डॉ. महेश गायकवाड
महाराष्ट्रात इतके धर्म, इतके पंथ अमाप असताना वारकरी संप्रदायाला जी अफाट लोकप्रियता मिळाली ती कुठल्याही संप्रदायाला मिळाली नाही, याला कारण सामान्य माणसाशी या संप्रदायाचे असणारे जिव्हाळ्याचे नाते. उत्कट भक्ती, सदाचार आणि नीती शिकवणारा हा साधा सरळमार्गी आचारधर्म, ‘नाचू किर्तनाचे रंगी । ज्ञानदीप लावू जगी ।’ असे सांगणाऱ्या या संप्रदायात भजन, कीर्तन, हरिजागर या व्यतिरीक्त कुठलेही कर्मकांड नाही. इथे कुणीही यावे आणि ईश्वरभक्तीत रंगून जावे. ज्ञानेश्वरी – एकनाथी भागवत- तुकोबाची गाया ही या पंथाची प्रस्थानत्रयी. हे तीन ग्रंथ हृदयाशी धरावेत, पारायणे करावीत. पंढरीची वारी ही इथली एकमेव साधना, ‘भावाचा भूकेला’ असणाऱ्या ईश्वराचे नाम हा इथला पाचवा वेद ! आणि भक्ती हा इथला पाचवा पुरुषार्थ ! गळ्यातली तुळशीची माळ हीच अलंकार भूषणे ! असा हा सामान्य माणसाचा असामान्य संप्रदाय ! वारकरी परंपरेची ही चळवळ जिवंत ठेवण्याचे मोठे श्रेय वारकरी कीर्तन परंपरेला आहे. वारकरी संप्रदायाच्या या ऐश्वर्यसंपन्न आणि प्रासादिक किर्तन परंपरेचा साक्षात देखणा आविष्कार म्हणजे हरी भक्ति परायण बाबामहाराज सातारकरांचे किर्तन. वारकरी संप्रदायाची परंपरा आजच्या काळात लोकांपर्यंत घेऊन जाण्याचे व्रत हीच आयुष्याची इतिकर्तव्यता समजून या समाजप्रबोधनासाठी आयुष्य वेचणारे एक आदर्श वारकरी म्हणजे बाबामहाराज सातारकर. त्यांचे जाणे वारकरी संप्रदायाची कधीही न भरून येणारी हानी आहे. आजही किर्तन म्हटले की आठवतात ते बाबामहाराज आणि त्यांच्या कीर्तनाचा तो थाट आणि त्यातील प्रासादिकता.
सुंदर, सुशोभीत व्यासपीठ, मधोमध तुळशीहार घातलेली पांडुरंगाची तसबीर, समोर छान सजवलेली बैठक, त्यावर विराजमान झालेले बाबामहाराज सातारकर, भारदस्त व्यक्तिमत्त्व, मोहक मुद्रा, प्रसन्न वाणी, पाणीदार डोळे, गळ्यात वीणा आणि मुखात ‘सुंदर ते ध्यान,’ समोर दहा-पंधरा हजारांचा जमाव तल्लीन होऊन सर्वांगाचे कान करून ऐकत असतो. मोठ्या रसाळ आणि मधाळ भाषेत, सोप्या शब्दांत जीवनाचे मर्म सांगणारे ते तत्त्वज्ञान बुध्दीकडे तर नंतर पोहोचते त्याआधी ते थेट हृदयाला भिडते आणि ऐकता ऐकता प्रत्येकाला अंतर्मुख करून जाते. बाबा महाराज सातारकरांच्या प्रत्येक कीर्तनात येणारा हा अनुभव म्हणजे कैवल्याच्या चांदण्यात न्हाऊन जाणं असायचं. बाबामहाराजांच्या जाण्यानं संपूर्ण वारकरी संप्रदाय आज या स्वर्गसुखाला पारखा झाला. आता उरल्यात त्या बाबामहाराजांच्या मधुर, रसाळ आणि प्रासादिक वाणीच्या आठवणी आणि सुरेल, सुमधुर आणि स्वर्गीय गायनाची संस्मरणे.
भाळी टिकलीएवढा बुक्का, पांढरा स्वच्छ पोशाख, दोन्ही खांद्यावरून आलेलं उपरणं. डोईवर डौलदार वारकरी फेटा, तलम शुभ्र धोतर आणि तो तेज:पुंज चेहरा ! कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी बाबा महाराजांनी पहिली तान घेतली की, त्या क्षणी त्यांचं दिसणं थेट फोटोमध्ये पाहिलेल्या बालगंधर्वांची आठवण करून देणारं, सुरुवातीचं नामसंकीर्तन झाल्यावर, ‘माऊली महावैष्णव श्री ज्ञानेश्वर भगवान…!’ या वाक्याने सुरू होणारा प्रासादिक वाणीचा तो ओघ समोरच्या श्रोत्यांना अखंडपणे भक्तिरसात न्हाऊन टाकत असे.
