– प्रकाश अ. जोशी

“तुझ्या गोळ्या, माझ्या गोळ्या, दोघे मिळुनी घेऊ सगळ्या…” एका ट्रीपमध्ये सहजपणे म्हटलं गेलेलं हे विडंबनकाव्य व्हॉटस्ॲपवर ऐकल्यानंतर असं वाटलं की बऱ्याच जणांच्या आजच्या बिघडलेल्या शारीरिक आरोग्यावरचं विदारक भाष्य या काव्यातून व्यक्त केलं गेलय. समारंभ, गेट टुगेदर, ट्रिपा यानिमित्ताने एकत्रितपणे केलेला सकाळचा ब्रेकफास्ट आटोपला की साठीसत्तरीकडे झुकलेल्यांची ‘गोळ्या’ घ्यायची लगबग सुरू होते, एकमेकांना गोळ्यांची ‘आठवण’ आठवणीने केली जाते. दुर्दैवाने त्यात गोळी न घेणारा ‘औषधापुरताही’ सापडत नाही. सध्या ज्येष्ठत्वाकडे झुकलेल्यांबरोबरच तरुण पिढीच्या बाबतीत असं काय घडतंय किंवा घडून गेलंय की असा कायमस्वरुपी औषधी ‘गोळीबार’ इतक्या प्रचंड प्रमाणात बोकाळू शकला?

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

गेल्या काही दशकांपासून मंद पावलाने समाजाची वाटचाल आर्थिक समृद्धीकडे होऊ लागली. बरोबरीनं सर्वच खाद्यपदार्थ सदासर्वकाळ मिळू लागले. समाजमनात चंगळवाद रुजायला लागला. जिभेवरचा ताबा सुटू लागला. आवडते पदार्थ नजरेला पडताच ते हादडले जाऊ लागले. देहाचं आकारमान गरगरीत होऊ लागलं, ढेऱ्या सुटायला लागल्या. बदललेली आधुनिक जीवनशैली आपले प्रताप दाखवू लागली. खाण्याच्या पदार्थांची रेलचेल, बैठंकाम, व्यायामावर पूर्ण काट अशी आरोग्याच्या शत्रूंची अभद्र युती ही शरीरस्वास्थाला बाधा आणण्याचं आवतण देणारीच ठरली. पुढे आयुष्यभर ठाण मांडणाऱ्या व्याधीविकारांची ही नांदी होती. मधुमेह, रक्तदाबासारख्या व्याधींचा शिरकाव शरीरात कधी झाला याचा सुगावाही लागू शकला नाही. ठणठणीत तब्येतीचे पूर्वजांपासूनचे बुरुज ढासळू लागले.

हेही वाचा – व्हॉट्सॲपवर चालणारं तालिबानी सरकार रोखणार कसं?

चोरपावलांनी शरीरात शिरणारे आणि नंतर आयुष्यभर ठाण मांडणारे, मधुमेह आणि रक्तदाब हे मुळात रोग नाहीत, तर आधुनिक जीवनशैलीशी निगडीत असलेल्या व्याधी आहेत. या व्याधी अयोग्य आहार आणि व्यायामाचा अभाव यामुळेच शरीरात मूळ धरतात, हे एक सर्वज्ञात सत्य आहे. दोनही व्याधींचा शरीरात झालेल्या शिरकाव्याच्या सूचना शरीर आपल्याला विविध मार्गांनी देतच असतं.

वास्तविक अशा एखाद्या व्याधींचा शिरकाव शरीरात झाल्याची लक्षणं जाणवताक्षणीच काही काटेकोर उपायोजना केल्यास सुरुवातीलाच या विकाराला कदाचित आळा बसू शकतो. दुर्दैवाने असला कुठलाच उपाय न योजता वा आहारविहाराबद्दल कोणतीही चर्चा न करता गोळ्यांचा जीवनभराचा रतीब सुरू केला जातो. काहीही खा, व्यायाम करा अथवा करू नका पण गोळ्या खा आणि जगा असा अलिखित संदेश रुग्णापर्यंत पोहोचवला जातो. दिवसाला एक-दोन गोळ्यांनी सुरू झालेला प्रवास, गोळ्यांची ‘उसळ’ होईपर्यंत वाढत जातो. सुरुवातीला अशी अपेक्षा असते की असाच उलटा प्रवास घडून येईल आणि एखाद-दोन गोळ्यांवर तो थांबेल. पण दुर्दैवाने असं घडत नाही वा घडणारही नाही.

