– प्रवीण कारखानीस
खाशाबा जाधव आज हयात असते तर त्यांनी वयाच्या शंभराव्या वर्षात पदार्पण केले असते. गरवर्षापासून त्यांचा जन्मदिवस राज्य क्रीडा दिन म्हणून सारा केला जाऊ लागला. याच पार्श्वभूमीवर मी आणि माझे मित्र खाशाबा जाधव यांच्या गोळेश्वर या गावातल्या त्यांच्या निवासस्थानी त्यांचे पुत्र रणजित कुसुम खाशाबा जाधव आणि भारती रणजित जाधव यांची भेट घेतली.
गोळेश्वर हे छोटेसे गाव सातारा जिल्ह्यातल्या कराड शहरापासून कार्वे गावाच्या दिशेला अवघ्या चार किलोमीटर अंतरावर आहे. गावाच्या वेशीवरच खाशाबा जाधव यांच्या नावे उभारलेला स्मृतिस्तंभ दिसला. खाशाबा यांचा जन्म याच गावी झाला होता आणि त्यांचे वास्तव्य, मुंबईतला त्यांचा नोकरीचा काळ वगळता, बहुतांशी याच गावी असे. हेलसिंकी ( फिनलंड) येथे १९५२ सालच्या ऑलिंपिक स्पर्धेत, ५७ किलोग्रॅमखालील वजनी गटातल्या कुस्तीत तिसऱ्या क्रमांकाचे कांस्य पदक मिळवून ते जेव्हा आपल्या या गोळेश्वर गावी परतत होते, तेव्हा साताऱ्यापासून कराडमार्गे थेट गोळेश्वर गावापर्यंत त्यांची जी मिरवणूक काढण्यात आली होती त्यात तब्बल दीडशे – दोनशे बैलगाड्या सामील झाल्या होत्या. त्यांच्या तेव्हाच्या छोट्याश्या घराचे आता ‘ऑलिंपिक निवास’ या दुमजली टुमदार बंगल्यात रूपांतर झाले आहे. या वास्तूच्या दर्शनी भिंतीवर ऑलिंपिकचे बोधचिन्ह आहे. दिवाणखान्यात पैलवान खाशाबा यांची असंख्य कृष्णधवल छायाचित्रे, मानपत्रे, पदके आणि सन्मानचिन्हे तसेच खाशाबांना पोलीस खात्याकडून विशेष नैपुण्याबद्दल पारितोषक म्हणून मिळालेली मानाची तलवार, खाशाबांच्या हस्ताक्षरातली अगणित पत्रे कल्पकतेने जतन केली आहेत. खाशाबा कोल्हापूरच्या राजाराम कॉलेजमध्ये शिकत असताना १९५० सालच्या ऑक्टोबर महिन्यात त्यांनी त्यांच्या वडिलांना लिहिलेले नऊ पैशांचे पोस्ट कार्ड रणजित यांनी दाखवले जे खाशाबांनी शाईच्या पेनने लिहिल्याचे दिसते. त्यात त्यांनी पोस्टाकडून मनिऑर्डर उशिरा प्राप्त झाल्याने घरी यायला थोडा उशीर होत असल्याचे वडिलांना कळवले होते.
हेही वाचा – नामविस्तारानंतर आंबेडकरी चळवळीची वाढ खुंटलेली कशी?
