अविजीत पाठक
शिक्षण- त्यातही विद्यार्थ्यांशी सतत संवाद साधत चालणारे शिक्षण ही आनंददायी प्रक्रिया असते असेच मला आज तीन दशकांहून अधिक काळ अध्यापन केल्यानंतरही वाटते. अशा संवादातून एकमेकांचे पटत नसले तरी निरनिराळे दृष्टिकोन कळतात, ऐकण्याची क्षमता वाढते आणि मानसिक- बौद्धिक क्षितिजे नक्की विस्तारतात! या संवादात ‘वाद’ होऊही शकतात… माझे काही डाव्या विचारांचे विद्यार्थी मला गांधीवादी ठरवायचे, दलित विद्यार्थी मला तोंडावर ऐकवायचे की मी उच्चवर्णीय नसतो तरच मला वंचितांची दु:खे कळली असती.. आणि मी थिओडोर अडोर्नो किंवा एरिक फ्रॉम यांची पुस्तके वाचतो म्हणून मला ‘नवा डावा’ ठरवणारेही बरेच होते! पण मी वेळीच निवृत्त झालो हेच बरे झाले की काय असे मला काही वेळा वाटू लागते, त्यापैकी एक कारण अलीकडेच कानांवर आलेला महाराष्ट्र राज्यातला- विद्येचे माहेरघर म्हणून ओळखले जाणाऱ्या पुणे शहरातला एक प्रसंग. बारावी इयत्तेच्या विद्यार्थ्यांना शिकवणाऱ्या त्या शिक्षकावर गुन्हा दाखल झाला आणि या तरुण शिक्षकाला अटकही झाली.
मी अध्यापन करत असताना या अशा तथाकथित ‘राष्ट्रवादी’ किंवा धर्माधिष्ठित भावना इतक्या तीव्र नव्हत्या, असे पुण्याच्या त्या प्रसंगाबद्दल ऐकल्यानंतर लक्षात येते. त्या वेळी गुपचूप ध्वनिचित्रमुद्रण करणारे विद्यार्थी नव्हते, तसे व्हीडिओ ‘व्हायरल’ होत नव्हते आणि वर्गात जे काही बोलले जाते त्याबद्दल गुन्हा दाखल होणे वा अटक याची तर कल्पनाही कोणी केलेली नव्हती. वर्गातील विद्यार्थी आणि अध्यापक यांचा एकमेकांवर काहीएक विश्वास होता, त्यामुळे वर्ग ही अध्यापकावर पाळत ठेवण्याची जागा नव्हती.
आणखी वाचा- ‘नकुशी’ कधी होणार ‘हवीशी’?
याउलट पुण्यात काय झाले पाहा. ‘सिम्बायॉसिस कॉलेज ऑफ आर्ट्स ॲण्ड कॉमर्स’ या तेथील महाविद्यालयातील अध्यापकाला डेक्कन जिमखाना पोलिसांनी ‘धार्मिक भावना दुखावल्या’बद्दल अटक केली. त्यानंतर महाविद्यालयानेही हिंदू देवदेवतांबद्दल भर वर्गात ‘आक्षेपार्ह’ शेरेबाजी केल्याप्रकरणी त्याच्यावर निलंबनाची कारवाई केली. हे अध्यापक (माझ्यापेक्षा वयाने बरेच लहान म्हणून मी त्यांना अरे-तुरे करतो आहे) अशोक सोपान इयत्ता बारावीच्या वर्गात हिंदी शिकवत असताना विद्यार्थ्यांशी बोलत होते. कथित ध्वनिचित्रमुद्रण एका विद्यार्थ्यानेच त्यांच्या नकळत केल्याचे दिसते. या व्हीडिओमध्ये अशोक हे विद्यार्थ्यांना ‘ईश्वर एक आहे’ ही संकल्पना समजवण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्यासाठी इस्लाम आणि ख्रिस्ती धर्मातील ईश्वर-संकल्पनेची उदाहरणे देत आहेत. पण त्यांना अखेर ‘ईश्वर एक आहे’ हेच सांगायचे आहे, इतपत स्पष्टता ‘व्हायरल’ झालेल्या त्या व्हीडिओत आहे. मात्र हे झाल्यावर कुणा लढाऊ हिंदू संघटनेने फार वेळ न दवडता पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार दाखल केली. पुणे पोलिसांनीही या शिक्षकावर भारतीय दंड विधानाच्या कलम ‘२९५ अ’ नुसार (“कोणत्याही वर्गाच्या धर्माच्या किंवा धार्मिक श्रदधांचा अपमान करून धार्मिक भावनांवर अत्याचार करण्याच्या उद्देशाने बुद्धिपुरस्सर व दुष्ट उद्देशाने कृती करणे” असे या कलमातील शब्द आहेत. इथे ‘कोणत्याही वर्गाच्या’ या शब्दप्रयोगातील ‘वर्ग’ हा शाळा-महाविद्यालयातील नसून समाजगट अशा अर्थाने आहे).
