प्रतिस्पर्ध्यावर टीका केली नाही, तर राजकारणात टिकून राहणं जवळपास अशक्यच. पण विरोधकांचे वाभाडे काढताना अनेकदा भले भलेही पायरी सोडून खाली उतरतात. कलंक या शब्दावरून गेले काही दिवस गदारोळ सुरू असला, तरी अशा वादाची ही पहिली वेळ नाही आणि कलंक हे आजवरचं सर्वांत असभ्य विशेषणही नाही. शारीरिक व्यंगांवरून, खासगी जीवनावरून, वर्तनातील विरोधाभासांवरून किंवा कधीकधी काहीही संबंध नसतानाही अनेकांना असभ्य, अश्लील विशेषणांचा मारा सहन करावा लागला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बोचरी, पातळी सोडून केलेली टीका हे राजकारणातलं अघटीत अजिबातच नाही, ती परंपराच आहे. फरक फक्त एवढाच, की पूर्वी अशी टीका केवळ उत्स्फूर्त भाषणं, जहाल लेखन एवढ्यापुरतीच मर्यादित होती. आता अशा संज्ञा खास तयार करवून घेतल्या जात आहेत. समाजमाध्यमांच्या सहाय्याने या संज्ञांचा प्रचार, प्रसार करण्याचा एक मोठा व्यवसाय उभा राहिला आहे. बाकी राजकारणाची पातळी होती तीच आहे. कलंकवादाच्या पार्श्वभूमीवर बोचऱ्या संबोधनांची आजवरची परंपरा जाणून घेणं संयुक्तिक ठरेल…

माळावरचा महारोगी

लोकमान्य टिळक आपल्या जहाल लेखणी आणि वाणीसाठी ओळखले जात, मात्र त्यांच्या या वाणीची झळ गोपाळ गणेश आगरकरांनाही बसली. आधी स्वातंत्र्य मिळवून नंतर सामाजिक सुधारणा कराव्यात, असा टिळकांचा आग्रह होता. मात्र आधी सामाजिक सुधारणा करण्यावर आगरकर ठाम होते. त्यातून दोघांमध्ये निर्माण झालेल्या वितुष्टाने पुढे टोक गाठलं. सुधारक साप्ताहिक चालविण्याचा खर्च, सामाजिक सुधारणांचा व्याप, फर्ग्युसन महाविद्यालयाच्या प्राचार्य पदाची जबाबदारी या धबडग्यात आगरकरांचं शरीराकडे दुर्लक्ष झालं होतं. त्यातून त्यांना असलेला दम्याचा विकार बळावला. या शारीरिक व्याधीवरून त्यांना लक्ष्य करत टिळकांनी त्यांचा उल्लेख माळावरचा महारोगी असा केला होता.

हेही वाचा – मी भारताला ‘प्रगतीपथावरील देशांचा’ भक्कम पाठीराखा मानतो – पंतप्रधान नरेंद्र मोदी

निपुत्रिक आणि व्हाण

आचार्य अत्रेंचे अग्रलेख आणि त्यातून त्यांनी केलेलं शरसंधान सर्वांच्याच परिचयाचं आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील त्यांचं योगदान मोलाचं होतं, मात्र याच संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांना अत्रेंचे वाग्बाण झेलावे लागले. दैनिक मराठामध्ये त्यांनी ‘निपुत्रिक यशवंतरावांच्या हाती महाराष्ट्राची धुरा’ अशा मथळ्याचं वृत्त प्रसिद्ध केलं होतं. त्यावर यशवंतरावांनी चले जाव चळवळीदरम्यान गर्भवती असलेल्या त्यांच्या पत्नी वेणू यांना पोलिसांनी मारहाण केल्याचं, त्यात त्यांना बाळ गमावावं लागल्याचं आणि गर्भाशयाला कायमस्वरूपी इजा झाल्याचं अत्रे यांना कळवलं. त्यानंतर अत्रे यांनी उभयतांची भेट घेऊन दिलगिरी व्यक्त केल्याचं सांगितलं जातं.

