राम पराडकर
“दोशी मला आवडतो. दोशींच्या वास्तुकलेत कार्बुझिएचे काहीतरी आहे. लुई कानचे काहीतरी आहे आणि स्वत:चेही काहीतरी आहे. त्यांच्या वास्तुकलेत हा तिहेरी संगम आढळतो. मला त्यांची इंडॉलॉजीची वास्तू, त्यांचे ऑफिस संगथ, गांधी लेबर इन्स्टिट्यूट वगैरे वास्तू आवडतात.” – अच्युत कानविंदे
नुकतेच ज्येष्ठ वास्तुकार बाळकृष्ण दोशी यांचे वयाच्या ९५ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या जाण्याने देशातल्या वास्तुविश्वांत मोठी शोककळा पसरली. याचं कारण त्यांचा मोठा चाहता वर्ग आहे. देशभर आणि पुण्यातसुद्धा. त्यामुळे ते गेल्यावर आपल्या घरातली एखादी ज्येष्ठ व्यक्ती जावी असे दु:ख आम्हा सर्वांना झाले.
त्यांच्यावर लिहायला बसलो आणि अच्युत कानविंदे यांचे वरील वाक्य मला आठवले. मोजक्या शब्दातली ही अर्थवाही टिप्पणी त्यांच्याविषयी बरेच काही सांगून जाते. अर्थात ही टिप्पणी जाणकार वास्तुकारांसाठीच आहे. सामान्य वाचकांसाठी एवढंच सांगतो की बाळकृष्ण दोशींना गेल्या शतकातील दोन दिग्गज वास्तुकारांच्या बरोबर काम करायला मिळाले. तेसुद्धा जागतिक स्तरावरच्या. एक कार्बुझिए, चंदीगडचा वास्तुकार, आणि दुसरा लुई कान, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, अहमदाबाद याचा वास्तुकार. असे उत्तुंग श्रेणीतले वास्तुकार गुरू म्हणून भेटणे हे दोशींचे भाग्य. तेसुद्धा तरुण वयात! आणि दोशींनी दोघांच्या वास्तुकलेतलं मर्म ग्रहण केलं आणि त्यात स्वत:ची भर टाकून ते प्रत्यक्षात साकारले. त्यांच्या स्वत:च्या वास्तुरचनांमध्ये. त्यामुळे त्यांच्या रचना एकाहून एक सरस उतरल्या. त्यांना सात दशकांहून अधिक अशी प्रदीर्घ वास्तू कारकीर्द लाभली. या कालखंडात त्यांचे १०० हून अधिक प्रकल्प साकारले. त्यांचे घर, त्यांचे ऑफिस (संगथ) त्यांनीच स्थापन केलेलं स्कूल ऑफ आर्किटेक्चर, हुसेन दोशी गुंफा, आयआयएम बंगळूरु या वास्तुरचना विशेष गाजल्या. त्यांना देशांत परदेशांत भरपूर प्रसिद्धी मिळाली. याचं मुख्य कारण या सर्व वास्तूंना एक कालातीत परिणाम लाभलेला आहे. म्हणजे त्याला शिळेपणा अजिबात आलेला नाही. चांगल्या वास्तूचे हे महत्त्वाचे लक्षण मानले जाते.
प्रकाशाची किमया
बाळकृष्ण दोशींच्या ‘वास्तूंची वैशिष्ट्ये तुला विचारली तर तू थोडक्यांत काय सांगशील’ असे मला एका मित्राने विचारले. प्रश्न म्हटला तर अवघड होता. थोडा विचार केला आणि म्हटलं की त्यांनी वास्तूमध्ये प्रकाश आत घेण्याच्या पद्धतीत अनेक प्रयोग केले. स्कूल ऑफ आर्किटेक्चरमध्ये त्यांनी नॉर्थ लाइटचा वापर केला. सहसा तो फॅक्टरीमध्ये वापरला जायचा. पण वास्तुकॉलेजमध्ये भरपूर प्रकाशाची गरज आहे हे त्यांनी ओळखले आणि नॉर्थ लाइटची योजना केली. ती त्या कॉलेजची ओळख झाली. त्यांच्या या वास्तूनंतर भारतात जागोजागी वास्तू कॉलेजेस झाली. पण एकाही कॉलेजला अशी स्वतंत्र ओळख मिळवता आली नाही. बाळकृष्ण दोशींचे हे कॉलेज एकमेव असे कॉलेज राहिले. वास्तूला ५० वर्षे होऊन गेली. वास्तू जुनीही झाली. पण प्रकाश आत घेण्याची ही पद्धत आजही टवटवीत वाटते.
