योगेंद्र यादव
कन्नड लेखक देवनुरा महादेव यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर एक ६८ पानी पुस्तक लिहिले आहे. द्वेषाच्या राजकारणावर मांडणी करणाऱ्या या पुस्तकात त्यांनी केलेली संघावरील टीका ही धर्मनिरपेक्षतेबाबतच्या वैचारिक वादविवादाची पुनरावृत्ती नाही.
२०१७ च्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या प्रचारातून मी आणि देवनुरा महादेव परतत होतो. आमच्या पक्षाच्या एका विशिष्ट उमेदवाराबद्दल मी नाखूश, त्याच्याकडून जी स्पष्टीकरणे आली होती, त्यावर मी समाधानी नव्हतो. मी देवनुरा यांच्याकडे वळलो: ‘‘देवनुरा सार (म्हणजे कन्नडमध्ये ‘सर’), तुम्हाला काय वाटते? जे वाटते ते सांगा. तुम्हाला मुत्सद्दीपणे बोलण्याची गरज नाही.’’ ते माझ्याकडे वळून बघत म्हणाले, ‘‘मी नेहमीच खरेच सांगतो.’’ ‘‘मी नेहमीच खरेच सांगतो.’’ हे त्यांचे वाक्य माझ्या मनात कोरले गेले आहे.
देवनुरा महादेव हे प्रतिष्ठित कन्नड साहित्यिक, एक विचारवंत आणि कर्नाटकातील आदरणीय राजकीय कार्यकर्ते आहेत. कधी कधी ते इतके लाजाळू वागतात की एखाद्याला आश्चर्य वाटेल की हे सार्वजनिक जीवनात कसे काय आहेत? सार्वजनिक पातळीवर वावरतानाही लोकांच्या नजरेतून गायब होण्याची हातोटी त्यांच्याकडे आहे. एखाद्या कार्यक्रमात तुम्हाला अचानक व्यासपीठावरची त्यांची अनुपस्थिती लक्षात येते, विचारलेत तर कोणी तरी सांगते, की ते कदाचित धूम्रपानासाठी बाहेर पडले असतील. त्यांच्या जीवनाला एक वेगळी लय आहे आणि त्यांचे प्राधान्यक्रमही अगदी वेगळे आहेत.
मी सांगायला विसरलोच, की ते दलित आहेत. पण आता त्यांना दलित लेखक किंवा दलित कार्यकर्ते म्हणण्याची घाई करू नका. देवनुरा महादेव यांना दलित विचारवंत म्हणताना त्यांचे सामाजिक स्थान, ते ज्याविषयी लिहितात ते सामाजिक वातावरण आणि ते ज्याकडे लक्ष वेधून घेतात ते सांस्कृतिक विश्व याव्यतिरिक्त फारसे काही सांगता येणार नाही. इतर अनेक दलित कार्यकर्त्यांप्रमाणे ते नुसता आक्रोश करत नाहीत. मानवतेच्या भूमिकेतून सगळीकडे बघतात. त्यांच्या दृष्टीने सत्यापुढे दुसरे काहीही महत्त्वाचे नाही.
अलीकडे देवनुरा महादेव चर्चेत आहेत ते त्यांनी लिहिलेल्या ६४ पानी पुस्तकामुळे. ‘आरएसएस – इट्स डेप्थ अॅण्ड ब्रेड्थ’ या त्यांच्या नव्या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या पहिल्याच महिन्यात तब्बल एक लाख प्रती विकल्या गेल्या आहेत. त्यांच्या या पुस्तकाचा इंग्रजी, तेलुगु, तमिळ, मल्याळम आणि हिंदी भाषांमध्ये अनुवाद होतो आहे. विकेंद्रीकरणावरील त्यांच्या विश्वासाप्रमाणे, त्यांनी मुक्त स्रोत प्रकाशनाची निवड केली. कर्नाटकातील अनेक प्रकाशकांना एकाच वेळी पुस्तकाची परवानगी देण्यात आली होती. विद्यार्थ्यांच्या गटांनी आणि गृहिणींनी त्याच्या प्रती छापण्यासाठी स्वत:चे पैसे जमा केले आहेत. देवनुरा यांनी कोणतेही मानधन मागितलेले नाही.
