डॉ. मेधा देशपांडे

अरबी समुद्रातील चक्रीवादळांच्या संख्येत गेल्या दोन दशकांत ५२ टक्के वाढ झाली आहे, तर अतितीव्र वादळांची संख्या दुपटीने वाढली आहे. असे असले तरीही अचूक पूर्वानुमानामुळे जीवितहानीवर नियंत्रण राखणे शक्य झाले आहे..

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
Ladki Bahin Yojna Sudhir Mungantiwar 2100 rs Installment
Ladki Bahin Yojna : लाडक्या बहिणींना २१०० रुपयांसाठी…
Firing at the house of an independent candidate in Jalgaon news
जळगावात अपक्ष उमेदवाराच्या घरावर गोळीबार
Girl takes off her t-shirt while dancing in university in viral video
दिल डूबा दिल डूबा गाण्यावर तरुणीचा अश्लील डान्स; स्टेजवरच टी-शर्ट काढलं अन्…VIDEO पाहून नेटकरी भडकले
Gujarat man, presumed dead, walks into his own memorial service shocking news goes viral
बापरे! कुटुंबाने अंत्यसंस्कार उरकले अन् पुढच्याच क्षणी शोकसभेत मुलगा जिवंत डोळ्यासमोर उभा; नेमकं काय घडलं?
traffic system in Swargate area will changed on Tuesday November 19 and Wednesday November 20 pune
स्वारगेट भागात दोन दिवस वाहतूक बदल, मतदान साहित्याच्या वाहतुकीसाठी पीएमपी बस
Uddhav Thackeray on PM Narendra Modi
“आधी मणिपूर ‘सेफ’ करा आणि मग…”; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं मोदी सरकारवर टीकास्र!

नुकतेच अरबी समुद्रात तयार झालेले बिपरजॉय चक्रीवादळ शास्त्रज्ञांबरोबरच सामान्य माणसाच्याही मनात अनेक प्रश्न निर्माण करून गेले. अलीकडे आपण जास्त चक्रीवादळे अनुभवत आहोत का? बिपरजॉयच्या आधी बंगालच्या उपसगरात मोखा वादळ आणि मागील वर्षी असानी, सितरंग आणि मांडूस ही वादळे आली होती. २०२० आणि २१ मध्ये नामकरण करण्यायोग्य तीव्रतेची पाच चक्रीवादळे आली. २०१९ मध्ये चक्क आठ चक्रीवादळे आली, त्यापैकी पाच अरबी समुद्रात निर्माण झाली होती. नेमके काय होत आहे? खरोखरच हिंदू महासागरात विशेषत: अरबी समुद्रात जास्त वादळे येत आहेत का? वादळांची तीव्रता आणि तीव्र होण्याचा वेग वाढत आहे का? चक्रीवादळाचा कालावधी वाढत आहे का? आणि हे जर खरे असेल तर हे कशामुळे होत आहे? हा हवामान बदल आणि जागतिक तापमानवाढीचा तर परिणाम नाही ना?

तशी चक्रीवादळे ही काही आपल्यासाठी अगदी नवी घटना नाही. चक्रीवादळे म्हणजेच ‘हरिकेन’ अथवा ‘टायफुन’ ही अत्यंत विध्वंसक हवामानशास्त्रीय घटना आहे. ज्याच्या मध्यभागी हवेचा दाब खूप कमी असतो आणि सभोवती वारे वेगात आणि चक्राकार वाहत असतात. ते साधारण हजार किलोमीटर विस्तारलेले असतात आणि त्याची उंची साधारण १० ते १२ किलोमीटर असते. चक्रीवादळांचा जन्म साधारण २३ अंश उत्तर आणि २३ अंश दक्षिण अक्षांशांमधील पट्टय़ाला उष्ण काटिबंधीय (ट्रॉपिकल) महासागरांमध्ये होतो. तेथील महासागरांचे तापमान नेहमीच तुलनेने उबदार म्हणजे २६-२७ अंश सेल्शियसपेक्षा जास्त असते, ते अर्थातच सूर्यामुळे! अशा तुलनेने उष्ण समुद्राच्या पाण्याची वाफ तयार होते जी अदृश असते. वाफ हलकी असल्यामुळे वर वर जाऊ लागते व तिचे ढग तयार होतात. विषुववृत्ताच्या जवळील उष्ण काटिबंधीय महासागरांवर साधारणपणे नेहमीच लहान मोठय़ा ढगांचा पट्टा घोंगावत असतो, त्याला ‘आयटीसीझेड’ म्हणजेच ‘इंटर ट्रॉपिकल कॉनव्हरजन्स झोन’ म्हणतात. त्यामधील काही ढग एकत्र गोळा होऊ लागतात आणि मग तिथे कमी दाबाचा पट्टा तयार होतो. हा कमी दाब भरून काढण्यासाठी आजूबाजूची हवा वाऱ्याच्या स्वरूपात मध्यभागाकडे वाहू लागते. पण पृथ्वीच्या स्वत:भोवती फिरण्यामुळे हे वारे सरळ मध्याकडे न जाता कोरीऑलिस बलामुळे, मध्याभोवती चक्राकार (सायक्लोनिक) वाहू लागतात. या चक्राकार वाऱ्यांनी एक ठरावीक वेग गाठला की चक्रीवादळाचा जन्म होतो. चक्रीवादळाने एक ठरावीक तीव्रता गाठली की त्याचे नामकरण करण्यात येते.

