९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून लोकसाहित्य व लोकसंस्कृतीच्या अभ्यासक तारा भवाळकर यांनी मराठीतून होणाऱ्या लोकव्यवहाराबद्दल रास्त चिंता व्यक्त करतानाच, भाषेचा हा लोकव्यवहार संस्कृतीतून कसा उमलतो आणि संस्कृतीशी अखेर निसर्गाचा तसेच आत्मजाणिवेचा कसा संबंध असतो, हेही स्पष्ट केले. त्या भाषणातले हे काही निवडक वेचे…

अभिजात दर्जानंतरही शंका…

मराठी भाषेला अभिजात म्हणून शासन मान्यता मिळाली याचा सर्व मराठी भाषकांप्रमाणे मलाही आनंद झाला. शासकीय दर्जा मिळाल्याने काही आर्थिक लाभ महाराष्ट्राला, मराठी लेखक, कवी, संशोधक आणि महाराष्ट्रातील साहित्यिक उपक्रम राबवणाऱ्या संस्थांना होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मराठी संस्थात्मक पातळीवर, विद्यापीठीय पातळीवर भरीव कार्य करेल आणि करावे अशी अपेक्षा आहेच. त्याची किती पूर्तता होते हे येणारा काळ ठरवील. अर्थात त्यासाठी मराठी जनांची सर्वतोपरी प्रयत्न करण्याची तयारी पाहिजे आणि ती अपेक्षा आहे. ही अपेक्षा बाळगत असताना काही धोक्याचे लाल बावटेही समोर फडकत आहेत. भाषा आणि संस्कृती या सजीव संस्था आहेत. भाषेचे चलन जोपर्यंत समाजात सर्वसामान्य माणसांच्या व्यवहारात, आचरणात ज्या प्रमाणात असेल त्या प्रमाणात भाषा विकासाची शक्यता असते.

सामाजिक क्षेत्रात आणि विशेषत: शिक्षण क्षेत्रात सजगपणे दीर्घकाळ वावरणारी एक भारतीय व्यक्ती म्हणून मराठी भाषेच्या भवितव्याबद्दल मला साधार साशंकता वाटते. जो समाज उच्च शिक्षित, आर्थिकदृष्ट्या काहीसा स्थिरस्थावर झालेला असतो, अशी ज्याची आकांक्षा सर्व स्तरावर जागतिकतेशी स्पर्धा करण्याची असते, तो अभिजनांचा एक महत्त्वाचा स्तर आहे. स्वातंत्र्योत्तर काळामध्ये, यंत्रयुगोत्तर काळामध्ये आणि विशेषत: आता तंत्र वैज्ञानिक युगाच्या काळामध्ये त्यांची संख्या चढती वाढती आहे. अशा काळात सर्वसामान्यांच्या मराठीचे काय होणार अशी शंका मनाला साधार भेडसावते आहे.

इथल्या भाषेचा स्वीकार

फार कशाला, पाद्री लोक ज्यावेळेला भारतामध्ये आले आणि भारतामधल्या सामान्य माणसांमध्ये त्यांना काय त्यांच्या विचारांचा प्रसार करायचा असेल, भले धर्माचाही प्रचार करायचा असेल, पण त्यांना सामान्यांची मराठी शिकणे भाग पडले. गोव्यामध्ये पोर्तुगीज आले आणि तेथे फादर स्टीफन्सनसारखा माणूस आला आणि मग तो ज्ञानेश्वरीच्या शैलीमध्ये मराठीचं वर्णन करू लागला. आमच्याकडचे लोक मग नंतर धर्मांतर करून ख्रिास्ती झाले, पण ख्रिास्ती झाल्यानंतरसुद्धा त्यांनी ख्रिास्तांच्यामध्ये नेलं काय? तर पुन्हा मराठी लोकशैली नेली. म्हणजे रेव्हरंड नारायण वामन टिळक हे ख्रिास्ती झाले आणि त्या मंदिरांमध्ये म्हणजे चर्चमध्ये त्यांनी मराठीतून भजनं आणि कीर्तनं सुरू केली.

