युवराज मोहिते

गणेशोत्सवाला सार्वजनिक स्वरूप दिलं गेल्यापासून तो एकीकडे सातत्याने टीका झेलताना तर दुसरीकडे सातत्याने बदलताना दिसत आहे. लेझर किरणांचा मारा, डॉल्बीचा दणदणाट, गणेशोत्सवाच्या मिरवणुकीत ‘जय श्रीराम’च्या घोषणा हे त्याचं अगदी आजचं रूप.. असा गणेशोत्सव आपल्याला अपेक्षित आहे का ? आपल्या उत्सवांबद्दल आपण डोळस आहोत का?

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

देशभरातील गणेशोत्सव पार पडला. निर्विघ्नपणे हा उत्सव झाला का? तर त्याचं उत्तर नाही असंच आहे. गणेशाला विघ्नहर्ता म्हणतात, पण उत्सवातलं विघ्न मात्र टाळता येत नाहीये. १८९४ साली टिळकांनी गणेशोत्सव हे स्वातंत्र्यलढय़ाचं हत्यार बनवलं. अर्थात ते टिळकांचं राजकारण होतं. त्या काळामधला भाबडेपणा आता मात्र उन्मादाच्या राजकारणाचं हत्यार ठरत आहे. गणपती पूजनाची सुरुवात ही १८ व्या शतकातली. गणपती कुणी, कसा साजरा करायचा, याची एकच एक अशी काहीही आचारसंहिता उपलब्ध नाही. पेशव्यांनी गणपती पूजनाला सुरुवात केली. पुढे स्वातंत्र्यलढय़ाच्या पार्श्वभूमीवर त्याला सार्वजनिक स्वरुप आलं आणि मग हे प्रस्थ वाढत गेलं. गणेशोत्सवात मुख्यत: बहुजन समाज वाढत गेला. गणपतीच्या आरत्या या पुराणात वा संस्कृतमध्ये नाहीत. समर्थ रामदासांनी आरती मराठीत लिहिलीय. तीच सगळीकडे म्हटली जाते.

अगदी आता अमराठी लोकही तीच आरती म्हणतात. मात्र नंतर यात अनेक गोष्टी घुसडण्यात आल्या. उदा. प्राणप्रतिष्ठा आणि त्याला जोडून सत्यनारायणाची पूजा. या दोन्ही गोष्टी पुरोहित वा भटजींशिवाय होत नाहीत. यातला आर्थिक गाभा लक्षात यावा. आत्ताच्या काळात गणपती घरात बसवणाऱ्यांची संख्या बरीच वाढत आहे. अगदी सुविधांची वानवा असलेल्या झोपडय़ांमधूनही गणपती बसवला जातो. लोकलमधून प्रवास करताना नाल्यांच्या बाजूला गणपती बसवलेले दिसतात. अर्थात याबाबत अजून तरी निर्बंध कुणी आणलेले नाहीत. प्रत्येकाचा तो अधिकार अबाधित आहे. कोकणात पूर्वी महार समाजात घरी गणपती बसवले जात होते. गणपती शैव परंपरेत आहे. १९५६ साली डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू धर्म आणि त्यातील उपासनेचा त्याग करून बौद्ध धम्म स्वीकारला. घरातील देव्हारे काढून टाकण्यात आले. त्यानंतर मात्र बौद्ध समाजाने गणपतीही बंद केला.

मात्र आता सहा दशकांनंतर काही बौद्ध धम्मीय गणपती घरात आणू लागलेत. यावरून नवीनच वादंग सुरू झालाय. गेल्या काही वर्षांत या घटना घडताहेत. मागास समाजातील चर्मकार, मातंग असे इतर जातींतील लोक आपल्या पद्धतीने घरी गणपती बसवतात. मात्र बौद्धांनी घरी गणपती बसवण्यावर काही बौद्ध कार्यकर्तेच आक्षेप घेत आहेत. यातून हास्य अभिनेता भाऊ कदमही सुटले नाहीत. या प्रकारांवरून टोकाची टीकाटिप्पणी सुरू आहे. घरात जाऊन समज दिली जात आहे. बुद्धाचा विवेकवाद, चिकित्सा एका बाजूला, तर डॉ. बाबासाहेबांनी राज्यघटनेतून दिलेला श्रद्धा, उपासनेचा अधिकार दुसऱ्या बाजूला.. अशा गर्तेत काही बौद्ध कुटुंबे आजही आहेत, ही वस्तुस्थिती आहे. आजच्या एकूण परिस्थितीत श्रद्धा आणि श्रद्धेचं फॅड हा फरक ठळकपणे जाणवतो आहे. हल्ली गणपती ‘बसवणं’ हे त्याच पद्धतीचं फॅड झालंय. घर अगदी लहान असतं, पण गणपती बसवला जातो. अर्थात या सगळय़ाला अनेक कारणं आहेत. यातील एक कारण म्हणजे जगण्याचे जटिल प्रश्न. राज्यकर्ते, सरकारी यंत्रणा यांच्याकडून कल्याणकारी काही घडेल यावरून लोकांचा विश्वास उडतो आहे. लोकांनी आशाच सोडली आहे. आपलं व्यक्तिगत हित व्हावं म्हणून लोक असे ‘पावणारे’ पर्याय शोधतायत. घरचा गणपती सोडून लालबागला लाथा खायला लोक का जातात? ते यामुळेच. जिथून प्रश्न सुटतील तिथे डोकं टेकवायला लोक धडपडतायत.