‘अर्धगोलाकार व्हॉल्टमधून’ प्रकाश आत घेण्याची अनोखी पद्धत त्यांनी स्वत:च्या कार्यालयासाठी वापरली. सर्व कार्यालयाची रचना या वैशिष्ट्यपूर्ण कल्पनेभोवती झाली. त्याला वेगळेपण आले. त्यामुळे त्यांची ही रचनाही खूप गाजली. देशभरातील वास्तू महाविद्यालायांमधील विद्यार्थी त्यांच्या ‘संगथ’ या वास्तू ऑफिसला भेट द्यायचे. तसेच त्यांच्या वास्तू महाविद्यालायालाही हमखास भेट असायची. विद्यार्थ्यांना जबरदस्त ऊर्जा देण्याची क्षमता या वास्तूंमध्ये होती. नवीन वास्तुकारांनाही त्यांच्या कार्यालयामध्ये काम करायला अभिमान वाटायचा. मी स्वत: त्यांच्याकडे कधी काम केले नाही. पण आम्हा सर्वांचे ते नेहमीच स्फूर्तिस्थान राहिले होते. परवा ते गेले तेव्हा व्हॉट्सॲपवर, फेसबुकवर इतक्या पोस्टचा भडिमार झाला की त्यांची लोकप्रियता प्रकर्षाने जाणवली. क्वचितच अशी ‘लार्जर दॅन लाइफ’ अशी लोकप्रियता कोणाला लाभली असेल.
तिहेरी योगदान
त्यांचे वास्तुकलेसाठी तिहेरी योगदान आहे. एक म्हणजे त्यांनी ‘स्कूल ऑफ आर्किटेक्चर’ काढले, आणि त्याला देशातील सर्वोत्तम पातळीवर नेले. दुसरे योगदान म्हणजे वास्तुकला व्यवसायात स्वत:चा ठसा निर्माण केला. आणि तिसरे योगदान म्हणजे ‘वास्तुशिल्प फाऊंडेशन’ ही वास्तुकला संशोधन संस्था स्थापन केली. येथे वास्तुकला आणि शहरी समस्यांवर संशोधन केले जाते. अशी ही एकमेव संशोधन संस्था असावी. यापैकी एका क्षेत्रात यश मिळविणारे बरेच लोक आढळतील. पण तिन्ही क्षेत्रांत यशस्वी होणारे बाळकृष्ण दोशी हे कदाचित एकमेव उदाहरण असेल. त्यांचे यश हे असे तिहेरी आहे.
मुळात स्कूल काढणे हे येरागबाळ्याचे कामच नव्हे. समजा काढलेच तर ते यशस्वीपणे चालविणे मुश्कील आणि चालविलेच तर त्याला आयआयटी, आयआयएम या संस्थांसारखे दर्जेदार बनविणे त्याहून कठीण. पण बाळकृष्ण दोशींनी ही किमया करून दाखविली. आजही या स्कूलने आपला दर्जा टिकवला आहे.
