विभूती नारायण राय
एका तरुण महिलेने पाकिस्तानातून भारतात येऊन, दोन्ही देशांमधल्या पुरुषप्रधान अहंकाराला आणि ‘देशभक्ती’च्या कल्पनांना हादरा देणारे आव्हान नकळत उभे केले आहे. ती तिथून इथे कशी आली, कोणत्या कारणाने आली, याच्या तपशिलामुळे भारत आणि पाकिस्तान या दोन अण्वस्त्रधारी शेजाऱ्यांच्या भावना भडकल्या आहेत. ‘चार मुलांची आई’ इतकीच सामाजिक ओळख असलेल्या त्या महिलेने- सीमा हैदर हिने- स्वतःसाठी निवडलेल्या पुरुषासोबत राहण्याचे धाडस केले, यातूनच पुरुषप्रधानतेला मोठा हादरा बसला. दोन्ही देशांमधल्या पितृसत्ताकतेच्या पाईकांनी आरडाओरडा सुरू केला : ‘हे असले काही करण्याची हिची हिम्मतच कशी झाली?’
सुरुवातीच्या काळात मात्र ‘देशभक्त’ हिंदूंच्या प्रतिक्रिया अतिशय मनोरंजक होत्या. सीमा हैदर ही जणू आपण ‘जिंकलेली’ बाई होती, ती विजयाची खूण होती. ‘लव्ह जिहादी’ लोक ‘निर्दोष हिंदू मुलींना’ आकर्षित करून महान सनातन मूल्यांना काळिमा फासत होते, त्यांना जणू काही आपण प्रत्युत्तर दिले! दुसरीकडे मुस्लिमांमधील कट्टरपंथीय आधी बावचळले. मग त्यांनी शरिया कायद्यांतर्गत अशा चुकीच्या वागणुकीसाठी दगडाने ठेचून मारण्याचीच शिक्षा हवी, अशी मागणी केली… ती शक्य नाही, हे लक्षात आल्यावर कमीतकमी ‘नेहमीसारख्या’ म्हणजे ‘सभ्य’ फाशीने तरी हिला होत्याची नव्हती करा, अशी मागणी हे मुस्लीम कट्टरपंथीय करू लागले.
हेही वाचा – पूरनियंत्रणासाठी धरणे हाच पर्याय!
हिंदू असो वा मुस्लीम- कोणतीही पुरुषप्रधान, पितृसत्ताकतावादी संस्कृती सीमा हैदरच्या कृतीतून अभावितपणे मिळालेले आव्हान सहन करू शकत नाही.
पाकिस्तानातील आदळआपट
‘पराभूत’ बाजूने जे शक्य होते ते केले. पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील माजी खासदार अब्दुल हक हे अपहरण झालेल्या शेकडो हिंदू मुलींचे धर्मांतर करून त्यांचे मुस्लीम पुरुषांशी लग्न करून देण्यासाठी कुख्यात आहेत. त्यांनी मुस्लीम पुरुषांना त्यांच्याहून निम्म्या वयाच्या हिंदू मुली पुरवल्या, असाही आरोप केला जातो. या अब्दुल हक यांनी घोषित केले की जर सीमा हैदर पाकिस्तानला परतली नाही, तर पकिस्तानातील हिंदू मुलींच्या सुरक्षेची जबाबदारी कोणीही घेऊ शकत नाही. पाकिस्तानातील एका गुंडाने ‘धर्मकृत्य’ म्हणून तेथील एका हिंदू मंदिरावर रॉकेटद्वारे बॉम्बहल्ला केला… त्याचा नेम चुकला आणि काहीही नुकसान झाले नाही अशीही बातमी आहे, पण धर्मश्रद्धेचा रक्षक बनलेल्या त्या गुंडानेही सीमाला परत न पाठवल्यास परिणामांची धमकी दिली. पण सीमा हैदर भारतात आल्यामुळे जे काही पडसाद उमटले, त्यामागे पितृसत्ताक वृत्ती हे एकमेव कारण दिसत नाही. भारताच्या नव्या ‘राष्ट्रवादा’नेही सीमा हैदरच्या निमित्ताने डोके वर काढले आहे. विशेषत: पाकिस्तानी वंशाच्या मुस्लीम महिलेकडे ‘एका व्यापक आणि खोल कटाचा भाग’ म्हणून पाहिले जाऊ लागले आहे… ‘नाहीतर ती भारतात का येईल? केवळ तिला प्रिय असलेल्या माणसाबरोबर राहायचे आहे, एवढेच कारण कसे काय पुरेसे आहे?’ आदी प्रश्न केवळ ‘व्हॉट्सॲप विद्यापीठा’तूनच नव्हे, तर काही प्रादेशिक स्वरुपाच्या चित्रवाणी वृत्तवाहिन्यांवरूनही विचारले जाऊ लागले आहेत!
