विनय सहस्रबुद्धे
आधुनिक काळामधील जनतेच्या आशा, आकांक्षा व अपेक्षा यांना समर्पक अशा नवकल्पना राबवत देशात नवी चेतना निर्माण करण्याचे कार्य नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात चालले आहे.
एका विकसनशील राज्याचे तीन वेळा मुख्यमंत्री अन् विशालकाय भारताचे दोन वेळा प्रधानमंत्री बनत भारतीय राजकारणाची परिभाषाच बदलवून टाकणारं एक कल्पक नेतृत्व म्हणजे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी! भारतमातेच्या या निस्सीम सेवकाच्या ७२व्या जन्मदिवसानिमित्ताने त्यांच्या नेतृत्वात अनेकानेक नवकल्पना राबवीत होत असलेल्या भारतीय नवनिर्माणाचा मागोवा घेणारा हा लेख!
नरेंद्र मोदी यांच्या नरेंद्र मोदी असण्यात सिंहाचा वाटा उचलणारा घटक म्हणजे ‘नवकल्पना’. १३० कोटी देशवासीयांच्या अगणित आकांक्षांना लीलया गवसणी घालण्यासाठी मोदींनी प्रभावीपणे अमलात आणलेल्या नवकल्पनांनी चोख कामगिरी बजावली आहे. देशाच्या वर्तमान गरजा ओळखत त्यांच्यात नवतंत्रज्ञानाची समर्पक जोड देत सरकार नावाच्या व्यवस्थेस लोकाभिमुख करण्याचे काम मोदींनी मोठय़ा प्रमाणात केले आहे. नव्या धाटणीच्या अन् नव्या दमाच्या या बदलांची जननी म्हणजे मोदींच्या नवकल्पना. या नवकल्पनांची व्यवहार्यता आणि त्यांची चोख अंमलबजावणी हाच मोदींच्या सुशासन पर्वाचा पाया आहे.
सुशासन ही एक प्रक्रिया आहे, आणि कालसुसंगत बदल आत्मसात करण्याइतकी लवचीकता या प्रक्रियेत असायला हवी हे धोरण ही मोदी सरकारची पहिली विशेषता. याच अनुषंगाने त्या त्या क्षेत्रात राष्ट्रीय पातळीवर काम करण्यासाठी विविध मंत्रालये, विभाग स्थापित करण्यात आले. केंद्रीय सहकार मंत्रालय हे याचे अगदी अलीकडचे उदाहरण. देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी सहकार क्षेत्राचे सूत्रबद्ध पुनर्वसन आवश्यक आहे, त्यासाठी केंद्रीय पातळीवर विशेष प्रयत्न करणे गरजेचे आहे हे ओळखत सहकार मंत्रालय स्थापन करण्यात आले. सहकार क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवण्यासाठी राष्ट्रीय सहकार नीतीवर कामदेखील सुरू आहे. आयुष मंत्रालयाचे प्रभावी काम, जलशक्ती मंत्रालयाचा कायापालट, कौशल्य विकास मंत्रालयाची व्याप्ती अशा अनेक प्रशासनिक नवकल्पनांची अंमलबजावणी मोदी सरकार करत आहे. एक देश व सरकार म्हणून आपला वाढत असलेला व्याप लक्षात घेत भविष्यातील वाढत्या गरजा पूर्ण करण्यासाठी वर्तमानातील जीर्ण व्यवस्था बदलणे आवश्यक असते. तोकडय़ा पडत चाललेल्या जीर्ण व जुन्या संसद भवनाचा सन्मान कायम ठेवून आधुनिक सेवा-सुविधायुक्त नवीन संसद भवनाचा विचार व त्यातील नवकल्पनांना आकार हे ‘नित्य नूतन, चिर पुरातन, राष्ट्र’ म्हणून आपली ओळख अधोरेखित करते.
देशाच्या प्रगतीत तंत्रज्ञानाचे वाढते महत्त्व लक्षात घेत मोदी सरकारने तरुणाईच्याच विविध कल्पनांना प्रत्यक्षात उतरवले आहे. भारताची ड्रोन तंत्रज्ञानातील भरारी हा याचाच भाग आहे. कृषी क्षेत्रापासून ते ऐतिहासिक वारसा जतनापर्यंत ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर होतो आहे. सुरक्षेच्या दृष्टीने तसा संवेदनशील असलेला या तंत्रज्ञानाचा वापर योग्य ती खबरदारी घेत व नियमावली क्लिष्ट न ठेवता अधिक विकासात्मक बनवण्याची नवकल्पना मोदींचीच! शाश्वत विकास क्षेत्रातील आधुनिकता लक्षात घेत बांधकाम व आवास क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवणे हीदेखील एक नवकल्पनाच. बांधकाम क्षेत्रातील तंत्रज्ञानाच्या वापराच्या नवकल्पना लाइटहाऊस योजनेच्या माध्यमातून उदाहरण म्हणून प्रस्तुत करण्यासाठी, पर्यावरणपूरक बांधकाम सामग्रीवर संशोधन करणे, त्यातून प्रायोगिक तत्त्वावर घरांचे बांधकाम करणे आणि हे सर्व ‘सर्वासाठी घरे’ या धोरणांशी संलग्न करणे हे नरेंद्र मोदींच्या नवकल्पनांना नेहमीच व्यावहारिकतेच्या कसोटीवर पारखण्याबद्दलच्या आग्रहाचे उदाहरण होय!