मराठी मनांमध्ये जर जागा करायची असली तर त्या भाषेच्या माध्यमातून गेलं पाहिजे याचं भान या सगळ्यांना होतं. आपल्या देशातल्या विविध भाषांतील लोककथा व लोकगीतांची संकलने प्रथम युरोपीयन लोकांनी केली. पुढे दुर्गाबाई भागवतांनी त्यांची मराठीत भाषांतरे केली. त्याआधी संस्कृतमध्ये लोककथांची संकलने होती. कथासरित्सागर किंवा हितोपदेश इ. तर हा जो सगळा व्याप आहे, भाषेचा.. ती भाषेची देवाण-घेवाण जी आहे ती देवाण-घेवाण एकारलेपद्धतीने होत नाही, उभयपक्षी त्याच्यासाठी एक तयारी असावी लागते आणि मग ती तुमची प्रांत, धर्म याच्या पलीकडे असते.

एकारलेपणा टिकत नसतोच…

सांगायचं तात्पर्य सांस्कृतिक आणि भाषिक देवाण-घेवाण, सीमाप्रदेश ओलांडून, धर्म ओलांडून, जात ओलांडून होत असते, पिढ्यानपिढ्या चालत आलेली असते आणि म्हणून एकारलेपणा जो असतो कुठल्याही बाबतीत तो टिकत नाही. ‘हे शुद्ध आणि ते अशुद्ध,’ मग ते धर्माच्या बाबतीत असेल, भाषेच्या बाबतीत असेल, चालीरीती रुढींच्या बाबतीत असेल माणसाच्या आचरणात म्हणूनच हे असत नाही. लोकाचरण महत्त्वाचं (‘शास्त्रात् रुढीर्बलीयसि’) शास्त्रापेक्षा रुढी-चाली-रीती प्रभावी असतात. लोकसंस्कृती ही सबंध भारताच्या सांस्कृतिक, धार्मिक जीवनाला व्यापून राहिलेली आहे आणि आजतागायत ती आपल्याला दिसेल.

जाता जाता एक आणखी महत्त्वाची नोंद ‘लोक संस्कृती केवळ ग्रामीण, केवळ जुनी असते’ असा अलीकडे शहरवासीयांचा एक गैरसमज रूढ झाला आहे. प्रत्यक्षात लोकसंस्कृती व नागर संस्कृती यात सतत आदान-प्रदान होते. किंबहुना ‘लोक’ जीवनात ज्या बाबी लोकप्रिय असतात, त्या नागरजन – अभिजन जाणीवपूर्वक उचलतात आणि त्यात काही फेरफार करून तिचे जाणीवपूर्वक नागरीकरण – संस्कृतीकरण करतात, ही प्रक्रिया जीवनाच्या सर्व अंगात सतत चालू असते. संस्कृतीचे थोर अभ्यासक एम. एन. श्रीनिवासन त्याला ‘संस्कृतीकरण संस्कृतायझेशन’ (लोकनागर प्रक्रिया) असं म्हणतात.

स्यूडो सायन्सचा सुळसुळाट!

