डॉ. विनया जंगले

नामिबियातून भारतात आणल्या जाणाऱ्या चित्त्यांविषयी प्रचंड कुतूहल व्यक्त होत आहे. एखाद्या विशिष्ट परिसरातून नामशेष झालेला वन्यजीव जेव्हा अन्य एखाद्या देशातून आणला जातो, तेव्हा तो रुळेपर्यंत कोणती काळजी घेतली जाते याविषयी..

Pune growing urbanization, PMPL, Pune metro,
सावध ऐका पुढल्या हाका…
IND vs PAK Abhishek Sharma and Pakistani Bowler Fights Indian Batter Gives Death Stare After Fiery Send Off Watch Video
IND vs PAK: भारत-पाकिस्तान सामन्यात राडा, पाकिस्तानी गोलंदाजाने…
Bike Safety Tips
चोरांपासून बाईक सुरक्षित ठेवण्यासाठी महत्त्वाच्या टिप्स
environment protection from debris
फेनम स्टोरी: भंगारातून पर्यावरण रक्षण
cardiologists reveal age at which woman should start getting tested for heart disease
महिलांनी कोणत्या वयात हृदयविकाराची चाचणी केली पाहिजे? डॉक्टरांनी केले स्पष्ट
loksatta kutuhal handwriting recognition intelligent character recognition technology
कुतूहल : हस्ताक्षर ओळख – वैविध्यातून शिक्षण
Use of plastic will be dangerous for agriculture
प्लास्टिकचा भस्मासूर शेतांना गिळंकृत करू पाहतोय…
car maintenance tips
पावसाळा संपल्यानंतर अशी घ्या कारची विशेष काळजी; ‘या’ पाच महत्त्वाच्या टिप्स लक्षात घ्या

भारत स्वतंत्र झाला त्या वर्षी येथील जंगलांतून नष्ट झालेला चित्ता स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षांत भारतीय जंगलात पुन्हा येत आहे. एखादा वन्यप्राणी नष्ट झाल्यावर अन्य ठिकाणावरून आणून पुन्हा नव्याने त्या जंगलात सोडणे, हा जगभरातील पर्यावरण संवर्धन चळवळीचा एक भाग झाला आहे. अमेरिकेत यलो स्टोन उद्यानातून नष्ट झालेल्या लांडग्यांचे यशस्वीरीत्या स्थलांतर केले गेले. इंग्लंडमधील केंटच्या जंगलात बायसनचे स्थलांतर करण्यात आले. चीनमधील जंगली घोडे नष्ट झाले तेव्हा ते जर्मनी, इंग्लंडच्या जंगलातून आणले गेले. आता तेथील जंगली घोडय़ांची संख्या ८०० पर्यंत पोहोचली आहे.

प्राणी एका जंगलातून दुसऱ्या जंगलात सोडताना काही विशिष्ट प्रक्रिया काळजीपूर्वक पार पाडाव्या लागतात. ‘इंटरनॅशनल युनियन फॉर कॉन्झव्‍‌र्हेशन ऑफ नेचर’ (आययूसीएन) ही संस्था या प्रक्रियेचे नियमन करते. एखादा प्राणी जंगलात सोडताना त्या जंगलात त्या प्राण्याचा पूर्वी कधी तरी नैसर्गिक अधिवास असावा लागतो. तेथील मूळचा प्राणी नष्ट झाल्यावर अधिवासात झालेल्या बदलांची नोंद घ्यावी लागते. मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानात एके काळी चित्त्यांचा वावर होता. तिथे गवताळ कुरणे मोठय़ा प्रमाणात होती. परंतु मध्यंतरीच्या काळात ही कुरणे कमी झाली. त्यामुळे त्या ठिकाणी चित्त्यांसाठी गवताळ कुरणाचा अधिवास नव्याने निर्माण करण्यात आला. जंगलात सोडलेल्या प्राण्यांसाठी तिथे पुरेशा प्रमाणात खाद्य उपलब्ध असावे लागते. कुनोमध्ये चितळ, नीलगाई, भेकर या शाकाहारी प्राण्यांची संख्या मुद्दाम वाढवली गेली आहे.

