कराचीचे आर्चबिशप जोसेफ कार्डिनल कॉर्डेइरो हे माझ्या वडिलांचे पहिले चुलत भाऊ होते. त्यांनी दोन किंवा तीन कॉन्क्लेव्हमध्ये भाग घेतला होता. कॉन्क्लेव्ह म्हणजे पदावर असलेल्या एखाद्या पोपचा मृत्यू झाल्यानंतर पुढच्या पोपची निवड करण्यासाठीची ७० किंवा ८० कार्डिनल्सची (उच्च स्तरीय पाद्री) बैठक. एकदा ते मुंबईला आलेले असताना मी त्यांना या कॉन्क्लेव्हबद्दल काही प्रश्न विचारले होते आणि त्यांना स्वतःला काही मते मिळाली का, असेही विचारले होते. त्यांनी फक्त हसून माझ्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले.

गोव्याचे कार्डिनल आर्चबिशप फिलिप नेरी फेराव हे माझ्या दिवंगत पत्नीच्या सख्ख्या चुलत भावाचे पुत्र. पोप फ्रान्सिस यांचा उत्तराधिकारी निवडण्यासाठी त्यांना रोमला बोलावले जाईल. जगातील कॅथोलिक चर्चच्या प्रमुखाच्या निवडीत माझ्या वडिलांचा चुलत भाऊ सहभागी होता हे सांगताना मला खूप आनंद होत असे. आता, माझ्या प्रिय पत्नीचे नातेवाईक फिलिप नेरी या प्रक्रियेशी संबंधित आहेत, ते मतदान करणार आहेत, हे सांगतानाही मला असाच आनंद होतो.

पोप फ्रान्सिस यांनी शेवटचा श्वास घेण्याआधी त्यांना भेटणाऱ्या शेवटच्या व्यक्तींपैकी एक म्हणजे अमेरिकेचे उपाध्यक्ष जे.डी. व्हान्स. व्हान्स स्वतः कॅथेलिक आहेत, अमेरिकेतील महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेतलेल्या परदेशी विद्यार्थ्यांशी ट्रम्प यांच्या वागणुकीबद्दल पोप फ्रान्सिस यांच्या मनात असलेल्या शंका दूर करण्यासाठी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी व्हान्स यांना पाठवले होते.

ख्रिश्चन धर्मगुरू पोप यांच्याकडे जगातील महत्वाच्या नेत्यांवर प्रभाव टाकण्याची ताकद आहे. ते हे काम शांतपणे आणि वाद न घालता करतात, पण तरीही त्याचा परिणामकारकपणा कमी नसतो. त्यांच्या ताब्यात लष्कर नसले तरी जगभरातील कोट्यवधी कॅथलिक लोकांचा पाठिंबा त्यांना आहे, आणि धर्म ज्या नैतिकता व न्यायाचे समर्थन करतो, त्याची नैतिक सत्ता त्यांच्याकडे आहे.

फ्रान्सिस हे एक चांगले पोप होते. त्यांचा दृष्टिकोन खुला होता. जेव्हा त्यांना कॅथलिक विवाहित जोडप्यांनी गर्भनिरोधकांचा वापर न करण्याच्या चर्चच्या आदेशाविषयी विचारले गेले, तेव्हा त्यांनी तत्काळ उत्तर दिले की, “मी कॅथलिक लोकांकडून सशासारखी पिल्लं जन्माला घालण्याची अपेक्षा करत नाही.” माझी खात्री आहे की त्यांनी बायबल काळातील जीवनशैलीवर आधारित असलेल्या चर्चच्या अनेक नियमांमध्ये शिथिलता आणली असती. फ्रान्सिस यांना गरीब आणि शोषित लोकांची अधिक काळजी होती आणि त्यांनी चर्चच्या शिकवणींपेक्षा त्या गोष्टींना अधिक महत्त्व दिलं.

