अमेरिकेने मालवाहतूक विमानातून बेकायदा स्थलांतरित भारतीयांना बेड्या ठोकून परत पाठवले हा भारत देश विश्वगुरू झाल्याचा जणू पुरावाच आहे. जया अंगी मोठेपण, तया यातना कठीण! जेवढा जास्त अपमान सहन करण्याची क्षमता तेवढी जास्त संधी! बऱ्याच लोकांना या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात आले नाही. आपण अमृतकाळात प्रवेश करतोय आणि २०४७ पर्यंत विकसित देश होणार आहे, असे आपले पंतप्रधान कानीकपाळी ओरडून सांगत असतानाही बेकायदा स्थलांतर करणारे भारतीय नागरिक एवढ्या मोठ्या संख्येने वाढत आहेत, त्याविषयी सरकार एक चकार शब्दही बोलण्यास का तयार नाही? या प्रश्नाचे उत्तर सरकारसाठी गैरसोयीचे असले, तरी सत्य आहे. अशा प्रत्येकच बाबतीत विद्यमान सरकारची भूमिका अशीच राहिली आहे, हे सर्वांनी बघितले आहेच. कोलंबियाच्या अध्यक्षांनी काहीएक भूमिका तरी घेतली. आपले प्रमुख मात्र मूग गिळून गप्प आहेत. आता अजून अशी डझनभर विमाने येऊ घातली आहेत. अमेरिकेत अंदाजे सव्वादोन लाख बेकायदा भारतीय असून तेथील तुरुंगात असे सुमारे १८ हजार बेकायदा भारतीय असल्याच्या बातम्या येत आहेत.
काही वर्षांपूर्वी कॅनडा आणि अमेरिकेच्या सीमेवर अमेरिकी पोलिसांनी एका घुसखोर टोळक्याला पकडले. तेव्हा त्यातले काही लोक थंडीमुळे गारठून मृत्युमुखी पडलेले आढळले. त्यामध्ये एक पती-पत्नी आणि दोन लहान मुलांचाही समावेश होता. बाकीच्यांची चौकशी करण्यात आली. हा सगळा दहा-बारा जणांचा गट बर्फातून चालत अमेरिकेत बेकायदा प्रवेश करण्याच्या प्रयत्नात होता. चौकशीत आढळले की त्या सर्वांकडे इंग्रजीची जीआरई परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र आहे पण एकालाही नीट इंग्रजी बोलता येत नाही. त्यावर अमेरिकी इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी हे प्रकरण भारताकडे पाठवले कारण ते सर्व नागरिक भारतीय होते. त्यांच्याकडे असलेली डुप्लिकेट जीआरई प्रमाणपत्रे गुजरातमध्ये परीक्षा झालेल्या ठिकाणाहून देण्यात आलेली होती. आंतरराष्ट्रीय पातळीवर याची भरपूर चर्चा झाली. आपण नेहमी सोमालिया, रवांडा, सीरिया अशा देशांतील नागरिक बेकायदा स्थलांतर करून युरोपमध्ये जाण्याचा प्रयत्न करतात याबद्दल वाचतो. पण भारतीय नागरिक किती मोठ्या प्रमाणात आणि काय काय प्रकार करून परदेशात जाण्याचा प्रयत्न करतात हे आपल्याला माहिती नसते.
भारत सरकारकडे आलेले हे प्रकरण त्यांनी गुजरात राज्य सरकारकडे पाठवले तेव्हा पोलीस तपासात आढळले की खोट्या जीआरई केंद्रांत म्हणजे प्रत्यक्षात हॉटेलच्या रूममध्ये डमी उमेदवार बसवून परीक्षा घेण्यात आल्या त्यामोबदल्यात प्रत्येकाकडून लाखो रुपये घेण्यात आले. अशा पद्धतीने हजारो लोकांकडून पैसे गोळा करून त्यांना जीआरई देण्याचे प्रचंड मोठ रॅकेट हे गुजरातमधील सर्व मोठ्या शहरांमध्ये कार्यरत असल्याचे आढळले. याच्यामध्ये भारताचेच नाक कापले जाण्याची शक्यता दिसल्यामुळे लगेचच या प्रकारावर पांघरूण टाकण्याचा प्रयत्न झाला आणि ‘गोदी मीडिया’नेही तो पद्धतशीरपणे अमलात आणला.
