– अरुण प्रकाश
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
कारगिल संघर्ष घडण्याच्या सुमारे वर्षभर आधी, पाकिस्तानने अणुचाचणी केली. ती करण्याचे कारण, भारताने अशीच चाचणी केली असे दिले गेले. मात्र तेव्हापासून जगभर या दोन अण्वस्त्रधारी शेजाऱ्यांबद्दल चिंता व्यक्त होऊ लागली. गेल्या २४ वर्षांत मोठा संघर्ष झाला नाही, हे चांगलेच. परंतु अण्वस्त्रांविषयी पाकिस्तानची मानसिकता काय आहे?
पाकिस्तानच्या अणुचाचणीचा वर्धापनदिन त्या देशात ‘योम- ए- तकबीर’ म्हणून अधिकृतपणे साजरा केला जातो. यंदा त्या चाचणीचे २५ वर्ष, म्हणून जोर जरा अधिकच होता. पाकिस्तानचे निवृत्त लेफ्टनंट जनरल आणि आता त्या देशाच्या ‘नॅशनल कमांड ऑथोरिटी’चे सल्लागार असलेल्या खालिद किडवाईंचे प्रमुख भाषण इस्लामाबादच्या ‘इन्स्टिट्यूट ऑफ स्ट्रॅटेजिक स्टडीज’मधील सोहळ्यात झाले. वास्तविक या संस्थेमधील ‘शस्त्र-नियंत्रण आणि निरस्त्रीकरण केंद्र’ हे त्यांच्या भाषणाचे प्रमुख आयोजक होते, पण किडवाईंनी पाकिस्तानच्या अण्वस्त्रसज्जतेबद्दल जी काही विधाने, तीही ज्या पद्धतीने केली, ते व्यूहनीती अभ्यासकांची तसेच कोणाही शांतताप्रेमींची चिंता वाढवणारेच ठरते.
हेही वाचा – कर आकारणीचा जुगार!
हेच किडवाई पाकिस्तानची अण्वस्त्रसज्जता वाढवली जात असताना सेवेत होते. भारताने १९७१ मध्ये पाकिस्तानला धूळ चारली, मग १९७४ मध्ये भारताने अणुचाचणीही केली, म्हणून पाकिस्तानलाही अण्वस्त्र कार्यक्रमाकडे वळावे लागले अशा नेहमीच दिल्या जाणाऱ्या कारणांचा पाढा वाचल्यावर किडवाईंनी पाकिस्तानची लष्करी नीती ‘फुल स्पेक्ट्रम डिटरन्स’ची – म्हणजे पर्यायाने, अण्वस्त्रहल्ला होणारच असे गृहीत धरून शस्त्रास्त्रसज्जता ठेवण्याची गरज का आहे, यावरही उपस्थितांना ‘मार्गदर्शन’ केले. याआधीच्या काळात पाकिस्तानची नीती ही अगदी गरजेपुरती अण्वस्त्रे ठेवण्याची (क्रेडिबल मिनिमम डिटरन्स) होती, ती राखूनच पाकिस्तान ‘फुल स्पेक्ट्रम डिटरन्स’कडे वळला आहे, असे ते म्हणाले. भारताची नीती ही अण्वस्त्रे टाळण्यासाठी अन्य प्रकारची सज्जता राखण्याची (कोल्ड स्टार्ट डॉक्ट्रीन) आहे, याचा उल्लेख त्यांनी केला खरा, पण भारताकडून असणाऱ्या संभाव्य धोक्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पाकिस्तानाची नीती योग्यच, अशी भलामणही त्यांनी केली.
पाकिस्तानच्या अण्वस्त्रसज्जतेचे अगदी तपशीलवार वर्णनच या किडवाईंनी जाहीरपणे केले. अण्वस्त्रसज्जतेबद्दलची ‘क्षितिजसमांतर आयाम’ आणि ‘ऊर्ध्वगामी आयाम’ वगैरे परिभाषा वापरत ते म्हणाले की, पाकिस्तानचे पायदळ, नौदल आणि हवाईदल या तीन्ही दलांकडून अण्वस्त्रांचा उपयोग होऊ शकतो, इतकी सज्जता आहे (हा क्षितिजसमांतर आयाम) आणि पाकिस्तानकडील अण्वस्त्रांची मारा-क्षमता आता शून्य किलोमीटरपासून ते २७५० किलोमीटरपर्यंत अशी व्यापक झालेली आहे (हा ऊर्ध्वगामी आयाम). हे आयाम भारताला डोळ्यासमोर ठेवूनच वाढवले गेले आहेत, हेही किडवाईंनी नमूद केले.