युरोपमधील चर्चमध्ये लोकांची उपस्थिती झपाट्याने घटत आहे, अगदी सामूहिक प्रार्थनेसाठी राखीव असलेल्या रविवारच्या दिवशीही हीच स्थिती आहे. पाद्रींना प्रशिक्षण देणाऱ्या सेमिनरींची स्थिती तर याहूनही खराब आहे. पोप ज्या व्हॅटिकनचं नेतृत्व करतात, त्या व्हॅटिकनचे हे कर्तव्य आहे की, त्यांनी या घटत्या उपस्थितीमागची कारणं समजून घेतली पाहिजेत आणि या समस्यांचा सामना करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.

युरोपमधील आर्थिकदृष्ट्या प्रगत देशांमध्ये धर्माचे आकर्षण कमी होत चालले आहे. उदाहरणार्थ, मी आणि माझी पत्नी निवृत्तीनंतर दरवर्षी लंडनला जायचो, तेव्हा हॉटेलजवळील चर्चमध्ये जे काही भक्त दिसायचे, ते आपल्या किंवा आपल्याहून काळ्या रंगाचे लोकच असायचे. स्थानिक लोक, विशेषतः तरुण पिढी, जवळपास नव्हतीच. चांगल्या जीवनमानाच्या प्रमाणात धर्मनिष्ठा कमी होत असल्याचे ते लक्षण स्पष्ट दिसत होते.

पोर्तुगालमध्ये तर चर्चमध्ये येणाऱ्यांची स्थिती अजूनच दयनीय होती. पोर्तुगीज लोक जवळपास पाच शतकांपूर्वी गोव्याच्या किनाऱ्यावर उतरले होते. तो काळ होता ‘श्रद्धेचा’. तेव्हा पाद्री हे सैनिकांबरोबरच यायचे आणि लोकांना ख्रिश्चन धर्मात धर्मांतरित करायचे. त्यांनी माझ्या पूर्वजांचे आणि इतर हिंदूंचे धर्मांतर केले आणि जाती नष्ट करण्याच्या हेतूने आमची आडनावंही बदलली. रूपांतर केलेल्या कुटुंबांना त्या त्या पाद्रीचं पोर्तुगीज आडनाव दिलं जायचं. म्हणूनच पोरवोरीममध्ये ‘रिबेरो’ तर दिव्यात ‘मेनेझेस’ आडनावांची संख्या मोठी आहे – हे अनुक्रमे माझं आणि माझ्या पत्नीचं मूळ गाव.

मी पोर्तुगालमधील पोर्तो शहरात – जिथे प्रसिद्ध पोर्ट वाइन तयार होते – गेलेलो असताना काही पोर्तुगीज तरुण-तरुणी धोतर घालून आणि साड्या नेसून “हरे कृष्ण, हरे राम”ची पत्रकं देत होते. मी त्यांना आठवण करून दिली की माझे पूर्वज राम आणि कृष्णाचे भक्त होते, आणि त्यांनाच या मुलांच्या पूर्वजांनी ख्रिश्चन धर्मात धर्मांतरित केलं होतं – तेही साडेचार शतकांपूर्वीच्या गोव्यात! आणि आम्ही पोर्तुगालला गेलेलो असताना, या मुलांनी आम्हाला “घरवापसी”करायला सांगणं हे फारच उपहासात्मक होतं.

पोप फ्रान्सिस अर्जेंटिनाचे होते. ते पोपपदी विराजमान होणारे पहिले दक्षिण अमेरिकन होते. ते जेसुइट संघाचे पहिले पो देखील होते. हा असा पाद्री वर्ग आहे ज्यांला हे पद मिळवायला १४ वर्षं लागतात, तर इतर धर्मप्रांतातील पाद्रींसाठी केवळ आठ वर्षे.

