श्रीकांत कुलकर्णी
या लेखातील मांडणी मुख्यत्वे आपला भारतीय समाज नजरेसमोर ठेवून केलेली आहे. याला वैश्विक वा अखिल मानवजातीस लागू पडेल असं परिमाण आहेच, परंतु पूर्णतः तसं पाहण्यात अनेक वेगळ्या संदर्भ अन बारकाव्यांची भर घालावी लागेल. या विचाराच्या केंद्रस्थानी आहे ती एक शंका. भवतालातल्या बदलत्या नितीमूल्यांच्या कल्पनांविषयीची. नेमकेपणानं बोट ठेवता येत नसलं तरी काहीतरी बदलत चाललंय, अन तेही अयोग्यरित्या अशी एक जाणीव. नेमकं काय होतंय? ऱ्हास होतोय? अध:पतन होतंय? नैतिकतेचं, नैतिक मूल्यांचं? असं असेल तर नेमकी कुणाची नैतिकता ढासळतेय?
असं वाटतं अन जाणवतंय की आमचा एकमेकांवरचा, म्हणजे माणसाचा माणसावरचा विश्वास कमी होतोय. नीरक्षीरविवेक वा योग्यायोग्य ठरवण्याची आमची सारासार क्षमता लय पावत चाललीये. आणि यामुळे आम्ही फिरुन आदिम प्रेरणांच्या अंमलाखाली येत चाललो आहोत. साहजिकच, सारं काही ‘माझ्या उपयोगी आहे वा नाही’ केवळ या निकषावर तोलू पाहिलं जातंय; हिरेमाणकं हातात असली तरी खाण्यायोग्य नसल्यानं एखादं मर्कट ती भिरकावून देईल तसं. याची परिणती एकमेकांमधील संबंध बिघडत भीती, द्वेष आणि हिंसकपणा वाढण्यात होत जातेय. यातील हिंसकपणा हा वैचारिक आणि शारीरिक अश्या दोन्ही पातळ्यांवर अनुभवास येतोय. आपण फिरून, तथाकथित आधुनिक जगात वावरणारे, आदिवासी होत चाललोय.
आणखी वाचा-माणसाला माणसाशी जोडणारा एक फोन नंबर…
काय होतंय नेमकं? कधी आणि कसं सुरु झालं असावं? उत्तरं शोधत मागं जाउयात थोडं. उदाहरणादाखल, एक साधंसं मध्यमवर्गीय कुटुंब… नातवापासून ते आजीआजोबा अशी सारी मंडळी एकत्र बसून ब्लॅक अँड व्हाईट टीव्हीवर दूरदर्शनची कुठलीशी कुटुंबवत्सल मालिका पाहण्यात रंगून गेलेत आणि हे संपलं की नंतर जेवणं होणारेत. असं सारं चालू असताना एके दिवशी अचानक एकाचे शंभर चॅनल झाले आणि इतकंच नव्हे तर सारं कुटुंब एकत्र पाहात असलेल्या कौटुंबिक कार्यक्रमात आता अचानक काहीबाही अश्लीलही दिसू लागलं. आम्ही लाजलो, बावचळलो, गोंधळलो, अर्धवट प्रतिक्रिया देऊ लागलो. लपवू लागलो. नैतिकतेच्या कल्पना तडकल्या, तिची शकलं झाली. आता साऱ्या कुटुंबासमवेत काही बघायची धास्ती वाटू लागली. कारण समोर काय दिसेल नि काय नाही याचा काय नेम? बरं पाहायला तर आवडतंय पण सांगण्याची चोरी, त्यामुळे चोरून पाहण्याची उर्मी वाढू लागली. म्हणजे एकट्याने वा मित्रांसोबत बिनदिक्कत, बिनाशरम करताना जे आनंद देणारं असं ते, कुटुंबियांसमोर वा समाजासमोर करताना मात्र अनैतिक ठरू लागलं. नैतिकतेच्या सोयीस्कर व्याख्या करणं भाग पडलं. सरसकट नैतिक वा अनैतिक असं काही नाही किंवा आपली अन त्यांची व्याख्या वेगळी आणि आपली ती योग्य अन त्यांची मात्र अयोग्य अश्या धारणा मूळ धरु लागल्या. कालौघात नीतीमूल्यांचे मापदंड असे कायमच बदलत्या मापांना अन परिणामस्वरुप दंडांना सामोरे जात आलेत. पण आता तेच फार झपाट्यानं अन जास्त सार्वत्रिकपणे होऊ घातलं होतं. बदल होतच असतात, पण ते टप्प्याटप्प्यात झाले तर न कळताही अंगवळणी पडत जातात. पण हे असे अचानक अंगावर आलेले बदल पचवण्याकरता आवश्यक असणारी बदलती मानसिकता नसल्याने सारं काही सैरभैर होऊन जातं.
