राजेश्वर ठाकरे, देवेश गोंडाणे
सायन्स काँग्रेसमध्ये अप्रस्तुत असलेल्या ‘हळदीकुंकू’ आणि ‘रांगोळी’ यांचीच अधिक चर्चा होणे, हे स्वाभाविक होते. पण या व्यासपीठांवरून त्या पलीकडेही बरेच काही झाले. त्याचा हा रिपोर्ताज..
नागपुरात नुकतीच म्हणजे ३ ते ७ जानेवारीदरम्यान इंडियन सायन्स काँग्रेस पार पडली. तब्बल ४८ वर्षांनंतर विज्ञानाचा हा देशव्यापी महामेळावा अनुभवायची संधी नागपूरकरांना मिळाली. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या विस्तीर्ण अशा परिसरात पार पडलेली ही विज्ञानाची महासभा अनेक अर्थाने वैशिष्टय़पूर्ण ठरली. यात काही चांगल्या गोष्टी घडल्या, तर काही अधिवेशनाच्या उद्देशाला गालबोट लावणाऱ्या ठरल्या.
चार दिवस चाललेल्या अधिवेशनाने काय दिले याचा मागोवा घेतल्यास अनेक चांगल्या गोष्टींचा उल्लेख करावा लागेल. महासत्तेकडे वाटचाल करणाऱ्या भारताच्या विज्ञान तंत्रज्ञानातील प्रगतीचे दर्शन परिषदेतून घडले. नवीन संशोधनाची माहिती मिळाली. संशोधनात्मक विषयांवर झालेल्या विविध सादरीकरणांमधून संशोधकांची चिकित्सक वृत्ती म्हणजे काय याचा प्रत्यय आला. संपूर्ण जगाला हादरवून सोडणाऱ्या करोनासारख्या विषाणूला भविष्यात कसे तोंड द्यायचे यासाठी सुरू असलेल्या संशोधनाच्या प्रगतीचा आलेखही कळला. सर्वात वैशिष्टय़पूर्ण ठरली ती या अधिवेशनाची संकल्पना. ‘महिलांच्या सक्षमीकरण आणि शाश्वत विकासासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान’ ही संकल्पना डोळय़ांपुढे ठेवून आयोजित केलेले चर्चासत्र, कार्यक्रम महिलांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करणारे ठरले. आदिवासी, महिला, शेतकरी आणि बाल वैज्ञानिकांचे संमेलन, चर्चासत्रासाठी निवडण्यात आलेले विषय सामान्यांपर्यंत विज्ञान व तंत्रज्ञान कसे पोहोचवेल यावर आधारित तर होतेच, पण त्यातून ग्रामीण भागातील महिलांना पुढच्या काळात विज्ञानाचा कसा फायदा होईल हे सूचित करणारे होते. दुर्दैवाने या चर्चासत्रांना उपस्थिती पुरेशी नव्हती, कदाचित हे विषय लोकांपर्यंत पोहचवण्यात आयोजक कमी पडले असतील. पण चर्चासत्रातील उद्बोधन ज्या मोजक्या लोकांनी ऐकले त्यांच्यासाठी व त्यांच्यापासून इतरापर्यंत ते पोहोचण्यासाठी फायदेशीर ठरेल हे मात्र नक्की.
महिलांच्या विज्ञान संमेलनात बीजमाता पद्मश्री राहीबाई पोपेरे यांचे उद्बोधन ऐकण्याची संधी मिळाली. कुठलेही अधिकृत शिक्षण न घेता व विज्ञानाची प्राथमिक माहिती नसतानाही त्यांनी रासायनिक खतांमुळे शेतजमिनींवर होणारा परिणाम आणि जमिनीचा कमी होत चाललेला कस, जमिनीचे हे नुकसान कसे थांबवता येईल यावर त्यांनी अत्यंत सोप्या भाषेत विवेचन केले. एखाद्या शास्त्रज्ञाप्रमाणे त्यांनी जमिनीचे महत्त्व उपस्थितांना पटवून सांगितले. अंतराळाविषयी माहिती सर्वसामान्यांना मिळते ती पुस्तकातून किंवा इंटरनेटच्या माध्यमातून. पण इंडियन सायन्स काँग्रेसच्या प्रदर्शनातील भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (इस्रो) ‘स्पेस ऑन व्हील’ने लहान मुलांपासून आबालवृद्धांपर्यंत सर्वाना जणू अंतराळाची सफर घडवून आणली. शाळकरी मुलांसाठी तर ही खऱ्या अर्थाने पर्वणी ठरली. झोपडपट्टीतील लोकांनाही अंतराळाची यानिमित्ताने ओळख झाली. याशिवाय इस्रोचे कामकाज, विविध प्रयोगांचे प्रात्यक्षिक पाहता आले.
