प्रसाद माधव कुलकर्णी
नोबेल विजेते भारतीय शास्त्रज्ञ डॉ. सी. व्ही. रामन यांच्या ‘रामन इफेक्ट’ या शोधाच्या सन्मानार्थ २८ फेब्रुवारी हा दिवस भारतात दरवर्षी राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो. विज्ञानाचा शब्दशः स्फोट म्हणता येईल अशा युगात आपण आज वावरत आहोत. अगदी पाच-दहा वर्षांपूर्वी आश्चर्यजनक वाटणाऱ्या बाबी आज आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग झाल्या आहेत, मात्र अशावेळीच एकीकडे विज्ञानाने दिलेल्या सर्व सुविधांचा वापर करायचा आणि दुसरीकडे समाजाला अज्ञानाच्या दरीत लोटण्याचे पद्धतशीर प्रयत्न करायचे, ही वृत्ती वाढताना दिसते. मग कोणी गणेशजन्मावेळी प्लास्टिक सर्जरी अस्तित्वात होती म्हणतात, कोणी गटारातून गॅस पाइपने काढून पकोडे तळल्याचे किंवा चहा केल्याचे सांगतात, कोणी मुलगा व मुलगी कधी व कशी होईल हे सांगतात तर कोणाच्या बागेतील आंबा पुत्रप्राप्तीस कारण ठरत असल्याचा दावा केला जातो. अशी शेकडो उदाहरणे रोज जाहीरपणे पाहायला, ऐकायला मिळणे हे राष्ट्र म्हणून, उद्याची महाशक्ती म्हणून लाजिरवाणे आहे.
अनेक बुवा, कीर्तनकार व अन्य वाचाळ मंडळी काहीही विधाने करतात. ती अवैज्ञानिक आहेत हे स्पष्ट होताच प्राचीन ग्रंथांचे दाखले दिले जातात. ‘त्या’ ग्रंथात म्हटले आहे मग मी म्हणालो ते चूक कसे, अशी सारवासारव केली जाते. ते ग्रंथ प्राचीन काळातील आहेत आणि तुम्ही २०२३ मध्ये हे बोलता आहात. त्या ग्रंथात मूठभर धान्य घेऊन कीर्तन करावे, असे सांगितले असेल तर ते आज प्रमाण मानणार का बुवा तुम्ही? बिदागी लाखोंच्या पटीत आजच्या चलनात घेणार आणि अवैज्ञानिक बडबड करत राहणार हे योग्य नाही. वास्तविक प्राचीन ग्रंथांतील सारेच दावे विज्ञानाच्या कसोटीवर उतरू शकत नाहीत, हे वास्तव आहे. मात्र तरीही पुन्हा एकदा तेच ते दावे करण्यातून नेमके कोणाचे हित साधले जाणार आहे, हे पाहावे लागेल. ग्रंथप्रामाण्य हे किती मर्यादेपर्यंत विश्वासार्ह मानायचे हे ठरवावे लागेल. भारतीय विज्ञान परंपरेत ग्रंथप्रामाण्यापेक्षा अनुभवप्राधान्य महत्त्वाचे मानलेले आहे. किंबहुना जगाचा विकास वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या आधारेच झाला आहे, यात शंका नाही.
आज वैज्ञानिक दृष्टिकोनाअभावी कोट्यवधी व्यक्ती संकटमुक्त होण्याच्या उपायांच्या शोधात भटकताना दिसतात. हा शोध घेता घेता ते अधिकाधिक संकटग्रस्त होत जातात. विज्ञान ही चर्चेची, इतरांना सांगण्याची, शिकवण्याची गोष्ट आहे, ती आचरणात आणण्यासाठी नाही, असे मानणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्याला प्रतिष्ठाही मिळत आहे. हा एक अव्वल दर्जाचा राष्ट्रीय प्रश्न आहे. खरेतर मंत्रतंत्र, गंडेदोरे, उपास-तापास, यज्ञ यामध्ये आहुती पडते ती विज्ञानाची. आज समाजात अवैज्ञानिक घटना पदोपदी बघायला मिळत आहेत. समाज आर्थिकदृष्ट्या श्रीमंत होताना वैज्ञानिकदृष्ट्या कंगाल होताना दिसत आहे. बुद्धी ही अशी एकमेव गोष्ट आहे, जी कितीही वेळा गहाण ठेवता येते, यावर ठाम असल्यासारखे अनेक जण वागतात. म्हणूनच समाज भौतिकदृष्ट्या प्रगत होत गेला पण ती समांतरता मानसिकदृष्ट्या ठेवू शकला नाही. समाजात विज्ञान व अध्यात्म यांची सांगड घालून वैज्ञानिक दृष्टिकोनाची धार बोथट करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. या मंडळींना ना धड आध्यात्म समजले ना विज्ञान.
