अमेरिकी राजकारणावर लक्ष ठेवणाऱ्या प्रत्येकाचे लक्ष सोमवारी शिकागोतल्या ‘डेमोक्रॅटिक कन्व्हेन्शन’कडे होते. हे निव्वळ पक्षांतर्गत अधिवेशन; पण राष्ट्राध्यक्ष निवडणुकीच्या आधी या अधिवेशनांना निराळे महत्त्व असते. राष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवाराला पक्षांतर्गत पाठिंबा किती आहे, ते इथे प्रत्यक्ष दिसते. पण सोमवारचा दिवस ‘मावळते’ राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्यामुळे स्मरणीय ठरला. अधिवेशनाचे पहिले अधिकृत सत्र बायडेन यांच्याच भाषणाने गाजणार, याची पुरेशी प्रसिद्धी पक्षाने आधीच केलेली होती हे खरे आणि बायडेन यांच्या भावनिक उद्गारांना उपस्थितांकडून तितकाच भावनेने ओथंबलेला प्रतिसाद मिळत होता हेही खरे… पण बायडेन यांचा राजकीय संदेश राहिला बाजूला आणि त्यांचा ‘निरोप समारंभ’ मात्र झोकात झाला, असे चित्र या वेळी दिसले. वास्तविक बायडेन हे अत्यंत अनुभवी राजकारणी आणि प्रशासक. त्यांच्याबाबत असे का घडावे?
एकतर, या एकंदर अधिवेशनाचे ‘उत्सवमूर्ती’ बायडेन नाहीत. त्या आहेत कमला हॅरिस. माजी अध्यक्ष बराक ओबामा किंवा अन्य काही नामवंतांची उपस्थिती इथे लक्षवेधी ठरत असली, तरी या अधिवेशनाची निष्पत्ती हॅरिस यांच्याचकडे जाणारी आहे कारण आता राष्ट्राध्यक्षपदासाठी त्या उमेदवार आहेत. बायडेन यांनी सोमवार गाजवला, त्यांच्या कुटुंबियांचीही भावनेने अगदी ओथंबलेली भाषणे पक्षाच्या अधिवेशनात झाली, मध्येच कमला हॅरिस यांनीही अनपेक्षित उपस्थिती लावून बायडेनस्तुती केली, मग हिलरी क्लिंटन यांच्यासह अनेकांनी बायडेन यांच्या देशसेवेचे गोडवे गायले, यात काही राज्यांचे डेमॉक्रॅटिक गव्हर्नर तर अधिकच रसाळ, वेल्हाळपणे बोलले… पण ही भाषणे इतकी लांबली की, खुद्द बायडेन यांचे भाषण सुरू झाले तेव्हा रात्रीचे साडेदहा होत आले होते! तरीसुद्धा गर्दी कमी झाली नव्हती, अगदी नॅन्सी पेलोसी- ज्यांनी बायडेन यांच्यावर अनेकदा आक्षेप घेतलेले आहेत आणि गेले वर्षभर तर बायडेन आणि पेलोसी यांच्यात संवादही नाही हेच उघड झालेले आहे- त्यासुद्धा ‘थँक यू जो’चा गजर करणाऱ्या श्रोत्यांमध्ये तनमनाने सहभागी झाल्याचे दिसत होते.
आणखी वाचा-मोदींची पोलंड, युक्रेन भेट ‘मध्यस्थी’साठी नव्हे… भवितव्यासाठी!
