अनघा शिराळकर
देश स्वतंत्र झाल्यानंतर भारतीय हवामानशास्त्र विभागाला जागतिक हवामानशास्त्र संघटनेचे संस्थापक सदस्यत्व प्राप्त झाले आणि या विभागाच्या महासंचालकांना या संघटनेचे कायमस्वरूपी प्रतिनिधित्व मिळाले. जागतिक हवामानशास्त्र संघटना व संयुक्त राष्ट्रांचा विकास कार्यक्रम यांच्या संयुक्त विद्यामाने काही तरुण वरिष्ठ शास्त्रज्ञांना विकसित देशांमध्ये प्रशिक्षण देण्यात आले. तसेच तेथील तज्ज्ञांना भारतात बोलावून त्यांच्या ज्ञानाचा व अनुभवाचा लाभ भारतीय शास्त्रज्ञांना करून देण्यात आला. भारतीय हवामानशास्त्र विभाग २००६ सालापासून नव्याने तयार झालेल्या पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या अखत्यारीत कार्यरत आहे. हवामानाच्या विविध घटकांची देशातील विविध भागांत, विविध कालावधींत सतत निरीक्षणे घेणे. त्यांच्या नोंदींचे विश्लेषण, त्यावर आधारित सद्या:स्थितीचे व पुढील काळासाठीचे पूर्वानुमान कृषी, जलसंधारण, नौकानयन, हवाई वाहतूक, समुद्रातील इंधन शोधन इत्यादी हवामान संवेदनक्षम क्षेत्रांना व सर्वसामान्य जनतेला पुरवणे हे काम हा विभाग करतो. हवामानाच्या आपत्तींचे विभागनिहाय पूर्वानुमान वर्तवणे व त्यासंबंधी योग्य तो इशारा देणे, हवामानशास्त्र व त्याला संलग्न असलेल्या विषयात संशोधन करणे आणि अधिकारी व कर्मचारी यांना प्रशिक्षण देणे हेही या विभागाच्या कामात समाविष्ट आहे.

वैज्ञानिक संशोधनकार्याची व्यवस्थित रचना करण्यासाठी प्राध्यापक भगवंतम यांच्या नेतृत्वाखाली एक समिती स्थापन झाली होती. या समितीच्या शिफारशीनुसार ०१ एप्रिल १९७१ रोजी भारतीय हवामानशास्त्र विभागाचे काही कक्ष व वेधशाळा यांचे तीन स्वायत्त संस्थांमध्ये रूपांतर झाले. पुण्यातील भारतीय हवामानशास्त्र विभागातील उष्णदेशीय हवामानशास्त्र संस्था या कक्षाचे रूपांतर भारतीय उष्णदेशीय हवामानशास्त्र संस्थेत झाले. कोडाईकॅनाल येथील खगोल भौतिकशास्त्राचे कार्य करणारी वेधशाळा ही बेंगलोर इथे भारतीय खगोल भौतिकशास्त्र संस्था झाली. कुलाबा आणि अलिबाग या भूचुंबकत्वाचे कार्य करणाऱ्या वेधशाळांची मिळून कुलाबा इथे भारतीय भूचुंबकत्व संस्था झाली. भारतीय उष्णदेशीय हवामानशास्त्र संस्था ही भारत सरकारच्या पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या अखत्यारीत तर भारतीय खगोल भौतिकशास्त्र संस्था व भारतीय भूचुंबकत्व संस्था या भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाच्या अखत्यारीत कार्य करीत आहेत. भारतीय हवामानशास्त्राच्या प्रगतीमधील हा सर्वात मोठा पल्ला आहे. देशात वैज्ञानिक संशोधनासाठी व सेवेसाठी संगणकाचा वापर प्रथम भारतीय हवामानशास्त्र विभागाने केला. लांब पल्ल्याच्या हवामानाच्या पूर्वानुमानाचा पद्धतशीरपणे विकास जगात भारतीय हवामानशास्त्र विभागाने प्रथम केला हे विशेष. भारतीय हवामानशास्त्र विभाग हा जागतिक हवामानशास्त्र परिषदेच्या सहा विशेष क्षेत्रिय हवामानशास्त्र केंद्रांपैकी एक आहे. हवामानाचे पूर्वानुमान वर्तविणारे केंद्र, कृषीविषयक हवामान सल्ला सेवा केंद्र, जलवायू केंद्र, पूरविषयक माहिती केंद्र, चक्रीवादळ माहिती केंद्र, देशाच्या कानाकोपऱ्यात शेकडोंनी असलेल्या जमिनीवरील तसेच हिमाच्छादित प्रदेशावरील वेधशाळा, उंच हवेच्या ठिकाणी असलेली निरीक्षण स्थानके, ओझोन व किरणोत्सर्जन मोजणाऱ्या वेधशाळा, हवामानाची रडार आणि भूकंपमापन यंत्रणा या सर्वांचे जाळे तयार केले असून त्याद्वारे भारतीय हवामानशास्त्र विभागाचे मुख्यालय आणि सर्व क्षेत्रीय कार्यालये व वेधशाळा एकमेकांशी जोडलेले आहेत.

