डॉ. व्यंकटराव घोरपडे

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त केंद्र शासनाने १२ फेब्रुवारी २०२० पासून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना किसान क्रेडिट कार्ड (केसीसी) उपलब्ध करून देण्याविषयी मोहीम सुरू केली आहे. या अंतर्गत ‘किसान भागीदारी प्राथमिकता हमारी’ ही मोहीम राबवण्यात येत आहे. या अंतर्गत शेतकरी, पशुपालकांकडून अर्ज भरून घेण्याची देशव्यापी मोहीम हाती घेण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सहकार, महसूल, ग्रामविकास, कृषी, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास, मत्स्य व्यवसाय विकास नाबार्ड आणि महत्त्वाचे म्हणजे जिल्हा अग्रणी बँकेच्या समन्वयाने सदर मोहीम राबविण्याची आहे.

राज्यातील विशेषतः सहकारी दूध सोसायट्या, दूध संघ, दूध उत्पादक कंपनीच्या सभासदांसाठी म्हणजे दूध उत्पादक पशुपालकांना पशुसंवर्धन विषयक केसीसी कार्ड उपलब्ध करून देण्याबाबत राष्ट्रव्यापी मोहीम आयोजित केली आहे. त्यासाठी अनेक बैठका, पत्रव्यवहार, दुरुस्ती सभा, ग्रामसभा, प्रत्यक्ष भेटी यातून प्रयत्न करण्यात येत आहेत. राज्य पशुसंवर्धन विभागाला दहा लाख किसान क्रेडिट कार्ड वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. या कार्डधारकांना विनातारण रू. १.६० लाख कर्ज उपलब्ध करून दिला जाणार आहे व दूध संस्थेने हमी दिल्यास रु. ३ लाखापर्यंत पतपुरवठा केला जाणार आहे. व्याजदर ७ टक्के व नियमित कर्ज फेडणाऱ्यांना ३ टक्क्यांपर्यंत सवलत देण्यात येणार आहे.

हेही वाचा : भारताचे ‘चीन-मिंधे’ शेजारी!

या योजनेअंतर्गत पशुधन देखभालीसाठी खेळत्या भांडवलासह व्याज अनुदान व क्रेडिट सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. अलीकडे जे पशुपालक शेळ्या मेंढ्या, वराह, कुक्कुटपालन यासारख्या विविध पशुसंवर्धन विषयक कार्यात सहभागी आहेत, तसेच दूध सोसायटीचे सभासद आहेत अशा सर्व बाबींसाठी पशुसंवर्धनविषयक केसीसी कार्ड उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

योजनेच्या अंमलबजावणीसाठी इतर सर्व विभागांसह जिल्हा अग्रणी बँकांचा सहभाग फार महत्त्वाचा आहे. त्यासाठी राज्यातील विभागवार असणाऱ्या स्टेट बँक ऑफ इंडिया, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ इंडिया यांचा समावेश आहे. ऑगस्ट २०२३ अखेर राज्यातून एकूण १,९३,१३२ अर्ज बँकेत सादर करण्यात आले आहेत. पैकी ७९,१४० अर्ज मंजूर करून केसीसी कार्ड वितरित केले आहेत. म्हणजे १० लाख उद्दिष्टाच्या तुलनेत फक्त ७.९१% पशुपालकांना पशुसंवर्धन विषयक केसीसी कार्ड वितरित झाली आहेत. तुलनेत तामिळनाडू, राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश या राज्यांचे काम ५० ते ७० टक्के झालेले आहे. त्यामुळे याबाबतीत प्रसिद्धी, प्रचार आणि अर्ज गोळा करणाऱ्या पशुसंवर्धन विभागाला राज्य सरकार व केंद्र सरकारकडून दोषी ठरवले जात आहे. त्यामुळे क्षेत्रीय स्तरावर अर्ज गोळा करणे, बँकांना पाठवणे त्यासाठी प्रयत्न करणारे पशुधन विकास अधिकारी, पशुधन पर्यवेक्षक व आढावा घेऊन समन्वय साधणारे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी व जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त हे देखील जबाबदार ठरवण्यात येत आहेत.

हेही वाचा : बालसंगोपनाचे धडे भविष्य घडवताहेत…

सुरुवातीच्या काळात क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात अर्ज गोळा केले. ते बँकेत सादर देखील केले. पण हे अर्ज मोठ्या प्रमाणात नामंजूर होत गेले. त्यामागे पूर्वीचे किसान क्रेडिट कार्ड मंजूर असणे, अर्जदार हा थकबाकीदार असणे, एकाच कुटुंबातून पशुधनासाठी दुबार अर्ज सादर करणे, अन्य बँकेतून केसीसीवर पीक कर्ज उचललेले असणे, पूर्वीचा अर्ज प्रलंबित असणे आणि जादा करून पशुधन खरेदीसाठी अर्ज असणे ही कारणे आहेत. त्यामुळे हे अर्ज नामंजूर होऊन परत आले आहेत.