आज ज्या पद्धतीनं माणसांचं जीवन चाललेलं आहे, त्यात आपल्याला असं दिसतं आहे की, जुनं ते जाऊद्या सगळं, आता नवीन काय ते पाहा, असं एकीकडे म्हणायचं आणि एकीकडे जुन्याचाच पुन्हा पुन्हा वापर कसा योग्य आहे हे सांगण्याचाही प्रयत्न करायचा आणि म्हणून विशेषत: लोकांना निरनिराळ्या कर्मकांडांत गुंतवून ठेवण्याचे उद्याोग, देवाधर्माच्या नावावर, संस्कृतीच्या नावावर पुन्हा चाललेले दिसतात आणि त्याच्यामध्ये ‘तथाकथित’ शिक्षित स्त्रिया, मी ‘तथाकथित’ म्हणते मी ‘सुशिक्षित’ म्हणत नाही, तथाकथित शिक्षित स्त्रिया त्यामध्ये अडकतात. लोकसंस्कृतीतल्या आणि संत स्त्रियांनी जेवढा विचार केला, स्वत:च्या जगण्याचा तेवढा विचार या शिक्षित बाया करीत नाहीत. स्वत:ला पदवीधर, उच्चशिक्षित म्हणवतात परंतु आपण हे का करतो आहोत, याचा विचार करत नाहीत असे दिसते. विधी श्रद्धेने केला जातो आणि ज्यावेळेला ज्या विध्यात्मकतेतली श्रद्धा बाजूला होते, त्यावेळेला जे उरतं नुसतं कर्म केलं जातं, नुसते विधी केले जातात त्याला कर्मकांड असं म्हणतात. की नुसतं करत राहायचं ते अमुक करा, तमुक करा, तमुक करा आणि मग त्याला ‘सायंटिफिक रीझन’ देण्याचा प्रयत्न करायचा… स्यूडो सायन्स! आता लोककलांमध्येसुद्धा ही भानगड आलेली दिसते आहे. परवा मी लोककलांचा एक कार्यक्रम पाहिला मुंबईला. गंमत अशी की, आधुनिक पद्धतीनं लोककला शिकवणाऱ्या एका संस्थेमधल्या एका मुलीने एक गोंधळ सादर केला, त्या गोंधळाचं गाणं आणि त्याच्यामध्ये तिने म्हणजे बायकांनी कपाळाला कुंकू का लावावं, याचं असं समर्थन केलं की त्याला सायन्सची म्हणजे शास्त्रीय कारणे आहेत. ती कारणे काय? तर बायकांना फार मानसिक त्रास असतो म्हणतात. कपाळावर मधोमध दोन भुवयांच्यामध्ये दाबबिंदू असतो. त्यावर कुंकवामुळे दाब पडतो आणि त्यामुळे त्यांचं मानसिक स्वास्थ्य सुरळीत होतं. त्या मुलीचं मी ऐकलं सगळं स्टेजवर आणि नंतर प्रश्न विचारला, ठीक आहे. त्या कुंकवाच्या दाबबिंदूमुळे स्त्रियांचं मानसिक स्वास्थ्य ठीक होत असेल तर मानसिकदृष्ट्या जास्त स्वास्थ्याची गरज कोणाला आहे. लग्न झालेल्या बायकांना का विधवांना ? विधवांना जास्त गरज आहे! कारण मानसिकदृष्ट्या त्या जास्त असुरक्षित आहेत, तर विधवांना आम्ही कुंकू लावायचीच मनाई करणार. मग या ‘सायंटिफिक रीझन’ला अर्थ काय आहे? मग याला आम्ही काय म्हणणार? ‘फेक सायन्स’, ‘स्यूडो सायन्स’, व्याज विज्ञान/खोटं विज्ञान.

विज्ञानाच्या नावावर या खोट्या गोष्टी पसरवल्या जातात, आणि मग याला वैज्ञानिक सत्य कसं आहे, हे ठासून सांगायचा उद्याोग चालू झाला आहे. दुर्दैव म्हणजे ‘तथाकथित’ शिक्षित समाज याला बळी पडतो आहे, हा उलटा प्रवास सुरू झाला आहे, तो चिंताजनक आहे. अरे जर त्या बायकांचं स्वास्थ्य टिकायचं असेल तर विधवांना जास्त गरज आहे, तर त्यांना तुम्ही याची परवानगीच देत नाही, कुंकू लावायची! बरं स्त्रियांना जर मानसिक अस्वास्थ्य असेल तर पुरुषांचं काय ? सगळे पुरुष मानसिकदृष्ट्या स्वस्थ असतात का? नाही. तर आपण ज्याला ‘सायंटिफिक रीझन’ देतो म्हणतो, वैज्ञानिक सत्य म्हणतो, त्याच्या पाठीमागचा जो अप्रबुद्धपणा आहे, त्याच्याकडे आमचं लक्षच नाहीये आणि आंधळेपणानं त्याचं आचरण चाललेलं आहे. तथाकथित उच्चशिक्षित स्त्रिया हे अत्यंत आंधळेपणानं करतायत असं मला सगळीकडे दिसतं. एखाददुसरी असेल वेगळी, परंतु बहुसंख्य ज्यांना आर्थिक स्वास्थ्य आहे, सामाजिक दर्जा आहे आणि त्यांचे मेंदू काम करीत नाहीयेत. यांचे मन आणि मेंदू हे मोकळे करायला पाहिजेत, चिमटीएवढे मेंदू असलेली ही माणसं आहेत की ते आंधळेपणाने अशाप्रकारचे आचरण करतायत, कर्मकांडामध्ये गुंतून राहतायत आणि त्याचं समर्थन करतायत, यांना सुशिक्षित का म्हणायचं?