हेही वाचा : पतौडींचा सैफ आणि समाजाचा कैफ

हवामानाची निरीक्षणे व अभ्यास यांसाठी भूस्थिर, कल्पना, मेघाट्रॉपिक्स व ओशनसॅट या उपग्रहांच्या मालिका, भारतीय सुदूर संवेदन, भारतीय राष्ट्रीय उपग्रह प्रणाली, भारतीय व्यापारी व नौदलाच्या बोटी यांच्यावरील खास उपकरणांनी घेतलेल्या निरीक्षणांच्या नोंदी तसेच देशातील भूकंप निरीक्षण केंद्रांच्या भूकंपांच्या नोंदी इत्यादी भारतीय हवामानशास्त्र विभागाकडे त्यांच्या नेटवर्कद्वारे येतात. यांचा उपयोग हवामानाच्या पूर्वानुमानासाठी केला जातो.

भारतीय उष्णदेशीय हवामानशास्त्र संस्था, राष्ट्रीय मध्यम कालावधी हवामान पूर्वानुमान केंद्र आणि राष्ट्रीय महासागर तंत्रज्ञान संस्था इत्यादी संस्थांबरोबर अनेक प्रकल्पांमध्ये भारतीय हवामानशास्त्र विभागाचा सहयोग असतो. स्वत: नियोजन केलेले व कार्यरत ठेवलेले उपग्रह असणारा भारतीय हवामानशास्त्र विभाग हा विकसनशील देशांमधील हवामानशास्त्र संस्थांमध्ये पहिला आहे.

भारतीय हवामानशास्त्र विभागाचे शास्त्रज्ञ १९८१ साली सुरू झालेल्या प्रत्येक अंटार्क्टिका वैज्ञानिक संशोधन मोहिमेत भाग घेतात. १९८३ साली दक्षिण गंगोत्री या अंटार्क्टिकावरील पहिल्या भारतीय स्थानकाच्या स्थापनेत भारतीय हवामानशास्त्र विभागाचा सहयोग महत्त्वाचा होता.

हेही वाचा : गोवा खरंच ओस पडू लागलं आहे का? एका एक्स पोस्टवरून सरकार का बिथरलंय?

विशेष उपक्रम

चेन्नई (नंगमबक्कम), मुंबई (कुलाबा), गोवा (पणजी), पुणे व तिरुअनंतपुरम या पाच वेधशाळांना १०० वर्षांहून अधिक काळासाठी दूर पल्ल्याची निरीक्षण केंद्रे म्हणून जागतिक हवामानशास्त्र परिषदेची मान्यता मिळाली आहे. हवामानशास्त्राच्या प्रशिक्षण केंद्राला जागतिक हवामानशास्त्र परिषदेचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रादेशिक प्रशिक्षण केंद्र म्हणून मान्यता मिळाली आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाचा माहिती प्रणाली व सेवा कक्ष हवामानविषयक सर्व माहिती, नोंदी, अहवाल व हवामानाचे पूर्वानुमान अविरतपणे २४ तास राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील उपभोक्तांना पुरवत असतो.

भारताची भौगोलिक स्थिती वैशिष्ट्यपूर्ण असल्याने हवामानाच्या अंदाजासाठी वापरण्याची खास प्रारूपे (मॉडेल्स) बनवावी लागतात. भारत सरकारच्या पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या ‘नॅशनल मान्सून मिशन’ या बहुसंस्थात्मक प्रकल्पाअंतर्गत विविध कालावधींच्या हवामानाच्या पूर्वानुमानासाठी अत्याधुनिक गतिशील प्रारूपे तयार केली आहेत. तसेच जागतिक हवामान पूर्वानुमान प्रणाली अद्यायावत केली जात आहे. विभागनिहाय हवेच्या प्रदूषणास कारणीभूत असलेल्या प्रदूषक घटकांची निरीक्षणे घेऊन त्यावर आधारित हवेच्या प्रदूषणाची पातळी दाखविणारा आणि हवेच्या गुणवत्तेचे पूर्वानुमान व इशारा देणारा ‘सफर’ हा प्रकल्प भारतीय उष्णदेशीय हवामानशास्त्र संस्था व राष्ट्रीय मध्यम कालावधी हवामान पूर्वानुमान केंद्र यांच्याबरोबर भारतीय हवामानशास्त्र विभाग यशस्वीपणे राबवत आहे. भारतीय उष्णदेशीय हवामानशास्त्र संस्था आणि राष्ट्रीय मध्यम कालावधी हवामान पूर्वानुमान केंद्र यांच्या सहयोगाने वीज कोसळण्याच्या आपत्तींचे स्थलनिहाय पूर्वानुमान व इशारा देणारी ‘दामिनी’ ही प्रणाली भारतीय हवामानशास्त्र विभागाने कार्यान्वित केलेली आहे.

