सुहास सरदेशमुख

समाजाने वाऱ्यावर सोडलेल्या मुलींना नाव देण्यापासून तिचे पालकत्व घेण्यापर्यंतची जबाबदारी धाराशिवची तुळजाई प्रतिष्ठान बहुउद्देशीय संस्था समर्थपणे सांभाळते. संस्थेच्या स्व-आधार गतिमंद मुलींच्या निवासी प्रकल्पात सध्या ११४ मुली आहेत. या मुलींना संस्थेने नवजीवन दिले आहे.

pukar seva pratishthan ngo for destitute elderly homeless
रस्त्यावरील निराधार वृद्ध रुग्णांवर उपचार करणारा ‘सेवाव्रती’!
Ramdas Kadam On Uddhav Thackeray
Ramdas Kadam : “उद्धव ठाकरेंना म्हटलं होतं दोन तासांत आमदार परत आणतो; पण…”, शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान
ganesh idols made from paper
पर्यावरणपूरक कागदी लगद्याच्या मूर्तींना मागणी
retirement planning, financial freedom, emotional aspects, senior financial planning, peace of mind, financial mentor, heritage, family values, mental preparation,
निवृत्तीच्या उंबरठ्यावरचं अर्थकारण!
order of CIDCO Deputy Registrar to submit Building Hazardous Certificate navi Mumbai
पुनर्विकासातील घोळांना चाप; इमारत धोकादायक प्रमाणपत्र सादर करण्याचे उपनिबंधकांचे आदेश
non-vegetarian food, lunch boxes, food safety, danger zone temperature, bacteria, foodborne illnesses, Dt. Umang Malhotra, tiffin safety, Salmonella, food storage
टिफिनमध्ये मांसाहारी पदार्थ घेऊन जाणं आरोग्यासाठी योग्य की अयोग्य? जाणून घ्या तज्ज्ञ काय सांगतात
India allows drugs for weight loss Alzheimer’s and cancer approved globally
विश्लेषण : अल्झायमर्स, वजनघट, कर्करोगावरील औषधे भारतात येण्याचा मार्ग सुरळीत… काय आहे नियमातील नवा बदल?
Onion Mahabank is not viable even easier viable storage of onion is possible
कांदा महाबँक व्यवहार्य नाही, त्यापेक्षा ‘हे’ व्यवहार्य पर्याय स्वीकारावेत

लहान मुलाची लाळ गळत असेल तर त्याच्या गळय़ाशी एक लाळेरे बांधले जाते. पण लाळ गाळणारी मुलगी मोठी असेल तर? आणि समजा ५० मुलींची लाळ सारखी पुसावी लागत असेल तर? काळजी घेणारी व्यक्ती किती वेळ हेच काम करणार? – या प्रश्नांवर उत्तर काढायचे ठरले आणि लाळ गाळणाऱ्या मुलीच्या ओठावर मधाचे एक बोट लावण्याची कल्पना पुढे आली. ज्या मुलीची लाळ अधिक गळते तिच्या ओठावर तासाभरात दोनदा मध लावायचा. मग मधाच्या गोडीने मुली लाळ तोंडात ओढू लागल्या आणि हळूहळू सर्व मुलींची लाळ गळायची थांबली. धाराशिवच्या स्व-आधार गतिमंद मुलींच्या निवासी प्रकल्पात अशा ११४ मुली आहेत. यातील २० मुलींना नाश्ता, जेवण दुसऱ्याने भरवावे लागते. ३० मुलींना नैसर्गिक विधीची संवेदना ओळखता येत नाही. स्वच्छतेचे प्रश्न खूप गंभीर आहेत. ३० – ३५ मुलींना कपडे ठेवण्याचे भान नाही. ५० मुलींना कायमस्वरूपी औषधोपचार लागतात. अशा अवघड स्थितीशी दोन हात करत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा समूह आता विकसित झाला आहे. पण, या मुलींना लागणारे जुने कपडे गोळा करण्यापासून मुलगी आजारी पडली की तिला दुचाकीवर बसवून रुग्णालयापर्यंत नेण्याचे काम शहाजी चव्हाण यांनी संस्था उभारणीच्या पहिल्या टप्प्यात केले. धाराशिवमध्ये तुळजाई प्रतिष्ठानच्या वतीने स्व-आधार मुलींचा निवासी प्रकल्प सुरू होऊन आता १४ वर्षे पूर्ण झाली आहेत. अनेक सुविधा निर्माण झाल्या आहेत. एकेक टप्पा काम पुढे सरकत आहे.