खगोलशास्त्राची परंपरा!
आपल्या समाजावर फलज्योतिषाचा प्रचंड पगडा आहे. ‘आकाशाशी जडले नाते’ या पुस्तकात ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांनी ‘खगोलशास्त्र आणि फलज्योतिष’ हे प्रकरण लिहिले आहे. त्यांनी म्हटले आहे ‘एकविसाव्या शतकात पुढे उभे असताना आपल्या अंधश्रद्धा आपल्याला पहिल्या शतकाच्या पुढे जाऊ देत नाहीत. विज्ञानाच्या गरुड झेपेत आपल्या सूर्यमालेचे घटक ग्रह आणि त्यांचे उपग्रह यांचीच काय तर लांबच्या लांब ताऱ्यांची आणि त्याहून दूरच्या आकाशगंगेची माहिती आता मिळत आहे. धूमकेतूंच्या कक्षा बिनचूक ठरवता येतात. विसाव्या शतकात मानवाने चंद्रावर पाऊल टाकले. एकविसाव्या शतकात तो मंगळ पादाक्रांत करेल. पाच-सहा शतकांपूर्वीच्या मानवाने ग्रहांचे नीट आकलन न झाल्याने फलज्योतिषावर विश्वास ठेवणे आपण समजू शकतो. पण आजच्या काळात पुष्कळ माहिती उपलब्ध असूनही अनेक वैज्ञानिक चाचण्यांत नापास झालेल्या कल्पनांवर विश्वास ठेवून वेळेचा, शक्तीचा आणि धनाचा अपव्यय करणे कितपत योग्य आहे?’
वास्तविक भारतात खगोलशास्त्राच्या अभ्यासाची, विश्लेषणाची एक प्राचीन परंपरा आहे. अगदी ऋग्वेदातसुद्धा विश्वाच्या उत्पत्तीबाबत, रचनेबाबत सृष्टीच्या निर्मात्याबाबत आश्चर्य व अचंबा व्यक्त केला आहे. आजही अनेक प्रश्नांच्या उत्तरांचा शोध शास्त्रज्ञ घेत आहेत. जिज्ञासू वृत्ती व कुतूहल वाढत आहे. त्यातूनच अधिक जाणून घेण्याची इच्छा निर्माण होते. आपली जिज्ञासा आपण अधिक जागृत केली पाहिजे. फलज्योतिषासारख्या अपूर्ण, अवैज्ञानिक गोष्टींबाबत स्वतः सावध राहून इतरांनाही सावध केले पाहिजे. चारशे वर्षांपूर्वी आकाशाचा शोध घेण्यासाठी गॅलिलिओने तिकडे दुर्बीण वळवली होती. आपणही ही आपल्या मनाची सदसद्विवेकाची, विवेकवादाची दुर्बीण अधिक दूर पल्ल्याची कशी होईल, हे पाहिले पाहिजे. ती आपली आणि काळाचीही गरज आहे.
विज्ञान आणि विवेकवाद
‘सायन्स’ (विज्ञान) हा इंग्रजी शब्द ‘सायंशिया’ या लॅटिन शब्दावरून आला आहे. विज्ञानाच्या अनेकांनी अनेक व्याख्या केल्या आहेत. याबाबत विश्वकोशात म्हटले आहे की ‘विज्ञान ही ज्ञानाची एक अतिव्यापक शाखा असून तिच्यात वास्तव गोष्टींचे किंवा वस्तुस्थितीचे निरीक्षण करून त्यांचे वर्गीकरण करतात आणि बहुधा त्यांच्यामधील परस्पर संबंधांविषयीचे परिणामात्मक नियम सूत्रबद्ध करून त्यांची खातरजमा करून घेतात. नैसर्गिक आविष्कार समजून घेण्यासाठी विज्ञानात गणितीय युक्तिवाद (तर्कशास्त्र) किंवा कार्यकारणभाव आणि माहितीचे विश्लेषण यांचा उपयोग करतात. म्हणजे खात्री करून घेतलेल्या माहितीची विज्ञानात नियमबद्ध रीतीने सुव्यवस्थित मांडणी केली जाते. अशा माहितीला व्यापक स्वरूप देण्याच्या पद्धती आणि तिचा खरेपणा पडताळून पाहण्यासाठीचे निकष यांचाही अंतर्भाव विज्ञानात होतो.’
