विनाशकारी भूकंपाने उद्ध्वस्त झालेल्या तुर्कस्तानात भारताने ऑपरेशन ‘दोस्त’अंतर्गत पॅराशूट फील्ड हॉस्पिटल्सच्या माध्यमातून केलेल्या मदतकार्याविषयी..
डॉ. सुब्रत साहा
काही दिवसांपूर्वी तुर्कस्तानचा दक्षिण भाग आणि उत्तर सीरियाचा भूप्रदेश दोन प्रचंड भूकंपांमुळे हादरले. गॅझियानटेप परिसरात भूकंपाचा पहिला धक्का ६ फेब्रुवारी रोजी पहाटे ४.१७ वाजता (भारतीय प्रमाण वेळेनुसार सकाळी ६.४७ वाजता) तर दुसरा धक्का त्यानंतर जवळपास १२ तासांनी बसला. या विनाशकारी भूकंपामध्ये हजारो व्यक्तींनी प्राण गमावले. मालमत्तेची प्रचंड हानी झाली. मोठय़ा भूकंपांनंतरही काही दिवस या संपूर्ण प्रदेशात लहान-मोठे अनेक धक्के बसत होते.
या पार्श्वभूमीवर, भारताने मानवतावादी दृष्टिकोनातून मदत आणि आपत्ती प्रतिसादविषयक मोहीम राबविली. या मोहिमेचे नाव होते ऑपरेशन ‘दोस्त’. मोहिमेत राष्ट्रीय शोध आणि बचाव पथक, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ) आणि ६० पॅराशूट फील्ड हॉस्पिटल यांची ५० स्वतंत्र पॅराशूट ब्रिगेड यांचा समावेश होता. ६० पॅराशूट फील्ड हॉस्पिटलने १९५० ते ५३ दरम्यान उत्तर आणि दक्षिण कोरियादरम्यान झालेल्या युद्धात भारताचे प्रतिनिधित्व करून गौरवास्पद कामगिरी केली होती.
तुर्कस्तानात भूकंपग्रस्तांच्या मदतीला जाण्यासाठी सकाळी ११ वाजेपर्यंत सज्ज राहण्याचा आदेश लष्कराच्या मुख्यालयाकडून मिळताच देशाच्या आंतरराष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन विभागाने वेगाने काम सुरू केले. भूकंप झाल्यानंतर अवघ्या काही तासांत ६० पॅराफील्ड हॉस्पिटल समूहाने प्रतिसादात्मक कृतीला सुरुवात केली. वैद्यकीय तज्ज्ञ, शस्त्रक्रिया विशेषज्ञ, भूलतज्ज्ञ, हाडांचे डॉक्टर, मॅक्सलोफेशियल सर्जन म्हणजे जबडा आणि दातांवर शस्त्रक्रिया करणारे डॉक्टर, सार्वजनिक आरोग्यतज्ज्ञ, वैद्यकीय अधिकारी, निमवैद्यकीय कर्मचारी आाणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद कृतिदल यांचा समावेश असलेल्या ९९ जणांच्या मदत पथकाला भारतीय हवाई दलाने हिंडन हवाईतळावरून ‘एअर लिफ्ट’ केले.
या मदत पथकाबरोबर आवश्यक वैद्यकीय साहित्य, उपकरणे, शस्त्रक्रियेसाठी गरजेच्या वस्तू, आपत्कालीन परिस्थितीत बचाव कार्यासाठी लागणारे साहित्यही विमानातून नेण्यात आले. ८ फेब्रुवारी रोजी तुर्कस्तानात पोहोचल्यानंतर अवघ्या तीन तासांत विनाशकारी भूकंपात सर्वाधिक नुकसान झालेल्या हातय या प्रांतातील इस्केन्डरन इथे फिल्ड हॉस्पिटल उभारण्यात आले. या तात्पुरत्या रुग्णालयाची उभारणी केल्यानंतर लष्कराच्या पथकाने प्रत्यक्ष काम सुरू केले. भूकंपामुळे सर्वाधिक हानी झालेल्या गाझियानटेप या ठिकाणी राष्ट्रीय शोध आणि बचाव पथकाने बचाव आणि मदत कार्य सुरू केले, तर वैद्यकीय पथकाने जखमींवर उपचार सुरू केले.
