मृणालिनी चितळे

विख्यात खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांच्या पत्नी गणितज्ञ डॉ. मंगल नारळीकर १७ मे रोजी ८० व्या वर्षांत पदार्पण करत आहेत. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या अनोख्या पैलूंचा परिचय.

13 December Daily Horoscope in Marathi
१३ डिसेंबर पंचांग: पंचांगानुसार शिवयोग १२ पैकी कोणत्या राशीची आर्थिक घडी सुधारणार? तुम्हाला लाभेल का भाग्याची साथ; वाचा शुक्रवारचे भविष्य
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
shani gochar 2025 zodiac sign today horoscope in marathi
Shani Gochar 2025 : २०२५ मध्ये शनीचे मीन राशीत गोचर, ‘या’ राशींच्या नशिबाचं टाळं उघडणार; रिकामी तिजोरी धनधान्याने भरण्याचे संकेत
Shani-Mercury kendra drishti
२७ डिसेंबरपासून ‘या’ तीन राशींचे चमकणार भाग्य; शनी-बुधाची केंद्र दृष्टी देणार भरपूर पैसा
Anju Bhavnani
दीपिका-रणवीरची लेक झाली तीन महिन्यांची; आजी अंजू भवनानी यांनी नातीसाठी केली ‘ही’ गोष्ट, पाहा फोटो
Sane Guruji , book Sane Guruji Jeevan Gatha,
‘साने गुरुजींची जीवनगाथा’ आता ‘श्रवणीय’
Mercury Rise in Scorpio
‘या’ चार राशींचे भाग्य उजळणार, बुध ग्रहाच्या कृपेने मिळणार अपार संपत्ती
kharmas 2024 horoscope surya gochar 2024 in marathi
Kharmas 2024: १५ डिसेंबरपासून ‘या’ चार राशींवर मिळेल बक्कळ पैसा! खरमास सुरू होताच सूर्यदेवाच्या आशीर्वादाने धनलाभाची संधी

गणितज्ञ डॉ. मंगल नारळीकर! विख्यात खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांची पत्नी. माझी आत्तेनणंद. पूर्वाश्रमीची मंगल राजवाडे. एम. ए. ला मुंबई विद्यापीठात प्रथम आली. टीआयएफआर या संस्थेमध्ये तिनं संशोधनाला सुरुवात केली, परंतु तिच्या करिअरला यू टर्न मिळाला तो १९६६ साली जयंतरावांशी झालेल्या विवाहामुळे. लग्नानंतर केंब्रिजमध्ये तिनं संसाराबरोबरच गणितातील अध्ययन सुरू ठेवलं. चर्चिल कॉलेजमध्ये टीचिंग फेलोशिपसाठी तिचं नाव सुचवलं गेलं, परंतु जयंतरावांच्या कामांमुळे तिने हा प्रस्ताव नाकारला. पुढे १९७२ साली भारतात आल्यावर जयंतरावांनी टीआयएफआरमध्ये संशोधन आणि अध्यापनाचे काम सुरू केले. तर मंगलताईनं ‘संश्लेषात्मक अंक सिद्धांत’ या विषयात पीएच.डी. मिळवली आणि पदव्युत्तर आणि एम.फिल.च्या विद्यार्थ्यांसाठी अध्यापनाचं काम सुरू केलं. अनेक संशोधनात्मक लेख लिहिले. शालेय विद्यार्थ्यांसाठी ‘गणितगप्पा’, ‘गणिताच्या सोप्या वाटा’ यांसारखी पुस्तकं लिहिली. तिचं वैशिष्टय़ असं की गणितामुळे आत्मसात केलेलं तर्कशास्त्र आणि जयंतरावांच्या सान्निध्यात वृद्धिंगत झालेला विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात तिनं जपला.

स्वयंपाकघर नव्हे प्रयोगशाळा

वेगवेगळय़ा देशांत राहायची संधी मिळाल्यामुळे तेथील पाककृती तिनं शिकून घेतल्या. त्या जशाच्या तशा बनविण्यात ती वाकबगार आहे. कुठे तरी वाचलेले किंवा कुणाकडे तरी खाल्लेले पदार्थ लक्षात ठेवून त्यात यथायोग्य बदल करण्याची प्रयोगशीलता तिच्याकडे आहे. रोजचा स्वयंपाक करताना किंवा पाहुण्यांसाठी बनवतानाही त्यामध्ये पिष्ठ, प्रथिन, स्निग्ध पदार्थाचा समतोल साधण्याचा तिचा प्रयत्न असतो. कच्च्या पालेभाज्यांचा वापर करताना त्या पूर्णपणे र्निजतुक करण्यासाठी पोटॅशियम परमँगनेटचा वापर ती करते. पोटॅशियम पाण्यात टाकलं की पाण्यातील प्राणवायू शोषून घेते. त्यामुळे त्या पाण्यात भाज्या बुडवून ठेवल्या की कीड मरून जाते, शिवाय पोषणमूल्य अबाधित राहते हे त्यामागचं शास्त्र! स्वयंपाकघरातील विज्ञान ती कटाक्षाने आचरणात आणत आहे.