सायन्स काँग्रेसचे दुसरे मुख्य आकर्षण म्हणजे ‘प्राइड ऑफ इंडिया’ हे महाविज्ञान प्रदर्शन. यात देशाने केलेल्या विज्ञान, तंत्रज्ञानाच्या प्रगतीची झलक दिसून आली. सरकारी विभागामार्फत करण्यात आलेले संशोधन, त्याचा वापर करून सर्वसामान्यांचे जीवनमान बदलवून टाकण्यासाठी करण्यात येत असलेल्या प्रयत्नांची माहिती मिळाली. देशाच्या संरक्षण क्षेत्राविषयी माहिती देणाऱ्या संरक्षण संशोधन व विकास संस्थेच्या (डीआरडीओ) प्रदर्शनाचे दालन अधिवेशन सुरू झााल्यापासून संपेपर्यंत सर्वाधिक गर्दी खेचून घेणारे ठरले. भविष्यातील ‘जैविक युद्धा’चा धोका लक्षात घेऊन भारताने तयार केलेले रोबोट सैनिक, बॉम्ब निकामी करणारे रोबोट, सुरक्षा यंत्रणेला शत्रूची गुप्त माहिती प्राप्त व्हावी यासाठी ‘डीआरडीओ’ने विकसित केलेला उंदीर आदी संशोधन वैशिष्टय़पूर्ण होते. त्याचप्रमाणे भारतीय सीमांचे रक्षण करताना जवानांना येणाऱ्या अडचणी डोळय़ांसमोर ठेवून छोटय़ाशा ‘पाकिटा’त महिन्याभराचे अन्न साठवता येईल या संशोधनाने अनेकांचे लक्ष वेधले. अशाच प्रकारे भारतीय कृषी अनुसंधान परिषदने (आयसीएआर) कृषी क्षेत्रात केलेली वैज्ञानिक क्रांती, आयआयटी मुंबईच्या विद्यार्थ्यांनी विकसित केलेली ‘रक्त तपासणी किट्स’ देशाची वैज्ञानिक क्षेत्रातील प्रगती दर्शवणारी ठरली. या ‘किट्स’मुळे रक्त तपासणीसाठी येणाऱ्या खर्चात ९० टक्के बचत होणार आहे. बाल वैज्ञानिकांच्या दालनातील प्रदर्शनात शाळेतील मूल्यांच्या वैज्ञानिक दृष्टिकोनाची प्रचीती आली.
इंडियन सायन्स काँग्रेसमध्ये केवळ विज्ञान प्रदर्शनच महत्त्वाचे नव्हते तर तेथे रोज होणारे जागतिक दर्जाच्या संशोधकांचे परिसंवाद अभ्यासपूर्ण होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रमुख वैज्ञानिक सल्लागार प्रा. अजय कुमार सूद यांनी देशातील तंत्रज्ञान क्रांतीची माहिती देताना या क्षेत्रात भारत जगाच्या पातळीवर कुठेही मागे नाही हे स्पष्ट केले. नोबल पारितोषिक विजेत्या अॅडा योनाथ यांची परिषदेतील उपस्थिती खऱ्या अर्थाने महत्त्वपूर्ण ठरली. ‘भारत हा विज्ञानात महासत्ता होणार’ हे त्यांनी भारताविषयी केलेले भाष्य देशाच्या या क्षेत्रातील प्रगतीकडे लक्ष वेधणारे होते. इंडियन सायन्स काँग्रेसच्या महिला सक्षमीकरणाच्या संकल्पनेचेही त्यांनी तोंडभरून कौतुक केले.