भूकंपग्रस्तांसाठी उभारलेल्या ‘इंडियन फील्ड हॉस्पिटल’मध्ये १२ दिवसांत तीन हजार ६०४ जखमींवर आपत्कालीन उपचार करण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने, विविध प्रकारचे अस्थिभंग (फ्रॅक्चर), जबडय़ाला आणि दातांना झालेल्या दुखापतींवर उपचार करण्यात आले. जखमी रुग्णांवर शस्त्रक्रियाही करण्यात आल्या. जवळपास १०० जखमींना पुढील उपचारांसाठी अन्यत्र दाखल करण्यात आले. इमारतींची पडझड, कडाक्याची थंडी, मानसिकदृष्टय़ा दुर्बल झालेले रुग्ण अशा परिस्थितीत वैद्यकीय उपचार करण्यासाठी मनोबल टिकवून ठेवणे, वैद्यकीय उपकरणांचा आणि औषध सामुग्रीचा साठा संपल्यानंतर तो पुन्हा भारतातून मागवून घेणे अशी अनेक आव्हाने सातत्याने पेलावी लागत होती. अतिशय उत्तम सेवेमुळे भारतीय फील्ड हॉस्पिटल तुर्कस्तानवासीयांमध्ये लोकप्रिय झाली.
भारतीय लष्कराला संयुक्त राष्ट्रसंघाच्या मोहिमांमध्ये त्याचबरोबर देशातील अशांत भागांमध्ये विविध जनकेंद्री मोहिमा पार पाडण्याचा अनेक वर्षांचा अनुभव आहे. त्या अनुभवाचा फायदा तुर्कस्तानातील बचाव कार्यात झाला. भारतीय लष्करी दलांनी, संयुक्त राष्ट्रसंघाच्या मोहिमांचा भाग म्हणून युद्धग्रस्त अंगोला, काँगो, रवांडा, दक्षिण सुदान येथे काम केले आहे. तसेच देशांतर्गत बंडखोरी, दहशतवादाच्या विरोधात कराव्या लागणाऱ्या कारवाया यांचाही अनुभव लष्कराच्या मदत पथकाला आहे. अशा वेळी येणाऱ्या अडचणींवर स्थानिक स्वयंसेवकांच्या मदतीने मात केली जाते. परदेशांत मदतकार्यात भाषेची अडचण येते. तीच तुर्कस्तानमध्येही आली. मात्र भारतीय पथकाने स्थानिक स्वयंसेवकांना दुभाषे म्हणून वापरत रुग्ण तपासणी केली आणि तसेच औषध वितरण पार पाडले.
भारतातून गेलेल्या आपत्ती निवारण पथकाला तुर्कस्तानातील नागरिकांनी अतिशय हृदयस्पर्शी निरोप दिला. उलास या स्वयंसेवकाच्या परिवाराने पाठवलेल्या संदेशात म्हटले आहे की, ‘९९जणांचे पथक म्हणून तुम्ही इथे आलात, आता भारतात परतताना संपूर्ण तुर्कस्तानच्या जनतेचे आशीर्वाद तुमच्याबरोबर असणार आहेत.’ इडा इस्केंड्रम यांनी ट्वीट करून या पथकाविषयी कृतज्ञता व्यक्त केली. सर्वाच्या वतीने इडा म्हणतात, ‘तुम्ही सर्व आमचे नायक आहात. ज्या वेळी आम्ही आनंदात असू, आतासारखी शोकाची वेळ आमच्यावर नसेल, अशा आनंदी काळात आपण पुन्हा जरूर भेटू. मी भारतभेटीवर येईन. आणि भविष्यात तुम्हीही पुन्हा एकदा हातयमध्ये जरूर या.’
