राजा देसाई
विद्यार्थ्यांच्या धार्मिक भावना शिक्षकांमुळेही दुखावू लागल्यानंतरच्या शिक्षकदिनी, सत्य-शोधाच्या भारतीय परंपरेची ही उजळणी..

काही दिवसांतल्याच दोन बातम्या. एक : अठरा वर्ष निष्कलंक सेवा (प्राचार्याच्याच मतानुसार) देणाऱ्या एका अधिव्याख्यात्यांना पुण्यातील एका प्रतिष्ठित कॉलेजनं निलंबित केलं. का? विद्यार्थ्यांच्या ‘अभाविप’ या संघटनेनं एका व्हिडीओआधारे त्यांच्याविरुद्ध निदर्शनं केली आणि पोलिसात तक्रारही; तक्रार काय? बातमीनुसार ‘विविध धर्मातील ईश्वर हा अखेर एकच आहे’ असं ते शिकवताना म्हणाले! दुसरी बातमी : एका शैक्षणिक कार्यक्रमातच बारावीच्या विद्यार्थ्यांसमोर बोलताना केरळ विधानसभा सभापती म्हणाले : विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक वृत्ती अंगी बाणवावी; रामायणातील पुष्पक विमान, गणपतीचं हत्ती-मुख (प्लॅस्टिक सर्जरी) वगैरे गोष्टींकडे वैज्ञानिक सत्यं म्हणून न पाहाता मिथकं म्हणून पाहावं. भाजप, विहिंप, नायर सेवा सो., आदी संघटनांनी सभापतींकडून माफीची मागणी करून आंदोलनाचा इशारा दिला!

MIT suspends Indian-origin PhD student
MIT Suspends PhD Student : पॅलेस्टिनवर लेख लिहिणाऱ्या भारतीय विद्यार्थ्याची अमेरिकेतील MIT मधून हकालपट्टी; हिंसाचाराला प्रोत्साहन दिल्याचा आरोप
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
pralhad iyengar mit suspended
एमआयटीने निबंधावरून भारतीय विद्यार्थ्याला केले निलंबित; नेमकं प्रकरण काय? कोण आहे प्रल्हाद अय्यंगार?
Supreme Court News
Supreme Court : कामाच्या ठिकाणी भेदभाव झाल्याचा ट्रान्सवुमन शिक्षिकेचा आरोप, सर्वोच्च न्यायालयाने याचिकेवरील निकाल ठेवला राखून
Loksatta anvyarth issue of the withdrawal of government honors granted to two non-resident Indians in Britain
अन्वयार्थ: बहुमान आणि मानापमान
Both exams held statewide school registration and student applications were open from October 17 to December 7
विद्यार्थ्यांनो अंतिम मुदतवाढ, अन्यथा,,
Students paid tribute to Dr Babasaheb Ambedkar by studying for 68 hours Mumbai print news
६८ तास अभ्यास करून विद्यार्थ्यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना आदरांजली
Commissioner Dr Indurani Jakhar ordered strict action against regular absence of teachers
कडोंमपा शाळेत नियमित वेळेत न येणाऱ्या शिक्षकांवर कठोर कारवाई करा,आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांचे आदेश

विषय कोणताही असो; समाजाला सत्ताकारणी खेळाच्या हातातलं बाजूचं वा विरोधाचं बाहुलं बनवणं हा लोकशाहीचा अर्थ बनत आहे. विद्यार्जनही त्यातून सुटत नाही ही बाब कमालीची चिंताजनक आहे. हे सारं कालपर्यंत कोणाला वाटलं आणि आज कोणाला वाटतंय हे गौण, परिणाम अखेर भोगतो तो समाजच. मात्र या खेळात समाज जेव्हा समतोल विचारबुद्धी गमावून बसतो तेव्हा कोणत्याही वैचारिक मांडणीला खरं तर काही अर्थ उरत नाही; ती फक्त नव्या आरोप-प्रत्यारोपांना केवळ आमंत्रणच ठरते. तरीही वरील दोन्ही घटनांतील व एकंदरीतच विद्यार्थिवर्ग तसंच आपणा सामान्य धार्मिकांपैकीही ज्यांना ‘आता आपल्याला धर्मासंबंधी शिकण्यासारखं काहीही उरलेलं नाही’ असं वाटत नसेल, त्यांच्याशी संवादाचा हा प्रयत्न.

