अजिंक्य टांकसाळे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
भारत हा विविधतेने नटलेला देश आहे, असे आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत. शाळेत रोजच्या प्रतिज्ञेच्या निमित्ताने याचे स्मरण रोज करून दिले जात असे. या विविधतेची प्रशंसा जरी प्रत्येकाच्या मुखी असली तरी याचे भान फारच कमी व्यक्तींना असते. एखादी गोष्ट रोज म्हटल्याने ती फारतर आपल्या मेंदूच्या कोणत्यातरी कोपऱ्यात जाऊन बसत असेल, परंतु तिचे महत्त्व समजण्यासाठी आणि तिचा दैनंदिन व्यवहारात अवलंब करण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतात.
भारतातील याच वैविध्यामुळे हे एक राष्ट्र असू शकत नाही, असा समज इंग्रजांनी भारतीयांच्या मनात पेरला होता. भारताला चिरकाळ गुलामीत ठेवणे हा त्यामागचा हेतू होता. यातून जगाला एकाच चष्म्यातून पाहण्याची त्यांची मानसिकता प्रतिबिंबित झाली. समाज हा काही विज्ञानाच्या नियमांप्रमाणे चालत नाही. एकादा समाज अमुक प्रकारचा असेल, त्या समाजातील लोक अमुक गोष्टींना प्राधान्य देत असतील तर जगातील कुठलाही समाज हीच लक्षणे दाखवेल हा समजच मुळात मूर्खपणाचा आहे. भारतीय समाज समजू न शकल्यामुळेच इंग्रज ज्याप्रमाणे आफ्रिकेच्या आणि ऑस्ट्रेलियाच्या मूळ संस्कृतीचे उच्चाटन करू शकले तसे ते भारतीय संस्कृतीचे करू शकले नाहीत.
हेही वाचा…लेख : नव्या सरकारकडून अपेक्षा
भारताच्या विविधतेविषयी बोलताना नेहेमीच ‘विविधतेत एकता’ हा विचार अधोरेखित केला जातो. पंतप्रधानांपासून सामान्य व्यक्तींपर्यंत सर्वचजण हा विचार अगदी डोक्यावर घेऊन मिरवतात. आंतरराष्ट्रीय पातळीवर ही या विविधतेतील एकतेविषयी कुतूहल दिसते. पण आपण खरोखरच एक आहोत का, याचा विचार फारसा होताना दिसत नाही. एकमेकांपासून पूर्णपणे भिन्न असलेल्या व्यक्ती जेव्हा एकत्र येऊन सालोख्याने समाजात राहतात तेव्हा त्याला विविधतेत एकता म्हणता येऊ शकते. कोणालाही प्रथम दर्शनी भारतीय समाज या धाटणीचा आहे, असेच वाटेल. परंतु भारतीय समाजाची विविधतेची व्याख्या वास्तवाच्या कसोटीवर घासून पाहिली असता आपण एका वेगळ्या निष्कर्षापर्यंत पोहोचतो.
भारतीय समाजात काळाच्या विविध टप्प्यांवर विविध पंथ उदयास आले. अनेक भाषा निर्माण झाल्या. वेगवेगळ्या भूभागामध्ये वेगवेगळ्या संस्कृतींचा जन्म झाला. अनेक साम्राज्ये उदयास आली आणि लोप पावली. अनेक आक्रमणे झाली. या साऱ्याचे भारताच्या सामाजिक विविधतेत मोलाचे योगदान आहे. विविध प्रांतांत फिरताना मला कधीच हे लोक आपल्यापेक्षा वेगळे आहेत, असे जाणवत नाही. त्यांची भाषा कळत नसली, त्यांचे राहणीमान वेगळे असेल तरी हे लोक आपल्याच सारखे आहेत, ही भावना असतेच. याचा अर्थ पोशाख, भाषा, संस्कृती, राहणीमान इत्यादींत असलेली विविधता ही भारतीय समाजाचा दुय्यम घटक आहे तर समाजामध्ये असलेली भारतीयत्वाची भावना आ समाजाचा मुख्य घटक आहे.