अत्रे शब्दांशी अतिशय लीलया खेळत. आपल्या या कौशल्याचा प्रयोग त्यांनी यशवंतराव चव्हाणांवर केला होता. यांच्या आडनावातून च काढून टाकला तर काय उरेल, असा प्रश्न अत्रेंनी केला होता.

गुंगी गुडिया

इंदिरा गांधी पंतप्रधानपदाच्या सुरुवातीच्या काळात काहीशा गोंधळलेल्या असत. त्यामुळे विरोधक त्यांच्यावर टीका करत. १९६९चा केंद्रीय अर्थसंकल्प मांडताना तर त्या पुरत्या गांगरल्या होत्या. त्यावरून केवळ विरोधीपक्षानेच नव्हे, तर पक्षाअंतर्गत विरोधकांकडूनही त्यांची प्रचंड टिंगल केली गेली. राम मनोहर लोहिया यांनी त्यांना गुंगी गुडिया म्हटलं. त्यानंतर बराच काळ त्यांना याच विशेषणाने हिणवलं जात असे. मात्र इंदिरा गांधीनी ही टीका झेलत स्वतःच्या नेतृत्व आणि वक्तृत्वात आमूलाग्र बदल केले. पुढे हीच गुंगी गुडिया आयर्न लेडी म्हणून ओळखली जाऊ लागली. सोनिया गांधी यांनी राजकारणात पदार्पण केलं तेव्हा त्यांचीही गुडिया म्हणून खिल्ली उडविली गेली होती, मात्र पुढे प्रदीर्घ काळ त्यांनी पाक्षाची धुरा खंबीरपणे सांभाळली.

मैद्याचं पोतं

बाळासाहेब ठाकरेंनी अनेकांना अनेक विशेषणं लावली आणि काहींच्या मागे ती कायमची चिकटली. ठाकरे आणि पवार यांच्यातील राजकारणापलीकडच्या मैत्रीचे अनेक किस्से सांगतिले जात. शरद पवार यांच्या स्थूल शरीरयष्टीवरून त्यांना चिडवताना ठाकरे अनेकदा भाषणात त्यांचा उल्लेख मैद्याचं पोतं म्हणून करत. त्यांना ते कोणाच्याही हाती न येणारा तेल लावलेला पहिलवानही म्हणत.

लखोबा लोखंडे

हे बाळासाहेबांनी दिलेलं आणखी एक टोपण नाव. छगन भुजबळ हे शिवसेनेचे पहिल्या फळीतील नेते होते, पहिले आमदारही होते. मात्र विरोधीपक्षनेतेपद न मिळाल्याने नाराज झालेल्या भुजबळ यांनी १९९१ मध्ये १६ आमदारांसह काँग्रेमध्ये प्रवेश केला. बाळासाहेबांनी विचारल्यानंतरही आपण शिवसेनेसोबतच रहाणार असल्याचे सांगून अखेरच्या क्षणी पक्षांतर केल्यामुळे बाळासाहेब त्यांचा उल्लेख लखोबा लोखंडे म्हणून करू लागले. लखोबा लोखंडे हे आचार्य अत्रे यांच्या तो मी नव्हेच या प्रसिद्ध नाटकातलं एक फसवणूक करणारं पात्र होतं. त्यावरून बाळासाहेब भुजबळ यांचा त्या नावाने उल्लेख करू लागले. नुकतीच त्यांनी शरद पवार यांची साथ सोडून अजित पवार यांच्यासह भाजपशी हातमिळवणी केल्यानंतर त्यांना चिकटलेल्या या विशेषणाची चर्चा पुन्हा सुरू झाली होती.

