कुठल्याही देशाचे राष्ट्रप्रमुख आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा वावरत असतात. त्यातही, अमेरिका जागतिक महासत्ता असल्याने त्या देशाच्या राष्ट्राध्यक्षांच विशेष महत्त्व असते व सर्व जगावर परिणाम घडवू शकणाऱ्या कारवाया करणे त्यांना शक्य असते. परंतु, निवृत्त झाल्यावरही आपल्या भूतपूर्व पदाचा सकारात्मक वापर करणारे नेते क्वचितच असतात: अशा विरळा नेत्यांमध्ये नुकतेच दिवंगत झालेले माजी अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जिमी कार्टर (१९२४-२०२४) यांचा समावेश होतो. कार्टर म्हणाले होते, ‘जेव्हा मी व्हाइट हाउस सोडले, तेव्हा मी बराच तरुण होतो (५६ वर्षे) मला जाणीव झाली की आणखी २५ वर्षे तरी मी सक्रिय राहू शकेन. म्हणून, माझ्या आधीच्या पदाचा फायदा घेऊन जिथे काही करता येईल, तेथे मी योगदान देऊ शकेन.’ या विचारातून त्यांनी ‘कार्टर सेंटर’ची स्थापना केली. जागतिक शांततेसाठी, रोगनिवारणासाठी आणि ‘गरिबांमध्ये आशा जागवण्यासाठी’ या सेंटरचे काम चालते. जिमी कार्टर यांच्या मृत्यूनंतरही हे काम सुरू राहील, कारण मुळात जिमी यांनी त्यांच्या आईचा- लिलियन कार्टर यांचा- समाजकार्याचा वारसा या सेंटरमार्फत जिवंत ठेवला होता.
अमेरिकेच्या दक्षिणेतील राज्यांमध्ये वर्णभेद प्रचलित होता अशा काळात आणि अशा जॉर्जिया राज्यात जिमी कार्टर यांचा जन्म झाला. छोटी दुकानदारी, त्याखेरीज कापूस आणि भुईमूग शेती हे कुटुंबाचे अर्थार्जनाचे साधन होते. कार्टर यांचे वडील जेम्स अर्ल हे वर्णभेदाचे समर्थक होते; पण परिचारिका असणाऱ्या आई लिलियन या मात्र उदारमतवादी होत्या. परिसरातील काळ्या लोकांना वैद्यकीय सेवा देणाऱ्या त्या एकमेव गोऱ्या परिचारिका होत्या. १९४६ साली कार्टर अमेरिकेच्या नेव्हल अकॅडमीत शिकून अमेरिकन नौदलात सामील झाले. अमेरिकेच्या आण्विक पाणबुड्यांचा तो सुरुवातीचा काळ होता.
आणखी वाचा-सामान्य माणूस, शेतकरी यांच्यापर्यंत आर्थिक सुधारणा पोहोचल्या का?
१९५२ मध्ये कॅनडातील चॉक रिव्हर येथील अणुभट्टीला मोठा अपघात झाला. त्यावेळी अमेरिकेन नौदलाने मदत कार्य केले; त्यात कार्टर सहभागी झाले होते. या भयंकर अपघाताचा त्यांच्यावर परिणाम होऊन पुढील आयुष्यात अण्वस्त्रांचा प्रसार होऊ नये यासाठी प्रयत्न करण्याचे त्यांच्या मनावर ठसले; पुढे अध्यक्ष असताना त्यांनी अमेरिकेच्या न्यूट्रॉन बॉम्ब प्रकल्पाचे काम बंद केले. १९५२३ मध्ये वडील वारल्याने घराची जबाबदारी कार्टर यांच्यावर पडली. तेव्हा नौदलातील नोकरी सोडून ते जॉर्जिया राज्यात परत आले. कुटुंबातल्या मालमत्तेची वाटणी झाल्याने त्यांनी शेती व बियाण्याचा व्यापार सुरू केला. समाजकार्याची ओढ होतीच; यातून त्यांनी राजकारणात भाग घ्यायला सुरुवात केली. १९६२ मध्ये जॉर्जिया राज्याचे खासदार, १९७० मध्ये गव्हर्नर व १९७६ मध्ये अमेरीकेचे राष्ट्राध्यक्ष अशी त्यांच्या कारकीर्दीची चढती कमान होती.