विज्ञानाची ही दृष्टी आपण स्वीकारली पाहिजे. त्यासाठी विवेकवाद स्वीकारला पाहिजे. विवेकवाद ही विज्ञान शाखेतील एक विचारधारा आहे. सर्वोच्च मानवी ज्ञान केवळ विवेक किंवा बुद्धीपासूनच मिळू शकते, असे विवेकवाद मानतो. ज्ञान निश्चित आणि संशयातीत असले पाहिजे ही विवेकवादाची भूमिका आहे. एखाद्या बाबीचे आपल्याला ज्ञान असणे आणि त्या बाबतची आपली समजूत असणे यात मोठा फरक असतो. विवेकाधिष्ठित ज्ञान हे निश्चितपणे सत्य असल्यामुळे स्थिर व शाश्वत असते.
विवेकवादालाही प्राचीन इतिहास आहे. रूढार्थाने प्लेटो हा पहिला विवेकवादी होता. मात्र विवेकवादाची शास्त्रशुद्ध मांडणी सर्वप्रथम आधुनिक पाश्चात्त्य तत्त्वज्ञानाचा प्रणेता रेने देकार्त याने केली. प्रमाणज्ञान अनुभवातून प्राप्त होत नाही, हे त्याने अनुभववादी विचार मांडत विवेकवाद नाकारणाऱ्यांना ठणकावून सांगितले. मानवी ज्ञानाचा उगम इंद्रियानुभवात होतो. इंद्रियानुभवाच्या क्षेत्रापलीकडे मानवी ज्ञानाचा विस्तार होऊ शकत नाही, असे सांगणाऱ्या अनुभववाद्यांना त्याने विचाराने खोडून काढले. रेने देकार्तच्या मते, इंद्रियजन्य प्रत्यक्ष ज्ञान आणि त्यावर लाभणारे ज्ञान संशयग्रस्त असते म्हणून ते खऱ्याखुऱ्या ज्ञानाच्या पदवीला पोहोचू शकत नाही. ज्याला यथार्थपणे ज्ञान म्हणता येईल असे ज्ञान आपल्याला गणितात उपलब्ध नसते गणिती ज्ञानाची सुरुवात स्वतः प्रमाण असलेल्या विधानांपासून झालेली असते. आपल्याला जर जीवनाचे गणित नीट सोडवायचे असेल, तर वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारण्याखेरीज पर्याय नाही, हेच राष्ट्रीय विज्ञान दिनाचे सांगणे आहे.
आपले वैचारिक पर्यावरण वैज्ञानिक दृष्टिकोन स्वच्छ ठेवू शकते. वैचारिक पर्यावरणाचा विचार करताना आपण आपल्या सभोवतीची वास्तव परिस्थिती आणि आभासात्मक परिस्थिती यांचे यथायोग्य भान ठेवले पाहिजे. तसेच वैचारिक पर्यावरणाबरोबरच आपले सामाजिक, राजकीय, आर्थिक, सांस्कृतिक पर्यावरणही चांगले राहिले पाहिजे. विचारांच्या पर्यावरणाला आचाराच्या पर्यावरणाची शास्त्रशुद्ध जोड दिली की सर्वार्थाने प्रदूषणमुक्त समाजाचे स्वप्न साकार होईल. ती आपली आणि येणाऱ्या पिढ्यांची गरज आहे.
लेखक ‘समाजवादी प्रबोधिनी’, इचलकरंजीचे कार्यकर्ते तसेच ‘प्रबोधन प्रकाशन ज्योती ‘मासिकाचे संपादक आहेत.
prasad.kulkarni65@gmail.com