डॉ. अनिल कुलकर्णी
राज्याच्या शालेय शिक्षण मंत्र्यांनी परवाच पहिली ते चौथी या इयत्तांचा गृहपाठ बंद करण्याचे सूतोवाच केले. याबाबत शिक्षणतज्ज्ञांशी चर्चा करून निर्णय घेतला जाणार असल्याचे सांगितले. खरोखरच गृहपाठ बंद व्हायला हवा असेल तर, तसे करणाऱ्या अनेक ठिकाणच्या यशोगाथा विचारात घ्यायला हव्यात. गृहपाठ बंद होणे हा केवळ आनंदाचा व सुटकेचा श्वास होऊ नये तर ती एक बदलती जीवनशैली म्हणून स्वीकारायला हवी.
वर्गातील अध्यापन जर सशक्त असेल, लक्षात राहण्यासारखे असेल तर गृहपाठाची गरज नसते. काही आठवणीतले शिक्षक असेही आहेत की ज्यांनी वर्गात कविता चालीवर म्हणत शिकवली होती ती आजपर्यंतही लक्षात राहते. अनेकांचे संबोध वर्गातच इतके दृढ व्हायचे की पुन्हा त्यांना घरी काही करायची गरज ही भासत नसें.
सगळेच न शिकाविता काही भाग विद्यार्थ्यांना स्वतः शिकण्यासाठी घरी द्यावा , काही भाग पालकांनी पक्का करून घ्यावा. अमुक एक भाग वर्गात न शिकविता विद्यार्थ्यांनीच तो स्वयं अध्ययनाद्वारे शिकावा याबाबतीत त्यांचे उद्बोधन आणि प्रशिक्षण घेता येईल. पण गृहपाठ मुले करत असताना तो चिंतन, मनन याचा भाग होतो का? नसेल होत आणि मुले फक्त सादरीकरण करत असतील तर त्याला काही अर्थ आहे का याचाही विचार होणे अत्यंत आवश्यक आहे.
अनेकदा तर हळवे पालकच मुलांचे गृहपाठ करतात. गृहपाठ करणे ही यांत्रिक क्रियाच होणार असेल तर तो घ्यायचा कशासाठी? अनेक शिक्षक तो देतात, मुले किंवा पालक तो करून सादर करतात. तो तपासला जातो का? गृहपाठाच्या इतक्या प्रचंड वह्या शिक्षकांकडून तपासणे प्रामाणिकपणे होते का? शिक्षा मिळू नये म्हणून अनेक वेळा विद्यार्थी सुद्धा गृहपाठ कॉपी करून सादर करतात याकडे कसे पाहणार? मुले गृहपाठ समजून करतात का? केवळ शिक्षकांनी सांगितले म्हणून देखावा करणे हे कितपत योग्य आहे? ऑनलाइन च्या काळात अनेक पालकांनी व्यायामाचे पाच मिनिटाचे व्हिडिओ काढून पाठवल्याने मुलांमध्ये व्यायाम करण्याची शिस्त लागली का?
शाळेतच प्रभावी शिक्षण
कृतीतून मुले जर शिकली तर त्यांना गृहपाठाची गरज भासत नाही कारण ते त्यांच्या चांगल्या लक्षात राहते. आपल्या शिक्षण व्यवस्थेमध्ये मुलांना वर्गात कृती करायला संधी मिळत नाही. ‘ग्राममंगल’सारख्या प्रयोगशील शाळांमधून मुले कृती करत गटागटात बसून चर्चा करून शिकतात. शिक्षक फक्त मार्गदर्शक असतो. या प्रकारचे अध्यापन वाढीस लागायला हवे. ‘ग्राममंगल’ने स्वतःची शैक्षणिक साहित्य निर्मिती केली आहे. कोणताही घटक शिकवताना शैक्षणिक साहित्याच्या साह्याने मुले स्वतःच त्या प्रश्नांची उकल करत शिकत असतात, त्याच्यामुळे पुन्हा वेगळा गृहपाठ द्यायची आवश्यकताच भासत नाही.