हेही वाचा >>>आंदोलक आणि वर्दीतला माणूस, दोघेही राजकीय सत्तेचे बळी ? 

अशा सर्व वादांत मूळ प्रश्न : काय आहे भारताचा धर्म आणि ईश्वर? ‘ईशावास्यमिदं सर्वं..’ ( ईश्वर-तत्त्व विश्वातील कणाकणाला व्यापून आहे : ईशावास्य उपनिषद). पण सव्वाशे वर्षांपूर्वी जग कुठे होतं? ‘‘धर्माला आज एक प्रकारे राष्ट्रीय स्वरूप प्राप्त झाले आहे.. (परंतु) आजच्या आधुनिक मानवासाठी धर्म जर तर्कसंगत व बुद्धीचे समाधान करणारा नसेल तर तो नकोसा होईल.. सत्यापर्यंत पोहोचावयास बुद्धी पूर्णत: समर्थ नसेल तरीही धर्माचार्यावर वा वीस लाख देवतांवर आंधळेपणाने विश्वास ठेवण्यापेक्षा दुबळय़ा का होईना पण आपल्या बुद्धीचे अनुसरण करून नास्तिक झालेले परवडले..’’ कोण म्हणतं? अर्थातच स्वामी विवेकानंद. ‘‘धर्म विज्ञानाला सामोरा जायला तयार नसेल तर त्याच्या लौकरात लौकर मरणातच मानव जातीचं कल्याण आहे’’ हे त्यांचे शब्द तर लाटांबरोबर वाहत न जाता आयुष्यभर शिकू पाहणाऱ्या आपण सर्वच सामान्य धार्मिकांनी (‘निधर्मी’नीही का नको?) हृदयावर कोरून ठेवायला हवेत. पण कशी बरं एवढी हिंमत स्वामीजींची?

त्यामागे पतनावस्थेपूर्वीच्या भारताची महान ज्ञान-परंपरा आहे. भारतीय धर्म-संस्कृतीचा निर्विवादपणं पाया असलेल्या उपनिषदांचा काळ हा वैचारिक, आध्यात्मिक आंदोलनांचा काळ मानला जातो. स्वर्गसुखासहित कशाचीही स्पृहा नसलेल्या उपनिषदकारांची सत्यशोधनासाठी कोणत्याही त्यागाची तयारी होती. का? उपनिषदकार बेभानपणं शोध घेत होते एकाच प्रश्नाचा : ‘कस्मिन्नु भगवो विज्ञाते सर्वमिदं विज्ञात भवति’ (वस्तुमात्राच्या आतील एकत्व कोणतं?- म्हणूनच ‘न हि ज्ञानेन सदृशं पवित्रमिह विद्यते’ हा तर गीतेचा घोषमंत्रच!)