या प्रश्नांचे उत्तर, ते विचारणाऱ्यांकडे अर्थातच तय्यार आहे- ‘आपल्या महान राष्ट्राचे नुकसान करण्यासाठी तिला आयएसआयने पाठवले असावे’ असे ते उत्तर! त्यामुळे तिचे आगमन, मोबाईल फोन, हालचाली आणि भारतीय माणसाची पडझड या सर्व गोष्टींकडे बारकाईने पाहिले पाहिजे, तिला ताबडतोब पाकिस्तानात परत पाठवले पाहिजे, असे इथल्या बहुतेक ‘देशभक्तांना’ वाटते. विशेष म्हणजे भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांतल्या कट्टरपंथीयांचे एका बाबतीत फार म्हणजे फारच एकमत आहेत. सीमा हैदरसारख्या महिलेला जगण्याचा आणि स्वातंत्र्याचा हक्क आहे की नाही, याची पर्वा न करता दोन्ही बाजूंच्या कट्टरपंथीयांना ती पाकिस्तानातच हवी आहे. दोघेही तिच्या प्रत्यार्पणाची मागणी करत आहेत. ज्या क्षणी ती पाकिस्तानच्या भूमीवर पाय ठेवेल त्या क्षणापासून तिच्या जिवाला धोका असेल, हे या सर्वांनाच माहीत आहे. दुर्दैवाने, पाकिस्तानात तर या अशा हत्यांतून येणारे मरण स्वस्तच आहे… पंजाब प्रांताचे गव्हर्नर सलमान तासीर यांनी तेथील गरीब ख्रिश्चन महिलेला ‘धर्मनिंदा’ (म्हणजे इस्लामचीच निंदा) केल्याच्या प्रकरणात फाशीची शिक्षा सुनावली गेल्यानंतर कैक वर्षांनी, तिला आधुनिक प्रकारचा न्याय मिळावा अशी मागणी केली होती, तेव्हा तासीर यांना त्यांच्याच रक्षकाने गोळ्या घालून ठार मारले होते.
कट-कारस्थान कोणाला हवे असते?
राष्ट्रवादाच्या अनैसर्गिक वाढीसाठी ‘षड्यंत्र’ या कल्पनेची फारच आवश्यकता असते! मोठा कट, व्यापक कारस्थान अशी प्रसिद्धी केल्याखेरीज एखादा मुद्दा लक्ष वेधण्यासाठी पुरेसा ठरूच शकत नाही. त्यामुळे ‘ती नेपाळमार्गे भारतात इतक्या सहजतेने कशी घुसली?’ यासारखा प्रश्नही आत्यंतिक गांभीर्याने विचारला जाऊ लागला. वास्तविक भारत-नेपाळ सीमा ही सर्वांत खुली आहे हे सर्वजण विसरताना दिसतात. मग ‘तिच्याकडे अत्याधुनिक मोबाईल कोठून आला?’ हाही प्रश्न तितक्याच तारस्वरात विचारला गेला. आता भारत काय, पाकिस्तान काय किंवा नेपाळ काय- या तीनपैकी कोणत्याही देशात अद्ययावत मोबाइल खरेदी करणे ही सर्वांत सोपी गोष्ट आहे, हे प्रश्न विचारणाऱ्यांपैकी कोणालाही आठवले नाही. यातही गोम अशी की, या सीमा हैदरचे मोबाइल फोन आता सुरक्षादलांनी ताब्यात घेतले आहेत आणि तिने ज्यांच्याशी संपर्क साधला, तिने ज्यांना संदेश पाठवले अशा सर्वांचे मोबाइल क्रमांक सुरक्षा दलांना सहजपणे मिळवता येऊ शकतात. पण हा तपशील उघड केला तर मग ‘कटकारस्थाना’च्या कथानकात सनसनाटी कशी काय निर्माण होणार म्हणा!
