‘पायर’ या पेरुमल मुरुगन यांच्या कादंबरीची सध्याची चर्चा कदाचित विरेल; पण कादंबरीने दिलेली अस्वस्थता टिकते..
विबुधप्रिया दास
लग्न हे खासगी नाते असले तरी कुटुंब आणि समाजाशी त्याचा संबंध असतो आणि त्यामुळे, भारतीय समाजधारणेनुसार लग्न हे एक स्त्री आणि एक पुरुष यांच्यातच झाले पाहिजे, अशा आशयाचे प्रतिज्ञापत्र भारत सरकारने अलीकडेच सर्वोच्च न्यायालयाला सादर केले. ते प्रतिज्ञापत्र समिलगी विवाहांना कायदेशीर मान्यता का देऊ नये, याविषयीचे आणखीही मुद्दे मांडणारे होते. मात्र ‘नाते दोघांचे- पण समाजधारणेशी संबंध असलेले’ हा त्यातील भाग खरोखरच आपल्या भारतीय लग्नसंस्थेला व्यापून उरणारा. तसा संबंध अद्याप घट्ट असल्यामुळे आंतरजातीय, आंतरधर्मीय विवाहांपुढे आव्हाने असू शकतात. आपले सामाजिक वास्तव हे असे असल्यामुळे आंतरजातीय, आंतरभाषक, आंतरधर्मीय प्रेमविवाहांच्या शोककथा भरपूर आणि त्यांचे निव्वळ चित्रपटीय आविष्कारही ‘एक दूजे के लिए’पासून ‘सैराट’पर्यंत अनेक. पेरुमल मुरुगन यांची ‘पायर’ ही कादंबरीदेखील अशीच एक कथा आहे.
कथासूत्र माहितीचे असले तरी, गोष्ट कशी सांगितली जाते याला महत्त्व असते. कटुपट्टी या दुर्गम गावातला मुलगा आणि थळूर या छोटय़ा शहरातली मुलगी यांच्या प्रेमाची ही गोष्ट सांगताना पेरुमल मुरुगन गाव आणि शहर या दोन्हीकडल्या गरिबीत, तिथल्या समूहजीवनात कसा फरक असतो आणि त्यामुळे व्यक्तीवर काय परिणाम होतो हेही आपसूक सांगतात. गावातल्या कुमारासनचे वडील लहानपणीच वारले आहेत, तर सरोजाची आई ‘मेली’ असेच तिच्या वडिलांकडून, तुटकपणे तिला सांगितले जाते आहे. कुमारासनला जिवापाड जपणारी आई मारायी कुणा ‘भाईअण्णा’च्या आग्रहाखातर मुलाला चार पैसे कमावण्यासाठी थळूरच्या सोडा फॅक्टरीत पाठवते. ही फॅक्टरी म्हणजे तसा कुटिरोद्योगच. गोटीचे झाकण असलेल्या सोडा-बाटल्या धुणे, भरणे आणि पोहोचवणे ही साऱ्या प्रकारची कामे करताना एकदा हातातच बाटली फुटून कुमारासन जायबंदी होतो. याच काळात शेजारच्या सरोजाकडे निरखून पाहताना त्याच्या लक्षात येते, तीही आपल्याकडे पाहाते आहे! महिन्याभराने कधीतरी, सरोजा ‘कांडेपेटी द्या जरा’ म्हणत त्याच्या खोलीच्या दारी येते, तेव्हाच्या ‘चकमकपेटी होय? देतो की!’ या त्याच्या उत्तरातून दोघांमधला प्रादेशिक फरकही वाचकाला कळतो. पण त्यांच्या अव्यक्त प्रेमाला कुठलाही अडथळा येत नाही, तिच्या वडिलांना आणि मोठय़ा भावाला चामडय़ाच्या कारखान्यात काम करावे लागते आहे, याचा तर नाहीच. कुमारासनच्या शांत आत्मविश्वासाला भुलून सरोजा त्याच्यात गुंतत जाते, इथून पळून जाऊन लग्न करू, गावी जाऊ.. तुझी जात मात्र कुणाला सांगू नको, बोलूच नको कुणाशी, या त्याच्या साऱ्या इच्छांना प्रतिसाद देते.. फाल्गुनातल्या टळटळीत दुपारी ते गावात पोहोचतात आणि ‘पांढरे साप वळवळत असावेत इतका उन्हात माखलेला रस्ता’ पाहून सरोजा अंतर्यामी चरकते.