मुळातच ही योजना अत्यंत चांगली आहे. स्वतः पंतप्रधान या योजनेचा अधूनमधून आढावा घेतात. ४ फेब्रुवारी २०१९ रोजी रिझर्व बँक ऑफ इंडियाने देशातील सर्व बँकांना मार्गदर्शक सूचना जारी करून याबाबतीत पुढाकार घेण्याविषयी सूचित केले आहे. तथापि एकूणच राज्यातील प्रत्येक विभागातील जिल्हा अग्रणी बँकांच्या उदासीनतेमुळे आणि पशुसंवर्धन संबंधित कर्ज प्रकरणात आलेल्या अनुभवातून थोडंसं दुर्लक्ष करताना दिसतात असं अनेक क्षेत्रीय अधिकाऱ्यांशी चर्चा करताना जाणवते. अग्रणी बँका या मुळातच कर्जासाठी सुरक्षित तारण नसेल तर कर्ज देण्यासाठी धजावत नाहीत. या योजनेमध्ये १.६० लाख कर्जासाठी विनातारण हे कर्ज म्हणण्यापेक्षा पत (क्रेडिट) म्हणून दिली जाणारी रक्कम आहे. हे पतकर्ज आहे. पशुपालक त्याचा वापर पशुखाद्य खरेदी, पशुवैद्यकीय खर्च, विमा, मजुरी, पाणी, वीज, यांच्या खर्चासाठी खेळते भांडवल म्हणून करू शकणार आहेत.

हेही वाचा : आरक्षण वर्गीकरणाला विरोध म्हणजे सामाजिक न्यायाला विरोध… 

बँका नेहमीप्रमाणे तो थकीत कर्जदार आहे का, त्याचा क्रेडिट स्कोर काय आहे हे पाहतात. पशुपालकही त्यांच्याकडे असणाऱ्या दहा-बारा गाई म्हशींच्या नियमित खर्चासाठी खेळते भांडवल न मागता पशुधन खरेदीसाठी आग्रही राहतात. यामध्ये समन्वय हवा. अग्रणी बँकांनी योग्य प्रमाणात पुढाकार घेऊन पशुसंवर्धन विषयक लाभ घेतलेल्या चांगल्या लाभार्थींची निवड करण्यात व त्यांना अशी केसीसीची सुविधा उपलब्ध करून देण्यात पुढाकार घेणे आवश्यक असल्याचे काही क्षेत्रीय अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. या मूळ योजनेबाबत मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी प्रचारासाठी देखील गरज आहे. अनेक बँक अधिकारी अनेक ठिकाणी आपला स्वतंत्र अर्ज तयार करून त्याप्रमाणे माहिती मागवतात असे देखील अनेक ठिकाणी घडले आहे. त्यामुळे या योजनेबाबत स्वयंस्पष्ट सूचना खालीपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. महिन्यातून किमान एकदा ‘केसीसी कॅम्प’ लावून त्यामध्ये पशुसंवर्धन सह दुग्धविकास, सहकारी दूध संघ, कृषी व संलग्न विभागांनी एकत्र येऊन मार्ग काढावा लागेल. विशेषतः सहकारी दूध संघांना त्यांचे यशस्वी दूध उत्पादक पशुपालक माहीत असतात. ती यादी घेऊन समन्वय साधला तर एकूण चांगले लाभार्थी निवडले जातील त्यांना खेळते भांडवल मिळेल. त्याद्वारे ते निश्चित आपल्या व्यवसायाची वृद्धी करू शकतील.

हेही वाचा : वाघनखांचे अभ्यास-दुवे..

सध्या हा कार्यक्रम फक्त लक्ष्यपूर्तीसाठी चालू राहणार असेल आणि सर्व पशुधन विकास अधिकारी, पशुधन पर्यवेक्षक हे अर्ज गोळा करत सुटले आणि त्यांची गठ्ठे बँकांना सादर करत गेले तर ते कुणाच्याच हिताचे ठरणार नाही. त्यासाठी अग्रणी बँकांनी मुळातच पुढाकार घ्यायला हवा. योजना समजावून घ्यावी आणि नेमकेपणाने सहकार्याची भूमिका घेतली तर गुणात्मक दृष्ट्या चांगले काम होईल आणि चांगले परिणाम दिसतील. अन्यथा सर्वांचा बहुमूल्य वेळ वाया जाऊन पशुपालक शेवटी आहे त्या भांडवलात व्यवसाय करतील. त्यामुळे याबाबत प्रसिद्धीप्रचारासह मोहीम स्वरूपात योजना राबवणे आवश्यक आहे. फक्त लक्ष्य देऊन अर्जासाठी पशुपालकांना उद्युक्त करणे, कागद गोळा करायला लावणे हे बरोबर ठरणार नाही हे निश्चित. (लेखक पशुसंवर्धन विभागातील सेवानिवृत्त सहाय्यक आयुक्त आहेत.)

मराठीतील सर्व विशेष लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Just collecting applications for kisan credit card from farmers will not be beneficial css