भारत सरकारने मोबाइल फोनमध्ये वापरण्यासाठी अनेक वाहिन्या व स्थानके असणारी, एकत्रितपणे अनेक सेवा देणारी, बहुभाषिक व सुरक्षित अशी ‘उमंग’ नावाची प्रणाली निर्माण केलेली आहे. या प्रणालीमध्ये भारतीय हवामानाच्या सेवांचा समावेश केला गेला आहे. या सेवेअंतंर्गत सद्या:स्थितीचे हवामान, सद्या:स्थितीच्या हवामानाचे पूर्वानुमान, शहराच्या हवामानाचे पूर्वानुमान, पाऊस, वादळे, महापूर, इत्यादींचे इशारे यांचा समावेश आहे.

नैसर्गिक आपत्ती या हवामानाशी निगडित असल्याने आपत्तींचे स्थलकालनिहाय पूर्वानुमान देणे ही भारतीय हवामानशास्त्र विभागाची जबाबदारी सर्वोच्च आहे. जिल्हानिहाय विविध प्रकारच्या १३ आपत्तींची क्षेत्रे दर्शविणाऱ्या ‘नकाशाचा संच’ प्रसिद्ध करण्याचे महत्त्वाचे काम भारतीय हवामानशास्त्र विभागाने केले आहे. यामध्ये दुष्काळ, चक्रीवादळे, धुळीची वादळे, वीज, महापूर, गारपीट, उष्णतेची लाट, थंडीची लाट, धुके, इत्यादी आपत्तींचा समावेश आहे. याचा उपयोग आपत्तींच्या काही काळ आधी तसेच दीर्घकालीन जिल्हानिहाय आपत्ती निवारण धोरण ठरवण्यासाठी व योग्य ते व्यवस्थापन करण्यासाठी होईल. हे नकाशे भूतकाळातील हवामानाच्या नोंदींवर आधारित आहेत.

हेही वाचा : यूजीसीच्या दोन अधिसूचना चर्चाग्रस्त ठरताहेत, कारण…

देशातील सर्व शेतकऱ्यांना स्थानिक पातळीवर आगामी दहा दिवसांचे हवामानाचे पूर्वानुमान व तीव्र हवामानाच्या घटनांच्या पूर्वसूचना उपलब्ध होण्यासाठी पृथ्वी विज्ञान मंत्रालय व पंचायती राज मंत्रालय यांच्या संयुक्त विद्यामाने ‘मौसमग्राम’ हा उपक्रम हाती घेतला आहे.

संपूर्ण देशातील शेतकऱ्यांसाठी भारतीय हवामानशास्त्र विभागाने ‘मेघदूत’ नावाची खास सेवा सुरू केली आहे. ही सेवा देशातील ६०० जिल्ह्यांसाठी व २२ भाषांमध्ये उपलब्ध आहे. या सेवेअंतर्गत आगामी ५ दिवसांसाठी हवामानाचे पूर्वानुमान, पिकांच्या व्यवस्थापनासंबंधीचा सल्ला आणि तीव्र हवामानाचा इशारा दिला जातो. ही सेवा मोबाइल फोनवर संदेश, ध्वनिमुद्रित माहितीचे आदानप्रदान, सामाजिक माध्यमे, मोबाइलचे विशेष अॅप्स, भारतीय हवामानशास्त्र विभागाचे संकेतस्थळ, इत्यादींद्वारे पुरवली जाते. ही सेवा भारतीय हवामानशास्त्र विभाग राज्य कृषी विद्यापीठे, कृषी विज्ञान केंद्रे, भारतीय कृषी संशोधन परिषद आणि राज्य शासन यांच्या संयुक्त विद्यामाने पुरवली जाते.

भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या प्रादेशिक दळणवळणाच्या ‘उडान’ या योजनेअंतर्गत नवीन वैमानिक स्थानके निर्माण करून विमान प्रवासाने लहान-मोठी शहरे जोडणाऱ्या या विमान स्थानकांना हवामान सेवा पुरवली जाते.