आहार-विहाराकडे दुर्लक्ष

याचं कारण औषधोपचारांच्या जोडीला आवश्यक असलेला योग्य व्यायाम आणि संतुलित आहार सुचवला जात नाही वा सुचवला तरी आचरला जात नाही. परिणामी जडलेल्या व्याधींमध्ये वाढच होत जाते आणि कालांतराने व्याधी आटोक्याबाहेर जाऊ लागतात. त्या पुन्हा आटोक्यात आणण्यासाठी औषधांची मात्रा दर खेपेला वाढवली जाते. हळूहळू हृदय, मूत्रपिंडे, यकृत, डोळे अशा महत्त्वाच्या अवयवांवर परिणाम होऊ लागतो. गोळ्यांची यादी वाढू लागते, ट्रीटमेंटची विविधता बदलत जाते. यासर्वांतून औषधांवरचं परावलंबित्व वाढत जातं. औषध कंपन्यांनी मांडलेल्या बाजाराची भरभराट होत जाते, मार्केटिंगची टार्गेट सहजी पूर्ण होत जातात आणि एक दुष्टचक्र जन्माला येतं. ॲलोपॅथिक औषधांच्या उपयुक्त गुणांबरोबरच त्यांचे काही दुष्परिणामही असतात. पण या विषयावर चर्चा वा त्याबद्दलची माहिती यांना गौणत्व दिलं जातं. औषधांच्या अशाप्रकारच्या उपद्रवी अवगुणांवर मात करण्यारी औषधे अर्थातच तयार असतात आणि यातूनच औषधाला औषधं जोडणारी मालिका तयार होत जाते. दुष्टचक्राची व्याप्ती वाढू लागते.

या लेखाचा उद्देश हा ॲलोपॅथीवर निव्वळ टीका करणं हा अजिबात नाही. उलट कुठल्याही आजारापासून तात्काळ मुक्ती ही फक्त ॲलोपॅथीच्या उपचारांनीच मिळू शकते, ही वस्तुस्थिती कोणीच कधी नाकारणार नाही. ॲलोपथीचे उपचार वेळच्यावेळी मिळत गेल्याने सर्वांचीच आयुर्मर्यादा निश्चितपणे वाढलेली आहे, हेदेखील एक सत्य आहे. तथापि व्याधीग्रस्तांना हळूहळू पडणारा भरमसाठ (की अनावश्यक?) औषधांचा विळखा जो दिवसेंदिवस घट्ट होत जातोय, तो काही प्रमाणात तरी सैल होत जावा, तोदेखील अत्यंत सोप्या मार्गांनी, हा या लेखामागचा उद्देश आहे. प्रश्न असा की विधात्याने अतिशय कल्पकतेनं, विचारपूर्वक निर्मिलेला आपला देह इतका कमकुवत, लेचापेचा, तकलादू असा खरोखरच आहे का, की ज्याला अन्नाप्रमाणेच कायमस्वरुपी औषधांची गरज भासावी?