मी मुंबईच्या धोबी तलाव येथील जेसुइट शाळेत शिक्षण घेतलं. ही शाळा आजही तितक्याच दिमाखात उभी आहे. जेसुइट शाळेत शिक्षण घेणं ही एक विशेष गोष्ट होती. १९३६ ते १९४४ या काळात माझ्या काळातले पाद्री हे स्पॅनिश होते. माझी फार इच्छा आहे की फ्रान्सिस यांच्या जागी पुन्हा एक जेसुइट पोप व्हावा.

पोपच्या निवडीत सामान्य लोकांचा सल्ला घेतला जात नाही. त्यामुळे माझी ही इच्छा फक्त इच्छा राहील. ती योग्य व्यक्तींपर्यंत पोहोचणार नाही. मी माझ्या पत्नीच्या चुलत भावाला – जो पोपच्या निवडीसाठी मतदान करणार आहे – ही इच्छा सांगण्याचं धाडस देखील करणार नाही. हाँगकाँगचे आर्चबिशप कार्डिनल स्टीफन चाउ हे जेसुइट आहेत आणि चिनी आहेत. बऱ्याचशा इटालियन पोपांनंतर आपल्याला एक पोलिश पोप, त्यानंतर जर्मन आणि मग अर्जेंटिनियन पोप मिळाले. त्यामुळे आता एक चिनी जेसुइट पोप ही एक रंजक आणि योग्य निवड ठरू शकते. विशेषतः पोप फ्रान्सिस यांनी सप्टेंबर २०१८ मध्ये चीन सरकारबरोबर मुख्य भूमीतील बिशप निवडीसंबंधी केलेल्या तात्पुरत्या करारानंतर ती आणखीनच रंजक आहे. या करारामुळे आता मुख्य भूमीतील बिशपांच्या निवडीवर अंतिम निर्णय पोपच घेतात.

२०२५ मधील कॉन्क्लेव्हमध्ये ८० वर्षांखालील १३५ मतदार असतील. जिथे मतदान होणार आहे, तिथे हे सर्व मतदार आवश्यक संख्येपर्यंत पोहोचत नाही तोवर दररोज दोन वेळा मतदान करतील. नव्या पोपची निवड होईल, तेव्हा व्हॅटिकनच्या चिमणीमधून पांढरा धूर निघेल. तोपर्यंत धुराचा रंग काळाच असेल.

मी ज्या चर्चमध्ये नेहमी प्रार्थनेसाठी जातो, तिथे एकाने मला ‘कॉन्क्लेव्ह’ नावाचा चित्रपट असलेली पेन ड्राइव्ह दिली – ज्यात प्रसिद्ध हॉलीवूड अभिनेता पीटर फायन्स यांनी व्हॅटिकनच्या सेक्रेटरी ऑफ स्टेटची भूमिका केली आहे. हा सेक्रेटरी कॉन्क्लेव्हचे संचालन करतो. ही पेन ड्राइव्ह ज्या व्यक्तीने दिली होती तिची मुलगी चित्रपट संपादनाचं काम करते. त्या चित्रपटात अफगाणिस्तानच्या काबूलमधील आर्चबिशपला पोप म्हणून निवडण्यात आलं! (माझ्या माहितीप्रमाणे, अफगाणिस्तानमध्ये कॅथलिक पाद्रीच नाहीत – कार्डिनल तर फारच दूरची गोष्ट.)

नवीन पोप हे देवाचे सेवक असावेत, त्यांनी भविष्याकडे पाहून तरुण पिढीला आध्यात्मिकता आणि धर्म अधिक स्वीकारार्ह वाटावा यासाठी योजना तयार करावी. सामाजिक मूल्ये बदलत आहेत. उदाहरणार्थ, विवाहसंस्था संकटात आहे. एकेकाळी एकाकीपणा आणि नाकारलेपणाच्या विरोधातील एक आधार असलेली कुटुंबसंस्था आता दुर्लक्षित होत आहे.

चर्चने मला आणि मेल्बाला (माझ्या पत्नीला) ज्याप्रमाणे स्वत्वाची जाणीव दिली, तसेच ते अशा अस्थिर काळात लोकांना आधार देत राहील का?