का घडू शकलं हे इथे? स्वामीजी म्हणतात, ‘वेदान्त हा सर्वात धाडसी धर्म आहे.. सत्याच्या शोधात त्याची कोठेच थांबायची तयारी नाही. त्यांना प्रतीत झालेले सत्य सांगण्याविरुद्ध उपनिषदकारांची मुस्कटदाबी करून त्यांचा मार्ग रोखायला त्या वेळी तिथे पुरोहितवर्ग नव्हता.. इथे खुळचट बंधने सामाजिक बाबतींत, धार्मिक सत्यशोधनात नाहीत.. इथे चार्वाक तर देवळादेवळांतून शहराशहरांतून अगदी नागडय़ा सोलीव जडवादाचा (निरीश्वरवाद) उघड उघड प्रचार करीत हिंडले, पण त्यांच्या केसालाही कोणी धक्का लावला नाही.’ वडिलांना निरोप द्यायला गेलेल्या दहा-बारा वर्षांच्या अष्टावक्रानं (त्याच्या आठ कुबडांकडे पाहून सभागृह हसल्यावर) भर विद्वत्सभेत जनकासमोरच सिंहगर्जना केली : ‘चामडीवरून माणसाची पारख करणाऱ्या चामडय़ांच्या व्यापाऱ्यांकडून (सभेतील विद्वान) निराकार अविनाशी आत्म्याचं ज्ञान मिळवू पाहाणाऱ्या जनकराजाला, ईश्वरा, वाचव रे बाबा!’ (राजा बेचैन तर विद्वत्सभा शरमली! एक चकार शब्द कोणी काढला नाही! नंतर उलट जनक त्या मुलाकडून जे शिकले ती ‘अष्टावक्र’ गीता! आणि हे आहे मध्ययुगात पश्चिमेत कॅथलिक चर्चपेक्षा वेगळं धर्ममत मांडल्याबद्दल असंख्य ‘ब्रूनों’ना जाळलं जाण्याच्या शेकडो वर्ष अगोदर!) अशी आहे या आध्यात्मिक भूमीची ज्ञान-परंपरा!

हेही वाचा >>>वसाहतवाद-विरोधा’च्या नावाखाली नेमके काय चालले आहे?

तरीही वेदान्त म्हणतो ‘एकं सत् विप्रा बहुधा वदंति’ (ऋग्वेद, मंडल १): ‘एकच सत्य (ईश्वर), जाणते वेगवेगळय़ा शब्दांत व्यक्त करतात’. आणि म्हणूनच : ‘ये यथा मां प्रपद्यंते..’ (गीता: ४.११: कोणत्याही मार्गानं माझ्याकडे या, स्वागतच! कपाळावर विशिष्ट धर्माच्या लेबलाचा आग्रह नाही). आणि हा ‘मी’ म्हणजे तरी कोण? भगवान स्वत:च सांगतात ‘अवजानन्ति मां मूढा..’ (९.११: माझ्या खऱ्या रूपाला न जाणता अज्ञानी मला मनुष्य देहधारी समजतात! मी आहे : ‘अव्यक्तोऽक्षर इत्युक्त:..’ ८.२१ : अव्यक्त, अक्षर असं सत्य की जिथं माणसाला जिवंतपणीच हृदयाच्या भावातून पोहोचायचंय! मोक्ष!) अगदी वेदकाळापासून भारत ईश्वरासाठी अत्यंत सहजतेनं आणि सर्वत्र ‘सत्य’ हा शब्द वापरत आला आहे. ‘हे का’ या केवळ एका प्रश्नाचा शोध (निदान ती नुसती उघडण्यापुरतं तरी पोथीच्या कापडाच्या भगव्या रंगाशीही वैर न करता) निधर्मीनी आणि (धर्म-सत्त्वाकडे दुर्लक्ष करायला नकळतपणं भाग पाडणाऱ्या केवळ भगव्या रंगावरच्या त्या अपार भावनिक प्रेमाबरोबरच) धर्मीनीही घेतला असता तरीही बरीच अधिक ‘सत्य’सेवा दोघांकडूनही घडली असती वा अजूनही घडेल! खरं तर आधुनिक काळातील, विशेषत: संघटित, ‘धर्म’ (रिलिजन) या अर्थानं भारतानं तो शब्द कधीही वापरला नाही. म्हणून तर साक्षात श्रीकृष्णांची हे म्हणण्याची हिंमत : ‘सर्व धर्मान्परित्यज्य..’! आणि तरीही पुढे वचन : ‘अहं त्वा सर्वपापेभ्यो..’ (‘सर्व पापांतून, म्हणजेच अज्ञानातून, मुक्ती’!) पण जर (‘तस्मादज्ञानसंभूतं..’४.४२ ) अज्ञानाला ज्ञानखड्गानं तोडून टाकशील तर!

