अशोक राजवाडे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

कतारमध्ये सुरू असलेल्या विश्वचषक फुटबॉल सामन्यातल्या दोन घटनांविषयी आजच्या बातम्या लक्ष वेधून घेणाऱ्या आहेत. इराणच्या फुटबॉलपटूंनी आपल्या देशाचं राष्ट्रगीत गायला नकार दिला- त्याऐवजी हे सारे पुरुष फुटबॉलपटू फक्त उभे राहिले- ही पहिली गोष्ट. सप्टेंबर महिन्यात महासा अमिनी या बावीस वर्षांच्या तरुणीचा मृत्यू झाल्यावर स्त्रियांच्या हिजाबच्या सक्तीच्या मुद्द्यावरून इराणमध्ये मोठा संघर्ष सुरू झाला. आज या अभूतपूर्व संघर्षात आबालवृद्ध महिला आणि आता हे पुरुष खेळाडूसुद्धा एकूणच पुरुष-वर्चस्वी आणि कठोर-धर्मी शासनाला विरोध करताना दिसत आहेत. इराणच्या खेळाडूंनी न डगमगता या संघर्षातल्या स्त्रियांना जो पाठिंबा दिला आहे त्याचं आपण प्रथमतः स्वागत करायला हवं.

विशेष म्हणजे या संघर्षाला रूढ अर्थाने कोणी नेता नाही. स्त्रिया या चळवळीत अग्रस्थानी आहेत; न घाबरता हिजाबची होळी करत आहेत; केस कापून आगीत टाकत आहेत; तरुण आणि शाळकरी मुलीसुद्धा यात तडफेने भाग घेत आहेत हे दृश्य जगभरच्या स्वातंत्र्याकांक्षी स्त्रियांचा उत्साह वाढवणारं आहे. जगाच्या इतिहासात कदाचित प्रथमच असं दृश्य दिसतंय -आणि तेही एका मुस्लीमबहुल देशात – की एका देशव्यापी उठावात स्त्रिया पुढे आहेत आणि पुरुष त्यांच्यामागे मोठ्या संख्येने उभे आहेत. हे इथल्या सावित्रीच्या लेकींना बळ देणारं आहे. मात्र यात आठ वर्षांच्या मुलापासून मोठ्यांपर्यंत शेकडो माणसांना आपले प्राण गमवावे लागले आहेत आणि काही हजार माणसं कैदेत आहेत हे वास्तव दु:खद आहे; तिथल्या राजवटीच्या क्रूरतेबद्दल घृणा निर्माण करणारं आहे.

एकूणच राष्ट्रगीत, राष्ट्रध्वज किंवा तत्सम ‘राष्ट्रीय’ प्रतीकं, त्यामागची मानवी मूल्यं पायदळी तुडवून जर कोणी जनतेवर लादू लागलं तर त्यांचं काय करायचं असतं हे कतारमध्ये आलेल्या इराणी फुटबॉल खेळाडूंनी दाखवून दिलं आहे. आपल्याकडे राष्ट्रवादाच्या नावाखाली बोकाळलेला बहुसंख्याकवाद (मेजॉरिटेरियनिझम) जेव्हा डोकं वर काढतो तेव्हा आपल्या इथल्या प्रचलित राष्ट्रीय प्रतीकांबद्दल जे बेफाम प्रेम उसळून येतं त्याची या वेळी आठवण न आली तरच नवल.

दुसरी बातमी ‘वन लव्ह’ दंडपट्टी वापरण्याविषयी आहे. ‘एलजीबीटीक्यूप्लस’ समूहाला पाठिंबा दर्शवण्यासाठी कतारमधल्या सामन्यांत इंग्लंड, वेल्स, बेल्जियम, नेदरलँड्स, डेन्मार्क, जर्मनी या सहा फ़ुटबॉल संघांनी अशी दंडपट्टी वापरण्याचा निर्णय घेतला होता. प्रसंगी त्यासाठी दंड झाला तरी तो भरण्याची तयारी या संघांनी दाखवली होती. पण कतारच्या कठोर नियमांना हा दंड पुरेसा नव्हता. त्यामुळे खेळाडूंना माघार घ्यावी लागली. (कतारमध्ये समलैंगिकता हा शिक्षेस पात्र अपराध मानला जातो.) काही का असेना; या बातमीमुळे एलजीबीटीक्यूप्लस समूहांना पाठिंबा देण्यासाठी एक नवं प्रतीक अस्तित्वात आहे हे आपल्याला समजलं हेही कमी नाही. तेव्हा भविष्यात या समूहांना अधिकाधिक पाठिंबा मिळेल अशी आशा बाळगायला हरकत नाही.

स्त्री, पुरुष आणि विषमलिंगी आकर्षण असणाऱ्या व्यक्तींपलीकडे जे विविध समूह सर्वत्र असतात त्यांचं वर्णन ‘एलजीबीटीक्यूप्लस’ किंवा तत्सम शब्दांत केलं जातं. (तृतीयपंथीयसुद्धा यात येतात. गूगल किंवा तत्सम गुरुजींना विचारल्यास या आद्याक्षरांतून कोणते समूह सूचित होतात याचं उत्तर मिळेल.) या सर्वांना माणूस म्हणून प्रतिष्ठा आणि समान वागणूक मिळावी यासाठी विविध मानवकेंद्री संघटना जगभर काम करत असतात.

तेव्हा फिफा फ़ुटबॉल आंतरराष्ट्रीय स्पर्धांत घडलेल्या या दोन्ही घटना आपल्यात नवी उमेद निर्माण करणाऱ्या आहेत. केशवसुतांची ‘नव्या मनुतील नव्या दमाचा शूर शिपाई आहे…’ ही कविता अनेकांनी शाळेत वाचली असेल. ‘जिकडे जावे तिकडे माझी भावंडे आहेत, सर्वत्र खुणा माझ्या घरच्या मजला दिसताहेत’ अशी एक ओळ त्यात आहे. नव्या युगाच्या शूर शिपायाला जग कसं दिसतं ती जाणीव या कवितेत व्यक्त झाली आहे. या घटनांबद्दल वाचताना या संपूर्ण कवितेची, आणि विशेषत: या ओळीची आठवण अपरिहार्य आहे.