योगेश पटवर्धन

काल रात्री रोजच्या प्रमाणे दहाच्या बातम्या पाहायला बसलो आणि सगळी च्यानले नागपुरातील महल या जुन्या गर्दीच्या परिसरात घडलेल्या दगडफेकीच्या घटनेची, पेटवल्या गेलेल्या वाहनाची, फोडलेल्या काचांची, वरून फेकलेल्या दगड विटांची दृश्ये आणि माहिती सांगत आणि कोणाच्या काय प्रतिक्रिया आहेत हे पुन्हा पुन्हा आणि तेच तेच सांगण्यात गुंतली होती.

शांतता राखा आणि अफवांवर विश्वास ठेऊ नका या पलीकडे कुणी जबाबदारीने बोलले नाही. सगळे नको ते घडून गेल्यावर परिस्थिती नियंत्रणात आहे हे पालुपद आळविले जात होते. तो वाद उघड उघड दोन धर्मांतील होता, मात्र ही दोन गटांत झालेली हाणामारी आहे, असे सांगितले जात होते. आपल्या उच्च परंपरा आठवून शांतता राखा असे सांगणाऱ्या शांतीदूतांनी आपल्या पक्षातील वाचाळवीरांना वेळीच आवरले असते, तर अधिक बरे झाले असते.

औरंगजेबाची कबर गेली किमान अडीच तीन शतके औरंगाबादेत, म्हणजे आताच्या संभाजी नगर परिसरात आहे. मुस्लीम धर्मात मृतदेह दफन करण्याची पद्धत आहे. औरंगजेब हा राजा होता, तो दीर्घायुषी होता आणि जवळपास सात दशके त्याचा अंमल त्या काळच्या अर्ध्याहून अधिक हिंदुस्थानावर होता. त्याची राजवट जुलमीच होती. मागील ५०० वर्षांचा इतिहास पाहिला तर २५० वर्ष मोघल, निझाम, इंग्रज दीडशे वर्ष आणि भारत स्वतंत्र झाल्यावर काँग्रेस ६० वर्ष अशी ढोबळ विभागणी होते. नाव हिंदुस्तान असले तरीही संपूर्ण भारतावर एकछत्री हिंदू अंमल कधीही नव्हता.

जो याच मातीत जन्माला आला, सत्ता राबवली आणि इथेच मृत्यू पावला त्याची कबर इथे असण्यात मान खाली जावी असे काहीही नाही. सुमारे ४५ वर्षांपूर्वी मी शाळेत असताना वेरूळ अजिंठा, दौलताबाद, औरंगाबाद अशा सहलीला गेलो होतो. ही ठिकाणे ऐतिहासिक, कलात्मक वास्तू इत्यादी असल्याने इतिहासाचे शिक्षक बरोबर होते. तेव्हा त्यांनी वाटेत लागणारी औरंगजेबाची कबर आवर्जून दाखवली होती. राजांच्या पराक्रमाचे प्रतीक म्हणून ती दाखविली गेली. ती पाहिली म्हणून आम्हला पालक ओरडले नाहीत, की त्या गुरुजींना जाब विचारला नाही. त्यामुळे आता म्हणजे छावा सिनेमा पाहिल्यावर ती पाडून टाकू, उखडून फेकू ही भाषा सामाजिक स्वास्थ्य बिघडवणारी आहे. औरंगजेबाचा मृत्यू शिवाजी महाराजांच्या आधी झाला असता तर त्यांनी ही असे काही होऊ दिले नसते. याच संदर्भात आणखी दोन दाखले देता येतील.