शाहरुख खानाचा ‘डंकी’ सिनेमा एक वर्षापूर्वी येऊन गेला. डंकी हा डाँकीचा अपभ्रंश आहे. सरहद्द पार करण्यासाठी (बॉर्डर इनफिल्टरेशन) प्रशिक्षित गाढवे वापरली जातात. स्मगलिंगचा माल, ड्रग्स, औषधे, शस्त्रास्त्रे लादून गाढवांना सोडले जाते. ती गाढवे ठरलेल्या मार्गाने प्रवास करून माल इकडचा तिकडे करतात. थोडक्यात अशाप्रकारे सीमा बेकायदा ओलांडणाऱ्यांनाही पण डॉन्की म्हटले जाते आणि त्याचा अपभ्रंश डंकी असा आहे. भारतातून सर्वांत जास्त बेकायदा स्थलांतर पंजाब, हरियाणा आणि गुजरात या राज्यांतून होते. गुजरातमध्ये तर एक प्रचंड मोठं डंकी रॅकेट कार्यरत आहे, पंजाबमध्ये सुद्धा आहे. सरकार आणि पोलीस यंत्रणांना याची पूर्ण माहिती आहे. म्हणूनच बोभाटा झाल्यावर काही एजंटवर तात्काळ कारवाई करण्यात आली. हा केवळ परराष्ट्र नीती, कायदा आणि आंतरराष्ट्रीय प्रतिमेचा मुद्दा नाही. एवढ्या मोठ्या संख्येने भारतीय लोक एवढे पैसे खर्च करून संकटे झेलूनही प्रगत राष्ट्रात जाण्याची धडपड का करतात हा खरा प्रश्न आहे.
गरीब आणि पीडित भारतीय जनताच अशाप्रकारे अवैध स्थलांतर करून दुसऱ्या देशात जाते असे नाही. कारण गरिबांना हा मार्ग परवडणाराच नाही. एका प्रवाशाला बेकायदा परदेशात विशेषत: युरोप किंवा अमेरिकेत घेऊन जाण्यासाठी डंकी माफिया प्रत्येकी पन्नास लाख ते एक कोटी इतकी प्रचंड रक्कम घेतात. संपूर्ण पैसे आगाउ जमा करावे लागतात. त्यानंतर चार्टर प्लेनने किंवा नेहमीच्या विमानाचे तिकीट काढून दक्षिण अमेरिकेतील निकारागुआ, होंडुरस सारख्या एखाद्या देशात त्यांना उतरवलं जातं. जिथे प्रवेश करताना व्हिसा मिळतो. त्याच्यानंतर हे डंकी ग्वाटेमाला, मेक्सिकोमधून अतिशय धोकादायक पद्धतीने जंगलातून, डोंगरांतून, वन्यप्राणी आणि आदिवासींच्या टोळ्या असलेल्या भागांतून अनेक दिवस चालत प्रवास करत अमेरिकेच्या सीमेपर्यंत पोहोचतात. वाटेत स्थानिक टोळ्या त्यांना लुटतात, महिलांवर बलात्कार होतात, वेठबिगार म्हणून वापरतात किंवा मारूनही टाकतात. वाचलेले लोक अमेरिकेत प्रवेश करायचा प्रयत्न करतात आणि अमेरिकेकडे आश्रय मागतात किंवा चक्क फरार होतात.