कोंबडी चोर, घरकोंबडा

नारायण राणे हे त्यांच्या तरुणपणी चेंबूर परिसरात राहत. तिथे त्यांनी काही कोंबड्या चोरल्याचा किस्सा सांगितला जातो. त्यांचा तिथे पोल्ट्री व्यवसाय होता, असेही सांगितले जाते. राणे अगदी लहान वयातच शिवसेनेत आले आणि पुढे मुख्यमंत्रीही झाले. उद्धव ठाकरे यांच्या वाढत्या वर्चस्वामुळे नाराज होऊन त्यांनी २००५ साली शिवसेना सोडली. तेव्हापासून बाळासाहेब ठाकरे कोणत्याही भाषणात राणे यांचा उल्लेख कोंबडी चोर किंवा सापाचं पिल्लू असाच करू लागले. आजही राणे यांनी उद्धव ठाकरे किंवा शिवसेनेवर टीका केली की कोंबडी चोर असे लिहिलेली मोठाली होर्डिंग्ज लावली जातात. याला प्रत्युत्तर म्हणून राणे कुटुंबीय उद्धव यांचा उल्लेख घरकोंबडा असा करतात.

बेबी पेंग्विन आणि म्याव म्याव

राणे कुटुंबीय उद्धव आणि आदित्य ठाकरे यांच्यावर टीका करण्याची संधी सोडत नाहीत. मुंबईतील जिजामाता उद्यानात पेंग्विन आणण्यासाठी आदित्य ठाकरे आग्रही होते. त्यांच्या या प्रकल्पाची खिल्ली उडवत राणे कुटुंबीय त्यांना नेहमीच बेबी पेंग्विन म्हणून संबोधतात. मध्यंतरी विधानसभेचं अधिवेशन सुरू असताना आदित्य ठाकरे विधानभवनात आले असता पायरीवर उभ्या असलेल्या नितेश राणे आणि त्यांच्या समर्थकांनी त्यांची म्याव म्याव असा आवाज काढत खिल्ली उडविली होती.

विषारी साप

कर्नाटकात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उल्लेख विषारी साप असा केला होता. या सापाच्या विषाची परीक्षा घ्यायला जाल, तर मृत्यू अटळ आहे, असं ते म्हणाले होते. त्यावरून भाजपने खरगे यांच्याविरोधात तीव्र टीका केली होती. नंतर त्यांनी मी विचारसरणीवर टीका केली होती, असे सांगत सारवासारव केली.

मौत के सौदागर

२००७ मध्ये गुजरात विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान सोनिया गांधींनी नरेंद्र मोदी यांचा उल्लेख मौत के सौदागर असा केला होता. याला २००२ साली झालेल्या गोध्रा दंगलींची पार्श्वभूमी होती. यावरून मोदींनी सोनिया गांधींवर प्रतिहल्ला चढवत, त्या संसदेवर हल्ला करणाऱ्यांना वाचविण्यासाठी असे आरोप करत आहेत, अशी टीका केली होती.

मौनी बाबा, नपुसक, कठपुतली

अमित शहा माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचा उल्लेख अनेकदा मौनी बाबा असा करत. ‘मौनी बाबांनी मोदींपेक्षा अधिक परदेशवाऱ्या केल्या, मात्र ते तिथे जाऊन काही बोलतच नसत, त्यामुळे त्यांच्या परदेश भेटींची कधी चर्चाच झाली नाही,’ असे ते म्हणत. सामनाच्या अग्रलेखातून मनमोहन सिंग हे निष्क्रिय असल्याची टीका करण्यात आली होती आणि त्यात त्यांचा उल्लेख नपुसक असा करण्यात आला होता. ते केवळ एक कठपुतली असल्याचेही म्हटले होते.