शासकीय कामकाज आणि योजना यांचे क्षमता वर्धन करून समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविणे ही मोदींच्या नवकल्पनांची दुसरी विशेषता. साचेबद्ध पद्धतीने काम करत असलेल्या अजस्र अशा नोकरशाहीचे कच्चे दुवे ओळखून ही व्यवस्था अधिक गतिमान, सर्जनशील व रचनात्मक करण्यासाठी नीतीगत काम करणे हा याचाच एक भाग. सामाजिक न्यायाची बूज राखून, शिक्षण, तंत्रज्ञान, आरोग्य, वित्त इ. क्षेत्रांतील अनुभवी व तज्ज्ञ मंडळींना सरकारात स्थान देत नोकरशाहीला आणखी परिणामाभिमुख करण्याचे सकारात्मक व दूरगामी परिणाम निश्चितच जाणवत आहेत. हे करत असतानाच ‘क्षमता विकास आयोग’ स्थापित करून सरकारी कर्मचाऱ्यांचे क्षमता वर्धन आता औपचारिकता नव्हे तर एक प्रक्रिया बनली आहे. कृषी क्षेत्राचे महत्त्व ओळखून त्याला सौर ऊर्जेसारख्या अक्षय ऊर्जेची जोड देत ‘प्रधानमंत्री कुसुम योजना’ राबविण्यात येते आहे. शेत जमिनीचा उपयोग ‘सौर ऊर्जा शेती’साठी करून त्यातून वीजनिर्मिती करणे अन् शेतकऱ्यांनी निर्माण केलेली ही वीज सरकारने धान्य विकत घेण्याप्रमाणे विकत घेणे, या नवकल्पनेतून कृषी क्षेत्राचे आर्थिक चित्र आकर्षक करण्याचे प्रयत्न होतायत. ‘प्रधानमंत्री स्वामित्व’ योजनेच्या माध्यमातून जमिनीच्या नोंदी, सात-बारा कागदपत्रे पडताळणी इ. क्लिष्ट व वेळखाऊ कामांमध्ये ‘ड्रोन’ तंत्रज्ञानाचा वापर करत महसूल क्षेत्र तसेच ग्रामविकास क्षेत्राचे क्षमता वर्धन होते आहे. नव्या शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून शैक्षणिक क्षेत्राचे नूतनीकरण अव्याहतपणे सुरू आहे. आता तर नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या ‘प्रधानमंत्री श्री’ योजनेच्या माध्यमातून देशभरात १४,५०० शाळांचे आधुनिक, अद्ययावत शैक्षणिक पद्धतींनी सुसज्ज विद्यालयात परिवर्तन करण्यात येणार आहे. या ‘हरित शाळा’ वैज्ञानिक कार्यपद्धती अवलंबून मुलांच्या सर्वागीण विकासावर काम करतील व त्यांना कौशल्य विकासावर आधारित शिक्षण प्रदान करतील. इतकेच नव्हे तर या शाळा आसपासच्या परिसरातील इतर शाळांची मार्गदर्शिका म्हणून कामदेखील करतील. शिक्षण व कौशल्य विकास क्षेत्राचे सर्वसमावेशी क्षमता वर्धन हीदेखील, एक नवकल्पनाच!.