कादंबरीच्या अखेपर्यंत तिचे हे भेदरलेपण वाचकाला भिडत राहाते. प्रसंगच तसे घडत राहातात. कुमारासनला जिच्याबद्दल खात्री असते ती आईसुद्धा सरोजाची जात निराळी असल्याचे ओळखून मुलाच्या अंगावर धावून जाते. ‘चांगले पांग फेडतोय पोरगा, कोण कुठली सटवी आणून ठेवली घरात, तिच्यापायी मला विसरला.. उचल रे देवा आता’ अशी वाक्ये ऐकवणारी ही मारायी एरवी खमकी बाई. पतीनंतर जमिनीचा तुकडा, गाय, शेळय़ा सांभाळणारी, पहाटे उठून दूरच्या विहिरीवरून दहादहा हंडे पाणी भरणारी. पण सरोजाच्या हातचे न खाणारी. सरोजाने पावडर लावली, म्हणून तिला ‘बाजारबसवी’ ठरवणारी. अख्खा गाव मारायीच्या बाजूने.. बायका तर सरोजाला अर्वाच्य बोलणाऱ्या. कुमारासन कामधंद्याच्या शोधात. धंदा सोडय़ाचाच, पण स्वत: सोडा बनवून विकण्यासाठी भांडवल हवे, ते जमवण्यासाठी आधी १३ गावांमध्ये सायकलवरून सोडा पोहोचवण्याची राबणूक करणारा. ‘आई फार बोलतात’ असे सरोजाने सांगताच, ‘अगं मलाच बोलते ना, ती तरी काय करणार बिचारी’ असे म्हणणाऱ्या कुमारासनला पुढले काही सांगण्याची हिंमत सरोजात नाही. कारण हाच आता आपले सर्वस्व, ही खूणगाठ पक्की आहे. तरीही तिला चुकारपणे वाटते, शहरात किती बरे होते, रस्त्यावरून हात हलवत चालू शकायचे मी.. बाबा आणि दादासाठी डबे घेऊन जायचे. कुणाशीही बोलायचे. इथे कुणी काहीही बोलले तरी तोंडाला कुलूप.
परिस्थितीने गांजलेला कुमारासन दारू (अरक) पिऊन येतो, तेव्हा सरोजा त्याला गळय़ातली चेन काढून देते.. ‘पैसे नाहीत म्हणून दुकान नाही, याच चिंतेत आहेस ना? हे घे.. पण असा दु:खी होऊन दारू नको पिऊ’ – पण तो नकार देतो. पुरुष म्हणून त्याला हे कधीही पटणार नसते हे एक कारण. दारू सोडण्याचा प्रस्ताव तो गांभीर्याने घेत नाही, हे दुसरे. ‘मी तुला जपणार, सांभाळणार, सगळे नीट होईल’ या त्याच्या म्हणण्यातील पोकळपणा वाचकालाही जाणवू लागतो. गावाचा जत्रोत्सव जवळ येताच सरोजाच्या जातीवरून गावकऱ्यांची पंचायत बसते. ‘सोडय़ात तू रंग मिसळतोस, तशी जातीपातींची मिसळ नाय करायची’ असा दम कुमारासनला देऊन, त्याच्या घराला वाळीत टाकण्याचा निर्णय सांगितला जातो. पुढल्या काही दिवसांत तिघेचौघे गावकरी, ‘भाईअण्णा’च्याच मदतीने सरोजाच्या घरापर्यंत पोहोचतात. कुमारासन ‘आज रात्री नाही येणार’ म्हणून सांगून गेलेला असतानाच्याच पहाटेपूर्वी, सरोजाला आवाजाने जाग येते- गावकरी मारायीला सांगताहेत- ‘आजच, आत्ताच’! सरोजा मागल्यामागे पळून प्रातर्विधीच्या झुडुपांमध्ये लपते.
