डॉ. श्रुती पानसे
शाळा नेमकी कशासाठी असते? मुलं शाळेत अभ्यास करण्यासाठी जातात; खेळण्यासाठी, विविध सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये भाग घेण्यासाठी. तसंच तिथे त्यांचं व्यक्तिमत्त्व घडावं अशीही एक अपेक्षा असते. शिक्षा करून जी व्यक्तिमत्त्वं घडतात, ती कशी असतात? आणि महत्त्वाचं म्हणजे शिक्षा नेमकी कशासाठी असते?
अभ्यास करणं ही एक अतिशय सकारात्मक गोष्ट आहे. ती आनंदाने करायला हवी. आनंद असेल, शिकण्याबद्दल उत्सुकता असेल, हाताने काही प्रयोग करून बघणं, स्वत:च्या मेंदूला चालना देणं या सगळ्या गोष्टींत मुलांना आनंद मिळतो. शाळेने जर मुलांच्या शिकण्यात आनंद आणि उत्सुकता आणली तर शिक्षा करण्याच्या वेळा निश्चितच कमी होतील; पण आपल्याकडे बहुसंख्य शाळा अभ्यास केला नाही तर किंवा अभ्यास करावा म्हणून शिक्षा देतात. मुलं अभ्यास करण्यासाठी शाळेत येतात आणि त्यांनी अभ्यास केला पाहिजे हे अगदी खरे आहे. परीक्षेत गुण मिळवणे हीदेखील त्यांचीच जबाबदारी आहे; पण ते होत नसेल तर त्याची कारणे शोधली पाहिजेत. या बाबतीत केवळ पालकांना सांगून उपयोग नाही. मूळ कारणं शोधली पाहिजेत; पण ती शोधली गेली नाहीत आणि फक्त शिक्षा होत राहिल्या तर अशा टोकाच्या शिक्षा केवळ त्या त्या शाळेला किंवा त्या संबंधित शिक्षकालाच नाही, तर संपूर्ण शिक्षणव्यवस्थेलाच टीकेचे धनी करतात. अशा प्रकारच्या टोकाच्या घटना घडतात तेव्हा प्रसारमाध्यमांमध्ये चर्चा होते. एखाद्या शिक्षकाला कायद्यान्वये शिक्षा होते आणि हळूहळू ते संपूर्ण प्रकरण मागे पडते. मात्र पुन्हा असे काही घडणार नाही याची कोणतीही शाश्वती नसते. म्हणून इथे काही प्रश्न उपस्थित केले आहेत.
हेही वाचा… ‘बीटीएस’च्या सैन्यभरतीची एवढी चर्चा का?
मुलांना वेगवेगळ्या लहान-मोठ्या कारणांसाठी, तऱ्हेतऱ्हेच्या शिक्षा केल्या जातात, तेव्हाच मुलांचे खऱ्या अर्थाने शिक्षण होते का? शिक्षा न करता शिक्षण घेताच येणार नाही का? मुलांना शिक्षा केल्या तर त्यांच्यासमोरचे प्रश्न सुटतात का? मुलांना शिकताना वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणी येत असतात, हे लक्षात घ्यायला पाहिजे. नवीन विषय, वेगळ्या संकल्पना, अवघड गणितं इत्यादी. अशा अनेक गोष्टी रोजच्या रोज मुलं शिकत असतात. इतके सगळे नवे विषय प्रत्येक तासाला त्यांना समजून घ्यायचे असतात. वर्गातल्या काही मुलांना लवकर समजेल, तर काही मुलांना उशिरा समजेल, काही मुलांना सराव पुन:पुन्हा करावा लागेल. प्रत्येक मुलाला एकाच वेळी समजणार नाही, प्रत्येकाच्या आकलनाची पातळी वेगळी असते हे समजून न घेताच जर मुलांना शिक्षा मिळत असतील तर प्रश्न फक्त त्या विषयापुरता राहत नाही. हळूहळू एकूण अभ्यासाची गोडीच कमी होते, असे वाटत नाही का? शिक्षा करून त्यांच्या अडचणी सुटतील की अजून वाढतील? शिकत असताना मागे पडलं, अडचणी आल्या, परीक्षेत मार्क कमी मिळाले तर तो गुन्हा