आपल्याकडे आजकाल कशाचेही राजकारण होते. अमुकच एक विषय पाहिजे असे नाही. सध्या पुतळ्याचे राजकारण सुरू आहे. ते सगळे किती अतार्किक, निरर्थक आहे हे सहज कळते. पण वळत नाही. कारण आपल्याला एकमेकांना दोष द्यायला, गरळ ओकायला रोज नवे विषय हवेच असतात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुळात थोर व्यक्तीविषयी आदर दाखविण्यासाठी पुतळ्याची गरज आहे का? भव्य पुतळा म्हणजे खूप आदर असे समीकरण आहे का? त्या महान व्यक्तीविषयी आपल्या निष्ठा, श्रद्धा, आदर दाखविण्यासाठी पुतळा उभारणे हे एकमेव साधन आहे का? तर मुळीच नाही. पुतळा उभारून आदर कसा व्यक्त होतो, हे समजण्याच्या पलीकडचे आहे. मुळात या बहुतेक पुतळ्यांची आठवण फक्त जयंती, पुण्यतिथीलाच होते. एरवी ते अनाथ असतात. त्यांना या दोन दिवशी घातलेले हार सुकून, निर्माल्य होऊन कोमेजतात. या पुतळ्यांवर धूळ साचलेली असते. आजूबाजूचा परिसर बहुतेकदा अस्वच्छ असतो. कुणी देखभाल करण्याची जबाबदारी घेत नाही. बहुतेक पुतळे बिचारे बेवारसासारखे ताटकळत असहाय उभे असतात.

आणखी वाचा- आर्थिक उन्नती म्हणजे सामाजिक उन्नती नव्हे

मुळात या भव्यदिव्य पुतळ्यांमागचे तर्कट काय हा खरा प्रश्न. पुतळे हे स्फूर्तिदायक असतात हा एक युक्तिवाद. पण कोणताही पुतळा पाहून कुणाला स्फूर्ती मिळाली, अंग चेतून उठले, आयुष्य बदलले, सन्मार्गी लागले असे ऐकण्यात वाचनात आले नाही! काही भव्यदिव्य पुतळे हे प्रेक्षणीय स्थळ म्हणून विकसित केले जातात. गुजरात येथील सरदार पटेल यांचा प्रेक्षणीय अतीभव्य पुतळा हे ताजे उदाहरण. पुतळ्यांच्या नादी न लागता उभारलेले विवेकानंद यांचे कन्याकुमारी येथील स्मारक उल्लेखनीय. हे अन् असे काही मोजके अपवाद सोडले तर कोट्यवधी रुपये खर्च करून पुतळे उभारावेतच कशासाठी, कुणासाठी हाच प्रश्न पडतो.

अनेक रस्त्यांवरचे पुतळे तर रहदारीत अडथळा निर्माण करणारे असतात. जेव्हा ते उभारले गेले तेव्हाची परिस्थिती वेगळी असणार. आता शहरे वाढली. वाहनाची संख्या तर कितीतरी पटीने वाढली. पण पुन्हा लोकभावनेचा आदर राखायचा म्हणून रस्त्यात अडचण निर्माण करणारे हे पुतळे (अन् काही धार्मिक स्थळे सुद्धा) हटविण्याची कोणाचीही हिम्मत होत नाही. अनेक जागा योग्य त्या परवानग्या न घेताच बळकावलेल्या असतात. समाजात तेढ निर्माण होऊ नये म्हणून सरकारी यंत्रणा त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करते!

पुतळे उभारण्यातही जाती, धर्म, वर्ग, पक्ष यांचे राजकारण असते हे आता लपून राहिलेले नाही. पुतळे, त्यांची उंची, निर्माण स्थळ, त्यासाठी होणारा अवाढव्य खर्च हादेखील आता अस्मितेचा प्रश्न झाला आहे. पुतळ्यांना धर्म, जात चिकटवून नवे राजकारण केले जाते. त्या महनीय व्यक्तींच्या आचारविचारांशी, तत्त्वांशी, त्यांनी निर्माण केलेल्या आदर्शांशी कुणालाच काही देणे घेणे नसते. अमुक वर्गाला, पक्षाला आपली अस्तित्वाची पोळी भाजून घ्यायची असते. हा गलिच्छ प्रकार असतो. हे सामान्य जनतेलाही आता माहीत झाले आहे. पण या राजकारणी गुंड, झुंडशाहीपुढे जनतादेखील हतबल झाली आहे. आपण सारे या प्रवाहात वाहत चाललो आहोत. परिस्थिती आता नियंत्रणाबाहेर गेल्यासारखी झाली आहे.