रणजित यांच्याशी मनमोकळ्या गप्पा मारत असताना मला खाशाबांविषयी अनेक गोष्टी समजल्या. त्यांचे आजोबा- नानासाहेब जाधव आणि वडील दादासाहेब जाधव पट्टीचे कुस्तिगीर होते. खाशाबांचे सर्व बंधूही मल्लविद्येत प्रवीण होते. पैलवान असूनही खाशाबा आडदांड शरीरयष्टी लाभलेले महाकाय मल्ल नव्हते. शक्तीबरोबरच युक्तीचा वापर करून ते कुस्तीच्या आखाड्यात बाजी मारत. त्यांच्या वडिलांनी त्यांना कुस्तीबरोबर कबड्डी, खोखो, मलखांब, भालाफेक आदी खेळांचाही भरपूर सराव करण्यास प्रोत्साहन दिले. त्यामुळेच खाशाबा यांची देहयष्टी लवचिक बनत गेली. कराडच्या टिळक हायस्कूलचे संस्कार खाशाबांवर त्यांच्या शालेय जीवनात झाले. पुढे त्यांनी कोल्हापूरच्या राजाराम कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. या कॉलेजमध्ये असतानाच ते बाबुराव बलावडे आणि बेलापुरे गुरुजी यांच्याकडून कुस्तीचे अनेक डावपेच शिकले. त्यांनी कुस्तीच्या आंतरमहाविद्यालयीन स्पर्धांमध्ये अगणित बक्षिसे पटकावली आणि आपल्या कॉलेजचे नाव उज्ज्वल केले. हे कॉलेज त्याकाळी मुंबई विद्यापीठाला संलग्न होते. त्यांनी विद्यापीठाला अनेक पदके मिळवून दिली. राष्ट्रीय स्तरावरच्या कुस्तीत त्यांनी अनेकदा अजिंक्यपद मिळवले. कुस्तीतले त्यांचे नेत्रदीपक यश पाहून राजाराम कॉलेजचे तत्कालीन प्राचार्य बॅरिस्टर बाबासाहेब हनुमंतराव खर्डेकर खूपच प्रभावित झाले. त्यांनी खाशाबांना सर्वतोपरी साहाय्य केले.
बडोद्यातल्या सुप्रसिद्ध जुम्मादादा आखाडयाचे अर्थात व्यायाममंदिराचे प्रोफेसर माणिकराव यांच्याही कानावर खाशाबा यांची यशोगाथा पडली होती. त्यांनी १९४५ च्या सुमारास खाशाबा यांची स्वतःहून भेट घेऊन त्यांची प्रशंसा केली आणि कुस्तीतले काही कानमंत्रही दिले. पुढे खाशाबा यांना लंडन येथे होणाऱ्या १९४८ सालच्या ऑलिंपिक स्पर्धेत कुस्ती खेळण्यासाठी सहभागी केले असल्याचे जाहीर झाले. त्या काळी कुठल्याही क्रीडास्पर्धेत एखादा खेळाडू भारताचे प्रतिनिधित्व करणार असला तरी त्याच्या प्रवासखर्चाचा भार हा त्या खेळाडूलाच उचलावा लागत असे. तोपर्यंत कोल्हापूर हे संस्थान खालसा झालेले नव्हते आणि छत्रपती शहाजी राजे (द्वितीय) हे कोल्हापूरच्या संस्थानाचे प्रमुख होते. दानशूरपणाच्या परंपरेला अनुसरून त्यांनी खाशाबा यांच्या संपूर्ण प्रवासखर्चाची जबाबदारी स्वीकारली. खाशाबा यांचे निकटवर्ती आणि गावकरी यांनीही यथाशक्ती मदत केली आणि खाशाबा लंडनला रवाना झाले.
खाशाबा हे ५२ किलो वजनापेक्षा कमी वजन म्हणजेच फ्लायवेट गटातून कुस्ती खेळणार होते. ऑलिंपिक स्पर्धेतल्या फ्री स्टाईल कुस्तीचे नियम आणि अटी, भारतातल्या नियम – अटींपेक्षा वेगळे असल्याने ते सर्वप्रथम अवगत करून घेणे गरजेचे होते. शिवाय तिथे मॅटवरच्या कुस्तीचा सराव करणे हे गरजेचे होते. या कामी खाशाबा यांना रीस गार्डनर या इंग्लिश प्रशिक्षकाने केलेले मार्गदर्शन अतिशय मोलाचे ठरले. या स्पर्धेत खाशाबा जाधव यांचे नाव सहाव्या स्थानावर झळकले. वयाच्या अवघ्या तेवीसाव्या वर्षी ते जागतिक पातळीवर मान्यता मिळालेले बहुचर्चित कुस्तीपटू झाले होते.