नीळकंठ ज्ञानेश्वर गोरे हे बाबामहाराजांचे नाव बहुतांश लोकांना माहिती पण नसावे. ५ फेब्रुवारी १९३६ रोजी त्यांचा जन्म वारकरी संप्रदायाची १३५ वर्षांपासून परंपरा असलेल्या घराण्यात सातारा येथे झाला. पुढे त्यांनी वकिलीचे पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले पण घराण्यात दादामहाराज, आप्पामहाराज, आण्णामहाराज अशा गेल्या तीन पिढ्यांपासून कीर्तनाची व प्रवचनाची सुरू असलेली परंपरा त्यांनी पुढे अखंडीत ठेवली. बाबामहाराजांनी सुमारे १५ लाख व्यक्तींना संप्रदायाची दिक्षा दिली. त्यांनी पुरोहितबुवा, आग्रा घराण्याचे लताफत हुसेन खाँ साहेब यांच्याकडे शास्त्रीय गायनाचे धडे घेतले. श्री. चैतन्य अध्यात्मिक ज्ञान प्रसार या संस्थेमार्फत ६० ते ७० हजार भाविकांना विनामूल्य वैद्यकीय सेवा तसेच औषधे पुरविण्यात येतात. आपल्या सातारकर परंपरेचा अभिमान आणि दादा महाराज सातारकरांच्या पुण्याईची कृतज्ञता त्यांच्या बोलण्यातून व्यक्त होत असे.
त्यांचा सखोल अभ्यास आणि प्रचंड वाचन, व्यासंग तर असायचाच; पण त्यांची वाणी साधी-सोपी आणि परिणामकारक वाटत असे, याला कारण ती अनुभूतीतून व्यक्त होत असते. ते बोलायला सुरुवात करत त्यावेळी ते कुठे लिहिलेले, पाठ केलेले किंवा ठरवून ठेवलेले बोलत नसत. ते विचार उत्स्फूर्त आणि अंतरंगातून उमटलेले असतात. संत साहित्यातून कोणत्याही प्रसंगाशी लढण्याची शक्ती निर्माण कशी होते, हे सांगताना महाराज साताऱ्यातील कार्यक्रमात संयोजकांना म्हणाले होते, ‘अहो, जे जळणारं असतं ते जळतंच, जे जळणारे असतात तेही जळतातच! पण जे टिकणारं असतं ते टिकतंच, सगळ्या टीकेला पुरूनही टिकतं कारण त्याला भगवंताचं अधिष्ठान असतं..!’
बोलताना मध्येच श्रोत्यांना एखादा चिमटा घेताना त्यांच्या चेहऱ्यावर एक खोडकर भाव असायचा. करंगळी शेजारच्या बोटात खड्याची अंगठी असलेला त्यांचा उजवा हात मांडीवर फिरत राहायचा. अचानक एखादा घरगुती सोपा दृष्टांत सुचला आणि तो सांगितला की, श्रोत्यांकडे पाहत “कळलं का?” म्हणून प्रश्नार्थक हात करताना अंगठीतला खडा चमकून जायचा. त्याबरोबरच श्रोत्यांना आपलं म्हणणं पटल्याचं समाधान महाराजांच्या डोळ्यांतही चमकून जात असे. पुण्यात महाराजांचा प्रवचनाचा कार्यक्रम होता. त्याआधी सुधीर गाडगीळ, शांता शेळके आणि रोहिणी भाटे यांच्या चर्चेचा कार्यक्रम होता. त्यावेळी महाराज श्रोत्यांमध्ये बसले होते. अचानक सुधीर गाडगीळांनी महाराजांना विचारले, “समय आणि काळ म्हणजे काय?” खरे तर महाराज चर्चासत्रात सहभागी नव्हते; पण महाराजांनी पटकन् सांगितले, “तुम्हाला आणि मला केव्हा घेऊन जाईल, हे समजत नाही तो ‘काळ’ आणि आता जात आहे तो ‘समय !” आणि उपस्थितात हास्यकल्लोळ उमटला.