संस्कृतीची जैविक प्रक्रिया

संस्कृती ही कुणीतरी एका धर्मगुरूने किंवा एखाद्या विद्वानाने सांगितली आणि मग ती प्रसारित झाली अशी होत नाही. ही एक नैसर्गिक, जैविक प्रक्रिया आहे भाषेसारखीच. माणूस जेव्हा केव्हा जन्माला आला असेल विश्वामध्ये तेव्हापासून तो आपल्या भोवतालच्या वातावरणातून बऱ्याच गोष्टी शिकत आला आहे. चाली, रीती, रुढी या तिथल्या निसर्गाने त्याला शिकवल्या आणि त्याच्या गरजांनी, हवामानाने शिकवल्या, हे सगळं निसर्ग माणसाकडून करून घेत आलेला आहे आणि माणूस त्या निसर्गाला सादप्रतिसाद देत आला आहे.

मानववंश जन्माला आल्यापासून ते आजपर्यंत जी स्थित्यंतरे झाली जी निसर्गानी आणि भोवतालच्या वातावरणाने झाली, मग नंतरच्या काळामध्ये निरनिराळया संस्कृतींच्या लोकांच्या सरमिसळीमुळे झाली, देवाण-घेवाणीमुळे झाली … हे मानववंशशास्त्र. काळाच्या ओघामध्ये काही गोष्टी अनावश्यक वाटायला लागतात, काही गोष्टींत सुधारणा करावीशी वाटते. काही गोष्टी एकदम सोडून द्याव्या वाटतात, काही थोडंसं परिवर्तन करून मग त्या वापराव्याशा वाटतात या सगळ्याचा जो इतिहास आहे हा माणसाचा इतिहास आहे. ज्याला आपण समाजशास्त्र म्हणतो. हा समाज माणसाचा कसा घडत आला तर निसर्ग, माणूस आणि ‘मी आणि माझ्या भोवतालचं जग’, यांच्यामधला जो नातेसंबंध आहेत त्याच्यातून हे मानववंश, समाजशास्त्र त्याच्या पाठीमागचं माणसाचं मन आणि मग त्याच्या श्रद्धा असतील, त्याच्या देवदेवता असतील, त्याच्या भावभावना असतील, त्याच्या संवेदना असतील या सर्व देवाण- घेवाणीतून माणूस घडत आलेला आहे आणि त्याला आपण संस्कृती म्हणतो. आमच्या संस्कृतीत असं आहे अन् तुमच्या संस्कृतीत तसं आहे. अहो साधी गोष्ट आहे, घाटावरचा गणपती आला की त्याला गूळ खोबऱ्याचा नैवेद्या किंवा गूळ खोबऱ्याचा मोदक चालतो आणि कोकणामधल्या गणपतीला ओल्या नारळाचा मोदक चालतो हे कुणी शिकवलं, हे काय गणपतीनं सांगितलं, हे तिथल्या निसर्गाने सांगितलं. आता व्यापाराच्या सोयी झाल्यामुळे कुठेही काहीही मिळतं, परंतु क्रमाक्रमाने माणसाचा जो विकास होत गेला त्यात खाणं-पिणं, रहाणं, कपडेलत्ते सगळं तिथला निसर्ग ठरवतो.

धर्मांतरानंतरही संस्कृती कायम!

