जगाच्या नकाशात भारत कसा दिसतो, त्याचे भौगोलिक स्थान आणि आकारमान महत्वाचे का ठरते, जी बलस्थाने भारताला प्रादेशिक शक्ती म्हणून बळ देतात, ती तंत्रज्ञानाने बदललेल्या अनपेक्षित धोक्यांसाठी तयार आहेत का, २१ व्या शतकातील अशा सर्व आव्हानांना तोंड देण्यासाठी भारतीय सशस्त्र दलात धाडसी परिवर्तन व सेवांचे एकत्रीकरण होत आहे.
कोणत्याही राष्ट्राचे भौगोलिक स्थान, आकारमान याचे काही फायदे-तोटे असतात. घनदाट जंगल, उत्तुंग पर्वतीय क्षेत्र, वाळवंट, बर्फाळ प्रदेश, विस्तीर्ण समुद्रकिनारा अशा वैविध्यपूर्ण सीमेवर संरक्षण फळी मजबूत राखणे आव्हानात्मक ठरते. सभोवतालच्या घडामोडींचा प्रभाव लष्करी नियोजनावर पडतो. विस्तारवादी चीन, युद्धखोरीत गुंतलेला पाकिस्तान, बांगलादेश आणि म्यानमारमधील गृहकलह, चीनशी जवळीक साधणारे नेपाळ आणि स्वत:चे बंदर चीनला देणारा श्रीलंका, असे शेजारी आव्हांनांमध्ये किती भर घालतात, हे सांगण्यासाठी तज्ज्ञांची आवश्यकता नाही. भारताचा सामरिक शेजार हा जगातील सर्वात अस्थिर आणि धोकादायक प्रदेशांपैकी एक गणला जातो. भविष्यातील युद्धभूमी बनण्यास ते कारक ठरण्याची शक्यता आहे.
हेही वाचा…उच्च शैक्षणिक धोरणदशा!
वेगवान तांत्रिक प्रगतीमुळे युद्धाचे स्वरुप पूर्णत: बदलत आहे. शेजारील चीनने नवीनतम तंत्रज्ञान आत्मसात करुन अनेक क्षेत्रात आघाडी घेतली आहे. संरक्षण मंत्रालयाने जाहीर केलेले २०२५ हे सुधारणेचे वर्ष सभोवतालच्या परिस्थितीमुळे आवश्यक होते. सैन्य दलांच्या आधुनिकीकरणात या सुधारणा महत्वाच्या ठरतील. बहुक्षेत्रीय आधुनिक युद्धाच्या वातावरणात त्या सायबर व अंतराळ सारख्या क्षेत्रासह कृत्रिम बुद्धिमत्ता, संगणकीय आज्ञावली, ध्वनिपेक्षा पाचपट वेगाने जाणाऱ्या ‘हायपरसोनिक’, यंत्रमानवाधारीत (रोबोटिक्स) तंत्रज्ञान केंद्रीत असतील. यातून भविष्यातील युद्धे जिंकण्यासाठी रणनीती, तंत्र व कार्यपद्धती विकसि़त करण्याचे सुतोवाच झाले.
तीनही सैन्यदलात समन्वय राखण्यासाठी भारतीय लष्कर, हवाई दल व नौदल यांच्या एकत्रीकरणातून एकात्मिक युद्ध विभागाची निर्मिती प्रगतीपथावर आहे. त्यास आता अधिक गती मिळेल. आजवरची ही सर्वात मोठी लष्करी पुनर्रचना आहे. तीनही दलांची संसाधने युद्धात एकत्रित व प्रभावीपणे वापरण्याची रणनीती आकारास येईल. आतापर्यंत हे तीनही दल स्वतंत्रपणे जबाबदारी सांभाळत होते. नव्या रचनेत भारतीय सशस्त्र दलांचे १७ विभाग एकत्रित होतील. विविध लष्करी शाखांच्या सामर्थ्याचा फायदा घेण्यात एकात्मिक दृष्टिकोन महत्वाचा ठरतो. सामूहिक शक्तीतून परिणामकारकता साधता येईल. विचाराधीन प्रारुपात किमान सहा एकात्मिक युद्ध विभागांचे नियोजन आहे. या माध्यमातून केवळ सामाईक लष्करी कारवाईच नव्हे तर, पुरवठा व्यवस्था, वाहतूक, दळणवळण देखभाल-दुरुस्तीत संयुक्त व्यवस्था आणि एकत्रित प्रशिक्षणाचाही अंतर्भाव आहे. सामाईक कारवाईच्या दृष्टीने तिन्ही सैन्य दलात समन्वय वाढविण्यासाठी एका दलातील अधिकाऱ्यांना दुसऱ्या दलात (क्रॉस पोस्टींग) नियुक्तीला सुरुवात झाली आहे.