जंगलात जो प्राणी सोडायचा आहे, त्याची प्रजाती किंवा उपप्रजाती ही तेथील नष्ट झालेल्या प्राण्याशी मिळतीजुळती असावी लागते. भारतात पूर्वी आशियाई प्रजातीचे चित्ते होते आणि आता भारतात येणारी चित्त्याची प्रजाती ही आफ्रिकन आहे. आशियाई सिंह आणि आफ्रिकन सिंहाचा विचार केला तर त्यांच्यात बराच फरक आहे. परंतु आफ्रिकन चित्ता हा आशियाई चित्त्याच्या प्रजातीशी बराचसा मिळताजुळता आहे. भारतीय चित्त्यावर पुस्तक लिहिणाऱ्या दिव्यभानू सिंग यांनी ही बाब त्यांच्या पुस्तकात नोंदवली आहे. परंतु कधी कधी अशा प्रकारे दुसरी प्रजाती जंगलात सोडण्यावर पर्यावरणतज्ज्ञ आक्षेप घेताना दिसतात. इंग्लंडमध्ये असलेली निळी फुलपाखरे काही कारणांमुळे नष्ट झाली होती. तेथील शास्त्रज्ञांनी त्यामागील कारणांचा शोध घेतला. या फुलपाखरांच्या वाढीसाठी नेमका अधिवास निर्माण केला गेला. स्वीडनमधील त्याच जातीच्या निळय़ा फुलपाखरांची अंडी आणून विशिष्ट झाडांवर ठेवण्यात आली. त्यावर काही पर्यावरणतज्ज्ञांनी ही स्वीडनची प्रजाती आहे, ती इंग्लंडच्या प्रजातीपेक्षा थोडी वेगळी आहे, असा आक्षेप घेतला. परंतु यावर इंग्लंडमधील विविध ठिकाणची निळी फुलपाखरे किंचितशी का होईना वेगवेगळी आहेत आणि त्यातील बरीचशी स्वीडनच्या फुलपाखरांशी मिळतीजुळती आहेत, असे उत्तर शास्त्रज्ञांनी दिले. योग्य वेळी स्थलांतर करण्यात आल्यामुळे आज इंग्लंडमध्ये ३० ठिकाणी मोठी, निळी फुलपाखरे भिरभिरताना दिसतात.

प्राणी जंगलात सोडण्यापूर्वी त्यांची संपूर्ण तपासणी करावी लागते. कधी कधी प्राणिसंग्रहालयात वाढवलेले प्राणी जंगलात सोडले जातात. परंतु हे प्राणी संपूर्ण निरोगी असणे महत्त्वाचे असते. प्राणिसंग्रहालयांतील प्राण्यांना माणसांच्या संपर्कामुळे क्षयरोग होऊ शकतो. बृसेलासारख्या रोगाचा प्रादुर्भाव या प्राण्यांमध्ये आढळतो. त्यासाठी त्यांच्या रक्ताची तपासणी करावी लागते. अन्यथा जंगलातील प्राण्यांमध्ये हे रोग संक्रमित होऊ शकतात. तपासणी केल्यावर प्राणी निरोगी असल्याचे आढळले तरी ज्या जंगलात त्यांना सोडायचे आहे, त्या ठिकाणी काही काळ त्याला निरीक्षणाखाली ठेवावे लागते. काही वर्षांपूर्वी मुंबईतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानात वाढवलेली चितळे तुंगारेश्वर अभयारण्यात सोडायची होती. त्या वेळीही तुंगारेश्वर अभयारण्यात या चितळांसाठी तात्पुरते कुंपण तयार करण्यात आले होते. महिनाभराने त्यांना अभयारण्यात मुक्त करण्यात आले. प्राण्यांचे एखाद्या जंगलातून अन्य जंगलात स्थलांतर केल्यानंतर काही कारणामुळे प्राणी दगावला किंवा त्यांची संख्या पुन्हा कमी झाली तर काही प्राणी नव्याने सोडायची गरज भासू शकते. अशा वेळी जिथून प्राणी आणले त्या ठिकाणी ती प्रजाती मोठय़ा प्रमाणात उपलब्ध असावी लागते. कारण प्राण्याचे स्थलांतर ही सतत काही वर्षे चालणारी प्रक्रिया असते. एकदा प्राणी सोडले म्हणजे झाले, असे होत नाही.