पप्पू आणि फेकू

२०१४च्या लोकसभा निवडणुकांच्या वेळी अमित शहा यांनी राहुल गांधी यांच्यासाठी पप्पू हे संबोधन वारंवार वापरलं होतं. पप्पूला वाटतं की पंतप्रधानपद हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे, असं ते भाषणात म्हणत. याला प्रत्युत्तर म्हणून काँग्रेसने नरेंद्र मोदींसाठी फेकू ही संज्ञा पुढे आणली. गुजरातच्या विकासाचं जे वर्णन केलं जातं, त्यात तथ्य अजिबात नाही असा दावा या फेकू शब्दातून करण्यात आला होता. राहुल गांधी यांचा उल्लेख मोदी यांनी अनेकदा शहजादा असाही केला आहे. भारत जोडो यात्रेनंतर मात्र राहुल यांना अशा विशेषणांनी संबोधणे बंद झाल्याचे दिसते.

हेही वाचा – रिपब्लिकन पक्षाकडून शिवसेना, राष्ट्रवादी काय शिकणार?

अनपढ राजा, सिरफिरा सीएम

केजरीवाल यांनी दिल्ली विधानसभा निवडणुकांच्या प्रचारादम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव न घेता अनपढ राज्यकर्त्यामुळे बेरोजगारी आणि महागाई वाढत असल्याचा उल्लेख केला होता. त्यावर दिल्लीतील भाजप प्रवक्ते हरिश खुराना यांनी केजरीवाल यांचा उल्लेख करदात्यांचे पैसे वाया घालवणारा सिरफिरा सीएम असा केला होता.

हाताला लकवा

‘फायलींवर तीन-तीन महिने सह्या केल्या जात नाहीत. सत्तेत बसलेल्यांचे हात सही करताना थरथरतात का? त्यांच्या हाताला लकवा भरला आहे की काय, बघायला पाहिजे,’ अशी टीका शरद पवार यांनी केली होती. त्यांनी कोणाचेही नाव घेतले नसले, तरीही त्यावेळी पृथ्वीराज चव्हाण हे मुख्यमंत्री होते, त्यामुळे वाग्बाणांचा रोख कोणाकडे होता, हे पुरेसे स्पष्ट झाले होते.

पलटू राम, कुर्सी कुमार, मौसम वैग्यानिक

नितीश कुमार यांची राजकीय भूमिका बदलण्याची सातत्याने वृत्ती आणि येन केन प्रकारे सत्तेत राहण्याचे कसब यामुळे त्यांना पलटू राम, कुर्सी कुमार म्हटले जाते. मौसम वैग्यानिक म्हणूनही त्यांची खिल्ली उडवली जाते.

ही मासलेवाईक उदाहरणं पाहता, राजकीय नेत्यांनी परस्परांचा येथेच्छ समाचार घेणं नवीन नसल्याचं आणि त्याला पक्ष वा विचारसरणीच्या मर्यादाही नसल्याचं स्पष्ट होतं. टीकेचा दर्जा घसरला आहे, असं म्हणता येणार नाही कारण पूर्वीची राजकीय भाषाही तोडीस तोड असभ्य होती. कित्येक दशकं उलटली तरीही राजकारण काही सभ्यतेच्या आसपासही फिरकताना दिसत नाही. सत्तेचा माज, राजकारणातलं साचलेपण, स्पर्धेतली अमानुषता कमी होत नाही. असं का होतं? नेते हे आपल्यातलेच काही मोजके असतात. प्रश्न असा आहे की आपण समाज म्हणून सभ्य आहोत का? काळानुसार अधिक सभ्य, सहिष्णू होण्याचा प्रयत्न करत आहोत का? आक्रस्ताळे वैयक्तिक हल्ले करण्यापेक्षा मुद्द्यांवर आणि तेही शिष्टाचार पाळून बोलण्याएवढी आपली प्रगती झाली आहे का? समाज सभ्य झाला, तर ती सभ्यता हळूहळू राजकारणातही झिरपेल. सभ्य समाज असं वाचाळ नेतृत्त्व सहनच करू शकणार नाही.

(vijaya.jangle@expressindia.com)

मराठीतील सर्व विशेष लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Is using abusive words new in indian politics ssb