किडवाईंच्या म्हणण्याचा मथितार्थ असा की, पाकिस्तानच्या सिंध प्रांतातून डागले गेलेले अण्वस्त्र भारताच्या अंदमान बेटापर्यंत मारा करू शकते एवढी क्षमता त्यांच्या ‘शाहीन-३’ अण्वस्त्राकडे आहे. मात्र त्यांच्या भाषणातील ‘शून्य किलोमीटर मारा क्षमते’चा उल्लेखही भारताच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे, कारण पाकिस्तानकडील ‘नस्र’ अण्वस्त्र ६० किलोमीटरपर्यंतचा मारा करू शकते आणि त्यांच्या लष्कराकडे ते आहे. याखेरीज आण्विक भूसुरुंग, आण्विक तोफगोळे आदींची जमवाजमव करण्याचा पाकिस्तानचा हेतू आहे, असा किडवाईंनी केलेल्या ‘शून्य किलोमीटर’चा अर्थ होतो. (भारतात होणाऱ्या घुसखोरीच्या संदर्भात हा तपशील महत्त्वाचा आहे). अशा प्रकारच्या अण्वस्त्राची स्फोटकता जरी ‘०.१ ते १ किलोटन’ इतकीच असली तरीही ‘टीएनटी’ स्फोटकांच्या १०० टन ते एक हजार टन माऱ्यामुळे होणाऱ्या नुकसानीएवढी हानी त्यामुळे घडू शकते.
पाकिस्तानच्या या पावलांची तुलना शीतयुद्धाच्या काळात १९६७ पासून अमेरिका व ‘नाटो’ने जशी भरमसाट अण्वस्त्रवाढ केली, त्या नीतीशीच होऊ शकते. अखेर त्या अणुयुद्धखोरीला लगाम घालण्याचे काम अमेरिकेचे तत्कालीन संरक्षणमंत्री रॉबर्ट मॅक्नामारा यांनी केले होते. अख्खे जग अण्वस्त्रसंहाराच्या खाईत सापडू शकते, असा इशारा त्यांनी दिल्यावर अण्वस्त्र-नियंत्रण वाटाघाटींची सुरुवात अमेरिका व रशियादरम्यान झाली होती.
किडवाईंच्या भाषणातून भारताबद्दलचा त्यांचा अपसमज उघड होतो. भारताने नेहमीच ‘सज्जड प्रत्युत्तरा’चे (मॅसिव्ह रिटॅलिएशन) धोरण ठेवले आहे, परंतु याचा गैर अर्थ किडवाईंनी लावला तो, भारत अण्वस्त्रवापर करील असा. त्यांचा समज हाच आहे, हे या भाषणातील “पाकिस्तानचा प्रति-सज्जड प्रतिहल्ला हा (भारतापेक्षा) जास्त नसला तरी तितकाच संहारक असेल” या विधानावरून स्पष्ट होते. भारतावर कुठेही हल्ला करण्यास पाकिस्तानला जणू मुक्तद्वारच आहे, अशा थाटात बोलणारे किडवाई भारताची सज्जता आणि रशियन ‘एस-४००’ यांचे संदर्भ विसरतात, हा भाग निराळाच. पण “… भारताकडील अस्त्रांना कोठेही दडून बसण्यास आम्ही जागाच राहू दिलेली नाही” हे त्यांचे विधानही दखलपात्र ठरते. किडवाईंच्या या विधानामध्ये समाजा, फार अचूक मारा करू शकणाऱ्या बिगर-आण्विक म्हणजे पारंपरिक अस्त्रांनी भारतीय अण्वस्त्रक्षेत्राचा वेध घेतला असे अभिप्रेत असले, तरी त्या परिस्थितीतही भारत-पाकिस्तानदरम्यानचा अण्वस्त्र-तिढाच चिघळू शकतो.
हेही वाचा – मणिपूरच्या हिंसेने आपल्या ‘आयोगां’ना कुचकामी ठरवले
पाकिस्तानची आर्थिक स्थिती आज डबघाईची आहे, त्या देशाची पत उरलेली नाही, हे सारे खरेच. पण म्हणून किडवाईंची विधाने दुर्लक्षित करण्यात अर्थ नाही. पाकिस्तानी अणुकार्यक्रमाच्या ‘शिल्पकारां’पैकी ते एक आहेत, हे लक्षात घेतल्यास त्यांची विधाने गंभीर ठरतात.
युद्धखोरीचे प्रदर्शन हे कोणत्याही काळात परिस्थितीवरील समाधानकारक उत्तर ठरू शकत नाही. भारताने तर ‘प्रथम वापरास नकार’ हेच धोरण अण्वस्त्रांबाबत कायम ठेवलेले आहे. अशा वेळी आपली क्षमता वाढवणे हे जरी शक्य असले, तरीही निराळे पर्याय चोखाळून पाहायला हवेत. त्यामुळेच, उभय देशांमधील अण्वस्त्रस्पर्धा कमी करण्यासाठी भारताने पुढाकार घेणे आवश्यक आहे. संशयाचे धुके दूर होऊन काहीएक पारदर्शकता निर्माण होणे, हे दोन्ही देशांच्या फायद्याचेच ठरणार आहे. किमान, पाकिस्तानच्या अण्वस्त्रांना काबूत ठेवण्यासाठी तरी ही पावले उचलली जाणे गरजेचे आहे.
(लेखक माजी नौदलप्रमुख असून हा त्यांच्या लिखाणाचा स्वैर (परंतु तपशिलांशी प्रामाणिक) अनुवाद आहे.)