स्वरदा मंदार गोखले
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
भारतीय अभिजात संगीताची कीर्ती सर्वदूर पसरलेली दिसते. भारतीय कलांकडे जगात अत्यंत आदराने पाहिले जाते. शास्त्रीय संगीत हा आपल्या देशाच्या संस्कृतीचा पाया आहे, मात्र तरीही शाळांत संगीताच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष होताना दिसते. अनेक शाळांत संगीत शिक्षकांची भरती थांबविण्यात आली आहे. भावी पिढ्यांमध्ये संगीताविषयी अभिरुची निर्माण करण्यात यामुळे अडथळा येणार आहे.
मी लहान असताना ज्या शाळेत शिकले तिथे संगीत हा विषय होता. कुटुंबालाही संगीताची पार्श्वभूमी होती. त्यामुळे माझ्यातही संगीताविषयी आवड विकसित होत गेली. गेली बरीच वर्षे मी संगीत क्षेत्रात कार्यरत आहे. शाळेत संगीत शिक्षिका आहे, त्यामुळे संगीताला व्यक्तिमत्त्व विकासात किती महत्त्वाचे स्थान आहे, हे मी स्वानुभवातून जाणते. शाळेत संगीत ही कला शिकवताना शिक्षकांनी त्यामागची उद्दिष्टे लक्षात घेणे अत्यंत गरजेचे आहे.
अलीकडे सरकारी असोत वा खासगी बहुतेक सर्वच शाळांमध्ये कला म्हणून चित्रकलेचाच विचार केला जातो. त्यासाठी प्रत्येक शाळेत शिक्षक नेमलेला असतो. संगीत कलेचा विचार फारसा होत नाही. बहुतांश सरकारी, अनुदानित, विनाअनुदानित शाळांमध्ये संगीत शिक्षक भरती थांबली आहे. काही ठिकाणी संगीत शिक्षक शिक्षकाचे पदच नाही. याचा विचार सर्व संगीत शिक्षकांनी करणे अत्यंत आवश्यक आहे. शाळांमध्ये संगीतकला या विषयाचे इतर विषयांप्रमाणेच अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. माणसाची बौद्धिक आणि भावनात्मक प्रगती करायची असेल तर त्याची कलात्मक प्रगती होणे अत्यंत आवश्यक असते. ज्ञानाबरोबरच त्याची भावनिक प्रगती, सर्जनशीलतेत वृद्धी, बौद्धिक प्रगती आणि मनाचा समतोल राखण्याचे काम कलांच्या व्यासंगातून आणि शिक्षणातूनच केले जाते.
शाळेत निम्न मध्यमवर्गीय, मध्यमवर्गीय, उच्च मध्यमवर्गीय अशा सर्व सामाजिक, आर्थिक स्तरांतील विद्यार्थी असतात. प्रत्येकाच्या घरातील वातावरण वेगळे असते. ती ज्या वातावरणात राहतात, जगतात त्या परिस्थितीचा, त्या भाषेचा त्यांच्या जीवनावर अत्यंत सखोल असा परिणाम झालेला दिसतो. प्रत्येकाच्या घरामध्ये कलेला पोषक वातावरण मिळेल असे नाही. प्रत्येकाच्या घरातील वातावरण हे वेगळे असते. शाळेतील मुले खूप हुशार आहेत. पण सांस्कृतिक दृष्ट्या आणि कलेच्या अंगाने त्यांचा विकास आणि प्रगती होण्यासाठी संगीत शिक्षकांनी प्रयत्न करणे ही काळाची गरज आहे. ज्या शाळांत संगीत शिकविले जाते, तिथे हा विषय सर्व विद्यार्थ्यांसाठी सक्तीचा असतोच. जसे शाळेत इतर विषय असतात, तसा संगीत विषय असतो. वर्गातील प्रत्येक मुलाला- मुलीला सुरात आणि तालात गाता येतेच असे नाही. हा विषय प्रत्येकालाच आवडतो असेही नाही. वर्गातील ४० मुलांना एकत्र शिकवत असताना प्रत्येकाला तालासुरात गाता येईल, अशी अपेक्षा करणे खरे तर चुकीचेच आहे, पण या ४० मुलांना आपली भारतीय संस्कृती, आपले भारतीय संगीत म्हणजे काय, कोणकोणते महान गायक संगीतकार. गीतकार आपल्याकडे होऊन गेले हे जरी कळले तरी संगीताचा समृद्ध वारसा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीपर्यंत सहज पोहोचेल.