नव्या ठिकाणी सोडलेल्या प्राण्याचे सतत निरीक्षण करत राहावे लागते. त्यासाठी त्यांच्या गळय़ात रेडिओ कॉलर लावावी लागते. त्यामुळे त्यांचा जंगलातील ठावठिकाणा कळत राहतो. प्राण्यांच्या वागणुकीबाबतच्या गोष्टी नव्याने कळतात. यलो स्टोन उद्यानात स्थलांतर केलेल्या लांडग्यांच्या गळय़ात रेडिओ कॉलर लावली गेली होती. शक्तिशाली टेलिस्कोपमधून लांडग्यांचे निरीक्षण केले जात असे. २००६ साली जन्माला आलेल्या एका मादीचे नाव ०६ असे ठेवण्यात आले. तिने दोन सख्खे भाऊ असलेल्या लांडग्यांबरोबर कळप केला. त्या दोघांना शिकार करायला तिनेच शिकवले. मोठय़ा भावाबरोबर राहून तिने पिल्लांना जन्म दिला. लहान लांडगा तिच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करायचा तरी ती त्याला जवळ येऊ द्यायची नाही. या ०६ चे जगभर अनेक चाहते निर्माण झाले. ७ डिसेंबर २०१२ रोजी ती उद्यानाच्या सीमारेषेबाहेर गेली आणि एका शिकाऱ्याच्या गोळीला बळी पडली. तिच्या मृत्यूने जगभरातील प्राणिप्रेमी हळहळले.

स्थलांतरित प्राण्यांमुळे तेथील पर्यावरणावर काय परिणाम होतो, याचेही निरीक्षण करावे लागते, नोंदी ठेवाव्या लागतात. काही काळ नाहीसा झालेला प्राणी नव्याने आल्यावर बरेच बदल दिसून येतात. इंग्लंडमधून हजारो वर्षांपूर्वी नाहीशा झालेल्या बायसनचे पुन्हा तेथील जंगलात स्थलांतर झाले त्या वेळी त्याचे चरणे, झाडाची साल खाणे, झाडे पाडणे, धुळीत लोळणे इत्यादी क्रियांमुळे तेथील भूभागाची जैवविविधता नव्याने पुनरुज्जीवित झाल्याचे लक्षात आले. ऑस्ट्रेलियात स्थलांतरित केलेला रॅट कांगारू जमीन खोदतो. त्यामुळे वर्षांला टनांनी माती वर- खाली होते. त्यामुळे झाडांच्या बियांचा प्रसार होतो. जमिनीतील पोषक द्रव्ये वाढतात.

काही पर्यावरणतज्ज्ञांनी परदेशातून भारतात चित्ते आणण्यास विरोध दर्शवला आहे, परंतु प्राण्यांचे स्थलांतरण पूर्ण काळजी घेऊन आणि नियम पाळून केले तर ते बऱ्याच प्रमाणात यशस्वी होते, हा आजवरचा जागतिक अनुभव आहे. पर्यावरणातील काही ठिकाणाचे प्राणी-पक्षी नष्ट झालेले आहेत. अशा वेळी नियमांच्या अधीन राहून त्यांचे स्थलांतर केले तर पर्यावरणसमृद्धीला हातभार लागतो, यात शंका नाही.