अफजल खानाच्या वधानंतर, त्याच्या देहाची विटंबना होऊ न देता, राजांनी पुरेशा गांभीर्याने तो मृतदेह दफन केला. श्रीरामाने रावणाचा वध केल्यानंतर त्याच्या देहाला नमस्कार केला होता आणि प्रदीर्घ स्वगत केले होते. लक्ष्मणाला बजावले, ही वेळ उन्माद करण्याची नाही, तो ही एक सम्राट होता आणि शंकराचा भक्त. जे घडले ते अटळ होते, ते विवेचन फार अर्थपूर्ण आहे. रामायण मालिकेत ते आजही पाहायला मिळते. असा गौरवास्पद वारसा आहे या भूमीला. उठता बसता श्रीरामाचे आणि शिवाजी महाराजांचे नाव घेणाऱ्यांनी अश्या बेछूट मागणीला समर्थन देणे योग्य ठरणार नाही. संसदेचे किंवा विधानसभेचे अधिवेशन सुरू झाले की असे विषय पुढे येतात आणि मूळ मुद्दे, आजचे प्रश्न आपोआप दूर ढकलले जातात, ही प्रथा गेल्या तीन-चार वर्षांत रुजली आहे.

ती कबर ऐतिहासिक वारसा यादीत असल्याने तिचे संवर्धन, संरक्षण ही जबाबदारी केंद्राच्या आदेशाने राज्यांवर सोपवली आहे. त्यालाही ५० वर्षे उलटली. इच्छा असो अथवा नसो, पण ते एक वैधानिक कर्तव्य आहे. दांडगाई करून ती जर पाडली गेली तर न्यायालय हस्तक्षेप करेल आणि सरकारला जबाबदार धरेल यात काही शंका नाही. त्यामुळे कबर शाबूत राहील आणि इतरत्र दंगली उसळून दोन्हीकडचे शेकडो निष्पाप मारले जातील. उखडून फेकण्याची भाषा झाली पुण्यात, दंगल नागपुरात आणि कबर संभाजीनगरमध्ये. संभाजी राजांना औरंगजेबाने अनन्वित हाल करून मारले ही बाब छावा सिनेमामुळे उघड झाली असे मुळीच नाही, अगदी छोट्यात छोट्या चरित्रात सुद्धा त्याविषयीची माहिती आहे. छावा याच नावाची मराठी कादंबरी ६० वर्षांपूर्वी प्रकाशित झाली आणि त्याच्या हजारो प्रती घरोघरी आजही आहेत. वाचनालयातून घरी नेऊन त्यांची पारायणे करणारे लाखो वाचक आहेत. मराठी नाटककार वसंत कानेटकर यांनी संभाजी महाराजांच्या जीवनावर दोन नाटके सुमारे ६० वर्षांपूर्वी लिहिली. त्यांचे शेकडो प्रयोग झाले, त्या नाटकाचे नावच इतके समर्पक होते की ते वाचूनच अंगावर काटा यावा…. ‘इथे ओशाळला मृत्यू’ प्रभाकर पणशीकर त्यात औरंगजेबाची भूमिका करत. म्हणून कुणी चिडून त्यांच्यावर हात उगारला नाही.

वाईट व्यक्तींचे समर्थन करणारे आजही आहेत, पूर्वीसुद्धा होते आणि पुढेही असतील. अलीकडची काही उदाहरणे- नराधम वाल्मिक कराडला अटक झाल्याच्या निषेधार्थ झुंडीने समर्थक पोलीस ठाण्यात गेले आणि बीड बंदची आरोळी देत बाजारपेठ बंद केली. पुण्यात गजा मारणे याची तुरुंगातून जामिनावर सुटका झाली म्हणून शेकडो गाड्या भरून समर्थक तुरुंगापाशी जमले आणि सात-आठ किलोमीटर पल्ल्याची विजयी मिरवणूक पोलिसांची परवानगी न घेताच काढली, त्यांना रस्ता मोकळा करून देण्यासाठी वाहतूक पोलीस धावाधाव करत होते.

१२-१५ वर्षांपूर्वी ऐन संक्रांतीच्या मुहूर्तावर तामिळनाडूत जय ललिता सरकारच्या कार्यकाळात एका शंकराचार्यांना, खून, बलात्कारच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती आणि त्यांचे समर्थक पोलिसांवर धाऊन गेले होते, ते संत आहेत त्यांना अटक करू नका ही त्यांची मागणी होती. त्यांनी अत्याचार, खून केला तर चालेल, कारण ते कुठल्यातरी गादीवर आहेत म्हणून? आसाराम बापूंना सर्व साक्षी पुरावे तपासून, बचावाची पूर्ण संधी देऊन न्यायालयाने शिक्षा सुनावली, तेव्हाही त्यांचे समर्थक निषेध करत रस्त्यावर आले होते आणि अन्याय झाला म्हणत, एक प्रकारे न्यायव्यवस्थेला आव्हान देत होते. थोडे मागे जाऊ.