उत्तर हिंदू महासागरातील चक्रीवादळांच्या प्रभावाखाली असणाऱ्या एकूण १३ देशांनी एकत्र येऊन वादळांच्या नावांची एक यादी तयार केली आहे व त्या देशांच्या नावाच्या वर्णक्रमानुसार सुचवलेले नाव क्रमाने येणाऱ्या वादळांना दिले जाते. पुढे जर वातावरणातील आणि समुद्रातील सर्व घटकांनी साथ दिली तर वारे आणखी तीव्र होतात, मध्यभागी दाब आणखी कमी होतो आणि चक्रीवादळाच्या मध्यभागी निरभ्र भाग तयार होतो ज्याला चक्रीवादळाचे केंद्र (सायक्लोन आय) म्हणतात.

जगभरात वर्षकाठी साधारण ८०-८५ वादळे तयार होतात. त्यापैकी चार ते पाच उत्तर हिंदू महासागरात निर्माण होतात. भारतीय उपखंडामुळे हिंदू महासागर अरबी समुद्र आणि बंगालचा उपसागर या दोन भागांत विभागला आहे, त्यापैकी बंगालच्या उपसागराचे तापमान हे अरबी समुद्राच्या तुलनेने जास्त आहे, तसेच प्रशांत महासागरातील काही टायफून बंगालच्या उपसागरात प्रवेश करतात. त्यामुळे बंगालच्या उपसागरामध्ये, अरबी समुद्राच्या तुलनेने जास्त चक्रीवादळे तयार होतात. वर्षभरात आपल्यासाठी चक्रीवादळचे दोन हंगाम असतात, मान्सूनपूर्व आणि मान्सूनोत्तर. एकूण वर्षभरापैकी, ऑक्टोबर-नोव्हेंबर तसेच मे महिन्यात जास्त वादळे येतात.

ही झाली उत्तर हिंदू महासागरातील चक्रीवादळांची सरासरी स्थिती. पण अलीकडच्या काळात या स्थितीत काही बदल झाला आहे का, हे समजून घेण्यासाठी शास्त्रशुद्ध पद्धतीने संशोधन करण्यात आले. त्यासाठी १९८२ नंतरच्या चक्रीवादळांच्या आकडेवारीचा अभ्यास करण्यात आला. १९८२ नंतरच्याच का? त्या पूर्वीचीही आकडेवारी उपलब्ध आहे परंतु त्यापूर्वीच्या आकडेवारीबद्दल थोडी साशंकता आहे. कारण आपल्या उत्तर हिंदू महासागरावर २४ तास लक्ष ठेवणारे भूस्थिर उपग्रह साधारणपणे त्यानंतर कार्यान्वित झाले, त्यामुळे त्यानंतरच्या आकडेवारीत जास्त अचूकता आहे. त्यापूर्वीची काही वादळे समुद्रावरील निरीक्षणाच्या मर्यादांमुळे वगळली जाण्याची शक्यता असू शकते. १९८२ नंतरच्या कालखंडचे पूर्वीचा कालखंड (१९८२ -२०००) आणि अलीकडचा कालखंड (२००१-२०१९) अशा दोन भागांत विभाजन करण्यात आले असता खालील निष्कर्ष निघाले.