‘विद्यार्थीवृत्ती’सुद्धा नष्ट…
या घडामोडीमुळे एक अध्यापक म्हणून मी व्यथित झालो, वैतागलोसुद्धा. शिकण्याची प्रक्रिया ही काही घेण्याची- काही सोडून देण्याची असते, त्यादरम्यान अनेक प्रश्न आणि प्रति-प्रश्न उपस्थित केले जातात आणि वादातूनही संवादच वाढवायचा आहे याची जाणीव संभाषणातून काही शिकण्यासाठी असावी लागते. पण आपण आता हे असे व्हीडिओ व्हायरल करून शिकण्याच्या प्रक्रियेत महत्त्वाचे काम करणाऱ्या परस्परविश्वासालाच नाकारत आहोत… आणि यातून आपण ‘विद्यार्थीवृत्ती’सुद्धा नष्ट करत आहोत.
आणखी वाचा-शतायुषी नागपूर विद्यापीठ : मध्य भारताची ज्ञान-गंगोत्री
माझी खात्री आहे की, ‘सिम्बायॉसिस कॉलेज ऑफ आर्ट्स ॲण्ड कॉमर्स’मधले बारावीच्या वर्गातले विद्यार्थी नवतरुणच असतील, ज्यांनी आता कोठे जग पाहायला सुरुवात केली आहे अशा वयातच हे सारेजण असतील. पण उलट याच वयात तर त्यांनी डोळे- कान उघडे ठेवून, समोरचा असे का बोलतो/ वागतो आहे याबद्दल कुतूहल बाळगले पाहिजे, अशाच प्रकारच्या कुतूहलातूनच त्यांनी उत्तमोत्तम पुस्तके वाचली पाहिजेत, आपापल्या जाती/धर्मांवर आधारित अस्मितांच्या पलीकडले जग कसे आहे हे पाहाण्याचा प्रयत्न करून संस्कृती, समाज यांच्याबद्दल चहुअंगांनी सजग होऊन आपले क्षितिज वाढवले पाहिजे. हीच तर ‘विद्यार्थी’ असण्यातली गंमत आहे. जग अनेकपरींचे असते, ते पाहून त्याबद्दल प्रश्न पाडून घेऊन, त्यांची उत्तरे स्वत: शोधणे, ती मिळेपर्यंत विविध दृष्टिकोनांसह एकत्र राहायला शिकणे, हे शिक्षणातून अपेक्षित असते. पण आजकाल आरडाओरड करणाऱ्या चित्रवाणी वृत्तवाहिन्यांवरली कंठाळी ‘अँकर’ मंडळीच जगाला ज्ञानाचे घास भरवत असल्याच्या थाटात वावरतात आणि त्यांनी भरवलेल्या घासांवरच काहीजण वाढतही असतात, किंवा ‘समाजमाध्यमां’मधले आपापले विचारकूप हे टीकात्मक विचारप्रक्रियेला खीळच घालत असतात, अशा काळात मात्र ही विद्यार्थीवृत्ती टिकवून धरणे कठीण ठरते, हे खरे. अशा काळात मग खरोखरीच्या महान संकल्पनांऐवजी कुणा स्वघोषित गुरू/नेत्यांच्या प्रवचना/भाषणांचेच महत्त्व अधिक भासू लागते, निव्वळ घोषणाबाजी हीच खऱ्या कवितेपेक्षा/ तत्त्वचिंतनापेक्षा गोड वाटू लागते.
अशा काळात मग विद्यार्थ्यांनाही झुंडीचा भाग बनवले जाते. त्यांच्यातले स्वत:च्या विचार-चेतनांचे स्फुल्लिंग सुखेनैव कोळपून जातात.