‘मी माझ्या प्रयत्नांत कधीही कुठेही कसूर सोडली नाही’ आणि ‘तुमच्या पाठिंब्यामुळे आम्ही आपल्या देशाला प्रगतीची सर्वोत्कृष्ट चार वर्षे लाभली, हे नि:संशय’ यासारखी वाक्ये बायडेन यांच्या मुखातून यावीत आणि श्रोत्यांनी उचंबळून टाळ्यांची दाद द्यावी, असे हृद्य क्षण अनेक आले. बायडेन यांच्या भाषणाचा सूर हा स्वत:च्या आजवरच्या प्रदीर्घ वाटचालीचा आढावा, राष्ट्राध्यक्षपदाच्या आपल्या कारकीर्दीतली बलस्थाने सांगताना रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीकेची झोड, कमला हॅरिस यांच्यावर विश्वास व्यक्त करणारी आणि त्यांना पाठिंबा देणारी विधाने… असा होता. त्यापैकी ट्रम्प यांच्यावर टीका करताना बायडेन यांनी अनेक विपर्यस्त विधाने केली, त्यांची यादी ‘न्यू यॉर्क टाइम्स’ आणि ‘वॉशिंग्टन पोस्ट’ या दैनिकांनी दिली आहे. यापैकी काही विपर्यास मासलेवाईक आहेत. उदाहरणार्थ, ट्रम्प यांच्या कार्यकाळातील इन्शुलीन इंजेक्शनचा खर्च ५०० डॉलरहून अधिक असल्याचे सांगताना ‘आम्ही अवघे ३५ डॉलर महिना या खर्चात हेच इंजेक्शन उपलब्ध केले’ असे बायडेन म्हणाले, पण ट्रम्प-काळातल्या खर्चाचा आकडा वर्षभरासाठीचा होता हे मात्र बायडेन विसरले! किंवा, ट्रम्प पुन्हा आले तर ‘मेडिकेअर’ला कात्री लागेल, असे बायडेन यांनी ठासून सांगितले- पण हा आरोप डेमोक्रॅट्स आपल्यावर करत राहाणार, हे ओळखल्यामुळे प्रचारकाळात तरी ट्रम्प यांनी आरोग्य योजनांवरचा खर्च आवश्यकच असल्याचे पालुपद लावले आहे, याकडे बायडेन यांचे दुर्लक्ष झाले. याला बायडेन यांच्या राजकीय अभिनिवेशाचा भाग म्हणावे की त्यांची जीभ घसरली असेल, यावरही आता चर्चा होऊ लागेल.
बायडेन हे ‘मीच निवडणूक लढवणार’ म्हणता-म्हणता २१ जुलै रोजी बायडेन यांनी या स्पर्धेतून माघार जाहीर केली, त्याआधी त्यांच्या भाषणांतल्या चुकांवर, वयपरत्वे त्यांची तारांबळ होते आहे यावरही भरपूर टीका झाली होती. त्यानंतर अवघ्या महिन्याभराच्या आत कमला हॅरिस यांनी डेमोक्रॅट्सची मने जिंकली आहेत. ट्रम्प आणि बायडेन यांच्यामध्ये स्पर्धा असताना ज्या काही मतदार-कलचाचण्या झाल्या, त्यांत बायडेन कमी आणि ट्रम्प वरचढ असे चित्र होते. ते आकडे आता पूर्णपणे फिरले आहेत. याउलट, २२ जुलैपासून ज्या १३ जनमत चाचण्या झाल्या, त्यांपैकी फक्त दोन चाचण्यांत (त्याही ऑगस्टच्या सुरुवातीपर्यंतच्या) हॅरिस यांची पिछाडी वगळता त्या नेहमी आघाडी वाढवत राहिल्याचे दिसते आहे.
आणखी वाचा-बदलापूर स्थानकातला उद्रेक काय सांगतो?
बायडेन यांना शिकागोत मिळालेला जंगी प्रतिसाद, जर तेच उमेदवार म्हणून कायम राहिले असते तर मिळाला असता का हा खरा प्रश्न आहे. ‘नाही’ हे त्याचे उत्तरही उघड आहे. बायडेन वेळीच माघार घेते झाले आणि पक्षाचा विचार त्यांनी केला, याला पक्षाने दाद दिली एवढाच शिकागोतल्या त्यांच्या ‘निरोप समारंभा’चा अर्थ. हा सोहळा आटोपून बायडेन कुटुंबीय थेट कॅलिफोर्नियाकडे रवाना झाले… तिथून पुढे काही दिवस ते कुटुंबीयांसह सुट्टीवर असणार आहेत. पक्षाच्या अधिवेशनात आता ते नसतीलच, पण पक्षीय राजकारणातही कमीच दिसतील… ‘मावळते अमेरिकी राष्ट्राध्यक्ष’ हीच येत्या नोव्हेंबरातल्या निवडणुकीपर्यंत आणि जानेवारीत नव्या अध्यक्षांच्या शपथविधीपर्यंत त्यांची ओळख उरेल. अर्थात, ‘काळजीवाहू’ म्हणून काम करण्याचे बायडेन यांनी ठरवले तरी त्यांना ज्यांची काळजी करावी आणि घ्यावीही लागेल, असे विषय बरेच आहेत… विशेषत: इस्रायल संघर्षाचा पेटता निखाराच ते हॅरिस यांच्याहाती सुपूर्द करणार का, हाही प्रश्न आहेच.
पण पुढले दोन दिवस तरी शिकागोत अशा चिंता-काळज्यांची चर्चा आत्यंतिक आत्मविश्वासाने होत राहील… पक्षाचा एकंदर नूर ‘बाय बाय बायडेन… वेलकम कमला हॅरिस’ असाच आहे आणि देशाचाही तो तसाच असायला हवा, हे यातून ठसवले जाईल!