पंकज भोसले
निर्भेळ आनंदाचे रूपांतर दारुण दु:खात करण्याची आपल्या समाजाची ताकद किती अफाट आहे, याचे दर्शन दोन दिवसांपूर्वी पतंगांच्या मांजाने घेतलेल्या बळींमधून समोर आले. या बळींची संख्या महाराष्ट्रात दोन आहे तर गुजरातमध्ये तिप्पट- म्हणजे सहा. उदारीकरणाबरोबर शहरांतून उत्तरोत्तर पतंगांंचा खेळ हद्दपार होण्याची आणि हा खेळ बदनाम होण्याची जी जी प्रमुख कारणे आहेत, त्यात नायलॉन मांजाचा क्रम सर्वात वरचा आहे. नव्वदच्या दशकात धारदार काचांचा आपापला मांजा बनविणारे पतंगबाज देशभर होते. बरेली या उत्तर प्रदेशातील शहरातून येणारा मांजा गेली कित्येक वर्षे पतंगांचे पेज लढविण्यासाठी सर्व राज्यांत पोहोचत होता. डोंगरीचा तार (तारी) मांजा हादेखील पतंग उडविणाऱ्यांना हवाहवासा वाटणारा. बरेलीचा काळा, वांगी रंगाचा, बारीक गुलाबी किंवा ‘कवटी’ मांजाधारक इतर मांजा वापरणाऱ्यांना स्पर्धेत मागे टाकत. या मांजांची गुणवत्ता, खर आणि धार या सर्वोत्तम असत पण त्यांचा उपद्रव ना पक्ष्यांना होई ना माणसे जखमी होण्याइतकी त्याची दहशत दिसे. उलट पतंग बदवणाऱ्याच्या, उडवणाऱ्याच्या बोटांवर त्या धारदारपणाचा प्रसाद उरे. सन दोन हजारोत्तर काळामध्ये पतंगबाजीत जो मोठा बदल घडला, त्यात दुसऱ्यावर कुरघोडी करण्यासाठी नायलॉन वा चिनी मांजा आणून पतंग उडविण्याचा. खरेतर ही पारंपरिक पतंगबाजी नव्हती. काच लावून बनविलेला कितीही ताकदीचा, उत्तम मसाल्याचा मांजा या चिनी मांजापुढे निष्प्रभ ठरत होता. पतंग उडविण्यासाठी, दुसऱ्याची पतंग कापण्यासाठी घशिटण्याची- ढील देण्याची विशिष्ट कला खेळाडूच्या अंगी असावी लागायची. केवळ त्या बळावर मांजा कोणताही असला, तरी हवेच्या स्थितीनुसार- पतंगबाजाच्या अनुभवानुसार निष्णात पतंगबाज इतरांच्या पतंगाला कापण्याची कला दाखवत असे. वरून पेज लावताना किंचितही न थांबता ढील देण्याचा प्रकार आणि प्रतिस्पर्ध्याची घशिटताना अधिक बदवून पुरेशी हापसण्याची स्थिती आकाशात तयार करण्याचा प्रकार पारंगत खेळाडू करत असे. पण पतंगीतल्या या सगळ्या कलाबाज्या नायलॉन मांजाने क्षणार्धात नष्ट केल्या. कारण हवेचे भान नसले-पतंग जुजबी उडवता आली तरी नवखा, अगदी लहान खेळाडूही चिनी मांजाद्वारे पारंगत पतंगबाजाला नामोहरम करण्यासाठी सक्षम ठरत असे.
बदल नेमका केव्हापासून…
नव्वदच्या दशकाच्या शेवटापर्यंत चिनी मांजा हा शंभरातील एखादा पतंग उत्साही वापरे. कारण त्या मांजाचा दर हा बरेली आणि डोंगरी मांजाहून चार ते पाच पट इतका होता. श्रीमंत आणि उच्चभ्रू वर्गातील पतंगबाजांचीच तो मांजा घेण्याची ऐपत होती. आताही त्यावर देशभरात बंदी असली, तरी निषिद्ध ठरविलेल्या ज्या ज्या गोष्टी आडमार्गाने मिळतात, तसा नायलॉन मांजाही उपलब्ध होतो. हा मांजा गुपचूप घेणारे, त्याच्या फिरक्या वापरणारे हेदेखील व्यापारी समाजातलेच अधिक. या मांजामुळे पक्ष्यांना, माणसांना, रस्त्यावर वाहन चालविणाऱ्यांना इजा होऊ शकते, याबद्दल कितीही जनजागृती झाली असली, तरी तो विचार लाथाडून केवळ पतंगबाजीत दुसऱ्यावर कुरघोडी करण्याची वृत्ती वाढत चालली आहे. छुप्या नायलॉन मांजांच्या साठ्यांवर कितीही कारवाई केली जात असली, तरी कितीही किंमत देऊन तो खरेदी करण्याची इच्छा दाखविणाऱ्यांमुळे सिनेमा पायरसीसारखा नायलॉन मांजाचा उद्योग फोफावला आहे. २००५ पासून हा मांजा मोठ्या प्रमाणावर वापरायला सुरुवात झाली. गुजरातचा पतंग महोत्सव बातम्यांचा विषय व्हायला लागला तेव्हापासून आणि तिथल्या पतंग उद्योगाने मूळच्या बरेलीमधील व्यवसायाला टक्कर द्यायला सुरुवात केली, तेव्हापासून हा मांजा देशात अधिकाधिक दिसायला लागला. या मांजाने घायाळ केलेल्या प्राणी-पक्ष्यांच्या छब्या वृत्तदळण करणाऱ्या दृक्-श्राव्य माध्यमांनी याच काळापासून दाखवायला सुरुवात केली. पतंग उडविण्याची एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित व्हायची परंपरा खेळात शिरलेल्या या अपायकारक घटकाने पूर्णपणे थांबविली.