कार्टर यांनी आपल्या अध्यक्षीय कारकीर्दीत अनेक महत्त्वाची कामे केली. त्यात ठळकपणे, १९७८ चा इजिप्त व इस्राएल यांच्यातील कॅम्प डेव्हिड शांतता करार, १९७८ मध्ये बराच अंतर्गत विरोध असताना केलेला पनामा कालव्याचा समझोता (ज्यामुळे अमेरिकेने पनामा कालव्यावरचा मालकीहक्क सोडून तो कालवा पनामाकडे पुढे सुपूर्द केला); १९७९ मधील रशिया व अमेरिकेदरम्यान आण्विकशस्त्रांच्या संख्या व प्रकारांवर मर्यादा घालणारा सॉल्ट-२ हा करार, आदींचा उल्लेख करता येईल. अमेरिकेचे रशियाशी संबंध सुधारत आहेत असे वाटत असताना डिसेंबर १९७९ मध्ये रशियाने अवानक अफगाणिस्तानवर हल्ला केला. त्याचाही कार्टर यांना फटका बसला.
आणखी वाचा-सत्तेला प्रश्न विचारताना त्यांनी आपला जीव धोक्यात घातला…
त्याआधी, १९६६ मध्ये कार्टर यांच्या आई लिलियन वयाच्या ६८ वर्षी अमेरिकेच्या ‘पीस कोअर’ या स्वयंसेवी संघटनेत दाखल झाल्या. १९६१ साली तत्कालीन राष्ट्राध्यक्ष जॉन केनेडी यांनी ही स्वायत्त संस्था निर्मण केली होती. जगातील गरीब व गरजू जनतेला विविध प्रकारची (इंग्रजी व विज्ञान शिक्षण, सार्वजनिक आरोग्य सेवा, कृषी व छोटे उद्योग, इ.) मदत कारण्याची संधी सेवाभावी अमेरिकन नागरिकांना अनेक देशांमध्ये मिळावी, हा या संस्थेचा उद्देश. यात ख्रिश्चन धर्म प्रसार वगैरेचा हेतू नसतो. ‘पीस कोअर’च्या स्वयंसेवकांना गरजांपुरता पगार दिला जातो व मायदेशातून पैसे, वस्तू आदी मागवण्यावर बंदी असते. पीस कोअरतर्फे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतरच, संस्थेने लिलियनना मुंबई जवळच्या विक्रोळीच्या गोदरेज मध्ये काम करण्यास पाठवले. सुरुवातीला त्यांना गोदरेज उद्योगसमूहातर्फे चालवण्यात येणाऱ्या ‘प्रगती केंद्र’ या समाजकल्याण केंद्रात काम देण्यात आले. बाल संगोपन, लसीकरण व -कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया, इ. काम या केंद्रात होत असे. केंद्रापासून साधारण दीड किलोमीटरवर असणाऱ्या हिलसाइड कॉलनीमध्ये त्यांना राहण्यास जागा देण्यात आली होती.
सेवाभावी वृत्ती, परिचारिका म्हणून प्रचंड अनुभव आणि भरपूर उत्साह असलेल्या लिलियन सर्वाना आवडू लागल्या. त्यांचा वैद्यकीय अनुभव बघता पुढे त्यांना कंपनीच्या इस्पितळातही काम मिळाले. एकदा कामावरून संध्याकाळी घरी परतताना लिलियनना गवतामध्ये हालचाल दिसून अली व विव्हळण्याचा आवाज ऐकू आला. जवळ गेल्यावर त्यांना एक अतिशय आजारी कुष्ठरोगी स्त्री दिसली. तिला मदत करायला इतर कोणीही तयार नव्हते. संसर्ग होईल व असे रोगी स्वीकारले तर काम वाढून रुग्णालय अपुरे पडेल; असे अनेक रोगी रस्त्याच्या कडेला रोजच मरत असतात … वगैरे युक्तिवादांना न जुमानता लिलियनबाईंनी स्वतः त्या रुग्ण स्त्रीवर उपचार केले. हे कळल्यावर इतर कुष्ठरोगी यायला सुरुवात झाली व हे रुग्णालय कुष्ठरोग्यांच्या उपचाराचे एक केंद्रच बनले! अर्थात, लिलियनना संसर्गाची कधीकधी भीती वाटायची हे त्यांनी लिहिलेल्या पत्रांत दिसते.