ज्यांना हे तपशील आणि प्रकरणाची सत्यता माहीत आहे, त्यांनी कोणतीही माहिती उघड केलेली नाही. त्याऐवजी, अर्धवट माहिती मात्र चित्रवाणी वृत्तवाहिन्यांच्या कंठाळी ‘अँकर’ मंडळींना सहजपणे या ‘सूत्रां’कडून मिळते आहे. अशी कोणतीही अर्धवट, तीही अनधिकृत माहिती मिळाली रे मिळाली की अँकर मंडळी किंचाळत आहेत- ‘बघा, मी तुम्हाला सर्वांत आधी सांगितले की ती शत्रूची एजंट आहे…!’.
थोडक्यात, एक साधी प्रेमकथा षड्यंत्र आणि रहस्यात अडकली आहे. सीमा हैदरला हद्दपार केले जावे यावर हिंदुत्व आणि कट्टरपंथी इस्लाम या दोघांचे एकमत आहेच, यात काहीही नवल नाही. कोणत्याही बाईने तिच्या शरीरावर ‘अधिकार’ असलेल्या पुरुषाकडे राहाणे, ही तर पितृसत्ताक पद्धतीची पूर्वअटच! यात बाईला काहीही किंमत द्यायची नाही, हीच तर पुरुषप्रधान संस्कृती! शेवटी, पुरुषालाच अंतिम निर्णय घेण्याचा हक्क आहे आणि सीमा हैदरने हा नियम धुडकावला आहे, म्हणून तिला शिक्षा झालीच पाहिजे, असे या साऱ्यांनाच वाटले तर काय नवल? हिंदू उजव्या विचारसरणीला, ज्यांना सुरुवातीला ‘जिंकल्या’सारखे वाटत होते, त्यांनाही आता हत्याच हवी आहे.. कारण उघडच आहे : ‘एका महिलेने तिच्या स्वत:च्या शरीरावर हक्क सांगण्याचे धाडस केले म्हणजे काय?- याबद्दल तिला शिक्षा झालीच पाहिजे!’
हेही वाचा – शेतकऱ्यांना, शेतमजुरांना मतांसाठी लाच दिली जाते आहे का?
या महिलेला शिक्षा झालीच पाहिजे, तिच्या जिवाला काहीही महत्त्व नाही, हेच तर हिंदू आणि मुस्लीम दोन्ही धर्मांमधील पुरुषसत्तावाद्यांना म्हणायचे आहे. सीमा हैदरने भारतीय प्रियकरासाठी भारतात येणे ही जर खरोखरच राष्ट्रीय समस्या मानायची असेल, तर त्या समस्येवर आपण काय उपाय शोधणार आहोत?
विचार करा.. हा महान देश – ‘विश्वगुरू’पदावर वारंवार दावा सांगणाराच नव्हे, तर जगातील पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असा टेंभा मिरवणारा हा आपला देश जर सीमाला घर देऊ शकत नसेल, तर… तर तिला त्याहून अधिक सुसंस्कृत ठिकाणी पाठवले पाहिजे! शक्यतो स्वीडन/ नॉर्वेसारखे देश किंवा जर्मनी अशा देशांत तरी तिने जावे… या प्रगत देशांनी, इतर देशांमध्ये अशा प्रकारचा छळ झालेल्या कैक लोकांना आश्रय दिला आहे. तिला पाकिस्तानात पाठवणे म्हणजे तिला बहुधा मृत्यूच्या दाढेत पाठवणे होय.
(लेखक निवृत्त ‘आयपीएस’ अधिकारी आहेत)