हा मांजा पहिल्यांदा थोड्या प्रमाणावर फॅन्सी काइट्स उडविण्यासाठी चीनकडून आयातीद्वारे आला. त्या पतंगी चिनी खेळण्यांचाच भाग होत्या. तंगुसाहून ताकद ही त्याची ओळख. नंतर मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश, गुजरातमध्ये त्याची छुपी निर्मिती होऊ लागली. २०१७ साली राष्ट्रीय हरित लवादाने या मांजावर बंदी घातली. पण तरीही तो अवाच्या सवा किमतीला विकला जातो. ती किंमत मोजायला तयार असलेल्या लोकांनी पतंगबाजीतला खरा खेळ संपुष्टात आणला. मध्य प्रदेशमध्ये या मांजावरून राजकारण रंगविले गेेले. हा मांजा बनविणारी घरे उद्ध्वस्त करण्याचे आदेश स्थानिक प्रशासनाने दिले. उत्तर प्रदेशात नायलॉनच्या मांजाचे प्रकरण मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचले. त्यानंतर झालेल्या कारवायांना अल्पसंख्यविरुद्ध बहुसंख्य असा रंग चढला.
थोडा मुंबईतला इतिहास…
मुंबईत झालेल्या दंगलीपूर्वी नायलॉनचा मांजा कुठेही वापरला जात नव्हता. मुंबईतील १९९२-९३ च्या दंगलीनंतर सर्वात मोठा बदल झाला, तो मुंबईतल्या पतंग उत्सवातला गिरगाव-गिरणगावातला उत्साह आटला. पुढल्या वर्षांपासून डोंगरीतील पतंगवाल्यांवर- पतंग- मांजांवर मकरसंक्रांत काळात बहिष्कार टाकल्यासारखी परिस्थिती झाली. राज्यातील इतर भागांत आपल्या पतंग- मांजा निर्यात करून या व्यवसायातील लोक तगले होते. पण नंतरच्या काळात ती निर्यातही थंडावली. बरेली आणि डोंगरी मांजासह या विक्रेत्यांवर व्यवसाय टिकविण्यासाठी छुप्या पद्धतीने चिनी मांजा विकण्याची वेळ आली. सुरुवातीला काचेच्या मांजाहून अधिक स्वस्त असलेला हा मांजा दुप्पट-तिप्पट दराने खरीदला जाऊ लागला.
मेटल मांजाचेही संकट…
पतंगबाजीतील कुरघोडी इतकी वाढली की नायलॉन मांजाला टक्कर देणारा मेटल मांजाही मधल्या काळात तयार झाला. नायलॉनचा मांजा धारदार कात्रीने कापला तरी जातो, पण मेटलचा मांजा कात्रीने कापण्यासाठीही बरेच कष्ट करावे लागतात. हा मांजा छुप्या विक्रीद्वारे बाजारात पसरला तर पतंग खेळाची दहशतच ती न उडवणाऱ्यांना वाटू लागेल. दहीहंडीत सहभागी असलेलेच जायबंदी होतात, पण पतंगीच्या या घातक मांजाचा फटका कुणाही निरपराधांना बसू शकतोच.
गरज कशाची?
आधीच शहरांमधून हा खेळ ओसरत चाललेला असताना त्याला या मांजामुळे बदनाम होण्यापासून वाचवण्याची गरज आहे. त्यासाठी केवळ नायलॉन मांजा विक्रेत्यांंवर कारवाई करून चालणार नाही. तर तो वापरणाऱ्यांनाही हिसका दाखविला, तर पतंगबाजीत आलेल्या या ‘कुरघोडीच्या राजकारणा’ला आळा बसेल. छापे, समज देऊन सोडून देणे यापलीकडे संगनमताने या मांजाची खरेदी-विक्री यंत्रणा संपवली, तरच पतंगबाजीतील मजा उरेल. अन्यथा दुर्घटनांची मालिका हा खेळ बंद होईस्तोवर कायम राहील.
pankaj.bhosale@expressindia.com