भारतात परतण्यासाठी निघालेल्या सी- १७ या पथकातील वैद्यकीय अधिकाऱ्याला तुर्कस्तानातील वैद्यकीय शाखेच्या एका विद्यार्थ्यांने संदेश पाठवला आहे, ‘आम्ही तुमच्यावर प्रेम करतो. तुर्कस्तानमध्ये तुमचे एक घर आहे आणि तिथे तुमचा एक भाऊ तुमची वाट पाहात आहे.’ प्रत्यक्ष आपत्तीच्या ठिकाणी ६० पॅराफील्ड हॉस्पिटल आणि एनडीआरएफच्या पथकांनी बचाव कार्य करून मने जिंकली आहेत आणि तुर्कस्तानातील नागरिकांच्या मनातही स्थान निर्माण केले आहे.
जागतिक पातळीवर भारताच्या या मानवतावादी कृतीची नोंद घेतली जात आहे, त्यामागे तीन प्रमुख कारणे आहेत. भारताने संकटाच्या काळात अतिशय जलद निर्णय घेऊन, त्यांची वेगवान अंमलबजावणी केली. दुसरे म्हणजे, सर्व प्रकारच्या अवघड, प्रतिकूल परिस्थितीशी जुळवून घेत आपत्तीग्रस्त नागरिकांवर अतिशय सहानुभूतीने उपचार केले. हे करताना आपल्या सैनिकांकडे असलेल्या कौशल्याचा, क्षमतांचा अगदी कस लागला. तिसरी गोष्ट म्हणजे, मदतकार्य करताना कोणत्याही विचारांपेक्षा मानवतावादी दृष्टिकोन आणि मूल्यांना, तत्त्वांना प्राधान्य देण्यात आले.
नैसर्गिक संकटांना सामोरे जावे लागले तर भारत मानवतावादी दृष्टिकोनातून मदत आणि आपत्ती निवारणामध्ये आघाडीवर राहतो, बहुपक्षीय वचनबद्धता व्यावहारिक पद्धतीने पार पाडतो, याचे उदाहरण म्हणजे ‘ऑपरेशन दोस्त’ आहे. कोविडकाळात भारताने दिलेला प्रतिसाद संपूर्ण जगाला माहीत आहेच. करोनाकाळात भारताने अनेक देशांना वैद्यकीय उपकरणे आणि औषधांचा पुरवठा केला. परदेशी नागरिकांना त्यांच्या मायदेशी परतण्यासाठी सुविधा उपलब्ध करून दिल्या आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे अनेक देशांना कोविड प्रतिबंधात्मक लस निर्यात केली.
भारत २०१६ पासून ‘बिमस्टेक’ (बे ऑफ बेंगाल इनिशिएटिव्ह फॉर मल्टिसेक्टोरल टेक्निकल अँड इकॉनॉमिक को-ऑपरेशन) देशांमध्ये मानवतावादी दृष्टिकोनातून मदत आणि आपत्ती निवारणविषयक सहकार्यासाठी सातत्याने सक्रिय योगदान देत आला आहे. सप्टेंबर २०२२ मध्ये ‘क्वाड’ समूहाच्या देशांनी म्हणजे- भारत, अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि जपान यांनी मानवतावादी दृष्टिकोनातून मदत आणि आपत्ती निवारणविषयक भागीदारीचा करार केला. नोव्हेंबर २०२२मध्ये भारताने आग्रा येथे बहुराष्ट्रीय, बहु-संस्था मानवतावादी दृष्टिकोनातून मदत आणि आपत्ती निवारणविषयक संयुक्त सराव- ‘समन्वय २०२२’चे आयोजन केले होते. यामध्ये आसियान (असोसिएशन ऑफ साऊथ-ईस्ट नेशन्स) देशांचा समावेश होता. जी-२० मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य’ अशी घोषणा केली. त्या एकात्मतेच्या भावनेला अनुसरून भारत जगामध्येही कुठेही आपत्ती आली तरी, तिथल्या संकटग्रस्तांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहतो. ऑपरेशन दोस्ती हा त्याचाच भाग होता.
लेखक राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळाचे माजी सदस्य आणि माजी लष्कर उपप्रमुख आहेत.