गृहपाठाची विद्यार्थ्यांच्या मनात भीती बसायला नको. गृहपाठ केला नाही म्हणून अनेकांना शाळेत जायची, शिक्षकांकडून अवहेलना होण्याची भीती वाटतें. मुळात शिक्षण आपण जेव्हा आनंदी प्रक्रिया म्हणतो आनंददायी म्हणतो, तर तिथे जावेसे वाटले पाहिजे.
वारे गुरुजींच्या शाळेत मुले शाळा सुटण्याची वेळ झाली तरी शाळेतच राहून अध्यापन करत होती. मुलांना घरी जावेसे वाटतच नसेल इतक्या प्रभावीपणे अध्यापन शाळेत झाले तर मुलांना पुन्हा घरी अभ्यास करायची गरज पडत नाही. गृहपाठाचा भाग शाळेच्या शेवटच्या दहा मिनिटातच थोडक्यात देऊन वर्गातच पूर्ण करावा. मात्र तो दहा मिनिटाचा असावा आणि विद्यार्थ्याला आकलन झाले किंवा नाही एवढेच पाहण्याचा उद्देश असावा किंवा गृहपाठ जरी दिला तर तों फक्त मौखिक असावा. मुलांनी मौखिक पाठांतर घरी करावे आणि दुसऱ्या दिवशी शिक्षकांनी फक्त त्याची चाचणी करावी. लेखी स्वरूपात नको म्हणजे गृहपाठाची भीती वाटणार नाही. मूल हे क्षणाक्षणाला परिसरातून शिकत असते. प्रत्येक शिकण्याचे दाखले द्यायचे नसतात. ज्याला त्याला आकलन झाले किंवा इतरांनाही त्यातून बोध झाला हे महत्त्वाचे आहे.
कृती आणि मूल्ये
आमची मुले घरी किती कामे करतात, श्रमप्रतिष्ठेची कामे कोणती करतात, आई वडिलांना मदत करतात का? त्या दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांना श्रमाची विभागणी करून दिली गेली पाहिजे त्याची जाणीव करून दिली गेली पाहिजे. याच प्रमाणे, समाजातही दिसले पाहिजे की विद्यार्थी समाजासाठी काहीतरी करतात. केवळ एक दिवसाचा स्काऊट आणि गाईड किंवा वृक्षारोपण असल्या गोष्टी करून मुलांमध्ये मूल्ये रुजणार कशी?
आपल्याकडे शिक्षणापेक्षा आरोग्याला प्राधान्य देण्याची वेळ मागच्या दोन वर्षात आली होती. शाळा बंद होत्या पण अस्तित्व टिकवायचा असेल, जगायचं असेल तर हात स्वच्छ धुतलेच पाहिजेत आंतर ठेवलंच पाहिजे या जाणीवा मुलांमध्ये विकसित झाल्या, त्यांना कोणी ग्रुहपाठ दिला नव्हता, पण जेव्हा अस्तित्व धोक्यात येतं तेव्हा आपल्याला अनेक गोष्टी कराव्याच लागतात, तोच खरा गृहपाठ असतो. एक विषाणू आपल्याला गृहपाठ काय देतो, एकमेकापासून विलगीकरणात काय राहायला लावतो आणि आपण तो विना तक्रार करतो, त्यातून बचावतो. करोना संपला की कोणीही आज अंतर पाळत नाही, सॅनिटायझर वा बहुतेकदा मुखपट्टीही वापरत नाही म्हणजेच ही मूल्ये रुजली नाहीत. आपल्या बाबतीत हे आहे तर विद्यार्थ्यांनी च्या बाबतीतही आपण अपेक्षा कशा ठेवणार?