हेही वाचा >>> सर्वकार्येषु सर्वदा : अक्षम मुलांना ‘पाठबळ’

मुंबई, पुणे, नागपूर अशा कोणत्याही शहरांत महिला अत्याचारांच्या घटना नव्या नाहीत. सामूहिक अत्याचारानंतर होणाऱ्या हत्याही वाढलेल्या आहेत. जन्मजात गतिमंद असलेल्या मुलींनाही रस्त्यावर फेकून देणारी मंडळी आहेत. शहाजी चव्हाण यांनी अशा मुलींचा सांभाळ करण्याचे ठरविले. ते कळंब येथे संत ज्ञानेश्वर मूक-बधिर विद्यालयात शिक्षक म्हणून काम करत होते. याच काळात त्यांच्या एका वर्गमित्राचा एड्समुळे मृत्यू झाला. त्याच्या बायकोला आणि मुलांना मग गोठय़ात हलविण्यात आले. त्या मुलांचा काय दोष, असा प्रश्न शहाजी चव्हाण यांना पडत असे. त्यातून अशा मुलांसाठी काम करायचे, असे त्यांनी ठरविले आणि २००६ मध्ये त्यांनी एड्सग्रस्त मुलांसाठी काम करण्याचा निश्चय केला. अशा मुलांचा सांभाळ करण्यासाठी त्यांनी स्वयंसेवी संस्था सुरू केली. घरची परिस्थिती तशी हलाखीची होती. आई-वडील शेतमजूर होते. पण, मित्राच्या एचआयव्हीबाधित कृश मुलांना पाहून त्यांना कळवळा आला. त्यातून अशा मुलांसाठी २००६ मध्ये संस्था आकारास आली. या काळात मुलांच्या आरोग्याची काळजी कशी घ्यायची, याचा अनुभव शहाजी चव्हाण यांच्या पाठीशी उभा राहिला. आपल्याच गावातील एक तरुण जरा वेगळे काम करतो आहे, असे म्हटल्यावर स्थानिक पातळीवरील बातमीदार असणाऱ्या सतीश टोणगे आणि सहकाऱ्यांनी त्यांना प्रोत्साहन द्यायला सुरुवात केली. ४० मुलांना सांभाळण्याचा अनुभव गाठीशी होता. याच काळात नागपूरमध्ये गतिमंद मुलींसाठी काम करणारी एक संस्था बंद पडली. या मुलींना आता कोण सांभाळणार, असा प्रश्न निर्माण झाला. या मुली आपण सांभाळू, असे शहाजी आणि मित्रमंडळींनी ठरविले आणि नागपूरमधील ३७ मुलींना ते नागपूरहून घेऊन आले. शासकीय पातळीवर मिळणारे तुटपुंजे अनुदान आणि गतिमंद मुलींना सांभाळण्याचे कौशल्य नसल्याने हे काम करायला पुढे येण्यासाठी कोणी धजावत नव्हते. धाराशिव शहरात तेरणा महाविद्यालयासमोर भाडय़ाची जागा घेऊन या मुलींना सांभाळण्याचा प्रयोग सुरू झाला. आलेल्या मुलींना सतरंजी दिली़ पण, या मुलींना ना खाण्याची समज होती, ना विधींची. त्यामुळे सतरंजी खराब झाली आणि शहरातील नेतेमंडळींच्या फलकाचा कापड वापरण्याचा प्रयोग झाला. कसे खाऊ घालावे, किती खाऊ घालावे, या मुलींना कोणते आजार आहेत, त्यावर कोणते उपचार करावेत, याचा एक एक अनुभव घेत, शहाजी आणि त्यांची मित्रमंडळी काम करत होती. तेव्हा संस्था चालविण्यासाठी आणि कर्मचाऱ्यांना देण्यासाठी पैसा नसे. कोणी कर्मचारी काम करायला तयार नसे. पण घरातील सदस्यांना बरोबर घेत मुलींचा सांभाळ करण्यासाठी मग शहाजींनी कर्ज काढले. उधार उसनवारी केली. या काळात त्यांना आत्माराम पवार या त्यांच्या मित्राने सहकार्य केले. याच काळात मुलांच्या आरोग्याचा प्रश्न लक्षात घेऊन उस्मानाबाद जनता सहकारी बँकेने संस्थेला एक रुग्णवाहिका दिली. त्यामुळे मोठा प्रश्न निकाली निघाला. पण मुलींच्या आरोग्याचे प्रश्न सोडवायचे कसे, हा प्रश्न होताच. धाराशिव शहरात सामाजिक कामात पुढाकार घेणााऱ्या डॉ. अभय शहापूरकर यांनी मग मुलींच्या आरोग्य पत्रिकाच हाती घेतल्या. ठरावीक कालावधीनंतर मुलींची तपासणी करण्यासाठी ते आवर्जून येत. आजही येतात.