आणखी वाचा-पाकिस्तानात चिनी प्रकल्पांवर वारंवार हल्ले का होताहेत?
आणखी पुढे जात यात भरच पडत गेली. समाज माध्यमं आली. मार्क झकरबर्गनं फेसबुक आणलं. तो कदाचित काळाच्या पुढचा विचार करणारा होता. पण समाज तितका पक्व नव्हता. आम्हा भारतीयांच्या मानानं पाश्चात्य देश तरी जास्त आधुनिक पण या आधुनिकांनाही अचंबित करणारा, त्यांच्याही काळाच्या पुढे भासणारा असा तो मार्क झकरबर्ग.
आज काहीही म्हणजे अगदी काहीही करायचं असेल तर त्यासाठी लागणाऱ्या विचारमंथनाचा, स्ट्रॅटेजायजिंगचा समाज माध्यमे अविभाज्य भाग बनली आहेत. आज समाज माध्यमांचे व्यासपीठ चालवणारे आणि वापरणारे कोणत्याही किंमतीवर त्यांच्या व्यासपीठाची कमाई वाढण्यासाठी, एखाद्या व्यक्तीला हव्याश्या वाटणाऱ्या, आवडत असलेल्या आणि/किंवा त्यांना नकोश्या वाटणाऱ्या, त्यांना राग आणणाऱ्या गोष्टींसंबंधीची जास्तीतजास्त माहिती गोळा करून, फिल्टर करून अधिकाधिक आणि म्हटलं तर पूर्णपणे अनैतिक असे ‘इको-चेंबर बबल’ (गाळीव समविचारी माहिती वा ठरवून कुणापर्यंत काय पोहोचवायचं हे पाहणारी प्रणाली) तयार करतात. आणि आपण, उत्क्रांतत जाणारी एक प्रजाती म्हणून ही इलेक्ट्रॉनिक प्रसार माध्यमं सुयोग्य रितीनं हाताळायला पुरेसे तयार किंवा प्रगल्भ किंवा पुरेसे उत्क्रांत झालो नव्हतो. मग ते रेडिओ असो वा टीव्ही, परंतु खास करूनन ही अक्राळविक्राळ, सर्वव्यापी समाज माध्यमे.
आणखी वाचा-मविआने ‘वंचित’ला सोबत न घेतल्याचे परिणाम काय होऊ शकतात?
या साऱ्याचे परिणाम आपण आज भोगतोय. या साऱ्याचा काही विधायक फायदाही निश्चितच झाला आहे परंतु त्यामानानं नुकसान जास्त अन सर्वव्यापी होताना दिसतंय. धार्मिक तेढ वाढवण्यातला आणि कसलाही विधीनिषेध न बाळगता केवळ वैयक्तिक संपत्ती वाढवण्याची लालसा असलेल्या अत्युच्च श्रेणीतल्या व्यापारी वर्गाच्या हातचं एक महत्वाचं हुकमी साधन बनण्यात या समाज माध्यमांचा फार फार मोठा वाटा आहे.
काळाच्या पुढच्या विचारांच्या मागे जाताना समाजाची केवळ फरफटच नव्हे तर भरून न येणारी हानीही होत जाते. दैवदुर्विलास असा की समाजाला हे कळायला, ध्यानी यायलाही काही काळ जावा लागतो. त्यामुळे सुधारण्याची वेळ कायमच भूतकाळात जमा झालेली असते. नवल ते काय, की आपण मानव प्रगतीच्या नावाखाली प्रत्यक्षात कायमच ऱ्हासाच्याच मार्गावर क्रमणा करत आलो आहोत.
असो, आनंद आहे, अस्वस्थ वर्तमानाचा धांडोळा घ्यायचा हा एक कदाचित एकांगी अन अपूर्ण असा प्रयत्न.