१९९० च्या दशकात मुंबईत टोळी युद्धाचा भडका उडाला होता. खंडणीखोर गुंड एकमेकांवर भर रस्त्यात, भर दिवसा पिस्तुले चालवत मुडदे पाडत होते, तर काही पोलिसांच्या चकमकीत मारले जात होते. ‘अब तक ५६’चा तो काळ. मन्या सुर्वे, तांडेल, कोळी, अशोक जोशी, सतीश राजे इत्यादी. त्यानंतर बरीच वर्षे मुंबईच्या मोठमोठ्या दैनिकांत त्यांच्या पुण्य स्मरणाचे जाहिरातवजा फोटो आवर्जून पाहायला मिळत, आणि खाली तुमचे उत्तुंग कार्य (म्हणजे खंडणी वसुली) आम्ही असेच चालू ठेवू. शोकाकुल मित्र परिवार आणि कुटुंबीय. भायखळा मित्र मंडळ. हे सगळे काय असते?

वर उल्लेख केलेल्या व्यक्ती देवदूत होत्या की रामाचे अवतार, त्यांचेही समर्थक होतेच ना. मुस्लीम चालकाच्या रिक्षेत बसू नका, त्यांच्याकडून वस्तू/ सेवा घेऊ नका, मटन- चिकन घेऊ नका, गाड्या दुरुस्त करून घेऊ नका, मिठाई, दूध, सुका मेवा, अत्तर, चप्पल, जोडे, गॉगल, कपडे, शोभेच्या वस्तू इत्यादी घेऊ नका, त्यांची व्यावसायिक कोंडी करा अशी कुजबूज गेली दोन-तीन वर्षे चालू होतीच. आता ती उघडपणे होऊ लागली आहे. गावोगावचे हे रस्त्यावरचे अनधिकृत (तेही मुसलमानांचे) मार्केट कुणामुळे, कोणाच्या आशीर्वादाने, हप्तेखोरीने फोफावले, अतिक्रमण हटाव गाडी येणार ही खबर कोण कुणाला पुरवते? अतिक्रमण पथकाने जप्त केलेला माल, वजन काटे, हातगाड्या चिरीमिरी घेऊन कोण सोडवते? हे एकदा गृह खात्याने तपासावे. ही व्यावसायिक (मुसलमान) तरुणाई हटवली तर ती जागा हिंदू बेरोजगार तरुण घेतील का? याचे उत्तर मला आणि तुम्हालाही नक्कीच ठाऊक आहे.

कालच्या नागपूरच्या उद्रेकात सुदैवाने जीवितहनी झाली नाही. पण वित्तहनी खूप झाली. आता एक दुचाकी वापरण्यायोग्य करायची तर, ५० हजार खर्च करावे लागतील, चारचाकी असल्यास किमान एक लाख. हे सगळे कुणामुळे? विमा कंपन्या हे दावे स्वीकारतील का? ज्या महल भागात ही दंगल उसळली, तिथेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय आहे. त्याचे धुरीण आता सांगतात औरंगजेबाची कबर पाडणे हा विषय आमच्यासाठी महत्वाचा नाही, ही आमची मागणी नाही, मग हे चार दिवस आधी का नाही बोललात? गृहमंत्री म्हणतात, ही दंगल पूर्वनियोजित होती. तुम्ही तिथले माजी महापौर ना… मग बजरंग दल, विश्व हिंदू परिषद यांना का नाही आवरले? तिथले पोलीस आयुक्त म्हणतात पूर्वनियोजित असे काही नसावे… हा विरोधाभास अनेक प्रश्न निर्माण करतो. हेरचे लोक होते, तर त्यांना कुठे आग लावायची हे कसे कळले? शिमगा संपला, वणवा भडकला, त्याचे कवित्व पाडव्यापर्यंत सुरू राहील.

ysp230863@gmail.com