पुढे प्रशिक्षक गोविंद नागेश पुरंदरे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी मॅटवर कुस्ती खेळण्याचा सराव चालू केला. या मॅट पाश्चिमात्य देशांतून आयात केलेल्या नव्हत्या. स्थानिक विणकरांकडून त्या बनवून घेतलेल्या होत्या. अश्या मॅटवर कुस्तीचा सराव करण्यासाठी खाशाबांप्रमाणेच केशव मानगावे आणि श्रीरंग जाधव हे स्थानिक कुस्तीगीर देखील नियमितपणे येऊ लागले. पुरंदरे सरांनी या सर्वांना उत्तम शिक्षण देऊन मल्लविद्येत तरबेज केले. परिणामी हे तिघेही कुस्तीगीर १९५२ च्या हेलसिंकी ऑलिंपिक स्पर्धेत वेगवेगळ्या गटात खेळण्यासाठी पूर्णतः सिद्ध झाले आणि ऐनवेळी कुठे माशी शिंकली कुणास ठाऊक परंतु खाशाबा यांना मद्रास येथे घेतलेल्या चाचणी स्पर्धेत आवश्यक गुणांपेक्षा एक गुण कमी मिळाला. खाशाबांनी पतियाळाचे महाराज, जे निवड समितीचे प्रमुख होते, त्यांच्याकडे दाद मागितली आणि पुनश्च चाचणी कुस्ती घ्यावी अशी त्यांना विनंती केली. फेरचाचणीत त्यांनी कलकत्त्याचा पैलवान निरंजन दासला तीन वेळा सहज चीतपट केले. खाशाबांचा सहभाग सुनिश्चित झाला.
जिगरबाज खाशाबांनी आता कुस्ती खेळायची ती विजयासाठीच या निर्धाराने शड्डू ठोकला. पुढे त्यांनी जी कामगिरी रचली ती इतिहासात नोंदवली गेली आहे. खाशाबा जाधव कांस्य पदकाचे मानकरी ठरले. त्याच दिवशी, हेलसिंकीच्या त्याच ऑलिंपिकमध्ये भारतीय हॉकी संघाने भारताला हॉकीतले पाचवे सुवर्ण पदक मिळवून दिले, मात्र तरीही त्या दिवसाची ‘ब्रेकिंग न्यूज’ होती, ती खाशाबा जाधव यांच्या कांस्य पदकाची !
मायदेशी परतताच खाशाबांनी अग्रक्रमाने आपले उर्वरित महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले आणि मुंबई विद्यापीठाची पदवी प्राप्त केली. योगायोगाने कोल्हापूरमध्ये त्यांची प्रत्यक्ष भेट, भारतीय पोलिस सेवेतले त्यावेळचे ज्येष्ठतम अधिकारी नारायण मारुती कामटे यांच्याशी झाली. खाशाबांच्या कुस्तीकौशल्याचा उपयोग पोलीस दलाला होऊ शकतो, हे जाणून त्यांनी खाशाबा जाधव यांची पोलीस खात्यात थेट नियुक्ती केली. त्यांनी तिथेही सर्वोत्तम प्रशिक्षणार्थी म्हणून मानाची तलवार मिळवली. मुंबईच्या पोलीस खात्यात त्यांनी २८ वर्षे निष्कलंक सेवा केली आणि निवृत्त होऊन पत्नी- मुलासह मूळ गावी परतले.