सशक्त भारताचा कणा म्हणजे भारताची लोकशाही! या मूल्याबद्दलची आपली राष्ट्रीय निष्ठा अभिव्यक्त होते ती मोदी सरकारच्या योजना व लोककल्याणकारी कार्यक्रमातील असाधारण लोकसहभागातून. हे साध्य करण्यासाठी विविध उपक्रम राबवणे ही मोदींची तिसरी विशेषता. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने चालविण्यात आलेले ‘हर घर तिरंगा’ हे अभियान याचेच द्योतक आहे. आपली राष्ट्रीय मानचिन्हे ही सर्वाना आपलीशी वाटणे आणि त्यांयोगे राष्ट्रीय ऐक्य स्थापित होत राहावे या अनुषंगाने भारतातील प्रत्येक घरापर्यंत तिरंगा पोचवणे आणि आपला अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिन एक विशाल जनआंदोलन बनवणे हे आव्हान मोदी सरकारने लीलया पेलले. त्यामुळे अमृत महोत्सव केवळ सरकारी न राहाता विनोबा भावे यांच्या भाषेत असरकारी झाला. समाजातील प्रत्येक घटकाला राष्ट्रीय संपत्तीशी एक आपुलकी असावी यासाठी जनसहभागातून या संपत्तीचे लोकशाहीकरण व्हावे या हेतूने राजपथाचे रूपांतर कर्तव्यपथात झाले इतकेच नव्हे, तर प्रधानमंत्र्यांना मिळालेल्या भेटवस्तूंचा लिलावदेखील आता नियमित सुरू झाला आहे. पूर्वी या वस्तू निरपवादपणे तोशाखान्यात दाखल होणेदेखील विरळेच होते. देशातील विमानतळेदेखील राष्ट्रीय संपत्तीच असतात व नवनवीन ठिकाणी ती उभी करून सामान्यातिसामान्य जनांना या सुविधांचा लाभ मिळावा म्हणून कोणी कधी कल्पनादेखील केली नसावी अशा दरभंगा, देवघर, कुशीनगर अशा शहरांमध्ये विमान सुविधा आणण्यावर मोदींनी भर दिला, हे धोरण दृष्टीतील नावीन्यच म्हटले पाहिजे.
नवकल्पना राबवत असताना देशाला आत्मनिर्भरतेच्या उद्दिष्टाचे लख्ख भान आणून देणे ही मोदींची चौथी विशेषता! कोविडसारख्या आस्मानी संकटात मोदींनी देशाला आत्मनिर्भरतेकडे नेत या संकटाचे रूपांतर संधीत व संधीचे रूपांतर सोन्यात केले. भारतीय लशीची निर्मिती करून जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम राबवून जगाला अचंबित करताना शंभराहून देशांना मदतीचा हात देण्याच्या ‘व्हॅक्सिन मैत्री’ नवकल्पनेने देशाला वेगळय़ा वैश्विक उंचीवर नेऊन ठेवले. आत्मनिर्भर भारत अभियानाच्या माध्यमातून देशव्यापी योजना राबवणे व त्याद्वारे रोजगारनिर्मिती, उद्योजकता व कौशल्य विकास यांना चालना देण्याचे काम सुरू आहे. आत्मनिर्भरतेच्या या प्रक्रियेतील महत्त्वाचा टप्पा म्हणजे नुकतीच नौदलात दाखल झालेली आयएनएस विक्रांत ही युद्धनौका. कर्मदरिद्री काँग्रेस सरकारने वर्षांनुवर्षे रखडविलेला हा प्रकल्प नव्याने संकल्पित करून देशाच्या सागरी सुरक्षेच्या क्षमता विक्रमी पटीने वाढविण्याचे काम विक्रांत युद्धनौकेच्या समावेशाने झाले. भारतीय नौदलाचे जनक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्यातून प्रेरणा घेत नौदलाचा चेहरामोहरा बदलण्याचे कार्य आता सुरू आहे. देशाच्या सुरक्षिततेसाठी संरक्षणाबरोबरच पोलादनिर्मिती, पायाभूत सुविधांची उभारणी, अन्ननिर्मिती व प्रक्रिया, ऊर्जा व निर्यात क्षेत्रातदेखील भारताला आत्मनिर्भर होण्यासाठी अनेक नवकल्पनांच्या सर्जनाचे श्रेय निरपवादपणे नरेंद्र मोदींना जाते.
‘बलसागर भारत होवो, विश्वात शोभुनी राहो’ हे लक्ष्य समोर ठेवून पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या अंत्योदयाचा मार्ग मोदी सरकारने प्रशस्त केला आहे. आधुनिक काळामधील जनतेच्या आशा, आकांक्षा व अपेक्षा यांना समर्पक अशा नवकल्पना राबवत देशात नवी चेतना, नव्या आकांक्षा व स्वकर्तृत्वाविषयी विश्वास आणि राष्ट्रीय क्षमतांबद्दलची श्रद्धा निर्माण करण्याचे भीमकार्य नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात चालले आहे. देशाच्या कानाकोपऱ्यात वसलेल्या नागरिकांच्या मनात ‘ये नया भारत है’ ठसवण्यात मोदी लाट अथवा मोदी मॅजिक नव्हे तर नवकल्पनावर आधारित मोदी मेहनत यशस्वी ठरली आहे. आधुनिक भारतातील विकासाच्या राजकारणाचे शिल्पकार ठरलेल्या या प्रधानसेवकाला जन्मदिनाच्या शुभेच्छा!