राष्ट्रवादाच्या अथवा कडव्या धर्मवादाच्या भावनेचा अतिरेक (मग ते राष्ट्र आणि तो धर्म कोणताही असो) जेव्हा शाळा- महाविद्यालयांत किंवा विद्यापीठांपर्यंत येऊन पोहोचतो, तेव्हा तर सारेच पालटून जाते. मग प्राचार्य आणि कुलगुरूसुद्धा ‘आपल्या विचारांचे’ असायला हवेत, या अट्टहासापायी एकतर होयबांची किंवा मग एककल्ली व्यक्तींची वर्णी लावली जाते. या साऱ्याचा परिणाम अंतिमत: राष्ट्राच्याच ज्ञान-क्षेत्रावर होणार असतो आणि हे क्षेत्र संकुचित करणे म्हणजे त्याचे नुकसानच करणे, हे कोणत्याही काळात अगदी उघड असते.
आणखी वाचा- अभाविपची पायाभरणी करणारा कार्यकर्ता
शिकवायचे कसे? कशासाठी?
एकाच वर्गात ‘गॅाड इज डेड’ म्हणणारा नीत्शे आणि “मैं न तो काबा में हूं और न ही कैलाश में ना मैं देवल ना मैं मसजिद, ना काबे कैलास में। ना तो कौन क्रिया-कर्म में, नहीं योग बैराग में। खोजी होय तो तुरतै मिलिहौं, पल भर की तलास में।” असे सुनावणारा कबीर यांच्यापर्यंंत आजचे- उद्याचेही विद्यार्थी पोहोचणार आहेत की नाही? गांधीजींच्या सायंकालीन प्रार्थनेत १९४७-४८ मध्ये ‘ईश्वर अल्ला तेरो नाम’ म्हटले जाण्याचा व्यापक अर्थ समजून घेण्याचे आवाहन याच विद्यार्थ्यांना कधी केले जाणार आहे की नाही… की तसे आवाहन करणाऱ्यांवरच गुन्हा दाखल होऊन, निलंबनाची कारवाईसुद्धा होणार?
हा प्रश्न सर्वच अध्यापकांसाठी आहे, तसाच तो विद्यार्थ्यांसाठीसुद्धा आहे. शिक्षणाची- संवादातून शिकण्याची संस्कृतीच आपण नष्ट करतो आहोत काय? अध्यापकांनी विचार करून पाहावा- तुम्ही वर्गात उच्चारलेल्या एखाद्या शब्दामुळे तुम्ही गोत्यात येऊ शकता असे तुम्हाला वाटत असेल – तुमची कुठली वाक्ये कशा प्रकारे ध्वनिचित्रमुद्रित केली जातील काही शाश्वती नाही, अशा परिस्थितीत तुम्ही शिकवत असाल, तर त्या दडपणाखाली तुम्ही खुलेपणाने शिकवू शकता का? आपल्याकडे शिकण्यासारखे आणि शिकवण्यासारखे खूप असते. गांधी- आंबेडकर- मार्क्स- ॲडॅम स्मिथ, टागोर- इक्बाल- मण्टो- प्रेमचंद… हा सारा आपणा सर्वांचा वारसा आहे… तो तुमच्या संवादातून सहज येऊ देण्यावर कुणाचा कशा प्रकारचा आक्षेप असेल, हे काही सांगता येत नाही, तर मग शिकवण्यातली सहजता आणि सर्जनशीलता कुठे जाईल? संवादातले हे सहज- सर्जन जिथे थिजून जाते, तिथे केवळ वर्गच थिजतो असे नाही… लोकशाहीसुद्धा थिजते, गळाठते. आज जे कुणा अशोक सोपान ढोले यांच्याबद्दल झाले, ते उद्या कोणाहीबद्दल होऊ शकते, या दडपणाखाली आपण ‘सेफ’ शिकवत राहणार की विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याच्या बाजूने ठामपणे उभे राहणार? पुणे शहरात घडलेल्या प्रकाराचे आव्हान दुहेरी आहे. ते आजच्या अध्यापकांना आहेच, पण आज-उद्याच्या विद्यार्थ्यांनाही आहे.
लेखक ‘जवाहरलाल नेहरू विद्यापीठा’च्या समाजशास्त्र विभागातून २०२१ मध्ये निवृत्त झाले असून शिक्षण व समाज, संस्कृती आणि आधुनिक काळ तसेच संस्कृती आणि तत्त्वचिंतन अशा विविध विषयांवर त्यांनी दहा इंग्रजी व दोन हिंदी पुस्तके लिहिलेली आहेत.