निवृत्तीनंतरच्या काळात खाशाबांना कुस्तीच्या क्षेत्रात खूप काही करायचे होते. १९५६ च्या मेलबर्न ऑलिंपिकमध्ये भारताचे नाव सुवर्ण पदकावर कोरण्याचे त्यांचे स्वप्न, त्या स्पर्धेला जाण्यापूर्वीच त्यांच्या एका गूढघ्याची वाटी सरकल्याने अधुरे राहिले होते. कधीतरी आपल्या कृष्णाकाठच्या कुस्तीगिराने ते पूर्ण करावे असे त्यांना वाटत होते. त्यासाठी एक अद्ययावत क्रीडा संकुल आपल्या गावात उभारावे असा त्यांचा मानस होता. नियतीला ते मान्य नव्हते. १४ ऑगस्ट १९८४ चा दिवस होता. खाशाबा काही कारणास्तव कराडला किंवा अन्य कुठेतरी जायला बाहेर पडले होते. एका परिचिताने त्यांना मोटरसायकलवर आपल्या मागे बसविले. वेगात चाललेली ती मोटरसायकल, रस्त्यात खड्डा आल्यामुळे असेल, अचानक ब्रेक दाबल्यामुळे असेल अथवा एखाद्या गाय बकरीला वाचवण्याच्या प्रयत्नामुळे असेल परंतु ती मोटरसायकल अचानक घसरून पडली. त्याक्षणी मागे बसलेले खाशाबा रस्त्याच्या बाजूला फेकले गेले. त्यांच्या डोक्याला जबरदस्त मार लागला आणि मेंदुतून रक्तस्राव सुरू झाला. वयाची केवळ ५९ वर्षे पूर्ण करून साठीकडे दमदार वाटचाल करत असलेल्या या उमद्या ऑलिंपिक वीराचा अंत असा अनपेक्षितपणे व्हावा हे देशाचे निव्वळ दुर्दैवच म्हटले पाहिजे.
हेही वाचा – स्त्रीद्वेष्टेपणा की कर्मचाऱ्यांच्या शोषणाची पूर्वतयारी?
खाशाबा हयात असताना त्यांच्या कार्यकर्तृत्वाची दखल फारशी घेतली गेलीच नाही. वास्तविक पद्म पुरस्कार मिळणे अपेक्षित होते. तसे झाले नाही. महाराष्ट्र शासनाने त्यांना मरणोत्तर शिवछत्रपती पुरस्कार १९९२ साली दिला. भारत सकारच्या क्रीडा मंत्रालयातर्फे २००० साली त्यांना मरणोत्तर अर्जुन पुरस्कार देण्यात आला. खाशाबा जाधव यांनी १९५२ साली मिळविलेल्या कांस्यपदकानंतर तब्बल ४४ वर्षांनी, १९९६ साली लिएण्डर पेस याने ॲटलांटा ऑलिंपिकमध्ये टेनिस (पुरुष) गटाच्या एकेरी सामन्यात कांस्य पदक मिळवले. दरम्यानच्या काळात अशी कामगिरी करणारे खाशाबा एकमेव भारतीय खेळाडू होते.
त्यांच्या मृत्यूनंतर २०१० साली दिल्लीतच झालेल्या राष्ट्रकुल देशांच्या क्रीडा स्पर्धेत इंदिरा गांधी क्रीडा संकुलाच्या ज्या हॉलमध्ये कुस्तीच्या स्पर्धांचे आयोजन केले होते, त्या हॉलला खाशाबांचे नाव दिले होते. पुण्यात बालेवाडी क्रीडा संकुलात ॲथलेटिक्स स्टेडियमच्या एका प्रवेशद्वाराला त्यांचे नाव दिले आहे. पुणे विद्यापीठाच्या विस्तीर्ण क्रीडा संकुलाच्या जमिनीवर खाशाबांचा ब्रॉन्झचा पुतळा स्थापन केला आहे. प्रतिवर्षी पुणे विद्यापीठातील सर्वोत्तम महिला आणि सर्वोत्तम पुरुष खेळाडूला खाशाबा जाधव ट्रॉफी दिली जाणार आहे. खाशाबा जाधव यांचे नाव पुण्यातल्या एका रस्त्याला दिलेले आहे. त्यांच्या स्मृती जागवणारी अशी काही दृश्य स्वरूपातील अपवादात्मक उदाहरणे सांगता येत असली तरी यंदाच्या प्रजासत्ताक दिनी खाशाबा दादासाहेब जाधव यांच्या जन्मशताब्दीचा सुयोग साधून भारत सरकारने त्यांना यथायोग्य मरणोत्तर पद्म पुरस्कार जाहीर केला, तर तो निश्चितच दुग्धशर्करा योग ठरेल!