मुलांना संगीताचे प्राथमिक ज्ञान देताना आपल्या कलांविषयी त्यांना सांगताना त्यांच्यातील सुप्त कलांना प्रोत्साहन देणे, हेही कला शिक्षकाचे काम आहे. मुलांना हे समजावून सांगणे अत्यंत गरजेचे आहे की, आपली भारतीय संस्कृती किती समृद्ध आणि संपन्न आहे. आपल्याकडे ज्या कला आहेत त्या किती उच्च दर्जाच्या आहेत. त्यांचा आनंद घेणे आपण सर्वांनी शिकले पाहिजे. शालेय जीवनाचा विचार केला तर पहिली ते दहावी या काळात मुलांच्या अंतरबाह्य व्यक्तिमत्त्वाचा विकास होत असतो. याच काळात त्यांना त्यांच्यातले गुण कौशल्यांची ओळख करून देणे महत्त्वाचे असते. विविध वयाच्या टप्प्यानुसार विविध विषयांवर ची गाणी स्तोत्र, मंत्र विविध पद्धतीने शिकवल्यामुळे मुलांची एकाग्रता वाढते. त्यांच्या संगीतकलेच्या अभिरुचींचा विकास होतो. गायन वादन केल्याने सकारात्मक ऊर्जा मिळते. आनंद मिळतो, मुलांची आध्यात्मिक प्रगती होते.
मनाचे श्लोक, भगवत गीतेचे अध्याय, रामरक्षा, अथर्वशीर्ष अशा अनेक स्तोत्रांमुळे वाणी शुद्ध होते. आपल्या संस्कृतीची ओळख होते. हीच संस्कृती एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे गेली तरच संस्कृतीचे संवर्धन होईल. भारतीय संगीताची तोंड ओळख करून देताना स्वरांच्या रचना शिकविल्याने, ओमकार शिकविल्याने मुलांचे मन शांत होते. विविध गायक वादक संगीतकारांची माहिती सांगितल्याने मुलांना प्रेरणा मिळते. विविध वाद्यांची वादकांची माहिती मिळाल्यामुळे त्या वाद्यांची मुलांना ओळख होते. ज्या मुलांचे आवाज चांगले असतात, त्यांचा वेगळा गट करून विविध गाणी, स्वररचना त्यांना शिकवता येतात. ही मुले विविध गायन वादनांच्या स्पर्धांमध्ये भाग घेऊन शाळेसाठी आणि स्वतःसाठी बक्षिसे मिळवतात. संपूर्ण शाळेचे, वर्गाचे गीत बसवल्यामुळे, स्तोत्रपठण करून घेतल्यामुळे एक सांघिक व एकात्मकेची भावना मुलांमध्ये निर्माण होते. भविष्यात या कलेकडे मुले करिअरच्या दृष्टीने सुद्धा पाहू शकतात. ही दृष्टी प्रत्येक संगीत शिक्षकाने विद्यार्थ्यांना दिली पाहिजे. संगीत हा विषय प्रत्यक्ष शिकूनच मुलांची प्रगती होते असे नाही. संगीत ऐकूनही त्याची प्रशंसा करण्याची क्षमता त्यांच्यात विकसित होते.
पण हे सारे तेव्हाच शक्य होईल, जेव्हा संगीत शिक्षक टिकेल. प्रत्येक शाळेत संगीत शिक्षक असावा, यासाठी सर्व संगीत शिक्षकांनी एकत्र आले पाहिजे. आपल्या मागण्या, आपल्या अपेक्षा सरकार दरबारी मांडल्या पाहिजेत. संगीत शिक्षक संघटनेला मोठे करण्याची जबाबदारी आपल्या प्रत्येक संगीत शिक्षकाची आहे. संगीत शिक्षक संघटनेतील काही वरिष्ठ संगीत शिक्षकांनी या दिशेने काम सुरू केले आहे. समाज संस्कारक्षम व्हावा, यासाठी कला जिवंत ठेवण्यासाठी, भारतीय संस्कृतीची ओळख करून देण्यासाठी आणि संगीत कलेचे जतन करण्यासाठी शाळेमध्ये संगीत हा विषय असणे अत्यंत आवश्यक आहे.