याच पद्धतीने कॅनडामधून सुद्धा चालत, बर्फ तुडवत लोक अमेरिकेत प्रवेश करायचा प्रयत्न करतात. आधी सांगितलेले प्रकरण त्यातलेच. मागच्या वर्षी एकट्या अमेरिकेत बेकायदा घुसखोरी करताना पकडण्यात आलेल्या लोकांपैकी भारतीयांची संख्या ९६ हजार होती. यापैकी ३० हजार कॅनडाच्या सीमेवर पकडण्यात आले आणि उरलेले मेक्सिको सीमेवर. या प्रत्येकाने डंकी रूट साठी लक्षावधी रुपये रक्कम मोजलेली होती. पकडले न गेलेल्या लोकांची संख्याही अशीच मोठी आहे असा अंदाज आहे. अमेरिकेत बेकायदा घुसखोरी करणाऱ्यांमध्ये भारतीय लोक संख्येने दुसऱ्या क्रमांकावर आहेत.
वर्षभरापूर्वी फ्रान्सने ३०० पेक्षा जास्त भारतीय नागरिक असलेले चार्टर विमान पकडले आणि आठवडाभर अडवून ठेवले होते. त्यातल्या पंचवीसएक लोकांना तिथल्या तुरुंगात ठेवून उरलेल्या ३०० लोकांना भारतात परत पाठवून दिले. फ्रान्सने भारत सरकारला सांगितले की तुम्ही या प्रकरणाची चौकशी करा. या चौकशीवर पांघरूण घातले गेले आणि ही घटना भारतीयांना आता आठवतही नसेल. भारतीय मीडियाने या सगळ्या प्रकाराला ह्युमन ट्रॅफिकिंग असे गोंडस नाव दिले. ह्युमन ट्रॅफिकिंग हा शब्द कमी पगारात धोकादायक काम करण्यासाठी, वेश्या व्यवसायासाठी, भीक मागण्यासाठी पकडून जबरदस्ती अन्य देशांत ज्यांना नेले जाते त्यांच्यासाठी वापरला जातो.
डंकी हे ह्युमन ट्रॅफिकिंग नाही. हे स्पष्टपणे बेकायदा स्थलांतर आणि घुसखोरी आहे. या सर्व लोकांना ते काय करताय याची पूर्ण कल्पना आहे आणि स्वखुशीने, लक्षावधी रुपये खर्च करून या लोकांनी डंकीगिरी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर भारतातून लोक स्थलांतर करू इच्छितात आणि असे लोक की ज्यांच्याकडे हे करण्यासाठी लक्षावधी रुपये आहेत. त्यांना असे का करावसे वाटत असेल याबद्दल भारत सरकार एक शब्दही बोलण्यास तयार नाही. बांगलादेशी मुसलमान भारतात घुसखोरी करतात याबद्दल मागची ५० वर्षे बोंबलत असलेले लोक या बाबतीत मात्र गप्प आहेत. आता हजारो भारतीय लोक बांगलादेशात नोकरी करत आहेत असे समजते.
प्रत्येक तिसरा हिंदू कुंभ मेळ्याला जाऊन आल्याचा अजब दावा करून सरकारी ढोल वाजवले जातात, वेगवेगळे पोशाख वापरणे, धार्मिक सोहळे आणि निवडणूक प्रचारात पंतप्रधान तासनतास खर्च करतात. त्यांच्या स्नानासाठी त्रिवेणीत फिल्टरच्या पाण्याचे खास कुंड तयार करण्यात आल्याचीही वदंता आहे. गृहमंत्री जनतेला मोफत अयोध्यावारी आणि चारधाम यात्रा घडवण्याचे आश्वासन देतात पण त्यांना किंवा आपल्या परराष्ट्र मंत्रालयाला एवढ्या मोठ्या प्रमाणावर भारतीय नागरिक देश सोडून का चालले आहेत, याबद्दल बोलावेसे वाटत नाही. कदाचित ते त्यांच्यासाठी सोयीस्कर नाही. गुजरात मॉडेल जर एवढे प्रचंड यशस्वी आहे तर गुजरातमधून मोठ्या प्रमाणात लोक स्थलांतर का करू इच्छितात? यामागे कोणत्या टोळ्या कार्यरत आहेत? एवढ्या अफाट मोठ्या प्रमाणावर गोळा केलेले पैसे नक्की कुठे जातात? डंकी माफीयाविरुद्ध भारत सरकार काय कारवाई करणार आहे? भारताची आंतरराष्ट्रीय पातळीवर नाचक्की होत आहे, याबद्दल कोणी काही बोलणार आहे की नाही? हे सगळे प्रश्न यनिमित्ताने समोर आलेले आहेत.