पण अशा ‘सत्ये’श्वरावरून आम्ही मानवांनी भांडावं तरी कसं? त्यासाठी त्याचा निदान रंग, रूप, आकार तरी नको का कळायला? तो कसा आहे भारतासाठी? ‘त्वं स्त्री त्वं पुमानसि..’ (श्वेताश्वेतर ४.३: ‘ना तू स्त्री ना पुरुष, ना तू कुमार/कुमारी, वृद्ध/तरुण वा कोणतंही रूप!’). म्हणून मंदिर/ मस्जिदी, मक्का/ वाराणसी फिरून फिरून थकल्या भागलेल्या प्रत्येकाला अखेर एक आवाज ऐकू येतो तो ‘छांदोग्या’तील ‘तत् तत्त्वं असि’चा (अरे, तो ईश्वर तर तुझ्या आतच आहे!) तेच वेगळय़ा अर्थानं ‘ईशावास्यमिदं सर्वं!

टीकेच्या नव्हे तर अपार दु:खाच्या भावातून वाटतं की गुरुऋण म्हणून अतीव कृतज्ञतेनं व्यास पौर्णिमा आणि शिक्षक-दिन साजरा करणारा हा देश; आता आपण कुठं चाललो आहोत? गुरुजनांनाही जर विद्यार्थ्यांना शिकवण्यापूर्वीच शब्दाशब्दासाठी (राजकारणी!) धर्माचार्याच्या परवान्याची जरुरी पडणार असेल; विद्यार्थीच जर त्यांच्यावर वर्गातच ‘व्हिडीओ वॉच’ ठेवून त्यांना पोलिसात खेचणार असतील तर अशा वातावरणात कोणतं सत्यशोधन आणि ज्ञानार्जन होईल? विद्यार्थ्यांचं कर्तव्य काय? प्रथमत: सामाजिक भवतालातून मेंदूंत शिरलेलं कोणत्याही रंगाचं राजकारण वर्गाबाहेर काढून ठेवणं. नंतर ज्ञानार्जनाच्या तहानेतून नतमस्तक होत, विद्वेषहीन निर्मळ भावातून नचिकेत- मैत्रेयी-गार्गेयी यांची भारतीय परंपरा सुदृढ करीत उलटसुलट प्रश्नांचा गुरूवर अगदी भडिमारही करणं! केवळ असाच देश मानव जातीसाठी अक्षय ठेवा देऊ शकेल.

हेही वाचा >>>आणीबाणी नाही, पण आणीबाणीसदृश वातावरण!

धर्माला मातीमोल करणारी हीनतम राजकारणं जगभरच होत असतात, इथंही चालू राहतीलच, आपण कोणत्याही बाजूचे असू, पण मानवाला मानव्य प्राप्त करून घेण्यासाठी असामान्य प्रकाश देणाऱ्या या भूमीचा सत्यशोधनाचा वारसा उद्ध्वस्त होऊ नये असं आम्हा अगदी सामान्य धार्मिकांनाही नाही का वाटत? आज पश्चिमेत असंख्य क्षेत्रांत कित्येक भारतीय माणसं आपलं व देशाचं नाव/स्थान निर्माण करून आहेत त्याचं श्रेय अठरा विसे दारिद्रय़ात असतानाच्याही त्या हजारो वर्षांच्या ज्ञानपरंपरेतून (होय, ‘एकलव्य’, ‘कर्ण’ यांनाही न विसरता!) झालेल्या आपल्या जडणघडणीला आहे. भारताचं मानवी संस्कृतीतील अक्षय स्थान टिकणार असेल तर ते, तो ज्ञान-प्रकाश व ती भयमुक्त सत्यशोधन परंपरा टिकवली गेली तर आणि तरच असेल; देशाची अर्थव्यवस्था किती लक्ष कोटी डॉलर्सची केव्हा होते (तीही जरूर होऊ दे..) यामुळे मात्र नव्हे!

Story img Loader