पंकज फणसे
माणसाच्या निवृत्तीचं वय किती असतं हो? ६०… ७०… फार फार तर ७५ वर्षे! त्यानंतर पैलतिरी डोळे लावून मोक्षाची वाट पाहणे हीच दिनचर्या! मात्र एक खटाटोपी महाशय वयाच्य ९६ व्या वर्षी कृत्रिम बुद्धिमत्ता या आजच्या पिढीच्या तंत्रज्ञानाने प्रभावित होतात, ९८व्या वर्षी गूगलच्या माजी अध्यक्षांबरोबर पुस्तक लिहून नवीन तंत्रज्ञानाच्या धोक्यांची जाणीव करून देतात आणि आपल्या मृत्यूच्या एक महिना आधी “अमेरिका आणि चीन यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता या प्रश्नावर एकत्र येण्याची गरज आहे, अशी अपेक्षा व्यक्त करतात. या महाशयांचे नाव आहे- हेन्री किसिंजर! तब्बल ७० वर्षांपेक्षा अधिक काळ जागतिक राजकारणात ठसा उमटविल्यानंतर त्यांनी जाता जाता मानवजातीला कृत्रिम बुद्धिमत्तेबाबत जागे करण्याचा प्रयत्न केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

किसिंजर यांनी २०१६ मध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेविषयीच्या एका चर्चासत्राला हजेरी लावली होती. या चर्चासत्रातून त्यांच्या मनातील कुतूहूल जागे झाले. वयोपरत्वे आलेले शहाणपण आणि आण्विक शस्त्रबंदीसाठी प्रयत्न करण्याचा पाच दशकांचा दांडगा अनुभव याच्या जोरावर किसिंजर यांनी तंत्रज्ञानाचा विकास आणि सामाजिक प्रभाव याची सांगड घातली. एआयच्या तत्त्वज्ञानाबाबत प्रश्न उपस्थित केले. १५ व्या शतकातील मुद्रण यंत्राच्या शोधानंतर ज्ञानप्रसार सुलभ झाला. या ज्ञानप्रसाराची परिणती युरोपमधील सामाजिक प्रबोधना(रेनेसाँ)मध्ये झाली. कसिंजर यांच्या मते सामाजिक प्रबोधन, पर्यायाने मुद्रणयंत्राचा शोध हे आजच्या उदारमतवादी जागतिक व्यवस्थेचे उगम स्थान आहे. तर्क आणि सद्सद्विवेक बुद्धी हा आजच्या सामाजिक व्यवस्थेचा पाया आहे. मात्र २१ व्या शतकातील तंत्रज्ञानात्मक क्रांतीमुळे या सामाजिक-राजकीय व्यवस्थेवर दूरगामी परिणाम होण्याची शक्यता वर्तवताना किसिंजर चिंता व्यक्त करतात. काहीशा गूढ आणि अनाकलनीय विदा आणि अल्गोरिदम यावर विसंबून असणाऱ्या, नैतिकता आणि तत्त्वज्ञानाच्या बैठकीचा अभाव असणाऱ्या यंत्रचलित जागतिक व्यवस्थेकडे आपण वाटचाल करत आहोत. इंटरनेटचा हेतू हा निरंतर प्रसरण होणाऱ्या माहितीची साठवण आणि हाताळणी हा आहे. तंत्रयुगात मानवी बौद्धिक क्षमता ‘मानवता’ हरवत चालली आहे. माणसे विदा होत आहेत आणि विदा राज्य करत आहे.

आणखी वाचा-काश्मीरकडे ‘नेहरूंची घोडचूक’ म्हणून पाहाणं ही बौद्धिक अपरिपक्वता… 

एआयला पुरविली जाणारी विदा संदर्भ आणि संकल्पनात्मक आकलन यांच्या खोलात जात नाही. त्वरित उत्तरांची भूक शमविण्यासाठी एआयद्वारे इतिहास आणि तत्वज्ञानात्मक आकलनाशिवाय विदावापर केला जात आहे. विदेचे प्रणालीवर आधारित विश्लेषण वाढत असून त्यामुळे सत्य सापेक्ष होऊ लागले आहे. माहितीचा अतिरेक विवेकाला तिलांजली देण्यास कारणीभूत ठरत आहे. उदाहरणार्थ – शीतयुद्धादरम्यान १९६२ मध्ये बी – ५९ या सोव्हिएत पाणबुडीला क्युबामध्ये संचार करत असताना अमेरिकी नौदल आक्षेपार्ह कृती करत असल्याचा संशय आला. सोव्हिएत कॅप्टनने पाणबुडीवरील आण्विक टॉर्पेडो डागण्याचा आदेश दिला. मात्र आणखी एका वरिष्ठ नौसैनिकाने या आदेशाला सहमती दर्शविली नाही. त्यामुळे टॉर्पेडो डागणे तर टळलेच, मात्र त्याहून महत्त्वाचे म्हणजे जग तिसऱ्या महायुद्धापासून बचावले. किसिंजर प्रश्न उपस्थित करतात जग जेव्हा स्वयंचलित आणि कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित शस्त्रास्त्रांचा विचार करते तेव्हा हा जो मानवी विवेक आहे तो कृत्रिम बुद्धिमत्तेच्या गळी कसा उतरविणार? केवळ अल्गोरिदम आणि विदा आकृतीबंध यांच्या आधारे निर्णय घेतला गेला असता तर जग विनाशाच्या दरीत लोटले गेले असते. एआयचा निर्णय प्रणालीनुसार चुकीचा नसेलही, पण त्यामुळे मानवजातीचे अस्तित्व धोक्यात येऊ शकते, अशी भीती किसंजर यांनी व्यक्त केली.