भव्य दिव्य राम मंदिर ५०० वर्षानंतर बांधले, सगळीकडे मोठमोठाले कंत्राटी रस्ते आणि प्रकल्प बांधले, तीर्थक्षेत्रांच्या विकासावर अब्जावधी रुपये उडवले जात आहेत. एवढे सगळे होत असताना, कलम ३७० रद्द झालेले असताना, ट्रिपल तलाक बंद झालेला असताना एवढ्या मोठ्या संख्येने लोक परदेशी का जात आहेत? हिंदुराष्ट्र होऊ घातले आहे. हे सर्व सोडून या लोकांना परदेशात जाण्याचे कारण काय? भारत आणखी २५ वर्षांनी महासत्ता होणार असे स्पष्ट आश्वासन मोदींनी दिलेले असूनसुद्धा त्यावर या लोकांचा विश्वास कसा नाही? फुकट अन्नधान्य, किसान सन्मानाचे वर्षाला ६००० रुपये, मोफत उज्वला कनेक्शन, मोफत घरे मिळत असताना परदेशात जाण्याची काय गरज आहे?
दरडोई उत्पन्न, आरोग्य व्यवस्था आणि शिक्षणाचा दर्जा, सुख आणि समाधानाच्या जागतिक निर्देशांकामध्ये भारताचा क्रमांक तळाकडे घसरत असला तरी भ्रष्टाचार, बेरोजगारी, बेकायदा स्थलांतर यामध्ये देशाची होत असलेली प्रगती काहींना बघवत नाही. अमृतकाळात भारताविरुद्ध परकीय शक्तींशी हातमिळवणी करून विरोधकांनी रचलेला हा बदनामीचा कट आहे आणि आपले विश्वगुरू पंतप्रधान त्याचा योग्य समाचार घेतील याची उर्वरित जनतेने खात्री बाळगली पाहिजे.
प्रत्यक्षात भारतात तरुणांमधील बेरोजगारीचे प्रमाण २५ टक्के आणि एकंदरीत बेरोजगारी ११ टक्के आहे. शिक्षणाचा दर्जा दिवसेंदिवस खालावत आहे, भारतीय डिग्रीला परदेशात मागणी कमी होत आहे. देशात शेतमालाला योग्य भाव मिळत नाही, प्रत्येक महिन्याला फुकट मिळणाऱ्या अन्नधान्यावर ८० कोटी जनता जगते. भारतात राहून भवितव्य नाही असे अनेकांचे मत झाले आहे. भारतात धार्मिक उन्माद, भ्रष्टाचार, अस्वच्छता, संधीचा अभाव, जातीभेद, वशिलेबाजी, गुंडगिरी, असुरक्षितता, प्रदूषण यातच वाढ होत आहे. सलोखा, संधी, शिक्षण, आरोग्य, समानता, शांतता, सहिष्णुता, लोकशाही, संविधानिक संस्था याचा हृास होत आहे आणि मोठ्या वेगात होतो आहे. या तुलनेत युरोप, अमेरिका आणि इतर प्रगत देशांत चांगल्या भविष्याची संधी मिळेल या आशेने एवढ्या मोठ्या संख्येने भारतीय लोक परदेशी जात आहेत. देशाच्या आणि स्वतःच्या भवितव्याबद्दलचा भरोसा आणि विश्वास वेगाने कमी होत आहे. तो कसा परत आणणार हा खरा प्रश्न आहे.
advsnt1968@gmail.com