भविष्यातील युद्धे ही संपर्क, विनासंपर्क, गतिज, स्थितिज, मनोवैैज्ञानिक आदी स्वरुपाची असतील. सायबर, अंतराळ, विद्युत चुंबकीय क्षेत्राशीही ते निगडीत असू शकतात. आधुनिक युद्धाचे संचलन आणि तांत्रिक पैलूंची ओळख तिन्ही दलांसाठी विकसित केलेल्या भविष्यातील युद्धतंत्र अभ्यासक्रमातून करून दिली जात आहे. जटील परिस्थितीचा सामना, नवतंत्रज्ञानाचा लाभ व नावीन्यपूर्ण डावपेचांशी जुळवून घेण्याच्या दृष्टीने अधिकारी सुसज्ज होतील. सशस्त्र दलात पुढील पिढीच्या युद्धासाठी सज्जता, तंत्रज्ञानाचा परिघ विस्तारणे, बहुक्षेत्रीय युद्धातील बारकावे हाताळणे, असे बदल घडत आहेत. प्रहारक क्षमता विस्तारण्यासाठी चीनने दशकभरापूर्वी सैन्य दलांची पाच थिएटर कमांडमध्ये पुनर्रचना केली आहे.
हेही वाचा…हमी भाव धोरणाच्या पुनर्विचाराची गरज
ड्रोन हल्ल्यांमुळे संपर्कविरहीत युद्धास घातक स्वरुप प्राप्त झाले आहे. युद्धाचे बदलते स्वरुप सशस्त्र दलांच्या सुधारणेतील मुख्य भाग ठरेल. भविष्यातील युद्धे ड्रोनवर आधारीत असतील. ड्रोनद्वारे टेहळणी, शत्रूचा ठावठिकाणा शोधणे, हल्ला चढविणे, तोफखान्याच्या माऱ्याची पडताळणी केली जाईल. भारतीय सैन्याच्या भात्यात स्वदेशी व परदेशी बनावटीच्या ड्रोनमध्ये विविधता आणली जात आहे. अमेरिकन बनावटीच्या प्रिडेटर पाठोपाठ त्याहून सरस रिपरसारखे ड्रोन सैन्याची शक्ती वाढवतील. चीनलगतच्या सीमेवर दुर्गम भागात नियमित गस्तीला मर्यादा येतात. तिथेही ते उपयुक्त ठरतील. आठ लेझर मार्गदर्शित वाहून नेऊ शकणारे हे ड्रोन ३० तासांहून अधिक काळ उड्डाण करू शकतात. प्रदीर्घ काळ चालणाऱ्या मोहिमेत पर्वतीय व सागरी क्षेत्रात त्यामार्फत लक्ष्यभेद करता येईल. काही ड्रोन लक्ष्याची हालचाल, भौगोलिक स्थितीचे अवलोकन करतात. लक्ष्याचा मागोवा घेतात. नागास्त्र – एक सारखे स्वदेशी ड्रोन आत्मघाती हल्ल्याची क्षमता राखते. दुर्गम भागात रसद पुरवठ्यात लवकरच ड्रोनचा वापर सुरू होणार आहे. ड्रोनला सायबर धोक्यांपासून सुरक्षित ठेवणे अनिवार्य ठरते. स्वदेशी सायबर संरक्षण तंत्राने ड्रोन सुरक्षित केले जात आहे. सुरक्षा नावाचे हे तंत्रज्ञान लष्करी ड्रोन क्षेत्रात सायबर घुसखोरीच्या धोक्यांना तोंड देणारा पहिला स्वदेशी उपाय आहे. ड्रोनच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर, त्यांचे संचलन करणाऱ्या अधिकारी, तंत्रज्ञांची संख्या वाढविली जात आहे. लष्करी अधिकाऱ्यांना हेलिकॉप्टर प्रशिक्षणासाठी स्थापित कॉम्बॅक्ट आर्मी एव्हिशन स्कूलने (कॅट्स) मानवरहित विमान संचलनावरही लक्ष केंद्रीत केले आहे.
