डॉ. अशोक वासलवार
नुकतीच ‘ॲलोपॅथीद्वारे पसरविण्यात आलेले असत्य’ अशा मथळ्याची पतंजली आयुर्वेदिक औषधाची मोठी जाहिरात व त्यावर रामदेव बाबांचा फोटो पाहिला. मन सुन्न झाले. ॲलोपॅथीच्या जगन्मान्य संशोधनांबाबत रामदेव यांचे असे विधान देशाच्या आरोग्य क्षेत्राची दिशाभूल करणारे आहे.
योगगुरू बाबा रामदेव म्हणजेच रामकिशन यादव यांनी ॲलोपॅथी व त्या चिकित्सा पद्धतीचा वापर करणारे ॲलोपॅथिक डॉक्टर्स यांच्याविषयी जे विधान केले व त्यांची खिल्ली उडविण्याचा प्रयत्न केला त्यावर प्रसारमाध्यमातून बरीच चर्चा व तर्कवितर्क लावले जात आहेत. बाबा रामदेव भारतासोबतच पूर्ण जगात योगाचा प्रसार करण्यात ते अग्रणी आहेत व आजच्या धकाधकीच्या जीवनात योगपूर्ण जीवनशैली सुदृढ आरोग्यासाठी प्रभावी आहे, हे सर्वमान्य झालेले असून त्याचे श्रेय रामदेव बाबांना जाते हे आम्ही मान्य करतो.
आपल्या देशात पूर्वीपासून विविध उपचार पद्धती रुजलेल्या आहेत. जवळपास तीन हजार वर्षांपूर्वी ब्रह्मदेवांनी महर्षी धन्वंतरीला वेदातून आयुर्वेदाची दीक्षा दिली व नंतर सुश्रुत व चरक ऋषींनी त्याचा प्रसार व उपयोग रोगनिवारण्यासाठी केला, ज्यात प्रामुख्याने वनस्पती व भस्माचा उपयोग होता. ‘आयुष’ म्हणजे जीवन व ‘वेद’ असे संबोधून आयुर्वेद असे ह्या शास्त्राचे नामकरण झाले. इंग्रजपूर्व काळात आयुर्वेद हीच उपचार पद्धती भारतात होती व त्याचे फायदेही समाजाला मिळत होते. नंतर जर्मन शास्त्रज्ञ सॅम्युअल हानिमन यांनी इ. स. १८१० मध्ये होमिओपॅथी प्रगत केली. हिपोक्रॅट्स या ग्रीस संशोधकांनी ॲलोपॅथीचा शोध लावला व याचे ॲलोस म्हणजे विरुद्ध व पॅथीस म्हणजे वेदना – म्हणजे वेदनेच्या विरुद्ध जाणारे शास्त्र असे नाव होमिओपॅथीचे जनक सॅम्युअल यांनी सुचविले.
एका पॅथीच्या संशोधकाने दुसऱ्या पॅथीला प्रोत्साहित करून त्याचे नामकरण करून देणे यासारखे दुसरे सलोख्याचे उदाहरण अस्तित्वात नाही. युनानी चिकित्सा पद्धतीचा जन्म ग्रीस या देशात झाला व अरेबियन व पर्शियन देशात त्याची जास्त प्रसिद्धी झाली. वरील सर्व उपचार पद्धतींचा शोध व उपयोगिता मानवाच्या आरोग्य संवर्धनासाठी केलेला असून प्रत्येकाचे मूळ व कार्य मार्ग वेगवेगळे असले तरी आरोग्य संवर्धन व आजारावरील उपचार ज्या मार्गाने होईल त्या सर्वांचा सहृदयतेने स्वीकार करणे व प्रोत्साहन देणे अशी स्वीकृतता त्या काळीही होती. आजचे जग हे विज्ञानाधारित आहे. प्रत्येक मानवनिर्मिती विज्ञानाच्या कसोटीवर उतरली पाहिजे तरच ती जागतिक मान्यताप्राप्त होते व तसे न झाल्यास ती काळाच्या ओघात मागे पडते. त्यातील दोष मान्य करून संशोधन पुढे रेटणे हे शहाणपणाचे ठरते.
ॲलोपॅथीच्या अनेक पैलूंबद्दल जगामध्ये विविध देशांत जेवढे संशोधन झाले आहे तेवढे आयुर्वेदाबद्दल झालेले नाही. भारतामध्ये आयुर्वेदाचा प्रसार होत असताना चीनमध्येही वनस्पतीजन्य औषधांचा वापर होऊ लागला व त्या देशात ट्रॅडिशनल चायनीज मेडिसीन (टी.सी.एम.) या नावाने ते नुसते लोकप्रिय नाही तर त्याची योग्यताही सिद्ध केली गेली. नेपाळ हा जगातील पहिला देश आहे ज्याने आयुर्वेदावर राष्ट्रीय धोरण तयार केले व पहिले आयुर्वेदिक महाविद्यालय काढले.