हेही वाचा >>> सर्वकार्येषु सर्वदा : विशेष मुलांची ‘मनाली’

गेल्या दहा वर्षांत गतिमंद मुलींचे आजारी पडण्याचे प्रमाण कमी झाले आहे. यासाठी संस्थेतील ३६ शिक्षक प्रयत्न करत असतात. अगदी करोना काळातही या मुलींना त्याची लागण होऊ नये म्हणून दर १५ दिवसांनी आरटीपीसीआर चाचणी केली जात होती़  या काळात तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी संस्थेतील कार्यकर्त्यांच्या चाचणीचे अहवाल वेळेवर मिळावेत याकडे लक्ष दिले. अनेक जणांनी मदतही केली. तरीही काही मुलींना करोनाची लागण झाली. पण योग्य वेळी उपचार आणि आहार आणि व्यायाम यामुळे ११४ मुलींपैकी कोणाच्याही जीवितास धोका निर्माण झाला नाही. आता या मुलींची प्रगती लक्षणीय आहे. काही मुली आता देशभक्तीपर गाणी म्हणतात. काहींना गणेशमूर्तीची आखणी करता येते. एक तेलाचा घाणाही संस्थेच्या आवारात सुरू करण्यात आला आहे. त्यातही काही मुली काम करू शकतात. संस्थेच्या इमारतीच्या पाठीमागे लावलेल्या भाज्या आणि फळबागेची निगाही आता काही मुली राखतात. प्रत्येक कृती करून घेताना खूप कष्ट पडतात. पण आता प्रत्येक मुलींच्या प्रगतीचा आलेख चढता आहे. आणि आता तो लिहून काढला जात आहे. प्रत्येकीची प्रगती होत आहे. पण असे होताना वाढत्या वयातील मुली आणि लहान वयाच्या मुली यांना वेगवेगळे ठेवण्याची गरज निर्माण झाली आहे. वयाने मोठय़ा झालेल्या मुलींसाठी नवी इमारत बांधणे आवश्यक आहे. याशिवाय या तीन वर्षांपासून ते सहा वर्षांपर्यंतच्या खाटेला खिळून असणाऱ्या मुलींसाठी नवीन सुश्रूषा केंद्र उभे करण्याचा संस्थेचा मानस आहे. त्यासाठी इमारत बांधकाम करण्यासाठी आणि मनुष्यबळ उभे करण्यासाठी संस्थेला आर्थिक आधाराची गरज आहे. आपल्याच समाजाने टाकून दिलेल्या बेवारस मुलींना नाव देण्यापासून ते तिचे पालकत्व घेण्यापर्यंतच्या सगळय़ा प्रक्रियेवर संस्थेस भेट देणारी मंडळी खूश असतात. संस्थेसमोरच्या हिरवळीवर जिल्ह्यातील मंडळी वाढदिवस साजरा करायला येतात. अगदी लोकप्रतिनिधींपासून ते सर्वसामान्य व्यक्तींचा संपर्क वाढतो आहे. अनेक छोटय़ा उपक्रमास निधीची कमतरता भासू नये, अशी काळजी अनेक मंडळी घेत आहेत. संस्थेसमोरील अडचणी या नव्या पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी लागणाऱ्या निधीच्या आहेत. त्यासाठी त्यांनी दात्यांना साद घातली आहे.

संस्थेपर्यंत कसे जाल?

धाराशिव शहरापासून सहा किलोमीटर अंतरावर विमानतळाकडे जाताना डाव्या बाजूला अर्धा किलोमीटरवर संस्थेची इमारत आहे.

धनादेश या नावाने काढावा

तुळजाई प्रतिष्ठान बहुउद्देशीय संस्था

 Tuljai pratishthan bahuuddeshiy sanstha

(संस्था ८०-जी करसवलतपात्र आहे)

ऑनलाइन देणगीसाठी

खाते क्र. 0840501091987

कॉसमॉस बँक, शाखा सोलापूर

आयएफएससी कोड – COSB0000084

धनादेश येथे पाठवा.. एक हजार किंवा त्याहून अधिक रुपयांची देणगी देणाऱ्यांची नावे ‘लोकसत्ता’त प्रसिद्ध केली जातील.

मुंबई कार्यालय

लोकसत्ता, संपादकीय विभाग,मफतलाल सेंटर, सातवा मजला, नरिमन पॉइंट, मुंबई – ४०००२१,  ०२२-६७४४०२५०

महापे कार्यालय  

संपादकीय विभाग, प्लॉट नं. ईएल १३८, टीटीसी इंड. एरिया, एमआयडीसी, महापे, नवी मुंबई – ४००७१०.  ०२२-२७६३९९००

ठाणे कार्यालय    

संपादकीय विभाग, कुसुमांजली बिल्डिंग, तिसरा मजला, गोखले रोड, नौपाडा, ठाणे.  ०२२-२५३९९६०७

पुणे कार्यालय      

संपादकीय विभाग, एक्स्प्रेस हाऊस,

प्लॉट नं. १२०५/२/६, शिरोळे रस्ता, पुणे- ४११००४.  ०२०-६७२४११२५

नागपूर कार्यालय        

संपादकीय विभाग, प्लॉट नं. ३८, अ‍ॅडिसन ट्रेड सेंटर, अंबाझरी, नागपूर – ४४००१०, ०७१२ झ्र् २२३०४२१

दिल्ली कार्यालय       

संपादकीय विभाग, द इंडियन एक्स्प्रेस बिल्डिंग, बी१/ बी, सेक्टर १०, नॉएडा- २०१३०१. ०१२०- २०६६५१५००