दुसरा एक अनुभव त्यांचा असा होता की , एकदा त्यांच्यासोबत काम करणाऱ्या गरीब कर्मचाऱ्याने त्यांना आपल्या घरी चहाला नेले. घरात शेणाने सारवलेला मातीचा ओटा व चहाचे कप घरच्या बाईनी एकाच कपड्याने साफ केले हे पाहून त्यांना गंमत वाटली. आपल्या नवऱ्याला व लिलियनना चहा व खायचे देऊन ती गृहिणी मात्र त्यांच्यापासून दूर जाऊन बसली हे काही लिलियनना आवडले नाही. तिघांनी एकत्र चहा प्यावा असा आग्रह त्यांनी धरला व तसेच अर्थातच झाले. तिसरा प्रसंग असा की, एका माणसाला नसबंदीला प्रवृत्त करून त्याची नसबंदी त्यांनी करवून केली, परंतु, थोड्याच दिवसांत कुठल्याशा साथीत त्याचे दोन मुलगे मरून गेले; या घटनेचा त्यांच्यावर परिणाम झाला. निव्वळ कुटुंबनियोजनाचा आग्रह न धरता, आरोग्यव्यवस्था सुधारणे कसे आवश्यक आहे हे त्यावरून दिसून आले.
आणखी वाचा-आचार्यांच्या ‘दर्पणा’त आजची पत्रकारिता कशी दिसते?
सुमारे २९ महिने लिलियन विक्रोळीत कार्यरत होत्या. जिमी कार्टर या काळात राज्याचे खासदार व डेमोक्रेटिक पक्षाचे उदयोन्मुख नेते होते. तत्कालीन अमेरिकी उपराष्ट्राध्यक्ष हुबर्ट हम्फ्रे यांना लिलियन भारतात आहेत हे जिमी कार्टर यांच्याकडून कळले. हम्फ्रे यांनी लिलियन यांची चौकशी ‘पीस कोअर’कडे केल्यावर भारतातही त्यांच्या ‘वजनदार’ संबंधांची माहिती पसरली. १९६८ मध्ये लिलियन कार्टर अमेरिकेत परतल्या. पुढे १९७७ मध्ये, राष्ट्रपती फक्रुद्दीन अली अहमद यांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी आलेल्या अमेरिकन शिष्टमंडळात त्या सहभागी होत्या. त्या भेटीत त्या विक्रोळीलाही जाऊन आल्या. त्यांनी पाहिलेली बालके आता मोठी झाली होती; ती आपल्या गोऱ्या आजींना भेटायला आली. जुने सहकारी, बरे झालेल्या कुष्ठरोग्यांसह अनेक जुने रुग्ण व स्नेही त्यांना मुद्दाम भेटायला आले होते. यावेळी लिलियान यांच्या आवडत्या भारतीय चपलांची भेट त्यांना देण्यात आली होती.
जिमी कार्टर यांचीही समाजसेवेची वृत्ती आई लिलियन यांच्याप्रमाणेच वादातीत होती. स्वत:ला २००२ मध्ये लक्षणीय शांतताकार्याबद्दल मिळालेल्या नोबेल पारितोषिकाचे १० लाख डॉलर्स त्यांनी आपल्या कार्टर सेंटर या स्वयंसेवी संस्थेसाठी खर्च केले. २००६ मध्ये, जिमी कार्टर व त्यांच्या पत्नी रोझालीन कार्टर यांनी २००० अमेरिकन व भारतीय स्वयंसेवकांसह लोणावळ्याजवळ पाटण या खेड्यात सुमारे १०० घरे उभारली. त्या वेळी जिमी कार्टर ८२ वर्षांचे होते. कार्टर सेंटर व हॅबिटॅट फॉर ह्युमॅनिटी या संस्थांतर्फे हे काम करण्यात आले होते, भारतीय नट जॉन अब्राहाम व अमेरिकन नट ब्रॅड पिट यांनीही यात भाग घेतला होता.
जिमी कार्टर यांच्या ‘कार्टर टर’ने देशोदेशी अशी कामे केली असतील, पण भारतीयांना या कामांमागचा प्रेरणास्रोत नेमका माहीत आहे… आई लिलियन कार्टर यांची समाजसेवेची भावना निरलस नसती, तर जिमी कार्टर घडले असते का असा प्रश्न त्यामुळेच अनेकांना पडत असेल! आपले राजकारणी राजकारणातून निवृत्तीनंतर अशा प्रकारची समाजसेवा करतील की नाही माहीत नाही; परंतु ‘पीस कोअर’ सारख्या संस्था भारतातही असणे- आणि त्यांनी अन्य देशांतही काम करणे- आवश्यक असल्याचे माझे मत आहे.
baw_h1@yahoo.com