विश्लेषणात्मक दृष्टिकोनातून पाहिल्यास मानवी देहाचं यंत्र लहान मोठ्या आजारापासून कायम संरक्षित रहावं, यासाठी शरीराअंतर्गत संरक्षणयंत्रणा कार्यान्वित केलेली असते. कोणत्याही रोगाचा प्रतिकार करण्याचा अंगभूत गुण म्हणजे रोगप्रतिकारक शक्ती. सकस आहाराबरोबरच जीवनशैलीत बदल करून रोगप्रतिकारक शक्ती वाढवता येते. याशिवाय शरीरात अनेक ठिकाणी संरक्षणयंत्रणा शरीररक्षणाचे कार्य बजावित असतात. अन्नग्रहण करताना घेतलेल्या घासात एखादा केस चुकून जरी गेला, तरी घास चघळणच नव्हे तर तोंडात ठेवणंदेखील मुष्कील होऊन जातं. केस काढल्यानंतरच घास गिळता येतो. तोंडातल्या जिभेवरचे चवीचे उंचवटे इतके संवेदनाशील असतात की घेतलेला घास गिळण्यायोग्य आहे की नाही ते ही चवीची केंद्रं ठरवतात. एखादा नको असलेला पदार्थ चुकून पोटात गेलाच तर उलटी होऊन तो त्वरीत बाहेर टाकला जातो. तर डोळ्यात एखादा धुळीचा कण गेला तर प्रतिक्षिप्त क्रियेने लगेचच डोळ्यांत मोठ्या प्रमाणात पाणी साठवलं जातं आणि या जमा झालेल्या पाण्यावाटे धुळीचा कण डोळ्याबाहेर आपसूक काढला जातो. शरीरावर झालेली लहानमोठी जखम आपोआप भरून यायची क्षमतादेखील शरीरात असते. काही कारणाने शरीरात झालेला बिघाड हा विश्रांती घेऊन किंवा लंघन करून दुरुस्त होऊ शकतो. थोडक्यात, शरीराचा नैसर्गिक कल हा आजारपणातून व्याधीमुक्तीकडे जाणारा असाच शेवटपर्यंत कायम असतो. म्हणूनच साध्याशा उपचारांनी बऱ्याचदा शरीर व्याधीमुक्त होऊ शकते.

ॲलोपॅथी, होमिओपॅथी आणि आयुर्वेद या आपल्याकडे उपलब्ध असलेल्या उपचारपद्धती आहेत. मात्र यातल्या प्रत्येकात परिपूर्णतेचा अभाव आढळून येतो. ॲलोपॅथीमध्ये शक्य असलेली शस्त्रक्रिया वा रुग्णाला त्वरीत आराम मिळवून देणारा औषधोपचार उरलेल्या दोनही उपचार पद्धतींत उपलब्ध नाही. तर असाध्य ठरलेल्या “क्रोनिक” कॅटॅगरीत बसणाऱ्या आजारांवर आयुर्वेदात वा होमिओपॅथीत उपाय सापडू शकतो. ॲलोपॅथीमधल्या पॅथालॉजिच्या परीक्षणातून शरीरात झालेल्या बिघाडाचे किंवा अनारोग्याचे निदान होऊ शकते. त्यानंतर ॲलोपथीच्या औषधांनी झालेला बिघाड आटोक्यात आणून मगच आयुर्वेद वा होमिओपथीच्या उपचारांनी व्याधीमुक्तीकडे मार्गक्रमण करता येऊ शकते. तथापी आहार, व्यायाम आणि गरज भासल्यास औषधोपचार हाच आरोग्याचा मूलमंत्र आहे, हे मात्र जाणीवपूर्वक लक्षात ठेवायला हवं.