यातील मागासवर्गीयांच्या घरात बसवले जाणारे गणपती हा वेगळाच प्रश्न आहे. गणपतीची पूजा, आरती यातलं काही माहीत नसतं. पण हेतू असतो तो समाजातील आपली ‘आयडेंटिटी’ बनवणं. हे सामाजिक प्रश्नाशी निगडित आहे. चार दिवसांपूर्वी कांदिवलीत ‘जय श्रीराम’ म्हणायला सांगत दलित तरुणांना मरेपर्यंत मारहाण करण्यात आली. या जखमी तरुणांना रुग्णालयात दाखल करावं लागलं. असे नवे प्रकार आता सुरू झालेत. मुळात बुद्ध आणि गणपती याचा काही संबंध आहे का? खरं तर यावर युक्तिवाद करायचा झाला तर बौद्ध परंपरा आणि गणपती याचे दाखले सूरज पंडित, सुधीर राज सिंग आणि पाली भाषेच्या अभ्यासकांनी दिले आहेत. अशोकाच्या शिलालेखात हत्ती आणि गजमुख यांना महत्त्व दिलंय. बुद्ध आणि बौद्ध धम्माचे अभ्यासक आ. ह. साळुंखे यांनी ‘भूमिपुत्र गौतम बुद्ध’ या ग्रंथात मायादेवींनी सिद्धार्थला जन्म देण्याआधी एक शुभ्र हत्ती आपल्या कुशीत प्रवेश करीत असल्याचं स्वप्न पाहिलं होतं याची मीमांसा केली आहे. सुरुवातीच्या बौद्ध साहित्यामध्येही गजवदनाचं वेगवेगळं स्वरूप विशद केलेलं आहे.

पाली भाषेत ‘गण’ याचा अर्थ समूह आणि गणाचा नायक ठरतो तो म्हणजे गणपती. बौद्ध भिक्खूंचे गण होते. बौद्ध साहित्यात विनायक असाही उल्लेख आहे. बुद्धाने जो अष्टांग मार्ग सांगितला तोच पुढे अष्टविनायक झाला, असं सुधीर राज सिंग म्हणतात. तिबेट किंवा थायलंडसारख्या बौद्धमय भागांत गणपती बुद्धाच्या जोडीने विराजमान आहे. बौद्ध परंपरेमध्ये गणेशाच्या मूर्ती दिसायला सुरुवात होते. आग्नेय आशिया, मध्य आशिया आणि पूर्व आशियामधून गणपती-विनायक हळूहळू लोकमानसात रुजताना दिसतात. यांचा प्रसार निश्चितच भारतामधून झाला. त्याला धर्माची बंधने कधीच नव्हती. तो जिथे गेला त्या संस्कृतीला आपला रंग देऊन त्यात रमला, अशी माहिती सूरज पंडित देतात. गणपती ही विघ्न आणणारी, करणी करणारी, अरिष्ट देणारी देवता म्हणूनही प्रख्यात होती, भीतीपोटी त्याला पूजलं जायचं, असेही सांगितले जाते. यातूनच गणपती ही लोकदेवता झाली. आपापल्यापरीने मग त्याच्या आख्यायिका आणि उपासना होऊ लागल्या. यातूनच गणपतीने भौगोलिक सीमा ओलांडल्या.