सहभाग महत्त्वाचाच
शिक्षकांनी सांगितले म्हणून गृहपाठ नाही करायचा तर शिक्षकांनी न सांगता सुद्धा जेव्हा विद्यार्थी गृहपाठ करतील तेव्हाच विद्यार्थ्यांची गोडी अभ्यासाबाबत निर्माण होईल. गृहपाठ केला नाही म्हणून शिक्षा आजही होत आहेत या मुलांना शिक्षणापासून दूर नेत आहेत या परिस्थितीमध्ये गृहपाठाचा नव्याने विचार करण्याची वेळ आता आली आहे
विद्यार्थ्याला स्वतः वाटले पाहिजे की आपण अभ्यासात मागे आहोत आणि अभ्यास केल्याशिवाय आता गत्यंतर नाही हे जेव्हा त्याला स्वतः जाणीव होईल तेव्हाच तो अभ्यासाकडे वळेल. विद्यार्थ्यांना केवळ आता अध्यापन नको तर समंत्रणाद्वारे बराचसा अभ्यासक्रमाचा भाग समजावून सांगायला हवा, म्हणजे सबंध भाग शिकवायचा नाही तर विद्यार्थ्यांना घरी वाचून यायला सांगून फक्त वर्गात चर्चा करायची किंवा अवघड संबोध स्पष्ट करायचे असे केले तर वर्गात विद्यार्थ्यांचा ‘सहभाग’ वाढेल व पुढे त्यांना वेगळे घरी काही करण्याची गरज भासणार नाही. याबाबतीत मुक्त विद्यापीठांमध्ये कौन्सिलिंगने दोन वर्षाचा अभ्यासक्रम ४० दिवसात शिकवला जातो आणि तो यशस्वीही होत आहे. नोकरी करत करत स्वयंअध्ययाने विद्यार्थी जे कधीच पदवी चे शिक्षण घेऊ शकले नाहीत ते आज पदवी, पदयुत्तर व विद्यावाचस्पती पदव्या प्राप्त करत आहेत.
त्याच प्रकारे विद्यार्थ्यांना शिकवण्याचा भडिमार न करता त्यांना स्वतःहून शिकू द्या, त्यातलाच हा गृहपाठ भाग आहे. पहिली ते चौथीसाठी तो बंद झाला तर विद्यार्थी अभ्यासच करणार नाहीत ही भीती पालकांनी काढून टाकायला हवी. जे काही होईल ते वर्गातच आणि घरी फक्त उजळणी किंवा देखरेख पालकांनी करावी पण विद्यार्थ्यांचे कोणतेच शैक्षणिक कार्य पालकांनी करू नये आणि विद्यार्थ्यांच्या प्रोजेक्टमध्ये अधिकांश भाग पालकांचाच असेल तर त्या प्रोजेक्टला अर्थ नाही. तसेच या दृष्टीने पालकांनी आपल्या पाल्यांना स्वयंअध्यापनाकडे प्रवृत्त करायला हवं. विद्यार्थ्यांना एकलव्य होऊ द्या.
गृहपाठ न देणाऱ्या शाळाही आज चांगले काम करीत आहेत. तसेच दप्तराचे ओझे आणायची गरज नसलेल्या शाळा ही आज चांगल्या कार्यरत आहेत व चांगले निकाल देत आहेत, अशा काही शाळांची रोल मॉडेल म्हणून निवड करून तो पथदर्शी प्रकल्प काही शाळांत राबवायला हरकत नाही. गृहपाठ न देणे म्हणजे मूल, पालक व शिक्षक यांची आपापल्या जबाबदारीतून सुटका करणे नव्हे, तर त्या जबाबदारीचे स्वरूप आणखी गांभीर्याने ओळखणे! गृहपाठ न देण्यातून आपल्यावर येणारी जबाबदारी आपण ओळखायला हवी.
लेखक शिक्षणविषयक लिखाण करतात. anilkulkarni666@gmail.com