बाबा महाराजांशी गप्पा मारणं ही तर परमानंदाची पर्वणीच असायची. अशाच एका कार्यक्रमानंतर अनौपचारिक गप्पांत बोलता-बोलता महाराज म्हणाले होते, “सर, कोणतीही कला ही थोरच असते; पण नुसत्या कलेने कलाकार भरकटतो. ती कला जेव्हा भक्तीत रूपांतरित होते, समर्पित होते तेव्हाच ती सुफल संपूर्ण होते!” आणि याचाच अनुभव महाराजांच्या कीर्तनात येतो. त्यांचे कसदार गाणे, कमावलेला आवाज, दाणेदार ताणा, लयकारी भारावून टाकते. शास्त्रोक्त गायन पध्दतीचा वापर करतानाही शब्दांची तोडफोड न करता त्यातला अर्थ लक्षात घेऊन अभंग सादर करण्याची कला बघून पंडित भीमसेन जोशीही भारावून गेले आणि महाराजांनी गायलेल्या भैरवीला त्यांनी मनापासून दाद दिली. महाराजांच्या रंगलेल्या कीर्तनातला तो ‘नादब्रह्म’ अनुभवणं हा एक विलक्षण अनुभव आहे. ‘ज्ञानेश्वर माऊली श्री ज्ञानराज माऊली तुकाराम’ किंवा ‘रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी’ गात असताना त्यांचा फिरणारा आवाज म्हणजे एक आश्चर्यच होतं. शेकडो टाळांचा तो नाद, साथीला मृदंगावर बसलेल्याकडे बघत बघत नामघोषातील शब्दांच्या दिलेल्या हुलकावण्या, यातून उभा राहणारा तो बेहोशीचा माहोल समाधीचाच अनुभव देतो आणि त्यानंतरच ‘ब्रह्मीभूत काया होतसे कीर्तनी’ याचा खरा अर्थ कळायला लागतो.
या किर्तन परंपरेशी इमान राखताना त्यांनी आयुष्यात खूप मोठी परीक्षा दिलेली आहे. उराशी एखादे मूल्य, एखादे तत्त्वज्ञान, एखादी परंपरा, कवटाळून ध्येयनिष्ठ जीवन जगणाऱ्या व्यक्तीसाठी ‘रात्रं-दिन आम्हा युध्दाचा प्रसंग’ हे ठरलेलेच आहे. पावलोपावली असा लढा देणाऱ्या, जीवनाच्या योध्यावरही एखादा प्रसंग असा येतो की, तो त्याच्या ध्येयनिष्ठेची, धैर्याची आणि श्रध्देची परीक्षा घेत असतो. असाच हा प्रसंग आहे बाबा महाराज सातारकरांच्या जीवनातला. आज जगाच्या पाठीवर जिथेजिथे मराठी माणूस आहे तिथे-तिथे बाबा महाराज सातारकर हे नाव आणि त्यांची रसाळ वाणी पोहोचली आहे. परदेशी जाऊन इंग्रजीतून प्रवचने देऊन तिथेही त्यांनी वारकरी संप्रदायाचा झेंडा फडकवला आहे. या वयाच्या १० व्या वर्षी ते प्रथम कीर्तनाला ते उभे राहिले तेव्हापासून जवळपास गेली सात दशके वर्षे त्यांची ही कीर्तनसेवा अखंड सुरू होती. त्यांच्या वाणीत प्रासादिकता होती, अधिकार होता आणि यामागे त्यांची तपश्चर्या, त्यांचा त्यागही होता. त्यांच्या कीर्तन सेवेवरील निष्ठेची परीक्षा घेणारा तो प्रसंग ऐकताना, वाचताना काळजाचे पाणी होते आणि नकळत त्यांच्या धैर्यापुढे आपण नम्र होतो.
बाबा महाराजांचे चिरंजीव चैतन्य महाराज यांचे अकाली आणि अचानक जाणे, हा बाबा महाराजांच्या जीवनातला सर्वात मोठा धक्का होता. बाबा महाराजांचा कीर्तनाचा कार्यक्रम सुरू होता. दिवस होता १८ जुलै १९७९. चैतन्य महाराज नेहमीप्रमाणे महाराजांच्या कीर्तनाला साथ करण्याकरता टाळ घेऊन उभे होते. कीर्तन रंगात आले होते. मात्र, त्याचवेळी महाराजांसमोरील माईक बंद पडले. माईक नीटनेटके ठेवण्याची काळजी चैतन्य महाराज घेत असत, त्यामुळे ते माईक पाहण्यासाठी महाराजांसमोर गेले. त्यांनी माईकला हात लावला आणि काही क्षण हॉलमध्ये अंधार झाला. तेथे पुन्हा लाईट आली तेव्हा चैतन्य महाराजांचा देह चैतन्यहीन झाला होता. काय झाले कोणालाच कळले नाही. दुःखाचा महापूर पसरला. तल्लख बुध्दीचा, लाघवी, प्रेमळ, दयाळू स्वभावाचा अतिशय देखणे व्यक्तिमत्त्व असणारा, आपल्या सातारकर परंपरेचा भावी वारसदार असणारा एकुलता एक मुलगा गेल्याचे दु:ख… महाराजासाठी तर आभाळच फाटले होते. अशावेळी एखादा सुन्न होऊन गेला असता; परंतु क्षणभर दुःख बाजूला ठेवून त्यांनीच इतर श्रोत्यांना, भाविकांना आधार दिला आणि ईश्वराची सेवा असणाऱ्या कीर्तनात खंड नको म्हणून त्यांनी त्याही अवस्थेत कीर्तन बंद केले नाही. ते आजपर्यंत कोणत्याही सुख-दु:खाने विचलित न होता, ही सेवा अखंडित सुरूच आहे.