पूर्वीच्या कालखंडाच्या तुलनेत अलीकडच्या कालखंडात अरबी समुद्रातील चक्रीवादळांच्या संख्येत ५२ टक्के वाढ झाली आहे, तर अतितीव्र वादळांची संख्या दुपटीने वाढली आहे. पूर्वीच्या कालखंडाच्या तुलनेने अलीकडे, अरबी समुद्रातील सर्व वादळांचा एकत्रित कालावधी ८० टक्क्यांनी वाढला आहे, तर एकूण अतितीव्र वादळांचा कालावधी तिपटीने वाढला आहे. या सर्व बाबतीत बंगालच्या उपसागरातील वादळांच्या स्थितीत फारसा फरक पडलेला नाही. चक्रीवादळांच्या एकूण जीवनचक्रामध्ये त्यांनी गाठलेल्या कमाल तीव्रतेला (एलएमआय- लाइफटाइम मॅक्झिमम इन्टेन्सिटी) म्हणजेच ‘आजीवन कमाल तीव्रता’ म्हणतात. अरबी समुद्रातील वादळांच्या बाबतीत अलीकडच्या कालखंडात ही ‘आजीवन कमाल तीव्रता’ही वाढली आहे. म्हणजे एकूणच अरबी समुद्र पूर्वीच्या तुलनेत अलीकडच्या काळात, अधिक सक्रिय झाला आहे. तेथील वादळांची संख्या आणि तीव्रता वाढत आहे. बारकाईने महिन्यागणिक अभ्यास केला असता, असे दिसून आले की अरबी समुद्रातील चक्रीवादळांच्या एकूण सक्रिय कालावधीत मे, जून आणि ऑक्टोबर महिन्यात लक्षणीय वाढ झाली आहे, पण बंगालच्या उपसागरातील सक्रिय कालावधीच्या बाकी महिन्यांमध्ये फार फरक पडलेला नाही, मात्र नोव्हेंबर महिन्यात घट झाली आहे. दोन कालखंडांतील चक्रीवादळांच्या मार्गक्रमामध्येही बदल झाल्याचे आढळले. चक्रीवादळांच्या निर्मितीच्या स्थानाचा अभ्यास केला असता, असे दिसून आले की अलीकडे वादळांची सुरुवात विषुववृत्ताच्या जवळ साधारण पाच ते आठ अक्षांशांजवळ होण्याचे प्रमाण वाढले आहे, ज्यामुळे वादळाचा समुद्रावरील एकूण कालावधी वाढला आहे. त्यामुळे वादळ तीव्र होण्याची शक्यताही वाढते. काही वेळा चक्रीवादळ तीव्र होण्याची प्रक्रिया फार जलदगतीने होते. अलीकडील काळात अरबी समुद्रात अशा वेगाने तीव्र होणाऱ्या वादळांची संख्याही वाढली आहे.

एकंदरीत अरबी समुद्र सक्रिय होण्यास अरबी समुद्रावरील वातावरणातील वाढलेली आद्र्रता आणि त्यामुळे वाढलेली ऊर्जा कारणीभूत आहे. ज्याचा मुख्य स्रोत हा अरबी समुद्राचे वाढलेले तापमान आहे, असे सिद्ध झाले आहे. या बदलत्या स्थितीला जागतिक तापमानवाढ आणि हवामान बदल कारणीभूत आहेत का?

हवामान बदल हा पृथ्वीच्या स्थानिक, प्रादेशिक आणि जागतिक सरासरी हवामानाच्या नमुन्यांमधील दीर्घकालीन बदल असतो. तो नैसर्गिक असू शकतो आणि मानवी हस्तक्षेपामुळेही घडू शकतो. पृथ्वीच्या आजवरच्या इतिहासात हवामान बदल अनेकदा झाले आहेत. किंबहुना आजवर घडलेल्या हवामान बदलांमुळेच पृथ्वी जीवसृष्टीसाठी आणि मानवी अधिवासासाठी योग्य स्थितीत रूपांतरित झाली आहे.

परंतु, २० व्या शतकाच्या सुरुवातीपासून पृथ्वीच्या हवामानात आढळून आलेले बदल प्रामुख्याने मानवी हस्तक्षेपामुळे व जीवाश्म इंधन जाळण्यासारख्या क्रियांमुळे घडले आहेत. एकंदरीत पृथ्वीच्या वातावरणात उष्णता साठण्यास कारणीभूत ठरणाऱ्या हरितगृह वायूचे प्रमाण वाढले आहे, ज्यामुळे पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या सरासरी तापमानात वाढ होत आहे. हवेतील वाढलेली उष्णता आणि उत्सर्जित झालेला कार्बन डायऑक्साईड प्रामुख्याने समुद्रात शोषला जातो. औद्योगिकीकरणाच्या आधीपासून, अलीकडच्या काळापर्यंत मानवी हस्तक्षेपामुळे पृथ्वीच्या जागतिक सरासरी तापमानात सुमारे एक अंश सेल्सिअस वाढ झाली आहे. एवढय़ाशा तापमान वाढीमुळे काय फरक पडतो, असा प्रश्न निर्माण होऊ शकतो. जागतिक तापमानातील लहानशी वाढ (एक अंश सेल्सिअस) ही जगातील हवामानात मोठे बदल घडवून आणते.