किंवा अपराध आहे का, याचा विचार आपण लवकरात लवकर करायला हवा. गुन्हा केला तर गुन्हेगाराला शिक्षा दिली जाते. फटके मारणं, न्यायालयात न्यायाधीशासमोर उभे करणे, ते सांगतील ती शिक्षा विनातक्रार सहन करणे – अगदी तशाच पद्धतीने, अभ्यासात अडचणी असणाऱ्या लहान मुलांसोबत वागायचे आहे का? अभ्यासातले काही आले नाही म्हणून शिक्षा केली, म्हणून मूळ प्रश्न सुटला का? शिक्षा झाल्यामुळे मुलाला आत्तापर्यंत जे समजले नव्हते, ते लगेच समजेल का? किंवा ज्या चुकीच्या वर्तनासाठी शिक्षा केली ते वर्तन झटपट सुधारेल का? ‘आधी मुलांना शिक्षा करा आणि मग शिकवा’ हाच शिक्षणाचा मूलमंत्र असेल तर हाच मार्ग सोपा नाही का? आपण तोच का नाही अवलंबत?
हेही वाचा… अन्वयार्थ : दवडलेली संधी
शिक्षा करणे – अंगावर हल्ला करणे ही कोणती संस्कृती आहे जी शाळेत शिकवली जाते? यातून मुलं नक्की काय बोध घेतात? मुलं मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या दुखावतील अशा प्रकारच्या शिक्षा शिक्षकांनी करू नयेत, यासाठी शिक्षकाचे स्वत:च्या मनावर नियंत्रण हवेच. शिक्षकांना नेमके काय मानसिक ताण असतात, त्यावर ते योग्य पद्धतीने उपचार घेतात का हे पाहणेसुद्धा महत्त्वाचे असते. कोणत्याही परिस्थितीत शिक्षकाचे, म्हणजेच प्रौढांचे ताण लहानग्यावर येणे हे योग्य नाही. वास्तविक शाळेत मुलांना केल्या जाणाऱ्या शिक्षा कायद्याने बंद केल्या आहेत. कित्येक शाळा या कायदा पाळतात; पण तरीही हे पूर्णपणे थांबलेलं नाही. अजूनही मुलांना प्रत्यक्ष शिक्षकच शाळेत मारहाण करतात, हे नोएडा इथे घडलेल्या प्रसंगावरून दिसून येते. त्यातून मुलांना गंभीर जखमा होणं आणि कधीकधी कोवळ्या मुलांचे मृत्यू हेसुद्धा घडते. अशा वेळी प्रश्न पडतो, की कायदा काहीही असो, शिक्षकांनी स्वत:हून शिक्षेवर बंदी घालायला हवी की नको? आज शिक्षाविरोधी कायदा असूनही अशा घटना घडतात, याचा अर्थ नक्की काय समजायचा?
हेही वाचा… अग्रलेख : शहरबुडी आली..
मॉन्टेसोरी मॅडम यांनी म्हटले आहे,की शाळेतलं वातावरण निर्भय असले पाहिजे. बहुतेक वेळा मुलांना शाळेतल्या शिक्षकांची भीती वाटते. शिक्षकांची करडी नजर, हातातली छडी, शिस्तीचा अवाजवी धाक, शिक्षा, परीक्षा या सगळ्या गोष्टींमुळे शाळेतले वातावरण मुलांसाठी भीतीदायक झालेले असते. मुलं दडपणाखाली असतात. ज्याला शिक्षा केली त्याच्यावर त्या शिक्षेचा काय परिणाम होतो हे बघायला हवे. त्या दृष्टीने शाळेत शिक्षकांनी मुलांचा शारीरिक, मानसिक आणि भावनिक अपमान करणे, हे अत्यंत वाईट आहे. ज्या वेळेस मुलं शिक्षा भोगतात, त्या वेळेस त्यांच्या वृत्ती पूर्ण नकारात्मक होतात. शिक्षा भोगत असताना मुलांचा अपमान होतो. मुले जसजशी मोठी होतात, त्या वेळीही जर शिक्षा अशाच चालू राहिल्या तर पुढे मुलांना त्या शिक्षांचे काही वाटेनासे होते. कोवळ्या वयात मात्र या शिक्षा त्यांच्या संपूर्ण व्यक्तिमत्त्वासाठी हानीकारक ठरतात.