प्रत्येक ॲलोपॅथिक औषधाचे रेणू, त्याच्या संयुगातील रचना, प्राण्यावर निर्बंधक तत्त्व अभ्यास, साइड इफेक्ट्स, क्रॉस ब्लाइंड अभ्यास, विविध ठिकाणी संशोधन इत्यादी बाबी सलाखून तपासल्यानंतरच त्याला एफ.डी.ए.ची मान्यता मिळते. बरीचशी ॲलोपॅथी औषधे बाजारात आणल्यानंतरही त्याच्या दुष्परिणामामुळे काढून घेण्यात आलेली आहेत. जागतिक पातळीवर प्रत्येक औषधासाठी ‘प्रॉडक्ट पेटंट’ ही प्रणाली सर्वमान्य आहे ज्यावर त्या शोधाला स्वामित्व व बौद्धिक हक्क मिळतात. कोणतेही विज्ञान परिपूर्ण नसते. ती अपूर्णता ॲलोपॅथी मान्य करते; म्हणून त्यात सातत्याने संशोधनाचा मार्ग सापडतो. ही प्रदीर्घ प्रक्रिया असल्यामुळे कोणतेही औषध बाजारात लवकर येऊ शकत नाही. प्रत्येक बाबीची छाननी होऊन त्याचा तपशील औषधाच्या कुपीवर ग्राहकाच्या माहितीसाठी प्रसिद्ध करावा लागतो. आयुर्वेदात होत नाही. आयुर्वेदाच्या आयुष मंत्रालयाने या सर्व बाबींची पूर्तता असलेली आयुर्वेदिक औषधे जागतिक आरोग्य संघटनेस वितरणासाठी सादर करायला हवीत म्हणजे काही डॉलर्स आपल्या देशाच्या गंगाजळीत पडतील.
आयुर्वेदिक औषधामुळे काहीच दुष्परिणाम नाही, हेही खरे नाही. त्यात वापरण्यात येणारे सोने, शिसे, आर्सेनिक हे प्रमाणाबाहेर वापरल्यास आरोग्यास घातक आहेत. आयुर्वेदिक औषधे अमेरिका, इंग्लंडसारख्या प्रगत देशांमध्ये मान्य नसून तेथील औषध प्रशासनाने ती स्वीकारलेली नाहीत. याउलट आधुनिक चिकित्सा पद्धती संपूर्ण जगात स्वीकारलेली आहे. अति तीव्र स्वरूपाच्या आजाराची औषधे या शास्त्रात उपलब्ध आहेत. पेनिसिलीन ते आताच्या केफालोस्पोरीनपर्यंतच्या अँटिबायोटिकचा शोध, अनेक संसर्गजन्य आजारांवरील लस, गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया याच शास्त्राने निर्माण केल्या असून आधुनिक उपकरणे उदा. स्टेथोस्कोप, माइक्रोस्कोपपासून तर एम.आर.आय.पर्यंत याच शास्त्राच्या संशोधनाची निर्मिती आहे. मृत्युसंख्या कमी करण्यात ॲलोपॅथीचा मोठा सहभाग आहे. हृदय, किडनी, मेंदू, फुप्फुस, एचआयव्ही एड्स, पोटाच्या विकारावर ॲलोपॅथीएवढे सिद्ध औषध दुसरे नाही.
रुग्णाचे प्राण वाचविण्याच्या शर्यतीत अनेक डॉक्टर्स, सिस्टर्स, पॅरामेडिकल वर्कर्स यांनी आपला देह ठेवला आहे. जेव्हा कधी कोविडचा इतिहास लिहिला जाईल तेव्हा त्या लिखाणात या सर्व करोना शहिदांच्या कुटुंबीयांचे अश्रू जरूर असतील. एका पॅथीने दुसऱ्या पॅथीला तुच्छ लेखणे, महासाथीत मृत्यू झालेल्या वैद्यकांची थट्टा करणे, आम्हीच श्रेष्ठ मानणे असे कोणत्याही वैद्यकीय शास्त्रात बसत नाही. सुश्रुत, चरकांच्या आयुर्वेदाला, हिपोक्रॅट्सच्या ॲलोपॅथीला किंवा हनिमनच्या होमिओपॅथीला अशी वैदूगिरी मंजूर नाही.
योगा व आयुर्वेद हे प्राचीन भारतीय शास्त्र असले तरी ते भिन्न आहेत. योग ही जीवनशैली व आयुर्वेद ही उपचार पद्धती आहे. दोन्ही शास्त्रे पारंपरिक म्हणून संलग्न आहेत, पण योगा करणाऱ्याने आयुर्वेद सोडून दुसऱ्या पॅथीची औषधे घेऊ नये, असे कुठे आहे? पतंजली हे योगगुरू आहेत, आयुर्वेदाचार्य नाहीत. तसेच रामदेव हे योगगुरू असून आयुर्वेदाचार्य नाहीत. पतंजली नावाने आयुर्वेदिक औषधे काढून, लोकाधार व राजकीय बैठकीचा आधार घेऊन, रामदेव म्हणजे आयुर्वेद असा समज त्यांनी व जनतेने करून घेतल्यास जनआरोग्यासाठी ते घातक ठरते. प्रत्येक पॅथीला सिद्धान्त व मर्यादा आहेत. निसर्गाच्या पुढे जाऊन अमरत्व कुणालाही प्राप्त झालेले नाही व होणारही नाही. जो आला तो गेला हे सृष्टी संतुलन आहे. शेवटी संशोधनाच्या माध्यमातूनच आपण पुढे जाऊ शकतो, टीकेच्या माध्यमातून नाही. हत्ती मांस खात नाही व वाघ कधी गवत खात नाही. प्राण्यांनी जशी आपली क्षमता ओळखली आहे तशी आपणही ओळखली तर मानवकल्याणचे सार्थक आपल्या पदरी पडेल.
ashok50wasalwar@gmail.com
(पूर्वाध्यक्ष, असोसिएशन ऑफ फिजिशियन्स ऑफ इंडिया, विदर्भ शाखा)