सूर्याच्या उष्णतेमुळे पृथ्वीवरील पाण्याची वाफ होते, वाफ हलकी असल्यामुळे वर वर जाते. वातावरणाच्या वरच्या थरामध्ये तापमान कमी असते त्यामुळे वायुरूपी अदृश्य बाष्पाचे सूक्ष्म जलकणांमध्ये रूपांतर होते. जलकण तयार होण्याच्या प्रक्रियेत वातावरणात उपलब्ध असलेले सूक्ष्म धूलिकण आणि एअरोसोल्सचाही सहभाग असतो. त्यापासून दृश्य ढग तयार होतो. या ढगांमध्ये असंख्य जलिबदू असतात. जलिबदूंनी ठरावीक वस्तुमान आणि आकारमान प्राप्त केले की ते गुरुत्वाकर्षणामुळे पावसाच्या स्वरूपात खाली पडतात. आता जर समुद्राचे तापमान वाढले तर पाण्याची वाफ होण्याचे प्रमाणही वाढते. त्याच बरोबर हवेचे तापमानही वाढले तर हवेची बाष्प साठवून ठेवण्याची क्षमताही वाढते. त्यामुळे होते काय, तर ढग अधिकाधिक शक्तिशाली होतो आणि जेव्हा पाऊस पडतो तेव्हा तो अक्षरश: कोसळतो. हेच तत्त्व चक्रीवादळांची संख्या आणि तीव्रता वाढण्यामागेसुद्धा आहे. एखाद्या अतितीव्र चक्रीवादळाचा एकदम जागतिक तापमान वाढीशी अथवा बदलत्या हवामानाशी संबंध जोडणे चुकीचे ठरते, परंतु अशा घटना वरचेवर घडत असतील, एकंदरीत मानवनिर्मित जागतिक तापमान वाढीचा हा एक परिणाम आहे, असे म्हणावे लागेल. वर्षांनुवर्षे थोडा-थोडा बदल होत होता, आता तो जाणवत आहे.

हे सारे काही खरे असले तरी चक्रीवादळामुळे होणाऱ्या नुकसानीचा सगळा दोष हवामान बदलांना देणेही योग्य नाही. आपणही हे दुष्परिणाम काही प्रमाणात टाळू शकतो किंवा त्यांची तीव्रता कमी करू शकतो. कसे?चक्रीवादळांविषयी अधिक सखोल माहिती मिळविणे, निरीक्षणांमध्ये सुधारणा करणे, पूर्वानुमानातील अचूकता वाढवणे, तसेच चक्रीवादळांचे दुष्परिणाम नियंत्रणात राहावेत, यासाठी योग्य नियोजन करणे या गोष्टींवर भर दिला पाहिजे. दिवसेंदिवस चक्रीवादळांच्या अंदाजांतील अचूकता वाढत आहे, त्यामुळे होणारी जीवितहानीसुद्धा कमी होत आहे. उदाहरणार्थ- १९९९ मध्ये ओडिशात आलेल्या सुपर सायक्लोनमुळे १० हजार जणांनी जीव गमावल्याची नोंद आहे. जवळपास तसाच मार्ग आणि तेवढीच तीव्रता असलेल्या फॅनी वादळामुळे २०१९ साली झालेली जीवितहानी ६४ इतकी होती. हे कशामुळे शक्य झाले?

उपग्रह, रडार आणि इतर निरीक्षणांमधील सुधारणांबरोबर मुख्यत्वे, ‘न्यूमरिकल वेदर प्रेडिक्शन मॉडेल्स’मधील सुधारणांची यामध्ये महत्त्वाची भूमिका आहे. जे केवळ उच्च कार्यक्षमता संगणन प्रणालीमुळे (एचपीसी अथवा सुपर कॉम्प्युटर्स) शक्य झाले आहे. पूर्वानुमानांमधील अंदाजांप्रमाणे आपत्ती नियंत्रण विभागाने दिलेल्या सूचनांचे पालन करून आपण जीवितहानी निश्चितच टाळू शकतो. पण, वित्तहानीचे काय? खरे तर ज्या जागी वादळे धडकण्याची शक्यता आहे तिथे कोणत्याही वसाहती करू नयेत. किनारपट्टय़ांवर असणारी खारफुटीची जंगले, कांदळवने वादळांच्या परिणामांची तीव्रता कमी राखण्यात हातभार लावतात, तसेच पर्यावरणातील जैवविविधताही त्यावर अवलंबून असते. त्यामुळे कांदळवने राखली पाहिजेत, त्यांची जोपासना केली पाहिजे, त्यांना अतिक्रमणांपासून सुरक्षित ठेवले पाहिजे. या काही गोष्टी आपल्या हातात आहेत.

(लेखिका आयआयटीएम, पुणे येथे शास्त्रज्ञ आहेत.)