बाल विज्ञान काँग्रेसमध्ये २८ राज्यांतील विद्यार्थी सहभागी झाले होते. गुजरातमधून आलेल्या मुलांनी सार्वजनिक शौचालयाच्या स्वच्छतेसंदर्भात केलेले संशोधन, जम्मूच्या मुलांनी मशरूमपासून तयार केलेली बिस्किटे आगळेवेगळे ठरले. सायन्स काँग्रेसमध्ये दोन महत्त्वपूर्ण परिषद झाल्या. एक म्हणजे आदिवासी विज्ञान काँग्रेस आणि दुसरी शेतकरी विज्ञान काँग्रेस. या आयोजनामागे सामाजिक पार्श्वभूमी होती. पूर्व विदर्भातील गडचिरोली जिल्हा नक्षलप्रभावित आहे, तर संपूर्ण पश्चिम विदर्भ हा शेतकरी आत्महत्यांसाठी जगात प्रसिद्ध आहे. विज्ञानाच्या साहाय्याने आदिवासी आणि शेतकऱ्यांचे जीवनमानात बदल घडवता येऊ शकतो का, यावर चर्चा झाली. या दोन्ही परिषदा आयोजित करण्याचा हेतू चांगला असला तरी त्याची मांडणी योग्य नव्हती. वैज्ञानिकांऐवजी स्थानिक आदिवासी नेत्यांची भाषणे ठेवून आयोजकांनी काय साधले असा प्रश्न यातून निर्माण झाला. असाच प्रकार शेतकरी संमेलनाच्या बाबतीतही दिसून आला. त्याचे स्वरूप अनुभव कथनाऐवजी वैज्ञानिक असायला हवे होते. हे दोन्ही कार्यक्रम अधिक परिणामकारक करता आले असते असे म्हणावेसे वाटते.
इंडियन सायन्स काँग्रेसचा आढावा घेताना त्यातील उणिवांवरही बोट ठेवणे तेवढेच गरजेचे ठरते. इतक्या मोठय़ा प्रमाणात होणाऱ्या परिषदेचे आयोजन करताना काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक ठरते. विशेषत: अशा गोष्टी की ज्यामुळे आयोजनाच्या उद्देशाला बाधा पोहोचते. दुर्दैवाने अशा काही घटना या परिषदेत घडल्या ज्या टाळता येऊ शकल्या असत्या. उदाहरण द्यायचे ठरले तर ते महिला काँग्रेसमधील हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमाचे देता येईल. विज्ञान आणि हळदी-कुंकू याचा दूरान्वयेही संबंध नसताना केवळ परंपरेच्या नावाखाली हा कार्यक्रम घेण्यात आला. तसेच याच कार्यक्रमात ‘घरासमोरील रांगोळीमुळे दुष्ट शक्ती घरात प्रवेश करत नाही’ असे व्यासपीठावरील प्रमुख वक्त्यांनी सांगणे म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोनाला छेद देणारे ठरले. परिषदेच्या निमित्ताने आयोजित केलेल्या परिसंवादाचे विषय उत्कृष्टच होते. त्यावर भाष्य करणारे संशोधकही तेवढय़ाच तोलामोलाचे होते. परंतु काही परिसंवादात संशोधकांना त्यांचे संशोधन सांगण्यासाठी पुरेसा वेळच मिळाला नाही. अनेकांनी याबाबत तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. ‘इंडियन सायन्स काँग्रेस असोसिएशन’वर असलेल्या बंगाली वर्चस्वाचे प्रतििबब परिसंवादासाठी निमंत्रित करण्यात आलेल्या तज्ज्ञ मार्गदर्शकांच्या संख्येच्या रूपात दिसून आले. त्यामुळे ही ‘बंगाल काँग्रेस’ नव्हे तर भारतीय विज्ञान काँग्रेस आहे असे काही शास्त्रज्ञांना सांगावे लागले. ढिसाळ व नियोजनशून्य आयोजनाचा मुद्दाही परिषदेच्या पहिल्या दिवसांपासून गाजत राहिला. त्याचा फटका बाहेरून आलेल्या प्रतिनिधींना बसला. रेल्वेस्थानक, विमानतळ अशा प्रमुख ठिकाणी माहिती कक्ष असते (यापूर्वीच्या परिषदेसाठी अशा प्रकारची व्यवस्था करण्यात आली होती) तर प्रतिनिधींना परिषदेचे स्थळ शोधण्यासाठी भटकावे लागले नसते. राष्ट्रीय स्तरावरील विज्ञान परिषद नागपुरात झाली. पण पहिले काही दिवस नागपूरकरांची त्याकडे पाठ होती. या परिषदेचे महत्त्व लोकांपर्यंत पोहचवण्यात आयोजक कमी पडल्याचे चित्र होते. असे असले तरी एकूणच १०८ वी इंडियन सायन्स काँग्रेस विज्ञान क्षेत्रात नवी दृष्टी देणारी ठरली.
rajeshwar.thakare@expressindia.com
devesh.gondane@expressindia.com