निसर्गाने आम्हाला मूलत: जगायला शिकवलं आहे आणि तो प्रवास आजपर्यंत चाललेला आहे म्हणून याला लोकसंस्कृती म्हणायचं आणि हा जो धर्म आहे त्याला मी ‘लोकधर्म’ असे म्हणते. सर्वसामान्य माणसांच्या जीवनामध्ये आजतागायत आजसुद्धा जो प्रचलित आहे तो ‘लोकधर्म’ जास्त आहे. त्याला तुम्ही कुठलातरी शिक्का मारा. हिंदू, मुस्लीम, ख्रिाचन वगैरे तुम्ही काहीही म्हणा, परंतु लोकांच्या जगण्यातून जे आपोआप निर्माण झालेलं आहे, तो ‘लोकधर्म’ आहे आणि म्हणून मग तुम्हाला असं दिसेल की, रूढार्थाने इथला धर्म जरी बदलला आणि भौगोलिक परिस्थिती तीच असली तरी चालीरीती, रुढीमध्ये फारसा फरक पडत नाही आणि म्हणून धर्मांतर करूनसुद्धा संस्कृत्यंतर होतेच असे नाही.

सिसिलिया कार्वालोने अगदी सुरुवातीच्या काळामध्ये ते पुस्तक लिहिलेलं आहे. ‘हिंदोळ्यावर’ नावाच्या त्या पुस्तकामध्ये ज्याला आपण धर्मांतर झालेली ख्रिास्ती म्हणू अशा मूळच्या वसईच्या वाडवळ नावाच्या एका मूळ आदिवासी जमातीतल्या विवाह संस्थेबद्दल लिहिलेलं आहे, त्यात विवाहातली गाणी, त्या नवरानवरीची वर्णनं ही सगळी आहेत… इस्लाम असू देत, ते ख्रिाश्चन असू देत, आपल्याकडच्या आदिवासी जमाती असू देत, उच्चवर्णीय असू देत काही विधी हे सर्वत्र समान असतात. विशेषत: लग्नातली हळद हा जो विधी आहे, तो आदिवासी जमातींपासून, धर्मांतरित जमातींपासून ते महाराष्ट्रातल्या उच्च वर्णीयांच्यापर्यंत भारतीयांत सर्वत्र हळदीचा विधी आहे. त्याचे तपशील वेगळेवेगळे असतील, परंतु हळद हा विधी सगळीकडे आहे. इस्लाममध्येही आहे. अनुपमा निरंजन उजगरे यांनी ‘ख्रिास्ती स्त्रियांच्या जात्यावरच्या ओव्या’ या पुस्तकात धर्मांतरित ख्रिास्ती स्त्रियांच्या जात्यावरच्या ज्या ओव्यांचे संकलन केले आहे ते सर्व बहुजन मराठी स्त्रियांच्या ओव्यांचेच जणू संकलन आहे. फक्त ‘विठ्ठल’ देवाऐवजी येशूचे नाव या ओव्यात आहे. धर्मांतराने संस्कृती पूर्णपणे बदलत नाही याचे हे उदाहरण आहे.

मी डांग प्रदेशात फिरले, तिथल्या आदिवासी आणि शेतकरी बायका मी पाहिल्या, तेव्हा संस्कृती संगम म्हणजे काय, ते समजलं. हे तुम्हाला कुठल्या ग्रंथात दिसणार नाही, प्रत्यक्ष पाहिले की दिसते, म्हणजे कसं, की त्या ग्रामीण बायका साडी नेसलेल्या होत्या, पण त्यांनी साडी कशी नेसलेली कमरेपर्यंत आपली एखादी कष्टकरी मराठी बाई जशी साडी नेसेल तशी, म्हणजे गुडघ्यापर्यंत कासोटा-बिसोटा घातलेली नऊवारी नेसलेली आणि वरचा पदर कमरेच्या वरचा तो गुजराती पद्धतीने घेतलेला असा होता. तेव्हा गुजराती आणि मराठी यांचं जे संमिश्रण आहे ते त्या सीमाभागातल्या स्त्री पोशाखामध्ये आपल्याला दिसतं, भाषेमध्ये तर ते खूप असतं.

Story img Loader