आणखी वाचा-आधुनिक भारतीय राजकीय विचारवंत आहेत कुठे?

आपल्याला तथाकथित महनीय व्यक्तींचे, पुढाऱ्यांचे, त्यांच्या आचारविचारांचे, तत्वाचे खऱ्या अर्थाने स्मरण करायचे असेल, त्यांचे आगळेवेगळे स्मारक जतन करून ठेवायचे असेल तर त्यांच्या नावे आदर्श शाळा कॉलेजेस निर्माण करावीत. तेथील ग्रंथालयांत अशा व्यक्तींचे विचार जपणारी चरित्रे, आत्मचरित्रे, इतर ग्रंथ याचे छान दालन निर्माण करावे. त्यांच्या नावे गोरगरीबांसाठी उत्तम सोयी असलेले रुग्णालय उभारावे. वृद्ध व्यक्तींसाठी आश्रम बांधावेत. युवकांसाठी खेळाचे मैदान, फिरण्यासाठी उद्याने उभारावीत. थोर व्यक्तीचे जीवन, विचार, तत्त्व यांचा प्रसार करणारे, स्मृती जपणारे संग्रहालय निर्माण करावे. विज्ञानाचा प्रसार करणारे प्रदर्शन निर्माण करावे. हे सारे सृजनात्मक कार्य आहे. त्याने त्या व्यक्तीच्या स्मृती अधिक चांगल्या पद्धतीने जपल्या जातील. पुतळ्यांमुळे नव्हे!

आता तर दहीहंडी, मराठी साहित्य संमेलन यासारखे सार्वजनिक, समाजहिताचे कार्यक्रमदेखील पूर्ण राजकीय झाले आहेत. पैसे, देणग्या देऊन काहीही विकत घेता येते अशी ही लोकशाही आहे! कोणत्या उद्देशाने लोकमान्य टिळक अन् त्यावेळच्या अन्य समाज पुरुषांनी गणेश उत्सवासारखे सोहळे सुरू केले ते आठवून बघा. अन् आज त्या कार्यक्रमाला आलेले स्वरूप, त्यातून निर्माण होणारे ध्वनिप्रदुषण, रहदारीतील अडथळे, त्यातील पक्षीय राजकारणाचा शिरकाव, त्यापायी होणारी पैशांची उधळण हे आठवून बघा. समाजातील हे स्थित्यंतर चांगले किती,वाईट किती, सृजनात्मक किती, विघातक किती याचा विचार करण्याची वेळ आली आहे. काळानुरूप बदल होणे स्वाभाविक आहे. ते स्वीकारले पाहिजेत. पण त्या प्रत्येक कृती मागची सामाजिक, सांस्कृतिक उपयुक्ततादेखील नव्याने, विवेकाने तपासली पाहिजे. जे चुकीचे ते पुनश्च सामाजिक चळवळीनेच सुधारले पाहिजे.

आणखी वाचा-महिला अत्याचारांचे राजकारण होतच राहील…

खरे पाहिले तर गेल्या काही दशकांतील तांत्रिक सुधारणांमुळे, वेगाने प्रगत झालेल्या दळणवळण, दूरसंचार, संगणक क्रांतीमुळे आपले सामाजिक, आर्थिक जीवन कितीतरी पटींनी सुधारले आहे. शिक्षण, आरोग्य, मनोरंजन, दूरसंपर्क अशा सर्वच बाबतींत मानवजात अभूतपूर्व, सुखावह क्रांती अनुभवते आहे. तरीही समाजात शांती नाही. संघर्ष आहे. अत्याचार, बलात्कार, धर्म-जाती भेद, हे सगळे नको त्या प्रमाणात जगभर वाढले आहे. हा विरोधाभास थक्क करणारा आहे. या समस्या कुठल्याही प्रमेयाने, समिकरणाने, एआयने सुटणाऱ्या नाहीत. त्या विवेकाच्या पायावर उभारलेल्या वैचारिक क्रांतीनेच सुटतील.

मराठीतील सर्व विशेष लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Is there a need for a statue to show respect for a great person mrj