हे पुस्तक इतक्या अल्पावधीत का लोकप्रिय झाले याबद्दल मी कर्नाटकच्या सांस्कृतिक इतिहासात, विशेषत: महादेव यांच्या समाजवादी परंपरेत खोलवर गुंतलेले समाजशास्त्रज्ञ, माझे मित्र प्रोफेसर चंदन गौडा यांना विचारले. ते म्हणाले की, एक तर राज्यातले सध्याचे संवेदनशील वातावरण. पुस्तकाचा विषयही महत्त्वाचा आहे. अगदी थोडे लेखक, अगदी भाजपचे पुरोगामी टीकाकारही संघाविरोधात बोलायला तयार नाहीत. त्याबाबत सगळीकडे अत्यंत शांतता आहे. त्यामुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरच्या या प्रांजळ टीकेने लक्ष वेधून घेतले आहे.त्याबरोबरच पुस्तक लेखकामुळेही चर्चेत आहे, असे गौडा यांचे म्हणणे आहे. कन्नड जाणणाऱ्या प्रत्येकाला माहीत आहे की देवनुरा महादेव सत्यवादी आहेत. त्यांनी २०१० मध्ये प्रतिष्ठित नृपतुंगा पुरस्कार नाकारला होता आणि १९९० मध्ये राज्यसभेसाठी नामांकन नाकारले होते. त्यांनी २०१५ मधला त्यांचा पद्मश्री आणि साहित्य अकादमी पुरस्कारही परत केला आहे. त्यांचे सर्व साहित्य केवळ २०० पानांचे आहे. त्यांचे निबंध लहान आहेत, त्यांची भाषणे आणखी लहान आहेत, ती सहसा लिहिली जातात, ते ती जराही परिणामकारक न करता ती वाचतात. पण ते त्यांच्या प्रत्येक शब्दावर ठाम असतात. त्यांचे शब्द विक्रीसाठी नाहीत. तुम्ही त्यांना वाकवू शकत नाही. तुम्ही त्यांच्याशी गोडगोड बोलू शकत नाही. त्यांचे टीकाकारही त्यांच्याकडे बोट दाखवत नाहीत.
त्यांची आरएसएसवरील टीका ही धर्मनिरपेक्षतेबाबतच्या वैचारिक वादविवादाची पुनरावृत्ती नाही. इंग्रजी आणि कन्नड साहित्याचे विद्यार्थी आणि त्यांचे जुने सहकारी प्रोफेसर राजेंद्र चेन्नी यांनी मला आठवण करून दिली की देवनुरा महादेव दंतकथा आणि लोककथांमधून, दंतकथा आणि रूपकांमधून आपले सत्य मांडतात आणि दलित साहित्याच्या तुरुंगात बंदिस्त असलेला ‘वास्तववाद’ बाहेर काढतात.
या पुस्तकात त्यांनी नेमके हेच केले आहे. पुस्तकाचा बराचसा भाग द्वेषाच्या राजकारणाच्या सत्याचा पर्दाफाश करण्याविषयी आहे. आर्य उत्पत्तीची मिथके, जातीय वर्चस्वाचा छुपा अजेंडा, घटनात्मक स्वातंत्र्य, संस्था आणि संघराज्य यावर हल्ला आणि फसव्या भांडवलदारांसाठी काम करणारे आर्थिक धोरण या सगळय़ांबद्दल ते त्यांच्या कथांमधून संदेश देतात.
देवनुरा महादेव यांनी भारतीय धर्मनिरपेक्षतेच्या सांस्कृतिकदृष्टय़ा दुबळय़ा राजकारणाला एक नवीन भाषा प्रदान केली आहे, ही भाषा सखोल आणि समृद्ध आहे. कुसुमाबळे या त्यांच्या कादंबरीने गद्य आणि पद्य यातील भेद जसा मोडून काढला होता, त्याचप्रमाणे त्यांचे हे पुस्तक सर्जनशील आणि राजकीय लेखन यातील भेद मोडून काढते. एरवीच्या राजकीय लिखाणाप्रमाणे ते गोलगोल भाषेत सत्य मांडत नाही. सत्याच्या शोधाचा मार्ग म्हणून ते सर्जनशील-राजकीय लेखनाकडे जाते. द्वेषाच्या राजकारणाचा मुकाबला करण्यासाठी ते राजकीय सिद्धांत किंवा संविधानवादाची उच्च भाषा वापरत नाहीत. ते लोकांशी त्यांच्या भाषेत, त्यांच्या रूपकांमधून आणि त्यांच्या सांस्कृतिक आठवणींमधून बोलतात. धर्मनिरपेक्ष राजकारणाची आज हीच गरज आहे.
देवनुरा महादेव यांच्याबद्दल मी माझे मित्र दिवंगत डी. आर. नागराज यांच्याकडून तीन दशकांपूर्वी ऐकले होते. देवनुरा महादेव यांच्याशी असलेल्या माझ्या मैत्रीमुळे आणि राजकीय सहवासामुळे मला त्या टिप्पणीत अंतर्भूत असलेल्या अर्थाचे पदर गेल्या काही वर्षांत समजले आहेत. ‘दलित’ किंवा ‘साहित्य’ किंवा त्यांच्या संयोगात महादेव यांच्या शब्दांनी मूर्त स्वरूप दिलेला राजकीय, नैतिक आणि आध्यात्मिक शोध सामावला जात नाही. ‘‘विभाजन हा राक्षस आहे आणि एकता हा देव आहे.’’ हा देवनुरा महादेव यांचा संदेश देशाने आज पूर्वीपेक्षा अधिक मनापासून वाचण्याची गरज आहे.