औद्योगिक क्षेत्रात गेल्या ५० वर्षांहून अधिक काळ अस्तित्वात असलेले स्वयंचलन (ऑटोमेशन) कृत्रिम बुद्धिमत्तेपेक्षा कसे वेगळे आहे हे स्पष्ट करताना किसिंजर सांगतात- स्वयंचलन निर्धारित उद्दिष्टे साध्य करण्याचा मार्ग आहे. ज्यामध्ये अस्तित्वात असलेल्या साधनांचा प्रभावी आणि किफायतशीरपणे वापर केला जातो. मात्र एआय स्वत: उद्दिष्ट निधार्रित करते. इतकेच काय तर उद्दिष्ट प्राप्तीची व्याख्या सुद्धा एआय स्वत:च निर्धारीत करते. एआय जात्याच अस्थिर आहे. एकूण एआय पूर्वनियोजित निष्कर्ष प्रकाशित करते. हे करताना एआय मानवी विचारप्रक्रिया आणि मूल्यांमध्ये फेरफार करण्याची भीती नाकारता येत नाही. एआय पूर्वनिर्धारित निष्कर्षापर्यंत पोहोचेल तरी त्याच्या निष्कर्षाचे तार्किक स्पष्टीकरण देण्याची क्षमता मात्र एआय व्यासपीठाकडे नाही. निष्कर्ष आणि तर्क यांचा अभाव हे एका वेगळ्याच मागासलेपणाचे लक्षण आहे. मानवी संस्कृतीचा इतिहास पाहिला तर अगदी भीमबेटकाच्या गुंफाचित्रांपासून, इजिप्तच्या पिरॅमिड्सपर्यंत सॉक्रेटिस पासून महात्मा गांधींपर्यंत सर्वांनी समकालीन विश्वाचा अर्थ लावण्याचा आपापल्या परीने प्रयत्न केला. मध्ययुगात तो अर्थ धर्माच्या संकल्पनेत गवसला तर प्रबोधन काळात तार्किक विचारसरणीमध्ये! २० व्या शतकात ‘विचारसरणी’ जागतिक परिस्थितीचे चित्रण करत होती. मात्र एआय भविष्यात आपल्याला कोणत्या मार्गावर नेईल, याचे उत्तर अज्ञात आहे. जर तार्किक शक्ती गमावली तर मानवी ‘जाणीवेची’ (कॉन्शियस) आणि पर्यायाने सामाजिक- राजकीय व्यवसथेची वाटचाल एकाअर्थहीन अस्तित्वाकडे सुरू होईल.

आणखी वाचा-सुब्रह्मण्य भारतींची स्मृती जपणारा ‘भारतीय भाषा दिवस’…

नियमनाबद्दल भाष्य करताना कसिंजर यांचा अनुभव दांडगा ठरतो. गेल्या सात दशकांतील आण्विक प्रसारबंदी आणि विशस्त्रीकरण कार्यक्रमामध्ये किसिंजर महत्त्वाचे साक्षीदार ठरले आहेत. आण्विक तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यांच्यात सांगड घालताना किसिंजर म्हणतात, दोन्ही तंत्रज्ञान विनाशकारी, युगप्रवर्तक आहेत. २० वे शतक अणुशक्तीचे होते. तर २१ वे शतक कृत्रिम बुद्धिमत्तेचे असेल.

दुसऱ्या महायुद्धानंतर तत्कालीन महाशक्ती -अमेरिका आणि सोव्हिएत युनियन यांनी चर्चेद्वारे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला. त्याचप्रकारे सध्याच्या भू-राजकीय परिस्थितीत ही जबाबदारी अमेरिका आणि चीनची आहे. मात्र त्याचवेळी जोपर्यंत सोव्हिएत अण्वस्त्रसज्ज होऊन अण्वस्त्रांच्या बाबतीत अमेरिकेशी बरोबरी करत नव्हता, तोपर्यंत दोन्ही देशांमध्ये आण्विक नियमनाबाबत कोणतेही भरीव काम झाले नाही. त्याचप्रकारे अमेरिका आणि चीन दोन्ही राष्ट्रे एआय तंत्रज्ञानाबाबत समानपातळीवर येणार नाहीत तोपर्यंत एआय नियमनाची आशा धूसर आहे. एआयच्या जटिलतेबद्दल किसंजर सांगतात की आण्विक तंत्रज्ञानासाठी इंधन, अणुचाचणी, वितरण प्रणाली आदी भौतिक गोष्टी गरजेच्या होत्या मात्र एआय केवळ डिजिटल स्वरूपात अस्तित्वात आहे. एआयचा अण्वस्त्रांच्या तुलनेत खासगी क्षेत्राकडून केला जाणारा विकास आणि वापर, नियमनासाठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे.

किसिंजर यांच्या उमेदीचा काळ अण्वस्त्रांच्या उदयाचा साक्षीदार ठरला. आयुष्याच्या संधीकाळात त्यांनी कृत्रिम बुद्धिमत्तचे मोती वेचले. दोन शतकांतील दोन युगप्रवर्तक तंत्रज्ञानांना कवेत घेणारे पितामह भीष्मांप्रमाणे प्रदीर्घ कारकीर्द असलेले किसिंजर जाता जाता विनाशाचा इशारा तर देऊन गेलेले नाहीत ना, याचा विचार व्हायला हवा.

लेखक जवाहरलाल नेहरू विद्यापीठात रिसर्च स्कॉलर असून तंत्रज्ञान आणि आंतरराष्ट्रीय संबंध हा त्यांच्या अभ्यासाचा विषय आहे.

phanasepankaj@gmail.com