याच परिसरात कवडीकाम केलेल्या घुमटांची एक अनोखी वास्तू आहे. हुसेन दोशी गुंफा या नावाने ती ओळखली जाते. हुसेनला एक आगळीवेगळी वास्तू करून हवी होती. हुसेनच्या अपेक्षांना दोशी खरे उतरले. ही वास्तू म्हणजे छोट्यामोठ्या अनेक घुमटांचा समूह आहे. बाहेरून पहताना फक्त या घुमटांचा समूहच दिसतो. पण आतलं अवकाश म्हटले तर सर्व एक आहे. पण वरच्या घुमटांमुळे त्या अवकाशाचे भाग झाल्यासारखे वाटतात. तसे ते अवकाश बरेचसे अंधारे आहे. इथेही दोशींना नळकांड्यांद्वारे प्रकाशाचे झोत आत घेतले आहेत. हे ठिकठिकाणी आहेत. त्यामुळे आतले अवकाश सर्व उजळून निघते. आतून हे घुमटांचे छत ‘हुसेनच्या रंगीबेरंगी रंगीत फटकाऱ्यांनी सजलेले आहेत. त्यामुळे म्हटले तर त्याला आर्ट गॅलरी म्हणता येईल. म्हटले तर त्याला संग्रहालयही म्हणता येईल. किंवा म्हटले तर ती मोकळी जागा आहे. इथे गेल्यावर अर्धा-पाऊण तास कसा जातो ते कळतही नाही. बाहेर पडताना मन भरून येते. एक सुंदर कलाकृती पाहिल्यावर येते तसे.
अशी ही ‘हुसेन दोशी गुंफा’ म्हटले तर सर्व काही आहे आणि दुसऱ्या बाजूने म्हटले तर काहीही नाही. ‘एव्हरीथिंग… नथिंग’ ही अध्यात्माची अति उच्च पातळी म्हणता येईल. हे अर्थात माझे त्यावरचे भाष्य आहे. दोशींनाही हे असे अपेक्षित असेल असे नाही.
बाळकृष्ण दोशींचा आणखी एक गुण म्हणजे त्यांनी सरस्वती आणि लक्ष्मी या दोघींनाही वश करून घेतलेले होते. या दोघी सहसा एकत्र नांदताना दिसत नाही. पण बाळकृष्ण दोशी त्याला अपवाद होते. ते फर्डे वक्ते होते. सरस्वती त्यांच्या जिभेवर नाचत असे. जीवनाविषयी, जीवनातील चढ-उतारांविषयी त्यांनी अनेक वेळेला सुंदर भाष्ये केलेली आहेत. त्यांचे एक भाष्य माझ्या चांगलेच लक्षात राहिलेले आहे. ते म्हणजे “Architecture… Celebration.” अचानक सहज आठवले म्हणून उद्धृत केले.
बाळकृष्ण दोशींना नेहमी प्रकाशझोतात राहायला आवडत होते. ‘प्रकाशझोत’ हा कदाचित त्यांचा ड्रायव्हिंग फोर्सही असावा. पण याचमुळे कदाचित त्यांच्या हातून एवढे भरघोस काम झाले असावे. अर्थात त्यासाठी लागणारी जबरदस्त इच्छाशक्तीही त्यांच्याकडे भरपूर प्रमाणात होती. याला मी ‘झपाटलेपण’ म्हणतो. दोशी हे असे झपाटलेले व्यक्तिमत्त्व होते. केव्हाही पाहा ते नेहमी उत्साही दिसत. स्वत: उत्साही असल्याने ते दुसऱ्यांच्यात उत्साह, जोश निर्माण करू शकत असत. अगदी उतारवयातसुद्धा त्यांना ही किमया साधत असे.
अशा या झपाटलेल्या बाळकृष्ण दोशी यांना जगातले बहुतांश मोठे पुरस्कार लाभले असले तर नवल नाही. त्यांना नोबल समजला जाणारा प्रिट्झकर पुरस्कार मिळाला, आरआयबीए सुवर्णपदक, आयआयए सुवर्णपदक, पद्मभूषण वगैरे सर्व पुरस्कार झाडून मिळाले. त्यांचं व्यक्तिमत्त्व असं होतं की त्यांना हे पुरस्कार मिळाल्याने पुरस्कारांचे मोठेपण वाढले.
तर अशा या बहुआयामी प्रेरणादायी बाळकृष्ण दोशींना भावपूर्ण श्रद्धांजली.