगा अभिजित मुखर्जी यांनी सभ्यतेच्या पलीकडे जाणारी वक्तव्यं केली होती. तृणमूल काँग्रेसचे खासदार तपस पॉल यांनी विरोधी पक्षातल्या महिलांवर बलात्कार करण्याची भाषा केली होती. जनता दलाच्या शरद यादव यांनी राजस्थानच्या तत्कालीन मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्या वजनाबद्दल शिवराळ भाषेत उल्लेख केले होते. समाजवादी पक्षाच्या आझम खान यांनी खासदार जयाप्रदा यांच्या अंतर्वस्त्रांचा रंगही आपल्याला माहीत आहे, असं विधान करून गदारोळ उडवून दिला होता.

हे सगळे शब्दांच्या शस्त्रानं केलेले वारच आहेत. असे वार केले की सामाजिक दबाव येऊन, मानसिक त्रास होऊन ती स्त्री मागे फिरेल, तिचा आत्मविश्वास खच्ची होईल, किमानपक्षी तिची धार कमी होईल आणि तिचं राजकारण मागे पडेल हाच हिशेब असतो. वार करणारा दिलगिरी व्यक्त करून मोकळा होतो. पुरुष विरोधकांवर असे वार केले तर त्यांना फारसा फरक पडत नाही. असे वार होणं हे कदाचित त्यांनी आणि समाजानेही गृहीत धरलेलं असतं, पण असे वार स्त्रीला नाउमेद करू शकतात, हे लक्षात घेऊन ते अचूक आणि पुन्हा पुन्हा केले जातात.

दुसरा मुद्दा आहे स्त्रियांनाच शस्त्र म्हणून वापरलं जाण्याचा. मागल्या वर्षी अभिनेत्री कंगना राणावत महाराष्ट्राच्या राजकारणाच्या पटलावर चर्चेत होती ती तिने केलेल्या वेगवेगळ्या वादग्रस्त विधानांमुळे. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात सतत काही ना काहीतरी वादग्रस्त विधाने करण्याचा धडाकाच तिनं लावला होता. त्याशिवाय मुंबईला ‘पाकिस्तान’ म्हणणं, दिल्लीत आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांचा ‘दहशतवादी’ असा उल्लेख करणं, या आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्या पंजाबी गायक दलजीत दोसांजला ‘खलिस्तानी’ म्हणणं, याखेरीज ‘खरं स्वातंत्र्य २०१४ साली मिळालं’ असं विधान- यातून कंगनानं गदारोळ उडवून दिला. या सगळ्यामध्ये तिचं स्वत:चं म्हणणं किती आणि काय आणि तिचे बोलविते धनी कोण याची सगळ्यांनाच कल्पना येत गेली. विरोधकांना नामोहरम करण्यासाठी कंगनाचा वापर केला गेला, अशीही चर्चा झाली.

मातोश्री बाहेर हनुमान चालिसाचं पठण करण्याचा आग्रह धरून खासदार नवनीत राणा यांनीदेखील काही महिन्यांपूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणातली हवा तापवायचा प्रयत्न केला होता. महाराष्ट्रात हनुमान भक्त समर्थ रामदास स्वामी रचित ‘भीमरूपी महारुद्रा…’ हे स्तोत्र म्हणतात. इथे हनुमान चालिसा फारशी कुणाला येत नाही, आणि ती म्हणण्याचं मराठीजनांना फार आकर्षणही नाही. पण तरीही गदारोळ उडवून देऊन सरकारविरोधात वातावरणनिर्मितीचा प्रयत्न करण्यासाठी नवनीत राणा यांचा शस्त्रासारखा वापर केला गेला आणि त्यांनीही तो होऊ दिला.

अगदी ताजं उदाहरण राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यासंदर्भातलं. त्यांनी सिनेमागृहात जाऊन हर हर महादेव सिनेमा बंद पाडायचा प्रयत्न केला, त्यांच्या कार्यकर्त्यांनी प्रेक्षकांना मारहाण केली, हे सगळं चुकीचंच आहे याबद्दल कुणाचंच दुमत नाही. पण त्यानंतर लगेचच कळवा पुलाच्या उद्घाटन प्रसंगी एका भाजप कार्यकर्तीला ते हाताला धरून बाजूला करत असल्याचा व्हिडीओ टीव्ही वृत्त वाहिन्यांवरून, समाजमाध्यमांमधून सगळ्यांनीच पाहिला. त्यांच्यावर या कारणासाठी विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्यामुळे तर तो पुन्हा पुन्हा पाहिला गेला. कार्यक्रमातील गर्दीमधल्या या हालचाली विनयभंगाच्या कशा असू शकतात, हा तो व्हिडीओ पाहणाऱ्या प्रत्येकाला पडलेला प्रश्न असेल. पण तरीही ३५४ कलम लावून पोलिसांनी आव्हाड यांच्या विरोधात विनंयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. एखाद्या पक्षाची सामान्य कार्यकर्ती विनयभंगाची तक्रार घेऊन जाते आणि ती दाखल होते तेव्हा ती तिचा पक्ष तिच्यामागे उभा असतो. या प्रकरणात राजकारण करण्यासाठी तिचा शस्त्रासारखा वापर झाला असल्याची शक्यता म्हणूनच नाकारता येत नाही.

शब्दांची शस्त्रं वापरून स्त्रियांना नाउमेद करणं किंवा त्यांचाच शस्त्रासारखा वापर करणं हे अर्थातच आज घडतं आहे असं नाही. गेली कित्येक वर्षे ते वेगवेगळ्या प्रकारे घडतंच आहे. पण आजच्या प्रसारमाध्यमांच्या विस्ताराच्या आणि समाजमाध्यमांच्या विराट दर्शनाच्या काळात ते आणखीनच ठळक होऊन पुढे येतं. त्यातल्या वादग्रस्त गोष्टींना प्रसिद्धी मिळते. पण या प्रसिद्धीचा परिणाम या प्रकारांना चाप बसण्यात झाला तर ते जास्त महत्त्वाचं ठरेल.

एक गोष्ट मात्र खरी की अशा गोष्टींचा आता स्त्रियांच्या राजकारणामधल्या वावरावर नकारात्मक परिणाम मात्र नक्कीच होणार नाही. तेवढा आत्मविश्वास त्यांनी आता कमावला आहे.

vaishali.chitnis@expressindia.com

Story img Loader