राष्ट्रीय सुरक्षा वाढविण्यासाठी महत्वाची शक्ती म्हणून कृत्रिम बुद्धिमत्ते (एआय) कडे पाहिले जाते. या तंत्राच्या आधारे एकात्मिक युद्ध विभाग एका शक्तीशाली विदाचलित केंंद्रात रुपांतरीत होत आहे. तो जमीन, हवाई व सागरी क्षेत्रातील कारवाईत संलग्न असेल. हे तंत्रज्ञान प्राप्त माहितीचे स्वयंचलित विश्लेषण करते. कारवाई करण्यायोग्य बुद्धिमत्ता वितरित करते. प्रगत विश्लेषण, धोके व जोखमीचा अंदाज बांधून लष्करी कमांडर तत्काळ प्रतिसाद देऊ शकतो. यातून समन्वय, निर्णयक्षमता व तत्क्षणी प्रतिसाद क्षमता वाढेल. भविष्यातील युद्धासाठी लष्कर १६ विशिष्ट तंत्रज्ञानांवर काम करीत आहे. त्या अंतर्गत प्रत्येक क्षेत्रासाठी विशेषतज्ज्ञांचा समावेश करण्याची प्रक्रिया या वर्षाच्या मध्यापासून सुरु होणार आहे.
हेही वाचा…नव्या भक्ती-चळवळीची गरज…
लष्करी सामग्री खरेदीत सुलभता, संरक्षण क्षेत्रासाठी विकसित तंत्रज्ञानाचे खासगी उद्योगांकडे हस्तांतरण, सार्वजनिक-खासगी भागिदारी व नवउद्यमींना प्रोत्साहन यावर सुधारणा वर्षात भर दिला जाईल. संरक्षण सामग्रीत आत्मनिर्भरता प्राप्त करणे आवश्यक आहे. या वर्षात डीआरडीओवर बदलत्या तंत्रज्ञानाशी सुसंगत काळानुसार लष्करी साधने विकसित करण्याची जबाबदारी सोपवली गेली. या संस्थेच्या प्रत्येक प्रयोगशाळेने दोन, तीन महत्वाचे प्रकल्प निवडून वर्षभरात ते पूर्णत्वास नेण्याचे शतक गाठावे, अशी संरक्षण मंत्रालयास अपेक्षा आहे. डी्आरडीओने विकसित प्रणालींसाठी भारतीय उद्योगांना आतापर्यंत १९५० तंत्रज्ञानांचे हस्तांतरण केले. यातील २५६ परवाना करार गतवर्षीच करण्यात आले.
सैन्य दलांच्या शस्त्रागारात पारंपरिक आयुधांपासून ते नावीन्यपूर्ण सामग्री समाविष्ट होत आहे वा होण्याच्या मार्गावर आहे. यंत्रमानवधारित श्वान वा खेचर हे त्याचे एक प्रातिनिधिक उदाहरण. प्रगत संवेदकांनी सुसज्ज रोबोटिक श्वान राजस्थानच्या वाळवंंटात लष्करी सरावात सहभागी झाले होते. प्रगत यंत्रमानव उत्तुंग क्षेत्रासह वाळवंटी प्रदेशात कार्यरत होत आहेत. पाळत ठेवणे, रसद पुरवठा व लढाऊ भूमिका पार पाडणे यासारखी कामे ते करतात. डीआरडीओने विकसित केलेल्या एआयपी तंत्रज्ञानाने नौदलाच्या ताफ्यातील पारंपरिक पाणबुड्यांची पाण्यात टिकून राहण्याची क्षमता वृद्धिंगत होईल. तर वजनदार इलेक्ट्रॉनिक पाणतीर कलवरी श्रेणीतील पाणबुड्यांची मारक क्षमता विस्तारतील. युद्धात यशस्वी ठरण्यासाठी प्रभावी संप्रेषण आवश्यक ठरते. सिग्नल तंत्रज्ञान मूल्यमापन आणि समायोजन गटाच्या (स्टॅग) स्थापनेतून माहितीच्या देवाण घेवाणीसाठी उत्कृष्ट संप्रेषण तंत्रज्ञानावर काम सुरू आहे. जगातील सर्वात उंच युद्धभूमी सीयाचीनमध्ये तैनात भारतीय सैन्यासाठी तापमान नियंत्रित ठेवणारे निवासस्थान अर्थात तंबूने बर्फाच्छादीत रणभूमीवर लढण्यास बळ देण्याचा प्रयत्न होत आहे. सैन्य दलांसमोरील आव्हाने लक्षात घेऊन असे असंख्य प्रयोग मूर्त स्वरुपात येत आहेत. aniket.sathe@expressindia.com