हेही वाचा… विश्लेषण: पुण्यात अचानक इतका पाऊस का पडला? तब्बल ३३९ टक्के अतिरिक्त पाऊस पडण्यामागे कारण काय?
अनेक शिक्षकांना असं वाटू शकते की, मुलांना शिक्षा केल्या नाहीत तर मुले डोक्यावर बसतील. वर्गात काहीही शिकवता येणार नाही. परंतु मुलांना अभ्यासाला प्रवृत्त करण्यासाठी किंवा योग्य वर्तनाकडे नेण्यासाठी मानसिक आणि शारीरिक शिक्षा करण्याऐवजी वेगळे मार्ग आहेत. मात्र त्यासाठी शिक्षकांनी स्वत:वर थोडे काम करायला हवे. त्यासाठी ज्या गोष्टीविषयी समस्या आहे ती समस्या कोणत्या पद्धतीने सुटेल, एवढेच अग्रक्रमाने बघायला हवे. हे केले तर शिक्षेची वेळच येणार नाही. जर मुलांना आपल्याला योग्य दिशेने न्यायचे असेल, तर त्यांच्यात सकारात्मक परिणाम कसे होतील, हे आपल्याला बघावे लागेल.
आपली नक्की काय चूक झाली हे समजण्यासाठी नुसतं ओरडून किंवा संतापून चालणार नाही. तर ते नीट सांगावं लागेल. ही एक गोष्ट स्पष्टपणे न सांगण्यामुळे मुलं आपल्याला शिक्षा का झाली असावी याचा अंदाज करत राहतात आणि मग पुढच्या वेळी अगदी नक्कीच तीच चूक पुन्हा केली जाते. अभ्यास किंवा वर्तन, कोणत्याही संदर्भात मुलांना आपली खरीखुरी चूक काय झाली हे कळायला हवं. एरवी काय होते, की मुलं रागावणं ऐकून घेतात आणि सोडूनही देतात. तसंच मुलं अगदी मार खातात, वेदना सहन करतात. पण म्हणून आपली चूक काय झाली हे काही त्यांना नीटसे कळत नाही. किंवा कळलं तरी ते त्यावर विचार करत बसत नाहीत. कारण त्यांच्या वतीने विचार करण्याचं काम मोठ्या लोकांनी आधीच करून टाकलेले असते. मुलांनी फक्त आज्ञा ऐकण्याचे काम करायचे असते. त्यामुळे मुलं विचार करत बसत नाहीत आणि जर त्यांनी विचार करणे थांबवले तर त्यांच्यात अपेक्षित बदल होत नाहीत. म्हणून सर्वांत आवश्यक आहे ते त्यांच्याशी त्यांच्या चुकांबद्दल बोलणे, त्यांच्याशी संवाद साधणे, चूक सुधारली तर त्यांचेच हित आहे हे त्यांना सांगणे, कारण आपला अंतिम उद्देश तर तोच आहे. ते सांगताना चिडून, संतापून कसे चालेल? हे काम अतिशय शांतपणे आणि संपूर्णपणे मुलांच्या हितासाठी करायचे आहे. कारण अभ्यास ही आनंददायी आणि सकारात्मक गोष्ट आहे. ती तितक्याच सकारात्मकतेने व्हायला हवी.
ishruti2@gmail.com
(लेखिका मेंदुविकासतज्ज्ञ आहेत.)