सरोजा झुडुपांमध्ये लपली आहे, लाठय़ाकाठय़ा घेऊन गावकरी तिला शोधताहेत, हा सुमारे दीड तासांचा घटनाक्रम १५ प्रकरणांच्या या कादंबरीची अखेरची दोन प्रकरणे भरून येतो.. समाजाबद्दल प्रश्न उभे करतोच पण, ‘त्यांच्या देवाचा धावा आपण केला तर आपला जीव वाचेल का?’ असे प्रश्नही कथेच्या ओघात विचारतो. झुडुपांमध्ये ती आहेच याची खात्री असूनही काटय़ाकुटय़ांमुळे तिच्यापर्यंत पोहोचू न शकणारे गावकरी, वाळलेल्या या झुडुपांना पेटवून देतात.. ‘भक्क प्रकाश तिच्यापर्यंत आला, त्याचे ऊष्ण श्वास तिला जाणवू लागले, तिने दोन्ही हात वर केले आणि ज्या आवाजाची वाट ती पाहात होती तो.. कुमारासनच्या सायकलीचा आवाज तिला आला’ यापुढे काय होणार आहे, हे वाचकाने ठरवायचे!
कुमारासन आणि सरोजा यांच्या या गोष्टीत समाजधारणाच प्रबळ ठरते, हा या कादंबरीचा गाभा. ओघवत्या शब्दांत, निसर्ग आणि कथानकातले मानवी जीवन यांची सांगड घालत, एकेका पात्राचे शब्दचित्र उभे करत आणि प्रसंगी ‘भाईअण्णा’चा गावातला वावर, सोडावॉटरचे काम यांबद्दल अर्धीअधिक प्रकरणे खर्ची घालत लेखक मुरुगन आपल्याला या जगात नेतात. कुमारासनचा खेडवळ हिशेबीपणा, त्याच्या किंवा गावातल्या पुरुषांच्याच नव्हे तर महिलांच्याही नेणिवेत मुरलेली पुरुषप्रधानता, सरोजाचा मुग्धपणा आणि तिनेही मान्य केलेले पुरुषवर्चस्व, तिला बिनचेहऱ्याच्या गर्दीत सुरक्षित आणि अस्मितावादी गावकऱ्यांत असुरक्षित वाटण्याची संभाव्य कारणे हे सारे वाचकांपर्यंत आपसूक पोहोचवणारी ही कादंबरी एका लग्नाची गोष्टच सांगते खरी.. पण त्या गोष्टीतला दाहकपणा मात्र आपल्या समाजातून आलेला आहे, ही जाणीव वाचकाला अस्वस्थ करते.
अनुवादिकेला दिसलेले मुरुगन
पेरुमाल मुरुगन यांच्या लेखनाचा अनुवाद करणे हा नेहमीच विस्मयजनक अनुभव ठरतो. त्यांच्या ‘वन पार्ट वुमन’मध्ये कथा अशा ठिकाणी येऊन पोहोचते जिथे कथेचा नायक कालीने आत्महत्येचा प्रयत्न केला आहे, मात्र त्याचा मृत्यू झाला की नाही, हे स्पष्ट होत नाही. पुढे याच पुस्तकाचे दोन वेगळय़ा वाटांनी जाणारे ‘सीक्वेल’ आले. त्यापैकी ‘अ लोन्ली हार्वेस्ट’मध्ये कालीचा मृत्यू होतो आणि ‘ट्रायल बाय सायलेन्स’मध्ये तो जिवंत राहतो. यापैकी दुसऱ्या आणि तिसऱ्या भागाचा अनुवाद मी केला आहे. तो करताना लेखक एकच कथाबीज दोन वेगवेगळय़ा प्रकारांनी आणि तेवढय़ाच ताकदीने कसे फिरवतो हे पाहून विस्मय वाटत राहतो. आणि मग असा प्रश्न पडतो की आपण या प्रतिभेला न्याय देऊ शकणार आहोत का? मात्र त्या दोन्ही कादंबऱ्यांचा इंग्रजी अनुवाद एवढा चपखल झाला आहे की, आशय मराठीत आणणे हा एक सहज आणि आनंददायी अनुभव ठरतो.
मुरुगन यांचे आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे ते महिलांचे आयुष्य, त्यांच्या लकबी लहानमोठय़ा बारकाव्यांसहित चित्रित करतात. कालीच्या मृत्यूनंतर गावातील महिला पोन्नाच्या (कालीची पत्नी) पाठीशी उभ्या राहतात, तो प्रसंग वाचताना त्यांचे हे कौशल्य ठळकपणे जाणवते. ग्रामीण भाषा रांगडी असते. तिथले लोक अपशब्दांचा मनसोक्त वापर करतात. मूळ कादंबऱ्या तमिळमधल्या असल्या, तरीही त्या इंग्रजीत आणताना हा रांगडेपणा हरवलेला नाही, त्यामुळे तो मराठीत आणणे सोपे होते. मुरुगन यांच्या कादंबऱ्यांचा अनुवाद करताना अनुवादक स्वत:ही जीवनविषयक जाणिवांनी समृद्ध होत जातो.