किमान वज्रासन तरी करा…

आहारात केलेला बदल वा चालण्यासारख्या व्यायामाचा केलेला अंतर्भाव याला शरीराकडून मिळणारा प्रतिसाद अचंबित करणारा असाच असतो. आहारात करायच्या बदलाची सुरुवात भूकेची संवेदना नसताना खाद्यपदार्थ पोटात ढकलणं पूर्णत: टाळून करता येऊ शकते. फास्ट फूड, इन्स्टंट फूड, चिप्स्, वेफर्स, खाखरा अशाप्रकारच्या चविष्ट पदार्थांमध्ये मिठाचं प्रमाण खूप जास्त असतं. याचा विपरित परिणाम रक्तदाबावर होऊ शकतो. म्हणूनच अशा पदार्थांपासून लांब राहिलेलंच चांगलं. भूकेशिवाय वारंवार केलेली खादाडी म्हणजे मधुमेहासारख्या व्याधीविकाराला आमंत्रण समजायला हवं. याचं भान ठेवूनच घास घ्यावा. अती तेलकट, तुपकट, खारट पदार्थ वर्ज्य करावेत. शिवाय संतुलित आहाराला आवश्यक असलेल्या चालण्यासारख्या व्यायामाची जोड द्यावी. व्यायामाने नवी उर्जा मिळते, मन आनंदी होतं, दिवसभर उत्साही वाटतं, शरीर निरोगी रहायला मदत होते. ज्या गुडघ्यांवर संपूर्ण शरीराचा भार पेलवला जातो, त्या गुडघ्यांच्या स्वास्थ्यासाठी वाचन करताना वा टीव्ही बघताना किंवा जेव्हा जमेल तेव्हा मांडी घालूनच बसावं. दिवसाच्या कोणत्याही प्रहरी करता येण्यासारखं योगासनांतलं एकमेव आसन म्हणजे वज्रासन. सकाळी अंथरुणातून बाहेर यायच्या आधीच पाच मिनिटं वज्रासनात बसून मगच दिवसाची सुरुवात करावी. हे आसन एखाद महिना सातत्याने केल्यानंतर शरीरात होणारे सुखद बदल आपल्याला जाणवू लागतात. पचनक्रिया सुधारते. मन स्थिर होतं, दिवसभर प्रसन्नता लाभते.

आपल्याकडची योगविद्या आणि वैविध्य असलेली आरोग्यकारक खाद्यसंस्कृती याला जगात तोड नाही. आपल्या नेतृत्वाने दरवर्षी २१ जून रोजी ‘योगदिवस’ साजरा करण्यासाठी केलेले प्रयत्न फळास आले आणि जगभरातल्या जनमनात योगविद्येचं महत्त्व कसं ठसलं आहे, हेही दिसू लागलं. सुदृढ शरीरसंपदा मिळवण्यासाठी व राखण्यासाठी व्यायामाला योगासनं आणि प्राणायामाची जोड महत्त्वाची ठरतेच, अन् त्यांच्या आचरणाने आत्मिक सुखाचा आनंद अनुभवता येतो. शिवाय आहाराचा विचार करताना आपल्याकडली खाद्यविविधता नजरेसमोर ठेवून योग्य अशा पोषक खाद्यप्रकारांची निवड व आखणी करावी.

हेही वाचा – कोणाचे ‘खडे’, कोणाची ‘मिठागरे’?

लोकसंख्येच्या तुलनेत आपल्या बरोबरीत असलेला चीन आपल्या शेजारचा देश. पर्यटनाच्या निमित्तानं माझी चीनवारी झाली. चीनीजनतेच्या आरोग्याविषयी माझ्या मनात प्रश्नांची चळत होती. या प्रश्नांची थोडीफार उकल आमच्या चीनी टीम लीडरमुळे काहीप्रमाणात होऊ शकली. आरोग्याला बाधा आणणाऱ्या मीठ, साखर, दारू आणि सिगारेट या चार वस्तूंची निर्मिती आणि वितरण यावर सरकारचे पूर्ण नियंत्रण आहे. यामुळे अशा वस्तूंची उपलब्धता मर्यादित स्वरुपातच असते. औषधांच्या किमती आपल्या देशाच्या तुलनेत कैक पटींनी जास्त आहेत. शिवाय आरोग्यसंदर्भातल्या सर्व सेवाही प्रचंड महाग आहेत. म्हणूनच या देशात आजारी पडणं हे मोठ्या संकटासमान मानलं जातं. अशा परिस्थितीत एकच पर्याय चिनी जनतेसमोर उपलब्ध असतो, तो म्हणजे तब्येत आरोग्यपूर्ण राखणं आणि त्याचं जतन करणं. तोच पर्याय निवडून शरीरस्वास्थ्याबद्दलची जागरुकता चिनी जनतेने बाणवलेली जाणवते.

आपणही स्वखुषीने आपला देह आरोग्यसंपन्न व सशक्त राखायचा प्रयत्न सातत्त्याने करू या! आणि सुरुवातीच्या विडंबन काव्यात थोडासा बदल करून म्हणूया… ‘तुझ्या गोळ्या, माझ्या गोळ्या; मिळुनी कमी करू या सगळ्या’!

(pajoshi51@hotmail.com)