बाबा महाराजांच्या भगिनी माईसाहेब महाराज सातारकर या उच्चशिक्षित बी. ए., एलएल. बी. झालेल्या आणि महाराष्ट्र राज्याच्या कायदा विभागाच्या सहसचिव पदावरून निवृत्त झालेल्या त्याही याप्रसंगी हजर होत्या. त्यांनी लिहिलं आहे, “चैतन्य महाराज म्हणजे दिंडीतलं आणि कीर्तनातलं चैतन्य होतं. ते दिंडीत असले की, टाळकरी मंडळी एकदम खूष होऊन जायची; पण त्या दिवशी सारं अचानक घडलं. माईक का बंद पडला, ते बघता बघता आणि माईक दुरुस्त करता-करता चैतन्य महाराज स्वतःच माईकरूप केव्हा झाले हे आम्हाला आणि कीर्तनाला बसलेल्या कुणालाच कळले नाही, ‘माशी पांख पाखडे । तव हे सरे ।’ ही ओवी प्रत्यक्ष पाहिली व भोगली. खरेतर त्या दिवसापासून आमचे चैतन्य महाराज हे बाबा महाराजांचे माईकच झाले ! त्यामुळे ३६५ दिवस सतत ते महाराजांच्या आणि सर्वांच्या समोरच आहेत. ते कीर्तनात माईकरूप झाले आणि आजपर्यंत ते बाबा महाराजांची वाणी हजारो भक्तांपर्यंत पोहोचविण्याचे माध्यम आहेत ! म्हणजे एकाही कार्यक्रमाला चैतन्य महाराज टाळ घेऊन उभे नाहीत, असे होतच नाही. चैतन्य हा जसा बाबा महाराजांचा आत्मा होता, तसा माईकचा आवाज हा कार्यक्रमाचा आत्मा आणि कार्यक्रमाचे चैतन्य आहे म्हणून आजही बाबा महाराजांना माईक सिस्टीम उत्कृष्टच लागते. कारण मला वाटते कीर्तनात त्यांच्या समोर निर्जीव माईक नसतो तर सजीव चैतन्यच उभा असतो आणि बाबा महाराजांचे नामसंकीर्तनही अखंड सुरूच असते. तितक्याच तन्मयतेने विठोबाला ते विनवित असतात… ‘जरी हे आकाश वर पडो पाहे । ब्रह्मगोळ भंगा जाये । तरी मी तुझीच वाट पाहे गा विठोबा।’
भक्तीप्रेमाचा साक्षात्कार देणारा भागवत संप्रदाय भोळ्या भाबड्या भक्तांच्या प्रेमाचा साक्षात्कार असला तरी या वारकरी संप्रदायाचे वैचारीक अधिष्ठान असणारा मूळ विचार मात्र साऱ्या विश्वाला कवेत घेऊ शकणारा समतेचा, बंधूतेचा विचार आहे. शेकडो वर्षांपासून वारकऱ्यांनी जपलेली ही अध्यात्मिक लोकशाही आहे. वारकरी संप्रदायाच्या याच विचारांचा जागर आपल्या नामसंकीर्तनातून बाबामहाराजांनी आयुष्यभर अखंडपणे केला. ‘साच आणि मवाळ। मितुले आणि रसाळ। शब्द जैसे कल्लोळ। अमृताचे।।’ अशा त्यांच्या अमृतवाणीच्या उत्कट आविष्काराला आता महाराष्ट्र मुकला आहे. महाराष्ट्राची पारंपरिक अस्सल किर्तन परंपरा आज मुक झाली आहे.
(लेखकाचा परिचय- डॉ. महेश गायकवाड हे वारकरी संप्रदाय आणि संत साहित्याचे अभ्यासक आणि व्याख्याते आहेत. तसेच ते कराड येथील शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालयाचे प्राचार्य आहेत.)