प्रत्येक गोष्टीचा वापर.. पुनर्वापर

एकही गोष्ट शक्यतो वाया घालवायची नाही आणि पर्यावरणाला हानी पोहोचेल असं काही करायचं नाही हा तिचा वसा. सभा-समारंभात मिळणाऱ्या शालींचे मुलांसाठी गरम कोट स्वत: शिवून तिने अनेकांना भेट दिले आहेत. लहान मुलांसाठी कपडे शिवताना कपडय़ांना ती अस्तर अशा खुबीने लावते की त्याची शिवण टोचू नये. नुकतंच तिनं मला मायक्रोव्हेवमध्ये ठेवून गरम करता येईल असं हीटिंग पॅड भेट दिलं. आयताकृती कापडाला कप्पे करून त्यामध्ये धान्य भरून ते शिवून टाकले होते. मायक्रोव्हेवमध्ये ठेवल्यावर हे पॅड त्यातील धान्यासह गरम होते आणि मस्त शेक घेता येतो. टाळेबंदीच्या सुरुवातीला जुन्या मऊ साडय़ा वापरून, तिनं तीन पदरी मास्क बनवले. अगदी एन ९५ मास्क इतकेच सुरक्षित ठरावेत असे. घरात नवा फ्रिज घेतल्यावर त्याचं भलं मोठं खोकं नातींना खेळायला दिलं. नातींनी त्यामध्ये दारखिडक्या कापून एक झोपडी बनवली. उरलेल्या कचऱ्यातून झोपडीच्या दारांसाठी कडय़ा – नातींच्या शब्दांत ‘क्लेव्हर बोल्ट’ बनवले. पायी फिरायला बाहेर पडलं की जयंतरावांना थकल्यामुळे मध्येमध्ये बसावं लागे. वाटेत बाकं असत, पण त्यांची उंची कमी असल्याने ते सोयीचे ठरत नसत. मंगलताईनं लगेच यावर तोडगा काढला. घरच्या उशीला पट्टा शिवला. पर्सप्रमाणे ती उशी स्वत:च्या खांद्याला लटकवून फिरायला जाण्यात खंड पडू दिला नाही.

लेखन, वाचन, सामाजिक बांधिलकी

जयंतराव आणि मंगलताई दोघांनाही अभिजात साहित्याची विलक्षण जाण आहे आणि आवडही. त्यांच्या दिवाणखान्यातील कपाटं पुस्तकांनी भरलेली असतात. दोघांनी विपुल लेखन केलं आहे. मंगलताईनं तिच्या लेखनातून आपल्या समाजातील चुकीच्या प्रथा-परंपरांवर अनेकदा टीका केली आहे तर कधी अनेक गोष्टींमागचं विज्ञान उलगडून दाखवलं आहे. तिला आवडलेली पुस्तकं अनेकांपर्यंत पोहोचावी, या उद्देशानं, ती पुस्तकांच्या प्रती विकत घेऊन ग्रंथालयांना भेटीदाखल देते. शिक्षकी पेशा तिच्या रोमारोमांत भिनला आहे. काय शिकवतो यापेक्षा आपण जे शिकवतो ते समोरच्यापर्यंत पोहोचणं तिला महत्त्वाचं वाटतं. आत्तापर्यंत आर्थिक कमकुवत गटातील असंख्य शाळकरी मुलांना तिनं तन्मयतेनं शिकवलं आहे. अनेकांना शिक्षण, आजारपण यासाठी मदत केली आहे, परंतु लग्नखर्चासाठी म्हणून कुणी पैशाची मागणी केली तर ती नाकारण्याइतका सडेतोडपणा तिच्यापाशी आहे.

आजाराशी दोन हात

१९८६ साली वयाच्या ४३ व्या वर्षी कॅन्सरशी सामना करायची वेळ तिच्यावर आली. त्यानंतर १९८८ साली आणि अलीकडे २०२१ आणि २०२२ साली त्यानं परत डोकं वर काढलं. प्रत्येक वेळी आपली सारी व्यवधानं सांभाळत अपराजित वृत्तीनं ती लढली आहे. आजही लढत आहे. तिच्या तिन्ही मुली आणि जगभर विखुरलेले असंख्य सुहृदजन तिची हिंमत पाहून स्तिमित होत आहेत. मंगलताईच्या व्यक्तिमत्त्वाचं एका शब्दात वर्णन करायचं ठरवलं तर ओठावर शब्द येतो, ‘सहजता’. तोच तिच्या व्यक्तिमत्त्वाचा स्थायिभाव आहे. कोणतीही गोष्ट करताना आपण खूप काही करतोय असा तिचा भाव नसतो नि अभिनिवेशही. असते ती तिची गणिती बुद्धी आणि कलावंताची मनस्वी वृत्ती. त्यामुळे काळ, काम, वेगाचं व्यस्त गणित ती बिनचूक रीतीनं सोडवू शकली आहे. तिच्या वाटय़ाला आलेली प्रश्नपत्रिका नक्कीच सोपी नव्हती. परंतु रडतकुढत न बसता सगळय़ांना तिनं व्यवस्थित कोष्टकात बसवलं. तिच्या बोलण्यात स्पष्टपणा असतो, तेवढाच मायेचा ओलावाही. शिस्त असते, पण कठोरता  नसते. यातच तिच्या व्यक्तिमत्त्वातील ‘मंगलपण’ सामावलेलं आहे.

Story img Loader