– डॉ. शुचिता नांदापूरकर-फडके
(‘अ लोनली हार्वेस्ट’ आणि ‘ट्रायल बाय सायलेन्स’च्या अनुवादक)
‘पायर’च्या ताज्या चर्चेस कारण की..
‘पायर’ या पेरुमल मुरुगन यांच्या कादंबरीची निवड ‘बुकर इंटरनॅशनल’ पारितोषिकाच्या पहिल्या यादीत झाली आहे. अनुवादित कथासंग्रह वा कादंबऱ्यांसाठीचे हे पारितोषिक ५०,००० ब्रिटिश पौंडांचे (सुमारे ५०.१० लाख रुपये) असते आणि अनुवादक तसेच मूळ लेखक यांना ते विभागून मिळते, ही माहिती गीतांजली श्री यांच्या ‘रेत समाधी’ (टूम्ब ऑफ सॅण्ड)ला गेल्याच वर्षी हे पारितोषिक मिळाल्याने अनेकांना आहेच. मुरुगन यांच्या कादंबरीचा अनुवाद अनिरुद्धन वासुदेवन यांनी केला आहे. पहिल्या (दीर्घ) यादीत एकंदर १३ पुस्तके असून यापैकी सहा पुस्तकांची निवड लघुयादीत होते. लघुयादीतील प्रत्येक पुस्तकाला एक हजार पौंडांचे प्रोत्साहनार्थ पारितोषिक मिळते. त्यासाठी या पुस्तकाची स्पर्धा अन्य १२ पुस्तकांशी आहे.
चिनी नाटककार, पटकथाकार झो झिंगजी यांची ‘नाईन्थ बिल्डिंग’, स्वीडिश लेखिका अमांडा स्वेन्सन यांची ‘ए सिस्टम सो मॅग्निफिसण्ट इट इज ब्लाइिण्डग’, स्पॅनिश कादंबरीकार ग्वाडालुपे नेटेल यांची स्टील बॉर्न, जर्मन लेखक क्लेमेन्स मेयर यांची ‘व्हाईल वी वेअर ड्रिमिंग’, फ्रेन्च कादंबरीकार लोफो मुवीनिए यांची ‘बर्थडे पार्टी’, युक्रेनी कादंबरीकार आन्द्रे कुरकोव्ह यांची ‘जिमी हॅण्ड्रिक्स लिव्ह इन लुव्हिव’, नॉर्वेजियन लेखिका विग्दिस जोर यांची ‘इज मदर डेड’, आयव्हरी कोस्टमधील पत्रकार-लेखक गॉझ यांची ‘स्टॅण्डिग हेवी’, बल्गेरियातील लेखक जॉर्जी गॉस्पोडनोव्ह यांची टाइम शेल्टर, फ्रेंच समीक्षक आणि कथाकार मेराइस कोडे यांची ‘द गॉस्पेल अकॉर्डिग टू न्यू वर्ल्ड’, दक्षिण कोरियाई कादंबरीकार चान मिआँग- क्वान यांची ‘व्हेल’ आणि स्पॅनिश कवी-लेखिका इव्हा बाल्टझार यांची ‘बोल्डर’ या कादंबऱ्यांशी ‘पायर’ची स्पर्धा असेल.
आन्द्रे कुरकोव्ह हे रशियन-युक्रेनी नाव या यादीतील सर्वाधिक लोकप्रिय असून त्यांच्या आधीच्या सर्व कादंबऱ्या जगभरात गाजल्या आहेत, त्यांच्या १९ कादंबऱ्यांपैकी १३ इंग्रजीत आल्या आहेत. त्यांच्या ‘डेथ अॅण्ड द पेन्ग्विन’चे ३०हून अधिक भाषांत अनुवाद झाले असून दीर्घ यादीत दाखल झालेली कादंबरी काही दिवसांपूर्वीच प्रकाशित झाली आहे.
‘पायर’ लेखक : पेरुमल मुरुगन, अनुवादक : अनिरुद्धन वासुदेवन, प्रकाशक : पेंन्ग्विन/ हॅमिश हॅमिल्टन, पृष्ठे : २१६ किंमत : ३९९ रु.