भारत सरकारने ‘मिशन मौसम प्रकल्प’ सुरू केला आहे. हा प्रकल्प भारतीय उष्णदेशीय हवामानशास्त्र संस्था आणि मध्यम कालावधी हवामान पूर्वानुमान केंद्र यांच्या सहयोगाने भारतीय हवामानशास्त्र विभाग राबवत आहे. त्यासाठी हवामानाच्या घटकांच्या नोंदी घेणारी अत्याधुनिक व स्वयंचलित यंत्रणा, खास उपग्रह, कलर डॉप्लर रडारस् यांचे जाळे तयार करून ते महासंगणकाला जोडणे तसेच महासंगणकाची क्षमता वाढवणे या गोष्टींना प्राधान्य देण्यात येणार आहे. हवामानाचा अचूक अंदाज, तसेच हवामान बदलांमुळे होणाऱ्या नैसर्गिक आपत्ती यांचा इशारा यांसाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापरही करण्यात येत आहे.

हेही वाचा : सैन्य दलांत सुधारणांचे वारे!

विकसित राष्ट्रांबरोबर संशोधन व तंत्रज्ञान यांच्या देवाणघेवाणीसाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्यान्वित असलेल्या अनेक संयुक्त कार्यक्रमात भारतीय हवामानशास्त्र विभागाचा सदैव सक्रिय सहभाग असतो.

मर्यादित मनुष्यबळ व साधनसामग्रीसह १८७५ साली स्थापन झालेला भारतीय हवामानशास्त्र विभाग हवामानविषयक सेवा व संशोधन असे महत्त्वाचे कार्य पार पाडत आहे. त्यासाठीच्या यंत्रणेमध्ये काळानुसार व गरजेनुसार सुधारणा करून हवामानविषयक सेवेचा देशभरात विस्तार केला आहे. पुणे येथील भारतीय उष्णदेशीय हवामानशास्त्र संस्था, नोएडा येथील राष्ट्रीय मध्यम कालावधी हवामान पूर्वानुमान केंद्र, हैद्राबाद येथील भारतीय राष्ट्रीय महासागर माहिती सेवा केंद्र आणि चेन्नई येथील राष्ट्रीय समुद्र प्रौद्याोगिकी संस्था यांच्या शास्त्रज्ञांनी हवामानाच्या विविध अंगांनी केलेल्या संशोधनाचा व निरीक्षणांच्या नोंदींचा उपयोग भारतीय हवामानशास्त्र विभागाला होतो.

हेही वाचा : संघाविषयी आंबेडकरांच्या ‘आपुलकी’चे सर्व दावे संशयास्पद! 

अत्याधुनिक यंत्रणेमध्ये उपग्रह, रडार, हवेच्या विविध घटकांची नोंद घेणाऱ्या उपकरणांसह उंच मनोरे व जहाजे, स्वयंचलित उपकरणे व उच्च क्षमतेचे महासंगणक यांचा उपयोग नेहमीचे व आपत्तींचे पूर्वानुमान करण्यासाठी केला जातो. अनेक उपकरणांच्या निरीक्षणांच्या नोंदी त्यांना जोडलेल्या संगणकांवर येत राहतात. त्यांचे विश्लेषण करून अनुमान काढले जाते. हवामानविषयक सेवेचा दर्जा सातत्याने उत्तम ठेवण्यासाठी विभाग कटिबद्ध आहे. हवामान सेवेचे देशाच्या प्रगतीसाठी असलेले महत्त्व लक्षात घेऊन देशात हवामानशास्त्राच्या प्रगतीसाठी भारत सरकारचा सर्व प्रकारचा पाठिंबा मिळत आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरही अनेक प्रकल्प अनेक संस्थांबरोबर राबवले जात आहेत. अशा प्रकारे भारतीय हवामानशास्त्राचा अनेक अंगांनी विकास होत आहे. उच्च शैक्षणिक संस्थांमध्ये हवामानशास्त्राचा समावेश अध्यापन व संशोधन यांसाठी केला जात आहे. हवामानाचे स्थल व कालानुसार आणि ऋतूनुसार पूर्वानुमानाची अचूकता वाढण्यासाठी अत्याधुनिक प्रणालींची निर्मिती व वापर केला जातो. हवेच्या निरनिराळ्या घटकांच्या व्यवस्थित नोंदी घेणारी अत्याधुनिक साधनसामग्री, यंत्रणा, हवेच्या व पावसाच्या अंदाजासाठी लागणारी किचकट आकडेमोड करणारे अतिजलद सक्षम संगणक आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे उच्चशिक्षित, प्रशिक्षित, अनुभवी अधिकारी व कर्मचारी वर्ग या सर्वांच्या सहयोगाने भारतीय हवामानशास्त्र जगातील सर्व विकसित राष्ट्रांच्या बरोबरीने वाटचाल करीत आहे.

लेखिका भारतीय उष्णदेशीय हवामानशास्त्र संस्था, पुणे येथील निवृत्त वैज्ञानिक अधिकारी आहेत.

हवामान विभागाच्या वाटचालीविषयीचा या लेखाचा उर्वरित भाग loksatta.com वर विचारमंच या विभागात.

Story img Loader