या सर्व पार्श्वभूमीवर एक गोष्ट अधोरेखित होते ती म्हणजे बौद्ध परंपरेत गणपती आहे आणि बुद्ध तत्त्वज्ञानासोबत त्याचाही जगभर प्रचार झालाय. आता बौद्धांनी गणपतीची उपासना केली तर हा युक्तिवाद होऊ शकतो की नाही? पण बाबासाहेबांनी जो विवेकवाद मांडलाय त्याच्या हे विपरीत ठरतं. असो, अनेक शतकं गणपतीला भारताबाहेर महत्त्व आहे. पण यात गणेश प्रतिष्ठापना वा विसर्जन ही प्रथा वा पद्धत दिसत नाही! पेशव्यांनी पुण्यात गणपती पूजला तो आपलं याने नुकसान करू नये या हेतूने. लढाया आणि सत्ता यात गणपती सोबत राहावा, ही अपेक्षा. त्या वेळी विसर्जन ही पद्धत नव्हती. मग भारतात हे विसर्जन आलं कुठून? विसर्जनाची एक गोष्ट सांगितली जाते ती अशी की पुण्यात गणेशोत्सव सुरू झाला तेव्हा त्याची मिरवणूक काढली जायची. या मिरवणुकीदरम्यान चर्मकार समाजातील एका भक्ताने गणपतीच्या मूर्तीला हात लावून नमस्कार केला. आता हा बाटलेला गणपती माघारी कसा न्यायचा, हा प्रश्न निर्माण झाला. मग त्याचं विसर्जन पाण्यात केलं गेलं. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या नावे ही पोस्ट वितरित केली जात होती. मात्र त्याला कोणतीही पुष्टी वा पुरावा दिला जात नाही. पण विटाळ झाल्यानंतर अंगावर पाणी घेऊन शुद्धी मिळते ही पद्धत तर आपल्याकडे पाळली जाते ना?

असो. गणपती या लोकदेवतेबाबत अनेकानेक आख्यायिका आहेत. या आख्यायिकांमुळे कालानुरूप गणपतीचं स्वरूप बदलत गेलं. आजचं कर्कश डीजे, ढोलताशे लावून विसर्जन करण्याचं विद्रूप स्वरूप आहे. ‘जय श्रीराम’ म्हणत गणपतीला विद्वेषाचं हत्यार बनवलं जात आहे. ‘विघ्नकर्ता’ या मूळ स्वरूपाकडे गणपतीला नेण्याचा कर्कश प्रयत्न होतो आहे. एरवी विसर्जनाच्या वेळी लोक भावुक असतात. यंदा ‘जय श्रीराम’च्या उन्मादी घोषणा अधिक होत्या. ‘बाप्पा मोरया’वरून फोकस ‘जय श्रीराम’वर केला जातोय. गणपतीचं सोयीस्कर हिंदीकरण वाढीस लागलंय. विद्येची, बुद्धीची देवता ही गणेशाची ओळख, ती विद्वेषाची देवता करण्याचा हा डाव आहे. गणपती उत्सवात देखावे उभारून सामाजिक संदेश दिला जात असे. बंधुभाव, अंधश्रद्धा, पर्यावरण, महिला अत्याचार, विज्ञान असे विषय देखाव्यातून समंजसपणे मांडले जात होते. आता सगळं लक्ष विसर्जनाच्या डीजेवर केंद्रित केलं जातं. यातूनच समाजकंटकांची घुसखोरी होते. अंमळनेरला मिरवणुकीत गांधींच्या खुन्याचे फोटो झळकवले गेले. आयोजक मंडळाने या प्रकाराबाबत हात वर केले. मग कोण होते हे लोक? आळंदीच्या वारीत धर्मवाद्यांची घुसखोरी झाली तसाच हा प्रकार दिसतोय. गणपतीआडून सुरू असलेला हा उन्माद बाप्पाचे भक्तही मुकाटय़ाने पाहताहेत.

हा सगळा प्रकार म्हणजे गणपतीच्या आडून काही समाजघटकांवर वर्चस्व, दहशत निर्माण करण्याचा आटोकाट प्रयत्न आहे. काही लोकांना वाटणारी असुरक्षितता ही यामागची वस्तुस्थिती आहे. या पार्श्वभूमीवर गणपती घरी आणला की मी सवर्ण होईन, ‘त्यांचा’ होईन हा भाबडा प्रयत्न असतो. पण या प्रयत्नाचा उपयोग होईलच असं नाही. या सगळय़ाकडे जरा डोळसपणेच पाहायला हवं. प्रबोधन सर्व पातळय़ांवर व्हायला हवं. यातला महत्त्वाचा भाग म्हणजे माझ्या श्रद्धेचा कुणी गैरफायदा घेता कामा नये आणि त्यातून दुसऱ्या कुणाला असुरक्षितही वाटू नये याची दक्षता प्रत्येकाने घ्यायला हवी!!! मोरया !!!

लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत.

Story img Loader