‘विविधतेत एकता’ हे दोन शब्द ऐकताच लाकडांची मोळी डोळ्यांसमोर येते. त्या मोळीतील प्रत्येक लाकूड वेगळे असते आणि ती मोळी एका दोरीच्या सहाय्याने बांधलेली असते. दोरी तुटली की त्या मोळीची एकता नष्ट होते आणि सर्व लाकडे वेगळी होतात. भारतीय समाजदेखील असाच ‘विविधतेत एक’ आहे असा समज इंग्रजांचा होता आणि त्यांनी समाजाला एकत्र जोडून ठेवणाऱ्या त्या घटकाला नष्ट करण्याचा खूप प्रयत्न केला परंतु त्यांना त्यात यश आले नाही आणि त्याचे प्रमुख कारण हेच आहे की भारतीय समाज त्यांना समजलाच नाही. ही वर सांगितलेली व्याख्याच मुळात भारतीय समाजावर लागू पडत नाही. हा समाज ‘विविधतेमध्ये एक’ नसून समाजाच्या ‘एकतेत विविधता’ आहे. याचे उदाहरण द्यायचे झाले तर एखाद्या वटवृक्षाला पहा. त्याचे खोड हे मजबूत असते आणि त्याची मुळे जमिनीत खोलवर गेलेली असतात ज्यांच्या मजबुतीच्या आधारावर शाखा विस्तारलेल्या असतात. प्रत्येक शाखा इतरांपेक्षा वेगळी असते. परंतु हा संपूर्ण मिळून एकच वटवृक्ष असतो. भारतीय समाजही असाच मुळातच एकसंध आहे आणि हजारो वर्षांनंतरही आपले अस्तित्व टिकवून आहे. उत्तरेकडे हिमालयापासून दक्षिणेकडे हिंदी महासागरापर्यंत असलेली ही भारत भूमी प्रत्येकाला आपली वाटते. कश्मीरमध्ये वीरगती प्राप्त झालेल्या जवानांसाठी तमिळनाडूतील लोकांचे डोळे पाणावतात. उत्तरेत असलेली गंगा आणि यमुना नदी दक्षिणेतदेखील पूज्य आहे आणि दक्षिणेतले रामेश्वर धाम हे चार धामांमधील एक आहे.
हेही वाचा…सीरियातील आव्हाने संपणार कशी?
विश्लेषणातून प्रचलित व्याख्येचे खंडन केले असता अनेक प्रश्न उपस्थित होतात. भारतीय समाज हा एकसंध आहे, हे जरी खरे असले तरी तो अजिबातच विभागलेला नाही, असे म्हणणेही चुकीचे आहे. समाजाचे जाती, पंथांच्या आधारावर विभाजन झालेल्याचे नेहमीच दिसते. हे विभाजन समाजातील आंतरिक भेदांमुळे आहे, हेही खरे आहे. परंतु हेही विसरून चालणार नाही की वेगवेगळ्या कालखंडात अनेक समाज सुधारकांनी समाजातील कलह दूर करण्यासाठी अनेक आमुलाग्र बदल समाजात घडवून आणले. गौतम बुद्ध यांनी समाजातील वाढत चाललेले स्तोम कमी करण्यासाठी एक वेगळा उपासना मार्ग दिला. दहाव्या शतकापासून ते एकविसाव्या शतकापर्यंत संतांनी समाजात बदल घडवून आणले. डॉ. आंबेडकरांनी समाजातील विषमता कमी करण्यासाठी आमूलाग्र योगदान दिले. विशेष म्हणजे समाजानेदेखील आपल्यात हे बदल करून घेतले. परकीय आक्रमणांच्या वेळी अंतर्गत भेदभाव बाजूला ठेवून समाज एकत्र आला. भारताचा स्वातंत्र्यलढा हे याचे उत्तम उदाहरण. जेव्हा जेव्हा एकतेतून उत्पन्न झालेल्या या बहुगुणी समाजाच्या विविधतेचा योग्य ठिकाणी वापर झाला आहे, तेव्हा तेव्हा देशाने विविध क्षेत्रांत उत्तुंग भरारी घेतली आहे.(लेखकाने आयआयटी मुंबईमधून एमटेक ही पदवी प्राप्त केली आहे.)